पाऊले चालती पंढरीची वाट
भक्तिरंग
शब्दांकन : संजय कुलकर्णी
पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण आपल्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य नसते. महाराष्ट्रातील सर्वात मोठं भक्तिपर्व म्हणजे पंढरपूरची आपाडीवारी. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. ही केवळ यात्रा नसून एक आध्यात्मिक साधना आहे. अनेक कलाकार देखील या वारीत सहभागी होऊन वारीचा अद्भुत सोहळा अनुभवतात. तो एक भारावून टाकणारा अनुभव असतो. या अनुभवाविषयी वेगवेगळे कलाकार व्यक्त होत आहेत.
विलक्षण अनुभूती - आदेश बांदेकर
"या आधीही मी वारीत चाललो आहे. पण यावर्षी पहिल्यांदाच एका वाहिनीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'आळंदी ते पंढरपूर' अशी संपूर्ण वारी करण्याचा योग जुळून आला आणि 'भेटी लागी जीवा लागलीसे आस..' अशीच काहीशी माझी अवस्था झाली. या वारीमुळे संतांची शिकवण, वारकऱ्यांचे अनुभव, भक्तीचं रूप आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा भक्तिमय उत्सव मला अनुभवता आला. या वारीत प्रत्येक भागात वारी कशी वेगळी असते, हे जाणवले. वारीचा एक एक पैलू समोर आला. पालखीचा बैलरथ, भक्तीचे रिंगण, माऊलींचा अश्व, अन्नपूर्णावारी, कर्तव्य वारी, सेवा वारी, पायी चालण्यामागचं भक्तीचं तत्त्वज्ञान, महिला वारकऱ्यांची भूमिका, वारीतील पुंडलिक, वारीतले लक्ष्मी-नारायण, बंधुभेट हा संपूर्ण अनुभव या वारीत उलगडत गेला. ही सगळी अनुभूती मी कधीच विसरू शकणार नाही."
हरिपाठ ऐकता ऐकता भाकऱ्या केल्या - शर्वरी जोग
“मी वारीत सहभागी झाले आणि दिवेघाट ते सासवड असा कठीण टप्पा पायी चालत पार केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वारी अनुभवली. अत्यंत भारावून टाकणारा अनुभव होता तो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. आजूबाजूचा हा उत्साह पाहून माझ्यातही नवी ऊर्जा संचारत होती. या टप्प्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. वारकरी विसाव्यासाठी जिथे थांबतात तिथं मला जाता आलं. हरिपाठ कानावर पडत होता. या विलक्षण सुखावणाऱ्या वातावरणात मी वारकऱ्यांसाठी भाकऱ्या बनवल्या. वारकऱ्यांसाठी भाकऱ्या बनवताना एक सुखद समाधान मिळालं. एक नवी अनुभूती मिळाली."
उरतो तो फक्त विठूचा भक्त - अमित भानुशाली
"वारीचं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. कारण पंढरपूर वारी ही केवळ चालण्यासाठी नाही, चालण्यापुरती मर्यादित नाही. ती एका साधकाची, भक्ताची आणि माणसाच्या आत्म्याची यात्रा आहे. ही यात्रा शरीराने केली जाते, पण ती पोहोचते थेट हृदयाच्या गाभाऱ्यात. यावर्षी मला या वारीचा भाग होण्याचं सौभाग्य मिळालं. या अनुभवाने आयुष्यभर पुरेल अशी एक अद्भुत ऊर्जा, भक्ती आणि समाधान दिलं. वारीच्या प्रवासाची सुरुवात झाली आळंदीहून. तीच आळंदी जिथे ज्ञानयोगी ज्ञानेश्वर माऊली समाधिस्थ आहेत. त्या ठिकाणी पाऊल ठेवताच एक विलक्षण स्पंदन जाणवतं. ना ते शब्दात सांगता येत, ना पूर्णपणे समजावता येत. त्या जागेचा प्रत्येक कण, प्रत्येक वारा, प्रत्येक घंटानाद.. सगळं काही आत्म्याला भिडणारं असतं. माझं आणि आळंदीचं नातं फार जुनं आहे. लहानपणी मी दरवर्षी तिथं जायचो. ते माझ्यासाठी दुसरं घरच होतं. त्या गल्ल्यांमधून ते अनवाणी फिरणं, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर डोकं ठेवून बसणं, पायऱ्यांवर बसून पूजापाठ करणं, प्रदक्षिणा घालणं.. हे सगळं माझ्या बालपणाचा भाग होता. पण अभिनयाच्या प्रवासात आयुष्यात बदल झाले, वेगवान धावपळ सुरू झाली आणि आळंदी हळूहळू मागे पडली. मात्र 'माऊली महाराष्ट्राची' या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारीत सहभागी झालो आणि पुन्हा आळंदीत पोहोचलो. तेव्हा जे काही जाणवलं ते शब्दांपलीकडचं होतं. त्या मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच संपूर्ण शरीरात एक विजेसारखी ऊर्जा संचारली. जणू काही माऊली म्हणत आहेत, 'किती वर्ष झाली बाळा, तू आला नाहीस. पण मी वाट बघत होतो..' त्यावेळी डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनात नेमकी काय भावना होती ते माझं मलाच समजत नव्हतं. हजारो वारकरी माझ्या भोवती होते. पण माझ्या डोळ्यासमोर फक्त माझा विठोबा होता. गर्दीतही मला वाटलं 'विठू माऊली' माझ्या शेजारी आहे आणि हलक्या स्वरात माझ्या कानात सांगतेय, 'घाबरू नकोस रे बाळा, मी आहे ना.. तुझ्या प्रत्येक पावलात.. तुझ्या प्रत्येक स्वप्नात..
'मी वारीत चालत होतो तेव्हा सतत पावसाचा शिडकावा होत होता. रस्त्यावर चिखल पसरला होता. पाय पूर्णपणे चिखलाने माखलेले. शरीर ओलं झालेलं. पण कोणताही त्रास हा जाणवत नव्हता. पावलं चालत होती. पण थकत नव्हती. जणू पावसाचा प्रत्येक थेंब विठोबाचा आशीर्वाद बनून अंगावर पडत होता. हातात वीणा, मुखात 'विठ्ठल विठ्ठल'चा अखंड गजर आणि मन?.. ते तर हरवलं होतं एका वेगळ्या विश्वात.. जिथे मी आणि विठोबा असे फक्त आम्ही दोघेच होतो. समोर हजारो भक्त. पण मला फक्त आणि फक्त विठोबाच दिसत होता. टाळ-मृदुंगाच्या गजरात मी कुठेतरी हरवलो होतो.'
"वारीत मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. इथे कोणी अभिनेता नाही, कोणी डॉक्टर नाही, कोणी उद्योगपती नाही. इथे असतात ते फक्त वारकरी. माणसं आपली खरी ओळख पार विसरतात. इथे उरतो तो फक्त विठोबाचा भक्त. वारी चालताना शरीर थकतं, पण आत्मा फुलत जातो. त्या भक्तीच्या धुंदीत चालणं म्हणजे जणू देवाच्य मांडीवर बसल्यासारखं वाटतं. माझ्या आयुष्यात इतका शुद्ध, निर्मळ आणि प्रेममय अनुभव याआधी कधीच आला नव्हता."
विठ्ठल मंदिराच्या सहवासात - प्रसाद खांडेकर
"मला कधी पंढरपूरच्या वारीला जाता आलं नाही. पण आम्ही ज्या चाळीत राहायचो तिथे एक विठ्ठलाचं मंदिर होतं. तिथे आषाढी एकादशीच्या आधी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असायचा. आषाढी एकादशीला मंदिरात पारायण होत असे. भजनं सुरू असायची. तिथे आम्ही जायचो. मी मृदुंग वाजवायला तिथेच शिकलो. या मंदिराची वारी निघायची तेव्हा आम्ही देखील त्यात सामील व्हायचो. विठ्ठलाच्या नामस्मरणात आम्ही फेर धरायचो. नाचायचो. आषाढीचा उपवास करायचो. उपवासाचे पदार्थ खायचो. आमच्या चाळीतील मित्रमंडळी त्यादिवशी मजा करत. तो दिवस धम्माल असायचा."
दिवे घाटातला अद्भुत सोहळा - अभिजित आमकर
“मी वारकरी कुटुंबातलाच आहे. माझं गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला ते गाव. दरवर्षी आमच्या गावी पारायण असतं. मी आणि माझं कुटुंब पारायणासाठी आवर्जून जातो. घरीही हरिपाठाचं पठण होतं. आजोबांपासून सुरू असलेली आळंदी ते पंढरपूर वारीची परंपरा आजही सुरू आहे. आजोबांनंतर माझे आई-बाबा आणि आता मी दरवर्षी किमान एक दिवस तरी वारीत सहभागी होतो. वारीतला रिंगण सोहळा देखील मी अनुभवला आहे. यावर्षी शूटिंगमुळे वारी चुकेल की काय असं वाटत असतानाच मला वारीत सहभागी होण्यासाठी विचारणा झाली आणि पुन्हा एकदा मला विठू माऊलीचा साक्षात्कार झाला. दिवे घाट ते सासवड असा कठीण टप्पा आम्ही पायी चाललो. आतापर्यंत फक्त फोटो आणि व्हिडीओमधून मी वारीचा दिवे घाटातला सोहळा पाहिला होता. यावर्षी तो प्रत्यक्ष अनुभवता आला. हा सगळा अनुभव भारावून टाकणारा आहे. सासवडला काही काळ आम्ही विसाव्यासाठी थांबलो होतो. त्यावेळेस हरिपाठाचं पठण झालं. मला वारकरी म्हणून वारीत सहभागी होता आलं. वारीतले हे आनंदाचे क्षण मी कधीच विसरू शकणार नाही."
न थकणारी भक्ती - प्रतीक्षा शिवणकर
“वारीबद्दल मी आतापर्यंत खूप ऐकलं होतं. ती पाहिलीही होती. पण यावर्षी पहिल्यांदाच मला वारीत सहभागी होता आलं. १९ जुलैला जेव्हा पुण्यात वारी आली होती तेव्हा मला वारकऱ्यांची सेवा करता आली. 'तुला जपणार आहे' मालिकेतील अंबिका म्हणून वारकऱ्यांनी मला ओळखलं आणि मनापासून त्यांचं प्रेम दिलं. त्यांचं ते प्रेम पाहून माझा ऊर भरून आला. त्यांची विठुरायाला भेटण्याची तळमळ अनुभवता आली. मी त्या वारीत असावं, अशी बहुधा विठ्ठलाचीच इच्छा असावी. वारीत चालताना मी वारकऱ्यांसोबत फेर धरला. आरती केली. त्यांना जेवायला वाढलं. पाऊस असो की थंडी असो, त्यांची ती न थकणारी भक्ती पाहून अवाक व्हायला होतं. पांडुरंगाने यावर्षी जशी माझ्याकडून वारकरी म्हणून सेवा करून घेतली तसाच योग पुढच्या वर्षीही यावा. मला वारीबरोबर पंढरपूरला जायला मिळावं, हीच पांडुरंगचरणी प्रार्थना."
ज्येष्ठ नाट्यसमीक्षक.