जंगलवाटेवरचा अनोखा गोवा

समुद्रकिनाऱ्यापलीकडचा गोवा अनुभवायचा असेल, तर त्याच्या हिरव्यागार अंतरंगात शिरावे लागते. घनदाट जंगल, धबधबा आणि पुरातन मंदिराच्या सहवासातली ही भटकंती निसर्ग आणि इतिहासाचा अनोखा अनुभव देणारी ठरली.
जंगलवाटेवरचा अनोखा गोवा
जंगलवाटेवरचा अनोखा गोवा
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

समुद्रकिनाऱ्यापलीकडचा गोवा अनुभवायचा असेल, तर त्याच्या हिरव्यागार अंतरंगात शिरावे लागते. घनदाट जंगल, धबधबा आणि पुरातन मंदिराच्या सहवासातली ही भटकंती निसर्ग आणि इतिहासाचा अनोखा अनुभव देणारी ठरली.

गोव्यात अशाच पावसाळी दिवसात मी भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या भागात भटकंती करत होते. जंगल इतकं हिरवंगार दिसत होतं की, निष्पर्णतेचा कुठेही ठिपका म्हणून दिसत नव्हता. छोट्या छोट्या टेकड्या, डोंगर, पठार सारंकाही हिरवाईने प्रफुल्लित झालेलं दिसत होतं. ढगांची दाटी, धुक्याची मखमली चादर या परिसरावर पसरली होती. पाऊस पडून गेला की, जंगलातून वाहणारे झरे तर जोरदार खळखळ करत वाहतात.

अगदी घनदाट जंगल इथे आहे. पण अशा जंगलाच्या जवळ वसलेली गावं पाहून मी आश्चर्यचकित झाले होते. या जंगलात दडलेल्या एका धबधब्यापाशी ट्रेक करत जाणार होते. ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते, तिथली ही एक सुंदर अ‍ॅक्टिव्हिटी होती. तिथला निसर्ग अभ्यासक आणि मी सकाळी तयडे गावात पोहोचलो. आजूबाजूने गच्च हिरवेगार डोंगर, घनदाट अरण्य आणि त्यामध्ये हे गाव वसलेलं होतं. अगदी शांततेत गावातली कामं सुरू होती, जनावरं तिथल्या हिरव्या कुरणात चरत होती.

त्यांच्या गळ्यातील घंटेचा आवाज फक्त कानावर पडत होता. गावातून आम्ही जंगलात प्रवेश केला. अर्जुनाची, सागाची, शिसमाची मोठी मोठी झाडं वाटेवर होती. उजेड कसाबसा जमिनीवर येत होता.

जंगलात फिरताना आपली सारी इंद्रिय खुली ठेवली की, जंगलाची जादू कळू लागते. पक्ष्यांची सुरावट कानावर पडत होती, जंगलाचा ओला गंध सबंध हवेत पसरला होता, डोळ्यांना कधी मोहक रंगाचे पक्षी दिसायचे, फुलपाखरू दिसायचीत, तर कधी एखादं अनोखं मशरूम पालापाचोळ्यातून वर आलेलं दिसायचं. गुलाबी तेरडा, पान तेरडा झऱ्यांच्या भवताली दिसत होते. जंगलाचे हे वैविध्य अनुभवत अर्धा ते पाऊण तासात आम्ही धबधब्यापाशी पोहोचलो. हा धबधबा काही उंच डोंगरावरून कोसळत नव्हता, तर एक मोठा २०-२५ फुटांचा दगड होता, त्यावरून पाणी धबाधबा वाहत होतं. दगडाच्या पाठी घनदाट वृक्षराजी होती. हे पाणी एका टेकडीवरून येतं असं समजलं. हा धबधबा छोटुसा होता, पण त्याच्या भवताली असणारा परिसर मात्र अत्यंत देखणा होता. धबधब्याचं पाणी काही अंतरावर अगदी संथ वाहत होतं. छान मोठं पात्र त्याने तयार केलेलं. स्वच्छ, नितळ आणि आकाशाचा रंग उतरून निळंशार झालेलं. अर्जुनाचं झाड या पात्राकडे कललेलं होतं. झाडाच्या खोड पाण्याला स्पर्श करत समांतर एक फुटावर वाढत गेलं आणि मग उजेडाच्या दिशेने वर वाढलं. गंमत अशी की, त्या एक फूट पसरलेल्या खोडावर जाऊन पाठ टेकून बसता येत होतं. मग मी पायातले शूज काढले आणि त्या झाडाकडे गेले. थोडी अॅडजस्ट होत त्या बुंध्यावर बसले. बसलेल्या बुंध्याखालून तो प्रवाह वाहत होता. वरती बघितलं तर झाडाचा फांद्यांच्या पसारा पसरला होता. पाण्यात हात फिरवून बराच वेळ खेळत बसले. झाडाला पाठ टेकून पाण्याचा आवाज आणि जंगलातली शांतता कानात साठवली. खऱ्या अर्थाने निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा आणि मनःशांती देणारा तो अनुभव होता.

असा हा परिसर वनसंपदेने नटलेला आहेच, पण याच परिसरात काही काळ्या पाषाणात बांधलेली मंदिरंही दडली आहेत. तांबडी सुर्ला गावातील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. पण या जंगलाच्या सान्निध्यात वसलेल्या तयडे गावातही एक अनोखं मंदिर दडलं आहे. ते पाहायला दुपारी पुन्हा या गावात पोहोचलो.

गावातल्या एका उंचवट्यावर भलीमोठी झाडं होती. त्यांच्या छायेखाली काळ्या पाषाणाचा चौथरा असलेलं छोटेखानी मंदिर होतं. ब्राह्मणी देवीचं हे मंदिर आहे, अशी माहिती समजली. गाभाऱ्यात ब्राह्मणी देवी आणि अजून काही देवदेवतांच्या मूर्ती विराजमान होत्या. तिथले गावकरी सांगत होते की, आधी मंदिराचं बांधकाम झालं नव्हतं, या दगडी चौथऱ्यावर, खुल्या आकाशाखाली या मूर्ती होत्या. मंदिराचा दगडी चौथरा पाहून तर मी चकित झाले होते कारण तिथली शिल्पं इतकी अनोखी होती की, अशी शिल्प मी प्रथमच पाहत होते. आपल्याला कान, नाक, डोळे, एक सुडौलता असलेली शिल्प पाहायची सवय आहे, पण इथली शिल्पं म्हणजे भौमितिक आकाराचा वापर करून साकारली आहेत. म्हणजे चेहरा गोल, त्यावरची टोपी त्रिकोणी, मुकुट तीन छोटे छोटे त्रिकोण जोडून काढलेला. लोककथेतील चित्र दगडात कोरल्यासारखी ती वाटत होती. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या दगडांवर स्त्रिया आठ आठ दिवे घेऊन उभ्या आहेत, असं शिल्प आहे. चौथऱ्याच्या दुसऱ्या बाजूला शृंगार शिल्पं आहेत. मंदिराच्या पाठीमागेही झाडांखाली अनेक शिल्पं आहेत. तिथले गजलक्ष्मीचं शिल्प तर अत्यंत देखणं होतं. पावसाळ्याच्या खुणा त्यावर जमलेल्या होत्या. हे मंदिर ७०० वर्षे तरी जुनं आहे, असं म्हणतात. ठोस माहिती मिळाली नाही. पण शिल्पकला पाहता खरंच हे मंदिर खूप पुरातन असावं असं वाटलं. हे मंदिर पाहणं हा माझ्यासाठी खरंच एक अद्भुत अनुभव होता.

खरंच आपल्याला केवळ समुद्रकिनारा, पार्टी असलेला गोवा ठाऊक आहे, पण गोव्याच्या अंतरंगात असे खजिने दडलेले आहेत. तिथली भटकंती केल्यावर गोव्याची निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक बाजू मला बघता आली. गोव्याच्या अंतरंगाची ही भटकंती अद्भुत, मनःशांती देणारी आणि आनंददायी ठरली.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in