

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱ्या ‘पेढा’ या सात्विक गोड पदार्थाचा ऐतिहासिक प्रवास आणि त्यासोबत जोडलेल्या मध्यमवर्गीय आठवणींचा हा एक गोड रसास्वाद आहे.
या विषयावर... म्हणण्यापेक्षा या गोड पदार्थावर लिहायला घेतानाच तोंडाला पाणी सुटलंय.
तसं पाहिलं तर एवढीशी मूर्ती, पण मुखात शिरून जिभेवर येताच जो स्वर्गीय सुखाचा आनंद देऊन जातो ना, त्या सुखाचं वर्णन काय करावं.
पेढ्याच्या इतिहासात शिरायचं तर, ‘पेडा’ हा शब्द संस्कृत शब्द ‘पिंड’ किंवा ‘पिंडक’ पासून आला आहे , ज्याचा अर्थ अन्नाचा गोळा आणि दूध व पिठापासून बनवलेला गोळ्याच्या स्वरूपातील गोड पदार्थ असा होतो. पिंडक या गोड पदार्थाचा उल्लेख इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील चरक संहितेपासून ते इसवी सन
१७ व्या शतकातील भोजनकुतुहलापर्यंतच्या आयुर्वेदिक आणि पाकशास्त्र ग्रंथांमध्ये आढळतो. भोजनकुतुहलामध्ये दूध आणि साखर वापरून, वेलची, लवंग आणि मिरी यांसारख्या मसाल्यांच्या साहाय्याने हा गोड पदार्थ बनवण्याचे वर्णन आहे.
संस्कृत साहित्यात दूध पेडा या गोड पदार्थाचा उल्लेख दुग्ध पिंडक आणि क्षीरवत्सिका यांसारख्या वेगवेगळ्या नावांनी आढळतो.
पेढ्यांचे आधुनिक प्रकार सध्याच्या उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात उगम पावले. मथुरा पेढा हा त्या शहराचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. उत्तर प्रदेशातून पेढे भारतीय उपखंडाच्या अनेक भागांमध्ये पसरले.
हा एक गोड पदार्थ आहे जो गणेश चतुर्थी , दिवाळी, रक्षाबंधन, बाळाचे आगमन किंवा लग्न यांसारख्या विविध प्रसंगी खाल्ला जातो . विशेषतः मुलगा जन्माला आल्यावर तो वाटला जातो. कृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी कृष्णाला अर्पण केल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय मिठाईंपैकी ही एक आहे .
पेढा हा कृष्णाचा आवडता गोड पदार्थ मानला जातो आणि कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी तो मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.
पेढा पहिल्यांदा कसा बनवला गेला याबद्दल एक प्रसिद्ध कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. कृष्णाची आई यशोदा ज्या चुलीवर दूध उकळत होते ती बंद करायला विसरली. जेव्हा तिला आठवले, तेव्हापर्यंत दूध बरेच घट्ट झाले होते. ते वाचवण्यासाठी, तिने त्यात साखर घालून कृष्णाला देण्याचे ठरवले. असे मानले जाते की कृष्णाला तो इतका आवडला की कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत कृष्णाला पेढा देण्याची परंपरा सुरू झाली .
अनेकजण पेढा हातावर ठेवला, की अख्खाच्या अख्खा पटकन तोंडात टाकतात आणि मोकळे होतात. हे माझ्या मते खरे पेढे प्रेमी नाहीत. पेढा हातात येताच, त्याचा स्वाद नाकात शिरतो आणि मन प्रसन्न करून जातो. थोडा धीर धरायचा, आणि पेढ्याचा तुकडा हाताने किंवा दातांनी मोडून मुखात घ्यायचा. छान चघळत खाऊन टाकायचा, आणि त्यानंतर उरलेला पेढा मटकवायचा. जीभ दात यांसकट संपूर्ण मुख पेढामय होऊन, अजून एकाची मागणी करू लागतं.
पूर्वी मिठायांमध्ये आजच्याएव्हढी विविधता नव्हती, आणि मंगल कार्य, धार्मिक कार्य, शैक्षणिक यश किंवा एखादा सत्कार समारंभ अशा कोणत्याही प्रकारात, पेढा हा पहिल्या क्रमांकावर असायचा.
माझ्या लहानपणी पेढा हा साधारणपणे आपल्या शीतपेयांच्या बाटलीच्या बुचाएव्हढा किंवा किंचित मोठा मिळायचा. त्यांमध्ये फार विविधता, व्यावसायिक रूप आलेलं नव्हतं. पिवळा आणि पांढरा दोन रंगांचे अगदी साधे पेढे उपलब्ध असायचे. गुरुवारी दत्तासमोर ठेवायला पाच पेढ्यांच्या रेडीमेड पुड्याच मिळायच्या. हे पेढे अंगाने चपट, रंगाने पिवळे आणि आकाराने साधारण पन्नास पैशाच्या नाण्याएवढे. पण चवीचं काम अगदी चोख बजावायचे.
पूर्वी साखरपुडा समारंभात साखरेचा पुडा, वर- वधूकडची मंडळी एकमेकांना देत असत. पुढे हे पुडे, पेढ्यांनी भरून दिले जाऊ लागले... त्यापुढे मी येत नाही, कारण त्यानंतर आणि आज साखरपुडा हा मिनी लग्नासारखा होऊ लागलाय. पूर्वी या समारंभाला अगदी घरची सख्खी मंडळीच हजर असायची, त्यामुळे या एक्सचेंज केलेल्या पुड्यातील पेढे साखडपुड्यानंतर सगळ्यांना वाटून, लग्न ठरल्याची गोड बातमी सांगितली जायची.
गणेश चतुर्थीला आमच्या घरच्या गणपती दर्शनाला मी जातो ना, तर तिकडे पणशीकर, पुरोहित, चितळे आणखी कुणी असे विविध दुकानांतील पेढे आलेले असतात. देवाला ठेवून झाले की, “एक बघू रे....”असं म्हणत प्रत्येक पेढ्याची चव घ्यायची.
मथुरेचा पेढा, धारवाडचा, साताऱ्याचा कंदी पेढा असे पिढ्यांचे विविध प्रकार वेगवेगळ्या चवींसह उपलब्ध असतात. जायफळयुक्त पेढासुद्धा स्वाद आणि चवीला मस्त असतो.
आजकाल गोडाला नाकं मुरडणारे महाभाग हातावर पेढा ठेवल्यावर त्याचा लहानसा तुकडा मोडून खाताना पाहिल्यावर खूप यातना होतात. किती म्हणून पेढ्याचा अपमान करायचा.
दुग्धमंदिर किंवा दुग्धालय, हलवाई... अहो, पूर्वी मिठाया मिळणाऱ्या दुकानांची अशीच नावं असायची. फक्त याच्या आधी पणशीकर, पुरोहित, घासिटाराम, चंदू , दयाराम दामोदर, गोरस हे लागायचं. पुढे या सगळ्याला व्यावसायिक स्वरूप आलं, आणि अमुक स्वीटस, तमुक स्वीटस अशा पाट्या झळकायला लागल्या. पेढ्यांचं छोटेखानी रूप बदललं आणि मोठ्ठे लुसलुशीत, डिझाइन कोरलेले, गुबगुबीत मोठे, मध्यावर पिस्ता चिकटवलेले, मोदकाच्या आकाराचे, मावा, चॉकलेट, ड्रायफ्रुट मोदक पेढे भरमसाठ किंमतीत उपलब्ध होऊ लागले, आणि पेढ्यांची ती पूर्वीची नजाकत, ते सर्वसामान्य लोकांना परवडणारं रूप आणि किंमत, आपलीशी वाटणारी चव मात्र हरवून गेली. समारंभात, मंगल कार्यात, ताटांमधून पातळ रंगीत कागदाच्या वेष्टनात गुंडाळून बसलेला पेढा, आता प्लास्टिक पिशव्या, लहान डेकोरेटिव्ह खोके यामध्ये बसून प्रत्येकाच्या हाती जाऊ लागला.
पूर्वी लग्नाची बोलणी पक्की झाली किंवा साखरपुडा झाला, अथवा लग्न लागलं की घरातलं कुणी आनंदाने, “आमच्या सौदामिनीचं लग्न ठरलं बरं का.....”
“आपल्या भैरवीचा काल साखरपुडा झाला....हे पेढे.”
“पेढा घ्या नाना, तुमच्या लाडक्या नमाचं लग्न लागलं..”
असं तोंड भरून सांगत पेढा आमंत्रितांच्या, आप्तांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या हातावर ठेवायचे. आज एका मोठ्ठ्या महागड्या पेढ्याचा गुळगुळीत महागडा खोका भोजन कॉन्ट्रॅक्टरचा माणूस निर्विकार चेहऱ्याने प्रत्येकाच्या हातावर ठेवतो इतकंच.
kprasad1959@gmail.com