परोपकारी लसूण

एका टोपलीत बरेच लसूण होते. टपोरे, मोठमोठ्या पाकळ्यांचे. त्या लसणात एक भलामोठा चमत्कारिक लसूण होता. बराच वेळ टोपलीत बसून बसून तो कंटाळला होता. कोणी गिऱ्हाईक येईना आणि त्याला विकत घेऊन कुणी घरी घेऊन जाईना, अशी त्याची तऱ्हा झाली होती. एकाच जागी बराच वेळ बसून तो स्वतःवरच वैतागला.
परोपकारी लसूण
Published on

बालोद्यान

एकनाथ आव्हाड

एका टोपलीत बरेच लसूण होते. टपोरे, मोठमोठ्या पाकळ्यांचे. त्या लसणात एक भलामोठा चमत्कारिक लसूण होता. बराच वेळ टोपलीत बसून बसून तो कंटाळला होता. कोणी गिऱ्हाईक येईना आणि त्याला विकत घेऊन कुणी घरी घेऊन जाईना, अशी त्याची तऱ्हा झाली होती. एकाच जागी बराच वेळ बसून तो स्वतःवरच वैतागला. म्हणाला, “कंटाळलो बुवा या टोपलीत बसून. किती वेळ बसणार एकाच जागी. लोकं कशी एका जागेवरून दुसऱ्या जागी ये-जा करतात, मनसोक्त फिरतात. आपणसुद्धा जरा बाहेर फिरून यावं म्हणतोय. मोकळ्या हवेत फिरल्याने अंगातला आळस पळून जाईल. छान वाटेल आपल्याला.” असं म्हणून त्यानं टुणकन टोपलीबाहेर उडी मारली आणि खरंच निघाला ना तो फिरायला. फिर फिर फिरला. टोपलीत तासन‌्तास बसून बसून आखडलेले अंग आता फिरून मोकळे झाले होते.

फिरताना वाटेत त्याला एक लहान मुलगा खोकताना दिसला. एक बाई त्या लहान मुलाला कडेवर घेऊन चालली होती. ते लहान मूल खोकायचं काही थांबेना. ते रडतही होतं. आई उगी उगी म्हणत त्या मुलाची समजूत काढत होती. पण मूल खोकायचं आणि रडायचं काही थांबत नव्हतं. लसणाला त्या लहान मुलाचं एकसारखं खोकणं पाहून वाईट वाटलं. तो लसूण लगेच बोलता झाला. त्या बाईला म्हणाला, “अहो बाई, तुमचं मूल एकसारखं खोकतंय. त्याला चांगल्या डॉक्टरकडे न्या. मला वाटतं त्याला डांग्या खोकला असावा. असं करा, माझ्या अंगावरच्या चार-पाच पाकळ्या काढा. त्याची माळ करा अन् ती माळ या मुलाच्या गळ्यात घाला. माझ्या पाकळ्यांच्या वारंवार वासाने त्याचा खोकला बरा होईल. आराम मिळेल त्याला.” त्या बाईने लसणाच्या अंगावरच्या पाच पाकळ्या काढल्या अन् ती त्या लसणाची माळ करण्यासाठी घरी निघून गेली.

लसूण आपला पुढे निघाला. रमत-गमत फिरत होता. तेवढ्यात एका माणसाला धाप लागून, तो जागीच घामाघूम होऊन बसलेला या लसणाने पाहिलं. लसूण त्या माणसाजवळ गेला. आस्थेने त्याने त्या माणसाची विचारपूस केली. तो माणूस म्हणाला, “मला ब्लडप्रेशरचा त्रास नेहमी होतो. बहुतेक माझं ब्लडप्रेशर आता वाढलं असणार म्हणूनच मला चक्कर आल्यासारखी होतेय.” लसूण पटकन म्हणाला, “आधी डॉक्टरला दाखवा. ब्लडप्रेशरची गोळी घ्यायला कधी चुकू नका आणि माझं एक ऐकाल!” त्या माणसाची धाप आता बरीच कमी झाली होती. तो लसणाला म्हणाला, “सांग मला. मी ऐकेन.” लसूण म्हणाला, “माझ्या अंगावरच्या काही पाकळ्या काढून घ्या.” तो माणूस म्हणाला, “मी या पाकळ्यांचं काय करू?” लसूण म्हणाला, “माझ्या काही पाकळ्या आणि पुदिना, जिरे, मिरे आणि सैंधव यांची चटणी करून रोजच्या जेवणात खाल्ल्याने वाढलेल्या रक्तदाबाचं प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होते. एकदा हा प्रयोग करून तर पाहा.” त्या माणसाने खरंच लसणाच्या अंगावरच्या काही पाकळ्या काढून घेतल्या आणि त्याने लसणाला धन्यवाद दिले. लसूण आनंदाने हसला आणि पुढे चालू लागला.

वाटेत शाळेतील साधारण बारा वर्षांचे एक मूल मोठमोठ्याने रडताना लसणाला दिसले. त्या मुलासोबत त्याचे वडीलही होते. त्या मुलाला रडताना पाहून लसणाला वाईट वाटले. लसणाने मुलाच्या वडिलांना विचारले, “का हो, काय झालं या मुलाला?”

तो माणूस म्हणाला, “पोट दुखतंय त्याचं. शिवाय त्याचं पोट फुगल्यासारखं वाटतंय.”

लसूण म्हणाला, “हे बघा, माझ्या अंगावरच्या चार-पाच पाकळ्या काढून घ्या. त्या पाकळ्या, खडीसाखर व सैंधव सम प्रमाणात घेऊन त्यात दुप्पट तूप कालवून त्याचं चाटण त्याला द्या. मग बघा, पोटदुखी, पोट फुगणे यावर चांगलाच फरक पडतो की नाही ते. तसं तुम्ही त्याला डॉक्टरलाही एकदा दाखवाच.” त्या मुलाच्या वडिलांनी लसणाच्या अंगावरच्या पाच पाकळ्या काढून घेतल्या. लसणाला नमस्कार करून तो माणूस आपल्या मुलाला घेऊन निघून गेला.

लसूण पुढे निघाला. वाटेत त्याला एक मुलगी कानाला हात लावून रडताना दिसली. बिचारीच्या सोबत कुणीच नव्हते. एकटीच होती ती. लसूण तिच्याजवळ गेला. म्हणाला, “कशाला रडतेस मुली? बरं वाटत नाही का तुला?”

“माझा कान दुखतोय खूप.” मुलगी रडतंच कसंबसं म्हणाली.

“हे बघ, तू एक काम कर. माझ्या अंगावरच्या दोन-तीन पाकळ्या घे. तेलात त्या पाकळ्या घालून ते तेल चांगले कढेपर्यंत गरम करायला आईला सांग. नंतर ते तेल कोमट झाल्यावर त्याचे थेंब दुखत असलेल्या कानात घातल्याने कानात सणके मारत असतील किंवा कान पिकला असेल तर त्यावर चांगला गुण येईल.” मुलीने लसणाच्या अंगावरच्या तीन-चार पाकळ्या काढून ती घाईने घराकडे निघाली. निघताना लसणाला धन्यवाद द्यायला ती चिमुरडी विसरली नाही.

लसूण पुढे चालत राहिला. चालता-चालता त्याच्या डोक्यात विचार आला. या रस्त्यावर केवढी रहदारी. जपून चालले पाहिजे. अपघात होण्याची भीती आहे. लसूण रस्त्याच्या कडेकडेनेच पुढे निघाला. थोड्याच अंतरावर त्याला माणसांचा घोळका दिसला. नेमकं काय झालं म्हणून लसूण त्या घोळक्यात शिरला. एक मुलगा तिथे मोठ्यानं रडत होता. त्याच्या पोटऱ्यातून रक्तही वाहत होतं. रक्त पाहताच लसूण घाबरला. तिथल्याच एका माणसाला त्यानं विचारलं, “का हो, काय झालं या मुलाला? त्याच्या पायातून रक्त का येतंय?” “अहो, एवढ्यातच रस्त्यावरचं पिसाळलेलं कुत्रं चावलं या मुलाला, फार वाईट झालं हो” तो माणूस कळवळून म्हणाला. लसूण पटकन पुढे झाला. तिथल्या बघ्यांना म्हणाला, “अहो, नुसतं बघत काय बसलात. याला ताबडतोब शेजारच्या दवाखान्यात न्या.” तिथल्या एका भल्या माणसाला लसूण म्हणाला, “अहो, काका असं करा, माझ्या अंगावरच्या पाच पाकळ्या काढा. त्या चांगल्या वाटा आणि त्याचा लेप कुत्रा चावलेल्या जागी लावा पटकन. तसंच लसूण वाटून तो पाण्यात उकळवून ते पाणीही त्याला प्यायला द्या. पिसाळलेल्या कुत्र्याचे विष उतरायला मदतच होईल.” त्या माणसाने लसणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या अंगावरच्या पाच पाकळ्या काढून घेतल्या आणि त्या मुलाला उचलून घेऊन तो तिथल्याच जवळच्या दवाखान्यात जायला निघाला. लसणाला त्या माणसाचे कौतुक वाटले. कोण कुणाचा. वेळ न दवडता लगेच नेले त्याने त्या मुलाला उपचारासाठी. लसणाला फार बरे वाटले. आनंदानेच तो पुढे चालू लागला. चालून चालून आपण किती दूर निघून आलो याचा अंदाज त्याला आलाच नाही. रहदारी आता कमी झाली होती.

वाटेत त्याला एक पाण्याचं तळं लागलं.

तळं पाहताच लसणाला वाटलं, चालून चालून खूप दमलोय आपण, तहानही लागलीय. तळ्यातलं थंडगार पाणी प्यावं आणि तळ्याकाठी थोडा वेळ विश्रांतीही घ्यावी म्हणून लसूण तळ्याच्या काठाजवळ आला आणि पाणी पिण्यासाठी तळ्याच्या काठावरून खाली वाकला अन् पाहतो तर काय! त्याला तळ्यात त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं. त्याचं रूप त्याला तळ्यात फारच चिमुकलं दिसलं. सुरुवातीला पटकन तो घाबरला. आपलं रूप असं का दिसतंय? पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं, “अरे हो, आपण प्रत्येकाला आपल्या काही पाकळ्या देत आलो. पाकळ्यांचा उपयोग करून तुमचं दुखणं, आजार दूर करा असं सांगत आलो, त्याचाच हा परिणाम.”

आता मात्र आपलं वेडंवाकडं, उरलंसुरलं चिमुकलं रूप पाहून लसणाला वाईट वाटलं नाही. उलट आनंदच झाला. आपण कुणाच्या तरी उपयोगी पडू शकलो, याचं समाधान त्याच्या चिमुकल्या चेहऱ्यावर आता झळकत होतं.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

logo
marathi.freepressjournal.in