
दखल
अनिरुद्ध खुटवड
पावसाळ्यात शेती करणाऱ्या कलाकारांकडून उरलेल्या वर्षभरात वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करून घेणाऱ्या रतन थियम यांच्यासाठी नाटक हा स्वान्त सुखाय प्रकार नव्हता. तो विद्रोही स्वर व्यक्त करणारा, दु:खाची तार छेडणारा कलात्मक आविष्कार होता. इतिहास, परंपरा आणि समकाल यांची सांगड घालणाऱ्या मणिपूरमधील या आविष्काराला म्हणूनच जागतिक ओळख मिळाली. अलीकडेच २३ जुलैला त्यांचं निधन झालं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा दोन वेगवेगळ्या नजरांमधून घेतलेला हा मागोवा.
रतन थियम हे १९७० च्या दशकात सुरू झालेल्या भारतीय नाट्यक्षेत्रातील ‘थिएटर ऑफ रूट्स’ चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होतं. रतन थियम यांनी १९७४ मध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये इम्फाळ येथे ‘कोरस रेपर्टरी’ या संस्थेची स्थापना करून या नाट्य संस्थेतर्फे मणिपुरी भाषेत अनेक प्रयोगशील नाटकांचं दिग्दर्शन केलं. रतन थियम यांच्या नाट्य कलाकृतींवर, भरत नाट्यशास्त्रावर आधारित भारतीय नाट्य परंपरेचा, तसेच प्राचीन ग्रीक नाट्य परंपरेचा आणि जपानमधील ‘नोह थिएटर’ या नाट्यकलांचा प्रभाव दिसून येतो.
रतन थियम यांनी भारतीय रंगभूमीवरील संस्कृत काळातील नाटककार कालिदास, शुद्रक, भास यांसारख्या तसेच जागतिक रंगभूमीवरील नाटककार सोफोक्लिस, शेक्सपिअर ते समकालीन लेखक जाँ आनुई यासारख्या नाटककारांनी लिहिलेल्या अजरामर अशा नाटकांची निर्मिती केली. या अशा शास्त्रीय (classical) नाटकांचे मणिपूरच्या समकालीन सामाजिक संघर्षाच्या संदर्भात अर्थ निर्णयन (interpretation) करत त्यांनी मणिपूरच्या लोकांचे दुःख ‘अंधायुग’सारख्या नाटकामधून मांडलं.
नाटक लिहिलं आणि केलं जातं ते सिस्टीमच्या विरोधातला निषेध (protest) व्यक्त करण्यासाठीच, असा रतन थियम यांचा ठाम विश्वास होता. वेगवेगळ्या सामाजिक प्रबोधनात्मक नाटकांची निर्मिती करताना रतन थियम यांनी मणिपूरच्या लोकसंगीत, नृत्य आणि ‘थांग ता’ या पारंपरिक मार्शल आर्टचा आधार घेऊन अभिनव पद्धतीने या शास्त्रीय (classical) नाटकांचं दिग्दर्शन केलं.
चक्रव्यूह, अंधायुग, उत्तर प्रियदर्शी, कर्णभारम्, उरुभंगम्, ऋतुसंहारम्, इम्फाळ इम्फाळ, कनुप्रिया, लेंग्शोन्नेई (Antigone), चिंग्लोन मपन तपाक अमा (Nine Hills One Valley), अशिबागी एशेही (When We Dead Awaken) रवींद्रनाथ टागोर रचित राजा, अशा विविध शास्त्रीय (classical) व समकालीन नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. यांपैकी मला ‘चक्रव्यूह’, ‘उत्तर प्रियदर्शी’, ‘अंधायुग’, ‘Nine Hills One Valley’, ‘When We Dead Awaken’, ‘इम्फाळ इम्फाळ’, या नाटकांचे प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. एक नाट्यरसिक म्हणून खूपच समृद्ध करणारा असा अनुभव होता तो!
त्यांच्या सर्व नाटकांमध्ये संगीत आणि नृत्त (movement) यांचा अंतर्भाव असला तरी ती केवळ संगीत नाटकं नसत, तर विचार प्रवृत्त करणारी, अंतर्मुख करणारी आणि दृक्श्राव्य अनुभव देणारी सामाजिक नाटकं असत. त्यांच्या प्रत्येक नाटकातून विद्रोही स्वर व्यक्त होत होता. रतन थियम यांच्या प्रत्येक नाटकातून नेहमीच अप्रतिम असा दृक्श्राव्य काव्य-नृत्त-नाट्यानुभव मिळत गेला आहे. अभिनेत्यांचे वाचिक अभिनयावर आणि शारीर हालचालींवर असलेले प्रभुत्व, पारंपरिक सुंदर व लक्षवेधी रंगभूषा व वेशभूषा, पारंपरिक तालवाद्यमेळ तसेच अभिनेत्यांच्या सुश्राव्य गायनातून मिळणारा विलक्षण संगीतानुभव आणि नेत्रदीपक प्रकाशयोजना ही त्यांच्या नाटकांची सौंदर्य स्थळे आहेत. जसे ‘चक्रव्यूह’ नाटकातील राजपुत्र अभिमन्यूचा चक्रव्यूहात अडकण्याचा प्रसंग, ‘उत्तर प्रियदर्शी’मधील राजा अशोकाचे युद्ध जिंकल्यावर, ऐरावतावर बसून रंगमंचावर होणारे आगमन, अशी त्यांच्या नाटकांतील अनेक दृश्ये अजूनही ठळकपणे आठवतात.
रतन थियम यांच्या या आधुनिक शास्त्रीय नाटकांपैकी बहुतांश नाटकांना जागतिक स्तरावर कीर्ती मिळाली आहे.
‘कोरस रेपर्टरी’ या थिएटर ग्रुपमध्ये दरवर्षी, पावसाळ्यात शेती करतानाच नवीन नाटकाची तालीम/निर्मिती करतात आणि पुढे वर्षभर नाटकांचे प्रयोग केले जातात. वर्षभराचे वेळापत्रक हे असं ठरवलं जातं. या उत्कृष्ट नाट्य निर्मितीमागे रतन थियम यांचा नाटक बसवतानाचा सर्जनशील उत्साह आणि कडक शिस्त या दोन्ही गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत.
१९८४ साली निर्माण केलेल्या ‘चक्रव्यूह’ या नाटकाला इडनबर्ग नाट्य महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं. ‘अंधायुग’ या नाटकाचा एक विशेष प्रयोग ५ ऑगस्ट १९९४ रोजी जपानमधील टोंगा येथे, हिरोशिमामधील अणुहल्ल्याच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त खुल्या हवेत सादर करण्यात आला. ‘उत्तर प्रियदर्शी’ या नाटकाचा पहिला प्रयोग १९९९ मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) च्या पहिल्या ‘भारत रंग महोत्सवा’त (बीआरएम) सादर करण्यात आला. अशी गेली अनेक वर्षे, त्यांच्या अनेक नाटकांना भारतातील आणि जगभरातील विविध नाट्य महोत्सवांमध्ये आमंत्रित केलं गेलं आहे.
गेली अनेक वर्षे रतन थियम हे ‘कोरस रेपर्टरी’ या नाट्य संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी १९९७-८८ दरम्यान नवी दिल्लीतील ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’त निर्देशक म्हणून काम पाहिले, तर २०१३ ते २०१७ पर्यंत ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’चे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. १९८७ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ या भारताच्या संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील राष्ट्रीय अकादमीने त्यांना मानाचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ दिला, तर १९८९ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांना २०१२ ची ‘संगीत नाटक अकादमी फेलोशिप’ देण्यात आली. ही फेलोशिप मिळणं हा कलाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.
रतन थियम यांचे २३ जुलै २०२५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी इंफाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथे निधन झालं. मणिपूरच्या लोकांचं दुःख जाणणारा, त्यांच्या सामाजिक लढ्याला वाचा फोडण्यासाठी भारतीय व जागतिक रंगभूमीवरील शास्त्रीय नाटकांमधून नव्याने विचार मांडणारा, प्रयोगशील, विद्रोही दिग्दर्शक म्हणून रतन थियम यांची नेहमीच आठवण राहील आणि आम्हा रंगकर्मींना सातत्याने प्रेरणा मिळत राहील, अशी आशा व्यक्त करतो.
नाट्य दिग्दर्शक आणि अभ्यासक. राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली व फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे इथे अतिथी अध्यापक.