चव अशीही

काही चवी ताटात वाढल्या जात नाहीत, त्या अनुभवाव्या लागतात. सायीची खरपूड, भाताचा कुरकुरीत तळ, चिवड्याची फोडणी किंवा पन्ह्याच्या ग्लासातला शेवटचा घोट... या साध्यासुध्या पण अविस्मरणीय चवी आपल्या खाद्यसंस्कृतीतील छोट्या-छोट्या आनंदाचा खजिनाच आहेत.
चव अशीही
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

काही चवी ताटात वाढल्या जात नाहीत, त्या अनुभवाव्या लागतात. सायीची खरपूड, भाताचा कुरकुरीत तळ, चिवड्याची फोडणी किंवा पन्ह्याच्या ग्लासातला शेवटचा घोट... या साध्यासुध्या पण अविस्मरणीय चवी आपल्या खाद्यसंस्कृतीतील छोट्या-छोट्या आनंदाचा खजिनाच आहेत.

चमचमीत, गोड, नमकीन, तिखट, मसालेदार पदार्थ त्यांच्या चवीने आपल्या जीभ, पोट आणि मनाला तृप्त करतच असतात. पण असे काही पदार्थ....त्यांना पदार्थ म्हणण्यापेक्षा, एखाद्या पदार्थातून जन्माला येणारे, तसे क्षुल्लक पण चवीची एक वेगळीच अनुभूती देऊन जाणारे, ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

बहुतेक प्रत्येक घरात दिवसातून दोन वेळा तरी दूध तापवलं जात असतं आणि प्रत्येक वेळी भांड्याच्या कडेला, तळाला सायीची खमंग खरपूड चिकटून रहात असते. दुधाचं भांडं रिकामं झालं, की ही भांड्याच्या कडेची सुकलेली, तळाची तशी मऊ असलेली सायीची खरपूड चमच्याने खरवडून खाण्याचा आनंद ज्याने घेतलाय, त्यालाच यातली गंमत कळू शकते. शक्यतो आइस्क्रीमचा असतो तसा चपटा चमचा घ्यायचा, मस्त मांडी ठोकून बसायचं, समोर दुधाचं रिकामं भांड घ्यायचं आणि चमच्याच्या कशण्ण कशण्ण आवाजात सगळ्या भांड्याला लागलेली मऊ कुरकुरीत सायीची खरपूड एकत्र करायची. आता पूर्वी दूध पाणीदार नसायचं, त्यामुळे भांड्याला चिकटलेली सायीची खरपूड सुद्धा खमंग, जाडसर असायची. आज तो थर पातळ असतो इतकंच. तर, भांड्याची संपूर्ण साय तळाला जमा होऊन भांडं चकचकीत झालं की त्या जमा झालेल्या खरपूस सायीच्या खरपुडीचा आस्वाद घ्यायचा. आता काही खवय्ये हा आस्वाद त्यात साखर घालूनही घेतात.

अशीच शिजलेल्या भाताची खरपूड (कुकरमधल्या नाही बरं) अर्थात तळाशी लागलेला कुरकुरीत भात, जो चवीला अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतो, हाही एक मस्त जिव्हानंद देणारा प्रकार. आता ही खरपूड कशी खावी? तर ती गरम असताना त्यावर लोणकढं तूप, मीठ टाकून किंवा अगदी वरण भातात कुस्करून खायलाही मज्जा येते.

सायीच्या खरपुडीचा विषय चाललाय म्हणून सांगतो, पूर्वी सरकारी केंद्रावर दुधाच्या बाटल्या मिळायच्या. या बाटल्यांच्या तोंडावर लावलेल्या पातळ अल्युमिनियम बुचांच्या आतल्या बाजूने आणि बाटलीच्या तोंडाला इतकी दाट साय लागलेली असायची, की बूच काढून बाटली उलटी केली तरी दूध सांडत नसे. या बाटलीचं बूच हलकंच काढायचं, त्याच्या आतल्या बाजूला लागलेल्या दाट सायीवरून जीभ फिरवायची आणि चाटून पुसून फस्त करायची. केवढा आनंद भरलेला होता या चवीत आणि त्या कृतीत.

काही वेळा दूध नासतं, अर्थात बंगाली मिठाया बहुधा दूध फाडूनच केल्या जातात म्हणा. तर दूध नासलं की त्यात साखर किंवा शक्यतो गुळ, वेलची पूड घालून जो पदार्थ तयार होतो त्या चवीला तोड नाही. या पदार्थाला सुई मुई, नसकवणी किंवा छेन्याची मिठाई म्हणतात. हा प्रकार खाताना दुधाची खरपूस, गुळाची खमंग गुळमट चव, वेलचीचा स्वाद एक होतात आणि चवीचा मस्त आनंद देऊन जातात.

आमच्याकडे केकच्या भांड्यात केक केल्यावर...पण थांबा. इथे एक सांगू इच्छितो, हा आमच्या घरी बनणारा केक पूर्ण पिकलेली केळी, रवा, साखर यांपासून बनतो. तर केक बनला आणि प्लेटमध्ये भांड्यासहित उलटा केला, की रिकाम्या केकच्या भांड्याच्या तळाला, केकचं मिश्रण त्यात टाकण्यापूर्वी पेरलेली साखर आणि फिरवलेला तुपाचा हात याच्या खमंग मिश्रणाची ओलसर खरपूड चिकटलेली असते. केक खाण्याआधी चमच्याने ती खरवडून खाताना, साखर, तूप आणि खरपूस भाजलेल्या केकचे तळाचे अवशेष एकत्रित मुखात जातात आणि एक वेगळीच चव देऊन जातात.

बटाटा भजी किंवा बटाटा वडा हे चमचमीत चविष्ट पदार्थ अनेक घरात अधूनमधून बनत असतात किंवा आपल्या आसपास मिळणाऱ्या दुकान, स्टॉल इथून आणले जातात. जिभेची हुळहुळ वाढवणारे, तोंडाला पाणी सुटणारे हे पदार्थ खातानाच, गरम तेलात वडा भजीसोबत गेलेला आणि खरपूस तळलेला बेसनचा कुरकुरीत बारीक चुरा, जो त्यांच्यासोबत ट्रेमध्ये अवतरतो, तो खाण्यात जी मज्जा आहे ती सांगून नाही तर खाऊनच समजू शकते. खवय्ये मंडळी वडा भजी खाण्यासोबत आवर्जून हा चुरा घेतात. काही ठेल्यावर तर म्हणे हा चुरापावही दिला जातो.

आता घरात बनणारा किंवा विकत मिळणारा खमंग चिवडा डिशमध्ये घेऊन खाऊन झाला किंवा बरणीत भरलेला चिवडा संपत आला, की त्या बरणीच्या तळाशी चिवड्याला दिलेली, कडिपत्ता, मोहरी, हिंग, मिरच्या, मीठ याची फोडणी जमलेली असते. त्यातच दोन चार तळलेले शेंगदाणे, डाळं हेही उरलेलं असतं. हे फोडणी मिक्सचर उजव्या हाताच्या बोटाने चेपून जिभेवर ठेवायचं. शेंगदाण्यासोबत झक्कास तिखट खारट खमंग चव जिभेवर उतरते आणि चिवड्याइतकाच चवीचा आनंद देऊन जाते.

उन्हाळ्यात अनेक घरांत पन्ह बनतं. ग्लासभरून कैरीच थंड पन्ह, उन्हाळ्याने होणारी शरीराची काहिली शांत करते. पण त्याहीपेक्षा संपूर्ण ग्लास रिकामा झाला, की ग्लासाच्या तळाला उरलेले कैरीचे मऊसर बारीक तुकडे मुखात घेण्यासाठी, ग्लासची एक बाजू तोंडाला आणि वरची बाजू नाकाला लागेल इतका ग्लास मुखात उलटा करायचा. पन्ह्यातली ती शेवटची कैरीची आंबट गोड चवीची गंमत मुखात उतरते आणि वेलचीच्या स्वादासह खूप आनंद देऊन जाते.

याच मोसमात येणाऱ्या आंब्यांचा रस पिळताना, बाठा आणि सालांचा संपूर्ण रस भांड्यात उतरला की रसहीन, गरहीन झालेली साल चोखण्यात जी मज्जा आहे ना, ती ही कृती केल्यावरच समजू शकते. हाताच्या संपूर्ण बोटांना आणि तळहाताला लागलेले आंब्याच्या गराचे अवशेष डोळे मिटून चोखायचे आणि तृप्त व्हायचं.

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in