भावभक्तीचा निर्मळ झरा

मानवशास्त्रज्ञ इरावती कर्वे असू देत, विदुषी दुर्गा भागवत असू देत किंवा आजची टेक्नोसॅव्ही पिढी असू देत, विठोबाचं सावळं रूप सगळ्यांना वेड लावतं. पंढरपूरची वारी एकदा तरी चालावी, ही इच्छा असलेले अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. विठ्ठलाच्या या वाटेवर सगळ्यांचं स्वागत आहे.
भावभक्तीचा निर्मळ झरा
Published on

भावरंग

डॉ. मुकुंद कुळे

मानवशास्त्रज्ञ इरावती कर्वे असू देत, विदुषी दुर्गा भागवत असू देत किंवा आजची टेक्नोसॅव्ही पिढी असू देत, विठोबाचं सावळं रूप सगळ्यांना वेड लावतं. पंढरपूरची वारी एकदा तरी चालावी, ही इच्छा असलेले अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. विठ्ठलाच्या या वाटेवर सगळ्यांचं स्वागत आहे.

एव्हाना पंढरपूरच्या वाटेवर वारीची लगबग सुरू झाली आहे. देहू-आळंदीबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या वाटा जणू काही त्या विठुरायाच्या पंढरीलाच जाऊन मिळत असल्याचं चित्र निर्माण झालंय...पण चित्र कशाला, ते वास्तवच आहे. पंढरीला पोचणाऱ्या प्रत्येक वाटेवर झपाझप पावलं उमटतायत... लहान-थोर, कोवळी-निबर, शहरी-ग्रामीण, अभिजन-बहुजन ते अगदी हिंदू-मुस्लिम...कारण या वाटेवर चालण्याची कुणालाच ना नाही. कुणीही यावं आणि भेटावं, विठ्ठलाची कुणाला मना नाही. एक वेळ विठ्ठल मंदिराची दारं बंद होतील, पण विठुरायाच्या मनाची कवाडं अखंड उघडीच असतात. त्यासाठी तर भक्ताने पंढरपुरात यायचीही गरज नसते. भक्त ‘जिथे उभा ठाकला, तिथे विठोबा भेटला’ असा हा देव... पण भक्तांचं-वारकऱ्यांचंच चित्त स्थिर नसतं. ते वर्षानुवर्षं पंढरपूरची वाट चालतच आहेत.

आताही आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर कधी एकदा पंढरपूरला पोहोचतोय, असं वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला वाटतंय. घर-दार, शेत-शिवार मागे सोडून आलेल्या वारकऱ्यांना आता विठ्ठलाचा ध्यास लागलेला आहे. गंमत म्हणजे मंदिरातील त्या अडीच फुटी विठ्ठलमूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन घडलं पाहिजे, असंही काही नाही. आषाढीला घडलेलं विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शनही वारकऱ्यांना पुरेसं असतं. कारण विठोबा त्यांच्या मनात असतो. लांबून कळस दिसला तरी त्यांना त्यांचा विठोबाच भेटतो. विठोबा आणि त्याच्या भक्तामध्ये असलेलं हे अनोखं नातं अन्यत्र पाहायला मिळत नाही.

विठोबाभेटीची ही पंढरपूर वारी म्हणजे एक आश्चर्यच आहे. वारकऱ्यांच्या तना-मनात चैतन्याचा हा झरा अखंड कुठून वाहतो याचं आश्चर्यच वाटतं. म्हणजे वारीच्या या प्रवासात वारकरी पुरेशी झोपही घेत नाहीत. दिवसभर चालून थकलेले वारकरी वारीच्या मुक्कामी जरा विश्रांती घेतील, शांत बसतील असं आपल्याला वाटतं. पण दिवसभराचं चालणं असो वा मुक्कामीचं बसणं, वारकरी सतत घुमतच असतात. उभ्याने चालताना वा मुक्कामाच्या ठिकाणी बसल्याजागीही ते विठ्ठलनामातच दंग असतात. जणू काही त्यांना चालण्याचे श्रम होतच नाहीत. म्हणून तर मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचं खाणं झाल्यावरही रात्री उशिरापर्यंत प्रत्येक तळावर अभंग-भारुडाचे फड रंगलेले असतात. अगदी पहाटे कधीतरी त्यांचा डोळा लागतो. मात्र तो लागतो न लागतो तोच तुतारीच्या दीर्घ ललकारीचा पहिला कर्णा वाजतो आणि आदल्या दिवशी संध्याकाळी वारकऱ्यांनी ठोकलेला तळ हलायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीबरोबर जाणाऱ्या दिंडीच्या प्रस्थानाची सहाची वेळ चुकू नये म्हणून बाया-बाप्ये आणि मुलंबाळं रामप्रहरी तीन-चारलाच उठलेली असतात. पंधरा मिनिटांनी दुसरा कर्णा वाजतो नि हाती टाळ, खाद्यांवर पताका, गळ्यात वीणा अडकवलेले वारकरी पालखीच्या पुढेमागे आपल्या नंबराप्रमाणे उभे राहतात. पंधरा मिनिटांनी, म्हणजे बरोबर सहा वाजता तिसरा अखेरचा कर्णा अधिक उच्चरवात वाजतो. त्याचबरोबर पालखीचे भोई झपकन पालखी उचलून खांद्यावर घेतात आणि दीड लाख वारकऱ्यांचा सूर अवघ्या आसमंतात घुमतो... ‘बोला पुंडलिक वरदे हऽऽऽरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाऽ ऽ ऽ राम... नि वारकऱ्यांची पावलं पुन्हा पंढरीची वाट चालायला लागतात.

अशाच वारीच्या दिवसांत एकदा, भारतातील पहिल्या महिला मानवशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांच्या पुण्यातील घरी त्यांचे काही परदेशी विद्यार्थी आले होते. त्यावेळी पुण्यात वारीचा मुक्काम असल्यामुळे त्यांच्या घरात काही ना काही कारणाने सारखा ‘विठोबा’ असा उच्चार होत होता. तेव्हा त्यांच्या एका विद्यार्थ्याने मोठ्या कुतूहलाने विचारलं- “Who is Vithoba?” (हा विठोबा कोण आहे?) यावर क्षणाचीही उसंत न घेता इरावतीबाई उत्तरल्या- “Ohh Vithoba, Vithoba is my boyfriend!” (विठोबा...विठोबा माझा बॉयफ्रेंड आहे.)

एका आवेगात डॉ. इरावती कर्वे यांनी दिलेलं हे उत्तर अगदी बरोबर होतं. गेली साडेसातशेहून अधिक वर्षं हा विठोबा केवळ संतांचाच नाही, तर संपूर्ण मराठीजनांचा माय-बाप, बंधू-सखा-मित्र-सगासोयरा राहिलेला आहे. ज्याचा जो भाव त्या रूपात तो विठोबाला पाहतो आणि समाधान पावतो.

एवढंच नाही, तर विठोबा हा महाराष्ट्रातील एकमेव असा देव आहे ज्याची अगदी सहज मनुष्यरूपात कल्पना केली जाते. धनगरापासून गुराख्यापर्यंत ते माळ्यापासून-कुंभारापर्यंत कोणत्याही रूपात विठोबा अगदी सहज सामावला जातो. यासंदर्भात विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील थोर विदुषी दुर्गा भागवत यांनी सांगितलेली एक आठवण पाहण्यासारखी आहे. त्या एकदा पंढरपूरला विठोबाच्या मंदिरात गेल्या होत्या. त्या मंदिरातून विठोबाचं दर्शन घेऊन बाहेर आल्या. गावाच्या वेशीवर येताच, अचानक एक धनगर त्यांच्यासमोर आला. दुर्गाबाई म्हणतात - “डोईवर मुंडासे घातलेला एक काळा, प्रौढ धनगर समोरून येत होता. त्याचा रंग काळ्या पाषाणाचा. तुकतुकीत काळा. मान आखूड, खांदे व छाती भरदार. दंड पिळदार. त्याचे पाय जाड खांबासारखे, पण पूर्ण जिवंत. जिथे पडतील तिथे रुजतील. त्याला पाहिलं मात्र... थेट मंदिरातल्या विटेवरच्या विठोबाचं मानवी ध्यान ऐहिकातून चाललं आहे असं वाटलं.”

भक्ताने आपल्या इष्ट दैवताला असं मानवी रूपात पाहण्याचं भाग्य अभावानेच एखाद्या देवतेला लाभलं असेल. विठ्ठलाला ते लाभलंय. किंबहुना विठ्ठलाइतकं हे भाग्य क्वचितच एखाद्या देवतेला लाभलं असेल. कारण रुढार्थाने कोणतीही सौंदर्यलक्ष्यी लक्षणं विठ्ठलमूर्तीत नाहीत. रंगरूपानेही तो प्रचलित सौंदर्य संकल्पनांनुसार आकर्षक ठरत नाही. त्याचा रंगही कभिन्न काळा! जणू काही विश्वाचा काळोख याच्यातच सामावलेला. म्हणजे थेट आकर्षून घ्यावं असं याच्या रंग-रूपात काहीच नाही. अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्याच जातीजमातीची विठोबा ही कुलदेवता नाही अन् तरीही संपूर्ण महाराष्ट्राची उपास्य देवता म्हणून, गेली आठ शतकं विठोबा मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवून आहे. त्याची मराठी जनमानसाला पडलेली भूल न उतरणारी आहे. आधुनिकतेचा परमोत्कर्ष ठरलेल्या एकविसाव्या शतकातही, विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीबरोबर पायी पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या वारकऱ्यांत पिढ्यान् पिढ्या ज्यांच्या घरात वारी आहे ते माळकरी आहेतच, पण आजची टेक्नोसॅव्ही पिढीही एका वेगळ्याच कुतूहलातून वारीत सामील होते आहे. विठ्ठलरूपाचे हे कसले गारूड आहे, त्याचा पुरता उलगडा अद्याप झालेला नाही, कदाचित होणारही नाही, कारण विठ्ठलाशी असलेलं जनमानसाचं हे नातं भावनिक आहे. म्हणजे जितक्या सहजतेनं आपल्या शरीरातील धमन्यांतून रक्त वाहतं, तितक्याच सहजतेनं मराठी माणसाच्या मनात विठोबाच्या भावभक्तीचा झरा वाहतो. आजही मराठी जनांच्या मनामनांतला हा झरा कुंठित झालेला नाही. उलट पायाखालची माती आणि डोक्यावरचं आकाश जेवढं आदिम आणि अनंत, तेवढाच त्यांच्यासाठी पंढरीचा विठोबाही आदिम आणि चिरंतन... हे महाराष्ट्रीय जनमानस आपल्या भावचक्षुंनीच विठोबाशी संवाद साधत असतं. त्यांना विठोबाच्या कभिन्नकाळ्या अडीच फुटी उंचीशी काहीच देणंघेणं नसतं. ते संतांच्या ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फाकती प्रभा’ या भारावलेल्या नजरेनेच पांडुरंगाकडे, विठोबाकडे पाहत असतात. त्यांच्यासाठी विठोबा हा निर्गुण निराकार नसतो. किंबहुना त्यांच्यासाठी तो सजीव-साकारच आहे. कृष्णाचं बाळरूप असलेला, हरिहर ऐक्य साधणारा, जनीला मदत करणारा, चोख्याची घोंगडी खांद्यावर घेणारा आणि बरंच काही...

म्हणून तर वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची चैत्रपावलं आजही उमटतायत आणि पुढेही उमटत राहतील. जोवर या भूतलावर महाराष्ट्र नावाचा प्रदेश असेल, तोपर्यंत महाराष्ट्रात विठोबा असेल आणि त्या विठोबाच्या भेटीच्या अनावर ओढीने झपाझप पावलं टाकणारी वारकऱ्यांची वारीही असेल हे नक्की!

लोकसाहित्याचे अभ्यासक.

mukundkule@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in