परमे देवराईचा जादुई अनुभव

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील परमेची देवराई म्हणजे दुर्मिळ वनसंपदा आणि वन्यजीवांचे जिवंत संग्रहालय. येथील प्राचीन गारंबीच्या वेलींमधून वावरताना अचानक समोर आलेल्या त्या ‘वन घुबडा’च्या दर्शनाने जणू निसर्गानेच आपल्याला या पवित्र वनात प्रवेशाची अनुमती दिली. एका संवेदशील पर्यटकाला अंतर्बाह्य बदलून टाकणारा हा एक अविस्मरणीय अनुभव!
परमे देवराईचा जादुई अनुभव
परमे देवराईचा जादुई अनुभव
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील परमेची देवराई म्हणजे दुर्मिळ वनसंपदा आणि वन्यजीवांचे जिवंत संग्रहालय. येथील प्राचीन गारंबीच्या वेलींमधून वावरताना अचानक समोर आलेल्या त्या ‘वन घुबडा’च्या दर्शनाने जणू निसर्गानेच आपल्याला या पवित्र वनात प्रवेशाची अनुमती दिली. एका संवेदशील पर्यटकाला अंतर्बाह्य बदलून टाकणारा हा एक अविस्मरणीय अनुभव!

चांदोबा, चंपक, पंचतंत्र वाचताना त्यातल्या कथांमधून भारतातल्या जंगलांची, गावांची ओळख व्हायची. रानातल्या प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी एक जिव्हाळ्याचं नातं या कथा वाचताना निर्माण झालं होतं. तुम्हाला माहितीये, कोकणाची भटकंती करताना अशी अनेक जंगलं दिसतात. देवाचा वास असणाऱ्या देवराई दिसतात. देवराईची, राखणदाराची तर कितीतरी रंजक माहिती ऐकली आहे. तिथे जाऊन तिथलं अद्भुत वातावरण अनुभवलं आहे. असाच एक सुंदर अनुभव दोडामार्ग तालुक्यातील भटकंती करताना आला आणि चांदोबामधल्या कथेतील पात्र समोर असल्यासारखं मला वाटलं.

दोडामार्ग तालुक्यात भटकंती करताना वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये राहिले होते. वनाच्या कुशीत विसावलेला, तिलारी नदीच्या सान्निध्यात हा होमस्टे आहे. निसर्गाला जपत हा होमस्टे प्रवीण हा तरुण उत्तम चालवतो. जंगलातील Trails,पक्षी-निरीक्षण करवून आणतो. आपसुकच एक प्रकारे निसर्गशिक्षण तिथे मिळतं. इथल्या एका देवराईची Trail मी प्रवीणसोबत करत होते. होमस्टेपासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर परमे नावाचे गाव आहे. तिथे ही देवराई आहे. परमेची देवराई म्हणूनच प्रख्यात आहे. या देवराईत पाऊल ठेवताक्षणी घडलेली घटना माझ्या मनात पक्की कोरली आहे.

गाडीनेच आम्ही परमे गावात पोहोचलो. गावाच्या बाजूला एक मोठा हिरवागार भाग दिसू लागला आणि ओळखलं की हीच देवराई आहे. मातीच्या वाटेने चालत देवराईत प्रवेश केला. भवताली गारंबीची वेल, सीताअशोकाची झाडं होती. आत जाऊन देवराई बघायची या हिशोबाने आपल्याच तंद्रीत चालत होते तोच प्रवीणने गडबडीत थांबवलं. बारीक आवाजात तो म्हणाला, “थांब थांब. तिकडे बरोबर गारंबीच्या फांदीवर बघ..” मीही नजर भिरभिरत गडबडीत हळू आवाजात म्हणत होते- “कुठे?? कुठे??” जंगलात फिरताना कितीही मोहक प्राणी अथवा दृश्य दिसलं तरी मोठ्याने बोलायचं नाही हे जंगल फिरून फिरून अंगात भिनलंच होतं. “अगं, ती सीताअशोकाची फांदी दिसत आहे, त्याच्या मधून बघ. गारंबीच्या फांदीवर बघ.” असे तो दबक्या आवाजात सांगत होता. मी अचूक बघितलं आणि आवासून बघत राहिले. फांदीवर तपकिरी रंगाचा, पोटावर फिकट तपकिरी पांढरे पिसं असणारा, गोल चेहऱ्याचा, तसेच गोल मोठाले डोळे असणारा पक्षी बसला होता. तो होता Brown wood owl अर्थात तपकिरी वन घुबड. माझा हा अत्यंत आवडता पक्षी त्या फांदीवर रुबाबात बसला होता. आपले पंख साफ करीत होता. तो थोडावेळ पंख साफ करायचा आणि सगळ्या देवराईकडे नजर टाकायचा. पुन्हा चोच पंखात खुपसायचा, पंख साफ करायचा आणि नजर देवराईवर टाकायचा. असं वाटत होतं की, तो या देवराईचा मालक आहे. देवराईवर नजर टाकता टाकता अचानक त्याचे मोठाले गोल डोळे आमच्यावर रोखले आणि घुss घुss घुss असा घुत्कार त्याने केला. जणू तो सांगत होता की, मी इथला मालक नाही तर मी इथला राजाच आहे आणि खरच तोच तिथला राजा होता. गेल्या गेल्या देवी लक्ष्मीच्या वाहनाचं घडलेलं दर्शन पाहून मन प्रसन्न झालं होतं. ते घुबड थोडावेळ त्या फांदीवर थांबलं आणि आम्हाला प्रवेश करण्याची अनुमती देऊन देवराईत गुडूप झालं. त्याच्या दर्शनाने देवराईतील वातावरण बदलून गेलं होतं.

देवराई म्हणजे देवासाठी राखलेलं जंगल. काही देवराई तर विशिष्ट झाडांच्याच असतात. म्हणजे इतर देशी झाडं असतात, पण एका प्रजातीची झाडं बहुसंख्येने असतात. परमेची देवराई विशेष आहे. इथे फिरताना अनेक दुर्मिळ झाडांच्या सहवासात मी वावरत होते. माझ्या भवताली गारंबीच्या वेली होत्या. या वेली इतक्या जुन्या आहेत की, त्या वडाच्या पारंब्यासारख्या पसरल्या आहेत आणि झाडाच्या खोडा-फांद्याप्रमाणे जाडजुड झाल्या आहेत. झाडाच्या ओंडक्यावर कसं आरामात बसतो तसं या वेलीवर एखादी व्यक्ती बसू शकते. गारंबीच्या मोठमोठ्या शेंगा लागल्या होत्या, खाली पडल्या होत्या. चिंचेची चिंचुका कशी असते तशीच पण चिंचुकेपेक्षा दसपट आकाराने मोठी बी असते. ही बी आयुर्वेदिक आहे. सीताअशोकाची झाडंही होती, ती लालपिवळ्या फुलांच्या गुच्छांनी भरलेली होती. इथे दुर्मिळ नील वृक्षही आहेत त्याला काळा ताम्हण म्हणतात हे समजलं. माकडलिंबू, कुंकुम, कडू कवठ अशी अनेक झाडं तिथे आहेत.

जी झाडं जंगलात आढळतात ती झाडं या देवराईत आढळतात. सह्याद्रीच्या कुशीत परमे हे गाव वसलंय. गावाला जंगलाची हिरवीगार किनार लाभली आहे. अनेक वन्यजीवांचा वावर इथे आहे. गावातले लोक देवराईतील राखणदाराची मनोभावे पूजा करतात. देवाच्या राईतील झाडावर कोणीही कुऱ्हाड चालवत नाहीत. परमेच्या देवराईत माझं मन अगदी रमलं. सूर्यास्ताची कोवळी किरणे या दुर्मिळ झाडांवर पडत होती. असं जाणवत होतं की या प्रत्येक झाडामध्ये देव विसावला आहे. तिथलं वातावरण अगदी चैतन्यमय होतं. असा अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल देवाचे आभार मानले.

जेव्हा मी Travel vlog साठी फिरायला लागले तेव्हा अशी विविध ढंगाची स्थळं मला बघता आली. पण त्या आधी चार चौकटीत कामं सुरू होती आणि ट्रीप करायची वेळ आली की, ठरलेली प्रसिद्ध ठिकाणं बघितली जायची. आता मात्र निसर्गवाचन करवणारी डोळस भटकंती करते. अजूनही पुस्तकात, फोटोत दिसणारे पक्षी-प्राणी प्रत्यक्षात पाहताना अगदी मनापासून आनंद होतो. हे विश्व किती मोठं आहे!! अशी किती चमत्कारिक विलक्षण अनुभव देणारी ठिकाणं असतील या पृथ्वीवर!! असे अनेक विचार मनात रुंजी घालत राहतात आणि मन म्हणत अजून भरपूर फिरायला हवं.

फिरताना कधी कधी परमेची देवराईसारखा घुबडाचा प्रसंग घडतो आणि मग तो क्षण आपल्याला आतून पूर्णपणे बदलून टाकतो. मन संवेदनशील बनतं आणि कुठल्याही ठिकाणचं वातावरण जिवंत होऊन आपल्यात झिरपू लागतं. अशीच दृष्टी निर्माण होत राहुदे.. मन संवेदनशील बनू दे हीच प्रार्थना मी नेहमी करते.

  • जवळचा एअरपोर्ट - मोपा एअरपोर्ट

  • जवळचे बसस्थानक - दोडामार्ग बस स्थानक, बांदा बस स्थानक

  • जवळचे रेल्वे स्टेशन - सावंतवाडी रोड

  • रोडने प्रवास - कोल्हापूर-आंबोली घाट-दोडामार्ग किंवा कोल्हापूर - तिलारी घाट-दोडामार्ग

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in