हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
डिजिटल गेमच्या मागे मानसशास्त्रीय डिझाइनचा सूक्ष्म विचार दडलेला असतो. ऑनलाइन गेमिंग आपल्या विचारशक्तीमध्ये, वर्तनामध्ये बदल घडवून आणते. त्याचे रूपांतर व्यसनामध्ये होत असले तरी जागरूकपणे त्याचा वापर केल्यास त्याचे काही सकारात्मक उपयोग देखील होतात.
गेल्या काही वर्षांत गेमिंग हे एक शक्तिशाली डिजिटल माध्यम म्हणून उदयास आले आहे. ते आता केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आपल्या मनावर आणि व्यक्तिमत्त्वावरही ते खोल परिणाम घडवत आहे. पारंपरिक युरोपियन रमीचा पत्त्यांचा खेळ या त्याच्या साध्या सुरुवातीपासून डिजिटल परिवर्तनानंतर ते सर्वात लोकप्रिय बनले आहे. लाखो खेळाडू सामान्य आणि स्पर्धात्मक दोन्ही स्वरूपात या ऑनलाइन गेमिंगमध्ये सहभागी होतात. अलीकडेच एका मंत्र्याने विधानसभेत काम चालू असताना मोबाईलवर रमी खेळल्यामुळे झालेला वाद सर्वांना ठाऊकच आहे.
आजचे ऑनलाइन गेम्स केवळ करमणूक करून थांबत नाहीत; ते आपल्या विचारशक्तीमध्ये, वर्तनामध्ये बदल घडवतात. जगाशी असलेला आपला संवादही बदलतो. आपला सामाजिक संपर्क केवळ गेमिंगभोवतीच फिरतो. मोबाईलवरील साध्या पझल्सच्या निरागस मोहातून ते कन्सोल्सवरील गुंतागुंतीच्या मल्टीप्लेयर विश्वापर्यंत खेळणारे खेळाडू इतके हरखून जातात की त्यांना वेळेचं भानच राहत नाही.
या डिजिटल विश्वातील गेम्सचे आकर्षण नक्की कशामुळे निर्माण होते? आपण हे खेळ खेळायला का प्रवृत्त होतो? आणि एकदा खेळ सुरू केला की, तो सहजपणे का थांबवता येत नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधताना आपल्याला ऑनलाइन गेमिंगच्या मनोवैज्ञानिक खोलीपर्यंत जावे लागते. हा लेख आपल्याला तो अदृश्य सापळा दाखवेल, ज्यात सगळे अडकले आहेत. हे गेम्स आपल्या भावनांवर, विचारांवर आणि वर्तनावर कसा ठसा उमटवतात आणि आपण त्यांचा आपल्या आयुष्यात सकारात्मक वापर कसा करू शकतो, हे आपण उलगडून पाहू.
सुरुवातीला ऑनलाइन गेम्स म्हणजे वेळ घालवण्याचे एक सामान्य साधन वाटते. पण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, हे खेळ ज्ञान वाढवू शकतात, सामाजिक कौशल्ये विकसित करू शकतात आणि मानसिक आरोग्यालाही बळकटी देऊ शकतात. उदाहरणार्थ, ‘सिव्हिलायझेशन’ (Civilization)सारखा खेळ इतिहासाचे धागे उलगडतो आणि रणनीतीचा गूढ अर्थ शिकवतो. ‘नेव्हरमाइंड’ (Nevermind) हा गेम जैव-प्रतिक्रियेचा (biofeedback) वापर करून चिंतेच्या सावल्या हलक्या करतो, तर ‘द लास्ट ऑफ अस’ (The Last of Us) आपल्याला भावनांनी भरलेली कथा सांगत, एखादा उत्तम चित्रपट पाहिल्याचा अनुभव देतो. अनेक मल्टीप्लेयर गेम्स आपल्याला सहकार्य, संवाद आणि सामाजिक नातेसंबंधांची नवी ओळख शिकवतात.
गेम डिझाइनमधील फ्लो स्टेट
गेम डिझाइनमध्ये वेगवेगळ्या मोहक आणि आकर्षक मानसिक संकल्पना वापरलेल्या असतात. त्यापैकी एक म्हणजे ‘फ्लो स्टेट’ किंवा प्रवाही अवस्था. फ्लोचे जनक असलेले मानसशास्त्रज्ञ मिहाय चिक्सेंटमिहाय (Mihaly Csikszentmihalyi) यांनी मांडलेली ही विलक्षण संकल्पना मनाला मंत्रमुग्ध करते, वेळेचा आणि जगाचा विसर पाडते. खेळामध्ये जेव्हा खेळाडूच्या कौशल्याचा आणि त्याच्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानाचा सुरेख असा मेळ जमतो, तेव्हा तो खेळाडू या ‘फ्लो स्टेट’मध्ये प्रवेश करतो. ही अवस्था म्हणजे संमोहित करणारी तल्लीनता, लक्ष केंद्रित करण्याची परिपूर्ण स्थिती आणि जगापासून तात्पुरते अलिप्त होण्याचा जणू एक जादुई क्षण.
गेम विकसित करणारी मंडळी, खेळाडूंना ‘फ्लो’चा अनुभव मिळावा, यासाठीच खेळाची रचना गुंफतात. आव्हाने जाणीवपूर्वक रचली जातात. ना खूप सुलभ, ना फार गुंतागुंतीची, जेणेकरून खेळाडू त्या अनुभवात सहज गुंतून राहील. मग जे घडते ते अद्भुत असते. खेळाडू वेळेचा मागोवा हरवतो, बाह्य जग विसरतो आणि त्या क्षणाला तो जणू स्वतःच्या मर्यादा ओलांडतो. अशा वेळी मिळणारी तृप्ती आणि प्रेरणा त्याला पुढे खेळत राहण्यासाठी प्रवृत्त करतात. प्रत्येक यशस्वी डिजिटल गेमच्या मागे मानसशास्त्रीय डिझाइनचा सूक्ष्म विचार दडलेला असतो.
बक्षिसांची मानसिकता
याच ‘फ्लो’इतकाच दुसरा वजनदार घटक म्हणजे खेळाडूला भुरळ घालणारी ‘बक्षिसांची मानसिकता’. खेळताना मिळणाऱ्या छोट्या-मोठ्या बक्षिसांचा खेळाडूच्या मनावर विलक्षण प्रभाव पडत असतो. कधी नव्या लेव्हलवर पोहोचणे, कधी गुण मिळवणे, तर कधी एखादे अनोखे कौशल्य उघड करणे. ही प्रत्येक बक्षिसे खेळाडूच्या लालसेला पंख देतात. मोठे मिशन पूर्ण केल्यावर मिळणारी उत्तेजनार्थ बक्षिसं किंवा नेतृत्व यादीत नाव झळकण्यासारखी सामाजिकदृष्ट्या चमकवणारी बक्षिसं, त्याची ओळख अधिकाधिक परिपूर्ण करतात.
ये दिल मांगे मोअर
या खास क्षणी आपल्या मेंदूत डोपामाइन हे रसायन स्त्रवू लागते आणि त्यामुळे शुद्ध आनंदाची अनुभूती येते. त्या आनंदामुळे खेळाडूला सतत पुढे खेळत राहण्याची नवी ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे अनेक गेम्स अनियमित बक्षीस पद्धती वापरतात. ती अनपेक्षित क्षणी मिळतात. ही अनिश्चितता खेळाडूच्या लोभाला अधिक धार देते आणि तो विचार करतो, ये दिल मांगे मोअर- “कदाचित पुढच्या क्षणी मला काहीतरी खास मिळेल!” याच आशेने तो खेळात अधिकाधिक गुंतत जातो. माझ्या एका उच्चशिक्षित रुग्णाने सांगितले होते की, “ऑनलाइन गेमिंग म्हणजे जणू एखाद्या विलोभनीय प्रेयसीसारखे आहे, ती तुम्हाला सोडत नाही आणि तुम्हीही तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही.”
मेंदूला उत्तेजित करणारी बौद्धिक आव्हाने
ऑनलाइन गेमिंगमध्ये एक मनोवेधक पैलू आहे. तो म्हणजे मेंदूला उत्तेजित करणारी बौद्धिक आव्हाने. कोडी सोडवणे, योजना आखणे, जलद प्रतिसाद देणे यासारख्या आव्हानांमुळे विचारशक्ती, मेमरी, तर्कशक्ती, पॅटर्न ओळखण्याची क्षमता व निर्णयक्षमता वाढते. ही कौशल्ये प्रत्यक्ष जीवनातही वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी वा कामातील निर्णयप्रक्रियेसाठी उपयोगी ठरतात. शारीरिक व्यायामाइतकेच ताजेतवाने करतात.
कल्पनाशक्तीचा अमर्याद प्रवास
ऑनलाइन गेमिंगची अद्भुत मोहिनी म्हणजे प्रत्येकाला स्वतःची प्रतिमा घडविण्याची संधी मिळते, जी वास्तवात मिळतेच असे नाही. प्रत्येक खेळाडू आपल्या अवताराला आकार देताना केवळ रूपरेखा सजवत नाही, तर मनातील सुप्त स्वप्नांना नवा चेहरा देतो. कुणी स्वतःला अधिक शक्तिशाली रूपात पाहतो, कुणी आपल्या आदर्श प्रतिमेचा शिल्पकार होतो, तर कुणी नव्यानेच एक अपरिचित व्यक्तिमत्त्व रचतो. हे फक्त खेळण्याचे साधन नसून, आत्मअनुभवाचा एक सृजनशील प्रवास ठरतो, जिथे वास्तवाच्या मर्यादा मागे पडतात आणि कल्पनाशक्तीला नवे, अद्वितीय अंतराळ लाभते.
गेमिंग : सामाजिक आयाम
‘एकाकी गेमर’ या संकल्पनेत एक विलक्षण सामाजिक आयाम दडलेला आहे. वास्तव आयुष्यातील एकटेपणापासून सुटण्यासाठी खेळ खेळणारी मंडळी आभासी दुनियेत प्रवेश करतात, जिथे मल्टीप्लेअर गेम्स त्यांच्या खऱ्या सोबत्यांसारखे ठरतात. स्क्रीनच्या पलीकडे असलेले जगभरातील खेळाडू एकाच ध्येयासाठी खांद्याला खांदा लावून लढतात, नियोजन करतात, एकमेकांना मदत करतात. या सामूहिक लढतींमध्ये, गप्पा आणि तात्पुरत्या संबंधातून नकळत नात्यांची वीण गुंफली जाते. ही आभासी मैत्री इतकी जिवंत, इतकी भावनिक ठरते की अनेकदा ती प्रत्यक्ष आयुष्यातील नात्यांनाही मागे टाकते. आपलेपणाची ही जादू, सामायिक अनुभवांचा थरार आणि एकत्र जिंकण्याचा आनंद, ‘गेमिंग’ या साध्या क्रियेला एक आगळावेगळा सामुदायिक आणि भावनिक प्रवास बनवतो.
वास्तवाचा असह्य भार
लोक ऑनलाइन गेमकडे वळतात, त्यामागे दैनंदिन ताणतणावांपासून मुक्त होण्याची खोलवरची इच्छा असते. वास्तव आयुष्य अनेकदा एकसुरी, नीरस आणि जबाबदाऱ्यांनी भरलेले आणि कधी कधी असह्यही भासते. अशा वेळी गेमिंगचे आभासी जग त्यांना वेगळीच दारं उघडून देते. तिथे रंग, थरार आणि कल्पनाशक्तीच्या सीमा विस्तारलेल्या असतात. या जगात ते कधी ‘सुपर हिरो’ बनून असंभव वाटणाऱ्या गोष्टी साध्य करतात, तर कधी ‘जादूगार’ बनून अशक्यप्राय संकटांवर मात करतात.
मुक्तीच्या शोधातला नवा कैदी
काही काळासाठी का होईना हा अनुभव त्यांना त्यांच्या वास्तव आयुष्याच्या वेदना, ताण आणि कंटाळ्यापासून दूर नेतो. त्यामुळे गेमिंगचा हा प्रवास त्यांना अधिक उत्सुक करत स्वातंत्र्याची अनुभूती देतो, शोध घ्यायला प्रवृत्त करतो. खरे तर योग्य प्रमाणात या आभासी जगात रमणे हे तणावासाठी एक प्रकारचे औषध ठरू शकते. मात्र, जेव्हा हा पलायनवाद अतिरेकाला जातो, तेव्हा तोच आनंदाचा स्रोत हळूहळू व्यसनाच्या साखळदंडात बदलतो. व्यक्ती वास्तव विसरून पूर्णपणे आभासी दुनियेच्या कैदेत अडकते आणि मुक्तीच्या शोधात नवा कैदी बनते.
मानसोपचारातील प्रभावी साधन
अलीकडे मानसोपचार आणि थेरपीमध्येही गेम्स हे प्रभावी साधन म्हणून वापरले जातात. एकाग्रता, तणाव सहन करण्याची क्षमता, तसेच परिस्थितीनुरूप प्रतिसाद देण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी विशिष्ट खेळ उपयुक्त ठरतात. मानसिक आजारांवर उपचार करताना ते रुग्णांना रचनात्मक, मनोरंजनात्मक आणि आनंददायी मार्ग उपलब्ध करून देतात. शारीरिक थेरपीतसुद्धा गेम्समुळे हालचालींचा सराव अधिक सुलभ होतो. याशिवाय संघभावना, संसाधन व्यवस्थापन, नियोजन आणि बजेट बनवण्याची सवय गेम्स शिकवतात. ही सवय घरात, शाळेत आणि नोकरीच्या ठिकाणीही उपयोगी ठरते.
ड्युओलिंगो आणि पालकांचा सहभाग
लोकप्रिय अॅप ड्युओलिंगो (Duolingo) हे याचे उत्तम उदाहरण आहे. बक्षिसे, स्तर आणि आव्हाने यामुळे शिकणे ही कंटाळवाणी प्रक्रिया न राहता मनोरंजक प्रवास ठरतो. त्यामुळे विद्यार्थी केवळ शिकत नाहीत, तर शिकलेली माहिती त्यांच्या स्मरणात खोलवर कोरली जाते आणि दीर्घकाळ टिकून राहते.
पण याचा खरा लाभ घ्यायचा असेल, तर संतुलन सर्वांत महत्त्वाचे आहे. वेळापत्रक आखा, खेळण्याला मर्यादा घाला आणि झोप, आहार, व्यायाम व सामाजिक संबंध या महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. पालकांनीही मुलांच्या गेमिंगमध्ये सहभाग घ्यावा, तर कधी त्यांच्या खेळांचा आढावा घेऊन योग्य मार्गदर्शन करावे. असे केल्यास गेमिंग ही केवळ वेळ घालवण्याची गोष्ट न राहता, शिकण्याची, विकासाची आणि आयुष्य समृद्ध करण्याची संधी ठरते.
गेमिंगचे व्यसनात रूपांतर कसे होते?
जेव्हा खेळ फक्त करमणुकीपुरता न राहता तो दैनंदिन आयुष्यावर ताबा मिळवतो तेव्हा गेमिंगचे व्यसनात रूपांतर होते. न होणारा अभ्यास, झोप बिघडणे, आरोग्य बिघडणे, जबाबदाऱ्या टाळणे, सतत चिडचिड किंवा नैराश्य आणि मोबाईल व नेट नसतानाची बेचैनी...ही सगळी या व्यसनाची ठळक लक्षणे आहेत. २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘गेमिंग डिसऑर्डर’ (Gaming Disorder) म्हणून मानसिक आरोग्य समस्या ही मान्यता दिली.
व्हेरिएबल रिवॉर्ड आणि आशेची साखळी
हे व्यसन तयार होते. कारण गेम्समध्ये ‘व्हेरिएबल रिवॉर्ड’ असतात, अनिश्चित वेळी मिळणारी बक्षिसं असतात. हाच कॅसिनो किंवा जुगाराचा पाया असतो. त्यामुळे खेळाडू आशेच्या साखळीत अडकतो. नवे टास्क, रँकिंग, वेळेवर लॉगइन या सगळ्यातून एक व्यसनात्मक चक्रव्यूह रचला जातो, तिथून बाहेर पडणे गेमरसाठी अवघड होते.
ऑनलाइन गेम्स हे इतर खेळांप्रमाणेच आपल्या हातातले साधन आहे. त्यांचा वापर आपण आपल्या जगण्याचा दर्जा उंचावण्यासाठी करायचा की आयुष्याच्या संतुलनाला धक्का देण्यासाठी करायचा, हे ठरवणे आपल्याच हातात आहे.
मनोचिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता