पूर्णियाचे पाणीपुरी पुराण

पाणीपुरी हा पदार्थ तसा सगळ्यांचाच लाडका. पण पूर्णिया जिल्ह्यात झालेल्या अभ्यासाने स्त्रियांना पाणीपुरी अधिक आवडते, हे पुढे आले. त्यावेळी खानपानाच्या आवडीवर सार्वजनिक वावराचे स्वातंत्र्य कसा प्रभाव टाकते, हे स्पष्ट झाले. घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या स्त्रियांना पाणीपुरी का आवडते, हे समजून घेणे जितके मनोरंजक, तितकेच उ‌द्बोधक आहे.
पूर्णियाचे पाणीपुरी पुराण
Published on

नोंद

विद्या कुलकर्णी

पाणीपुरी हा पदार्थ तसा सगळ्यांचाच लाडका. पण पूर्णिया जिल्ह्यात झालेल्या अभ्यासाने स्त्रियांना पाणीपुरी अधिक आवडते, हे पुढे आले. त्यावेळी खानपानाच्या आवडीवर सार्वजनिक वावराचे स्वातंत्र्य कसा प्रभाव टाकते, हे स्पष्ट झाले. घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या स्त्रियांना पाणीपुरी का आवडते, हे समजून घेणे जितके मनोरंजक, तितकेच उ‌द्बोधक आहे.

ड्यूमस हे भारतातील एक तरुण अभ्यासक. शहरीकरणाच्या प्रक्रियेत मैत्रीचे स्वरूपही कसे बदलते हा त्यांच्या अभ्यासाचा मूळ विषय. याचाच एक भाग म्हणून २०२२ मध्ये त्यांनी बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्यात ५०० स्त्री-पुरुषांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरवासीयांच्या मैत्रीसंबंधांशी निगडित विविध प्रश्न होते. मैत्री झाली म्हणजे भेटणे आले आणि भेटणे आले की खाणे आले. त्यामुळे या प्रश्नावलीत खान-पानाच्या सवयींशी संबंधित काही प्रश्न होते. अर्थातच त्यात 'स्ट्रीट फूड' म्हणजेच रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांविषयीही प्रश्न विचारले होते. अशा प्रकारच्या खवय्यांमध्ये उघडपणे पुरुषांचे प्रमाण जास्त आहे, असे दिसून आले. या अभ्यासात अगदी दररोज स्ट्रीट फूड खाणाऱ्या पुरुषांचे प्रमाण २३% आढळले, तर अशा खवय्या स्त्रियांचे प्रमाण केवळ सहा टक्के एवढेच होते. कधीच रस्त्यावरचे न खाणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ३४% होते, तर स्त्रियांचे प्रमाण ५४%. थोडक्यात, पूर्णियातल्या ५४ टक्के स्त्रियांनी रस्त्यावरचा मोकळा वारा अनुभवलेला नव्हता.

रस्त्यासारख्या सार्वजनिक जागी पुरुषांचा वावर अधिक असतो. त्याचेच काहीसे अपेक्षित प्रतिबिंब या प्रतिसादांमध्ये दिसते. मात्र रस्त्यावर उपलब्ध असणाऱ्या विविध त-हेच्या पदार्थांमधले कोणते पदार्थ कोणाला अधिक आवडतात यासंबंधीच्या अभ्यासाचे निष्कर्ष मनोरंजक आणि अभ्यासकांनाही अनपेक्षित असे आहेत. या अभ्यासात पुरुषांनी चहा, समोसा, लिट्टी, कोल्ड्रिंक इत्यादीला अधिक पसंती दर्शवली. पण 'पाणीपुरी'ने हे प्रमाण एकदम पालटवून टाकले. पाणीपुरी खायला आवडते म्हणणाऱ्यांमध्ये केवळ नऊ टक्के पुरुष होते आणि स्त्रिया तब्बल ७५% !

पाणीपुरीशी संबंधित निरीक्षणे इतर स्ट्रीट फूडपेक्षा इतकी वेगळी होती की आपल्या सर्वेक्षणात त्रुटी तर राहिली नाही ना, अशी शंका अभ्यासकांना आली. ती दूर करण्यासाठी त्यांनी आणखी एक पाहणी करायचे ठरवले. पूर्णियात भट्टा बाजार नावाचे मध्यवर्ती आणि गजबजलेले ठिकाण आहे. तिथे पुन्हा एक छोटेखानी सर्वेक्षण करण्यात आले.

पाणीपुरीसह विविध खाद्यपदार्थांच्या एकूण १३९ स्टॉल्सचे मॅपिंग केले गेले. चहाच्या ठेल्यावर ९५% पुरुष, कोल्ड ड्रिंक घेणाऱ्यांमध्ये ८७% पुरुष, इतर खाद्यपदार्थांच्या जागी ८२% पुरुष असल्याचे आढळून आले. या तिन्ही ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण मात्र पाच टक्के ते १८ टक्के यादरम्यान आढळले. पाणीपुरी गाड्यांवर मात्र तब्बल ५२% स्त्रिया आढळल्या, तर पुरुषांचे प्रमाण ४८%. भट्टा बाजारच्या पाहणीने प्राथमिक सर्वेक्षणातल्या निरीक्षणाला अधिक पुष्टीच मिळाली. एकंदर स्ट्रीट फूड खवय्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असले तरी त्याला 'पाणीपुरी' अपवाद ठरली. त्यात स्त्रियांनी पुरुषांना मागे टाकलेले दिसून आले. हा फरक कशामुळे पडत असेल? याचा शोध अभ्यासकांनी पुढील टप्प्यात घेतला. त्यासाठी त्यांनी पाणीपुरी विक्रेत्यांशी आणि त्यांच्या स्त्री-पुरुष ग्राहकांशी संवाद साधला. काहींच्या मते स्त्रियांच्या स्वादग्रंथी पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात, त्यामुळे दोघांची आवड वेगवेगळी राहते. स्त्रियांना आंबटसर आणि चटपटीत चवीचे पदार्थ अधिक आवडतात, असे काही लोकांना वाटते. आपल्या अनुभवावर आधारित लोकांनी व्यक्त केलेले हे अंदाज काही वैज्ञानिक अभ्यासांशीही मिळतेजुळते आहेत. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आंबट पदार्थांची आवड अधिक दिसून येते. विशेषतः विशिष्ट हॉर्मोनल स्थितीमध्ये ही आवड अधिक तीव्रतेने दिसून येते, असे काही वैज्ञानिक अभ्यासकांचे निष्कर्ष आहेत. हे स्पष्टीकरण मिळाल्यावरही या अभ्यासकांचे पूर्ण समाधान झाले नाही. कारण चवीचा हा मुद्दा ग्राह्य मानायचा तर दुसरा मुद्दा पुढे येतो. तो असा की, चटपटीत व आंबट चवीचे इतरही पदार्थ आहेत. उदा. भेळ वा चाट. तेही तितकेच स्वादिष्ट आहेत. पण तिथे स्त्रियांची गर्दी नसते, स्त्रियांना पाणीपुरीच खायची असते. तेव्हा संशोधकांनी 'असे का...' या प्रश्नाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला.

आता त्यांनी अभ्यासाचा फोकस पाणीपुरी ठेले वा चवीच्या आवडी-निवडींवरून हटवून तो अधिक व्यापक केला. स्ट्रीट फूडमधील 'फूड' बाजूला ठेवले गेले आणि फक्त 'स्ट्रीट'वर लक्ष केंद्रित केले. रस्ता म्हणजेच अशी सार्वजनिक जागा जिथे स्त्रियांचा वावर आधीच मर्यादित आणि कामापुरता असतो. मुंबई, पुणे व त्यासारख्या मोठ्या शहरातले चित्र नक्कीच बदलतेय आणि वेगळे आहे. पण स्त्रियांचे शिक्षण आणि सामाजिक सहभाग याबाबतीत पारंपरिक पगडा कायम असलेल्या बिहारमधील पूर्णियासारख्या जिल्ह्याच्या गावची परिस्थिती अजूनही वेगळी आहे. तिथे झालेला हा अभ्यास तिथल्या संदर्भानुसार समजून घ्यायला हवा. पुरुष कामानिमित्त वा कामाविनाही रस्त्यावर वा अन्य सार्वजनिक ठिकाणी रेंगाळतात. चहाच्या ठेल्यावर तासन्तास गप्पा मारत बसलेल्या पुरुषांना पाहून कोणाला त्यात काही वावगे वाटत नाही. पण अशी, रस्त्यासारख्या सार्वजनिक जागेवर मोकळ्या मनाने मुबलक वेळ घालवण्याची मोकळीक स्त्रियांना मात्र नसते.

स्त्रियांवरची बंधने प्रामुख्याने सामाजिक धारणांमुळे आलेली असतात. 'त्यांनी सातच्या आत घरात यावे', 'उगाच बाहेर वेळ घालवू नये', 'बाहेरचे वातावरण त्यांच्यासाठी सुरक्षित नाही'... हे त्यांच्यावर बिंबवले जाते. मग त्याही ही बंधनं समाजरीत म्हणून स्वीकारतात. फार वेळ बाहेर राहणे त्यांनाही नको वाटते. समजा मैत्रिणींना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर जावे लागले आणि ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर होऊ लागला, तर त्यांना अपराधी वाटू लागते. असा दबाव केवळ कुटुंबाचाच नसतो, घराबाहेरचे परिचित अपरिचित लोकही लक्ष ठेवून असतात. 'स्त्रियांनी उगाच बाहेर फिरू नये' ही सामाजिक धारणा असलेल्या समाजात प्रत्येकाच्या डोळ्यांचे सीसीटीव्ही स्त्रियांच्या हालचालींवर रोखलेले असतात. हे माहिती असल्याने स्त्रियाही सामाजिक चौकटीच्या आत राहू पाहतात. चहासारखी घरात रोज होणारी गोष्ट बाहेर कशाला प्यायची... असे म्हणून त्या चहाचा ठेला टाळतात किंवा बाहेरचे पदार्थ खावेसे वाटलेच तर पार्सल करून घरी नेऊन खातात.

या सामाजिक वास्तवासकट पाणीपुरीकडे पाहिले पाहिजे, असे अभ्यासक म्हणतात. समोसा, लिट्टी यासारख्या पदार्थांप्रमाणे पाणीपुरी ही पार्सलमध्ये नेऊन घरी खायची गोष्ट नाही. ती तयार झाली की लगेच खाण्यातच तिच्या चवीची मजा आहे. शिवाय ती झटकन तयार होते अन् पटकन खाता येते. म्हणजे खाणाऱ्याचा वेळही फार मोडत नाही. जाता-येता सहजपणे आणि चटदिशी खाता येईल असा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. त्याची हीच वैशिष्ट्यं पूर्णियातल्या स्त्रियांच्या 'पाणीपुरी प्रेमाचे' एक महत्त्वाचे कारण असू शकते, असे अभ्यासकांना वाटते. कारण त्यामुळे त्यांना चटकन घराबाहेर जाण्याची मुभा लाभते. स्वातंत्र्याचा वारा अनुभवता येतो.

याला पूरक ठरणारे आणखी एक कारण अभ्यासकांच्या लक्षात आले. ते म्हणजे पाणीपुरी विकणारे व खाणारे हे दोघेहीजण पाणीपुरीला 'लेडीज स्नॅक' म्हणत होते. अगदी पाणीपुरीच्या गाडीवरची चित्रंही चवीने खाणाऱ्या आनंदी मुली वा स्त्रियांची आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. पाणीपुरी म्हणजे प्रामुख्याने बायकांच्या आवडीचे खाणे-याला सर्वांचा दुजोरा होता. त्यामुळे महिला तिथे खायला जात असतील तर त्याला समाजमान्यता होती. मात्र तशी मान्यता स्त्रियांनी ठेल्यावर जाऊन चहा प्यायला असेलच असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे हा बिहारसारख्या राज्यातल्या एका लहान जिल्ह्याचा अभ्यास आहे. लहान जिल्ह्याचा हा संदर्भ महत्त्वाचा आहे. मोठ्या शहरातील चित्रं याहून वेगळे आहे हे निश्चित. तिथे सामाजिक बंधने शिथिल झाली आहेत. शिवाय ज्यांना परवडत असेल अशा स्त्रिया मैत्रिणींसोबत चांगल्याशा हॉटेलमध्ये जाऊन निवांत वेळ घालवू शकतात किंवा घरं मोठी असतील तर कुणाच्याही घरी भेटू शकतात. अर्थात ज्यांचा आर्थिक स्तर बरा आहे अशांनाच ही मुभा मिळू शकणार, हे उघड आहे.

पाणीपुरीसारखा सर्वपरिचित पदार्थ सामाजिक वास्तवावर किती वेगळ्या प्रकारे प्रकाश टाकू शकतो, याचा दाखला या अभ्यासातून मिळतो. पाणीपुरी स्त्रियांच्यामध्ये लोकप्रिय असण्याचे एकच एक असे कारण नाही. पण यानिमित्ताने अभ्यासाने केलेल्या उहापोहातून हे मात्र लक्षात येते की पदार्थांच्या आणि चवीच्या आवडीनावडी या काही व्यक्तीपुरत्या सीमित नसतात, आसपासची सामाजिक परिस्थिती, धारणा आणि स्त्रियांना मिळणारी मोकळीक, स्त्रियांचे संचार स्वातंत्र्य यांचाही त्यावर प्रभाव पडतो हे निश्चित.

समाज माध्यमांच्या आणि स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक

vidyakulkarni.in@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in