
पाऊलखुणा
विठोबाला आदि, अंत नाही, अशी संतांची भावना आहे. देवत्वाबाबत ही अनादी अस्तित्वाची भावना असली तरी एका गावाबाबत मात्र ती असू शकत नाही. ते गाव कधी वसलं, त्याआधी तिथे काय होतं, हे कुतूहल मानवी मनाला असतेच. पंढरपूरसारख्या विठोबाचा वास असलेल्या नगराबाबत तर ते असणारच. म्हणूनच या लेखात पंढरीच्या प्राधीनत्वाचा धांडोळा घेण्यात आला आहे.
"जेव्हा नव्हते चराचर,
तेव्हा होते पंढरपूर।
जेव्हा नव्हती गंगा, गोदा,
तेव्हा होती चंद्रभागा ॥"
असे पंढरपूर शहराचे वर्णन संत-महंतांच्या रचनेमध्ये आढळते. या शहराला एक प्राचीन वारसा आहे, आध्यात्मिक पाया आहे. अर्थातच, तो श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अतिप्राचीन मंदिरामुळेच आहे.
"पावलो पंढरी वैकुंठ भुवन,
धन्य आजी दिन सोनियाचा।।"
अशी भावना हजारो-लाखो वारकऱ्यांच्या मनात पंढरपूर या तीर्थक्षेत्राविषयी जागत असते. त्या सख्या पांडुरंगरायाला भेटण्याची ओढ इतकी उत्कट असते की, पंढरीच्या वाटेवरचे बाभळीचे काटेसुद्धा बोचत नाहीत, सलत नाहीत. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या मुख्य वाऱ्यांना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीला येतात. सकळ संताचे माहेर असणाऱ्या पंढरपुरात त्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेताच अवघ्या दुःखाचा विसर पडतो. अशा या पवित्र पावन पंढरीला अनेक वर्षाचे प्राचीनत्व लाभले असून, मध्ययुगीन व प्राचीन अशा दोन्ही कालखंडांत पंढरपूरमध्ये विठोबाचे देवस्थान अस्तित्वात होते, याबाबत कोणतीही शंका उरत नाही. तत्कालीन ग्रंथ, ऐतिहासिक दस्तावेज, पत्रव्यवहार, ताम्रपटांच्या आधारे या देवस्थानाचा, पंढरपूरच्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
पंढरपूरचा सर्वात प्राचीन उल्लेख इ. स. ५१६ सालच्या एका ताम्रपटात आढळतो. या उल्लेखाचा समावेश म्हैसूर सरकारच्या १९२९ सालच्या पुरातत्त्व खात्याच्या अहवालात करण्यात आला आहे. हा ताम्रपट कोल्हापूर येथील प्रा. कुंदणगार यांना प्राप्त झाला होता व नंतर म्हैसूर संस्थानातील संबंधित खात्याकडे देण्यात आला. त्या खात्याने प्रतिमा, वाचन, भाषांतर आणि चर्चा यासह तो अहवालात प्रसिद्ध केला. या ताम्रपटात राष्ट्रकूट अविधेय याने जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणास महादेव डोंगराच्या पूर्वेस असलेल्या अनेवरी, चाळ, कन्दक, बुद्धयल्ली या गावांसोबत पाण्डरङगपल्ली हे गाव दान दिले असल्याचा उल्लेख आहे. हेच दान राष्ट्रकूट सम्राट शर्वर किंवा पहिला अमोघवर्ष याने कायम ठेवले होते. या ताम्रपटाचा काळ इ. स. ५१६ नोव्हेंबर (शके ४३८) च्या सुमाराचा असावा. या गावांची ओळख अनेवरी-अनेवळी, चाळ-चळे, कन्दक-कोंदर्की व पाण्डरङगपल्ली-पंढरपूर अशी केली गेली आहे. या आधारावर पंढरपूरचे प्राचीन नाव 'पाण्डरङगपल्ली' होते, हे विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगे आहे. जरी विठोबा किंवा पांडुरंग या देवाचे इतक्या प्राचीन काळातील थेट उल्लेख मिळत नाहीत, तरी त्याचे पर्यायी नाव 'पाण्डरङग' व 'विठ्ठल' यांचा उल्लेख त्या काळात झाला आहे, हे अत्यंत उल्लेखनीय आहे. डॉ. सालेतूर यांनी आपल्या 'पंढरपूरचे प्राचीनत्व' या लेखात या ताम्रपटाचा व विठोबाच्या मूर्तीबाबत गॅझेटिअरमधील उल्लेखांचा आधार घेत या देवस्थानाचे अस्तित्व सुमारे इ. स. ४६० पासून असल्याचा निष्कर्ष मांडला आहे.
आजच्या विठ्ठल मंदिरात महाद्वार ओलांडल्यानंतर पत्र्याच्या मंडपातून आत येताच सोळा खांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील खणात तुळईवर एक लेख कोरलेला आहे. या लेखाची लिपी देवनागरी असून भाषा मात्र संस्कृत व कन्नड अशी मिश्रित आहे. या लेखाच्या प्रारंभी वीर सोमेश्वर (होयसळ यादव घराण्यातील) याची स्तुती आहे आणि पुढे विठोबाच्या षोडशोपचार पूजेपैकी काही उपचारांसाठी दिलेल्या दानांचे वर्णन आहे. यामध्ये जरी पाच वेगवेगळ्या कालावधींचा उल्लेख आहे, तरी सर्वांत जुना उल्लेख इ. स. १२३६ चा आहे. या लेखात पंढरपूरस 'पंडरगे' किंवा 'पंडरंगे' अशी दोन रूपे आढळतात. विठोबाला कन्नडमध्ये 'विठ्ठल', तर संस्कृत भागात 'विठल' असे संबोधले आहे. याशिवाय पुंडलीकास 'पुंडरीक मुनी' म्हणूनही उल्लेखले आहे.
विठ्ठल मंदिरातील प्रसिद्ध 'चौऱ्यायशीचा शिलालेख' वि. का. राजवाडे यांनी ग्रंथमालेत प्रसिद्ध केला आहे. या लेखाची भाषा मराठी असून मुख्यतः देवास दिलेल्या देणग्यांचा तपशील यामध्ये आहे. सर्वात जुना कालवर्षाचा उल्लेख इ. स. १२७३ चा असून यामध्ये पंढरपूरास 'फागनिपूर' व विठोबास 'विठ्ठल' किंवा 'विठल' अशा दोन्ही प्रकारांनी उल्लेखले आहे.
विठोबा मंदिराबाहेर, चोखामेळ्याच्या समाधीजवळ एक शिलालेख आहे. याचे वाचनही दिवंगत वि. का. राजवाडे यांनी ग्रंथमालेत प्रसिद्ध केले आहे. या लेखाचा काल इ. स. १३११ आहे, म्हणजेच मुस्लिम सत्तेच्या अगोदरचा. या लेखात पंढरपूरला 'खंडरिपुर' तर विठोबास 'विठ्ठल' किंवा 'विठल' म्हणून संबोधले आहे.
इ. स. १४९० ते १५०८ या दरम्यान निजामशाहीतील दलपतिराज नावाच्या अर्थमंत्र्याने 'नृसिंहप्रसाद' हा धर्मशास्त्रीय ग्रंथ रचला होता. त्याच्या 'तीर्थसार' नावाच्या भागात पुंडलीक व पुंडलीक क्षेत्राविषयी माहिती दिली आहे. यामधील काही अंश कूर्म व स्कंद पुराणांवर आधारलेले आहेत, तर काही माहिती दलपतिराजाने स्वतः लिहिल्याचे वाटते. यातील मोठा भाग अर्थविषयक व नैमित्तिक धर्मकृत्यांवर आधारित आहे. हा ग्रंथ एकाच हस्तलिखितावरून छापला गेल्यामुळे अनेक अशुद्धता आढळतात. त्यामुळे काही भाग नीट समजणे कठीण जाते. तथापि, त्यातील सारांश असा की, पुंडलीक क्षेत्र भैमी नदीच्या दक्षिण तीरावर असून, याच्या एक योजनावर धर्मरी नदी भैमीस (भीमा) मिळते. येथेच मूर्तिमान पांडुरंग वास करतो, असा उल्लेख आहे.
पुढे मराठेशाही व विशेषतः पेशवाईत छत्रपती, पेशवे व त्यांचे सरदार वारंवार पंढरपूर, तुळजापूर इत्यादी तीर्थक्षेत्रांतील यात्रांना जात असत. राजवाडे खंड ६, पृ. १४ वर इ. स. १७३९ मध्ये छत्रपती शाहू महाराज मिरजेकडून आणि राणोजी शिंदे चांभारगोंद्यातून पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी आल्याचा व नंतर तुळजापूरला गेल्याचा उल्लेख आहे.
छत्रपती राजाराम महाराजांनी इ. स. १६९४ एप्रिल २३ (शके १६१६ वैशाख शुद्ध नवमी) रोजी दिलेले अभयपत्र व आज्ञापत्र उपलब्ध आहे. यावरून असे दिसते की, मुघलांच्या आक्रमणामुळे विठोबाची मूर्ती वारंवार पंढरपूरजवळील देगाव येथे हलवली जात असे. मात्र, तिथेही त्रास होऊ लागल्यामुळे देवाच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेतली जाई. या पार्श्वभूमीवर, मराठा सेनापती संताजी घोरपडे याने इ. स. १६९५ जुलै २४ रोजी त्या गावास कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आज्ञा दिली होती आणि जर कोणी उपद्रव केला, तर त्याला दंड करण्यात यावा, असे आदेशही दिले होते.
याप्रमाणे, पंढरपूर आणि विठोबा देवस्थान यांचे प्राचीनत्व शास्त्रीय, ऐतिहासिक दृष्टिकोनातून ठामपणे सिद्ध होते. वरील ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि धार्मिक स्रोतांच्या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही. इ. स. ५१६ पासून पुढील अनेक शतकांपर्यतच्या ताम्रपट, शिलालेख, ग्रंथ आणि राजकीय दस्तावेजांमधून पंढरपूरचा व विठोबा देवस्थानाचा उल्लेख सातत्याने आढळतो. हे शहर संत परंपरेच्या साक्षीने घडले आहे आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनले आहे. काळाच्या लाटांवर अविचल उभे असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आणि आषाढी-कार्तिकीच्या गर्दीतून उमटणारा विठ्ठल नामाचा गजर हे सर्व काही पंढरपूरच्या पुरातनतेची सजीव साक्ष देतात. त्यामुळे पंढरपूर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ते एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा आहे, जो हजारो वर्षांपासून अखंड टिकून आहे आणि पुढेही युगानुयुगे टिकत राहील.
rakeshvijaymore@gmail.com