पेंग्विन परेड

अथांग समुद्रातून रोज मैलोनमैल प्रवास करून, एकाच वेळी शिस्तीत किनाऱ्यावर येणारे हे पिटुकले पेंग्विन नक्की स्वतःचे घर कसे शोधतात? आणि ऐन थंडीत त्यांना स्वेटर का घालावे लागले होते? निसर्गाचा एक विलोभनीय चमत्कार असलेल्या या ‘परिराज्यातील पेंग्विन’बद्दलच्या अशाच काही रंजक आणि कुतूहलजनक गोष्टी.
पेंग्विन परेड
पेंग्विन परेड
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

अथांग समुद्रातून रोज मैलोनमैल प्रवास करून, एकाच वेळी शिस्तीत किनाऱ्यावर येणारे हे पिटुकले पेंग्विन नक्की स्वतःचे घर कसे शोधतात? आणि ऐन थंडीत त्यांना स्वेटर का घालावे लागले होते? निसर्गाचा एक विलोभनीय चमत्कार असलेल्या या ‘परिराज्यातील पेंग्विन’बद्दलच्या अशाच काही रंजक आणि कुतूहलजनक गोष्टी.

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्न शहरापासून जवळजवळ सव्वाशे किलोमीटर दूर असलेलं फिलिप आयलंड आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही तिथे घालवलेली एक मनोरम संध्याकाळ आमच्या चिरस्मरणात राहील इतकी सुंदर होती. सूर्य अस्ताला जायच्या थोड्या अगोदरचा गुलाबी प्रकाश सर्वत्र पसरला होता. हवेत गारवा वाढत चालला होता. समुद्रानं अंधाराची शाल अंगाभोवती लपेटायला सुरुवात केली होती. हाताची घडी घालून, ती पोटावर हलकीशी दाबत, खांदे उंचावून त्या खोबणीत आपलं डोकं लपवत गारव्यावर मात करायचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्या उन्हाळी तरीही गार संध्याकाळी आम्ही कुणाची तरी वाट पाहत होतो. कुणाची बरं? रस्ता चुकलेल्या सहप्रवाशाची? ‘आत्ता येतो’ म्हणून सांगून गेलेल्या टूर गाईडची? पेट्रोल भरायला गेलेल्या टूरिस्ट बसची? छे! छे! आम्ही वाट पाहत होतो, जगातल्या सर्वात छोट्या पेंग्विनांची!

‘नक्की येतात का? सूर्यास्त होऊन तर बराच वेळ झाला.. आज आलेच नाहीत तर?.. छे! असं कसं होईल?.. का नाही? ते काही पाळीव पेंग्विन नाहीत माणसाच्या तालावर नाचायला.’ शंकाकुशंकांचं जाळं घट्ट विणलं जात असताना अचानक प्रेक्षकांमध्ये खळबळ माजली. कुणाला दिसले, कुणाला नाही. ज्यांना दिसले ते त्या दिशेनं हात लांब करत तर्जनी ताणत, मान तिरकी करत समुद्रावरचे गडद ठिपके दाखवू लागले. माझी गणती न दिसलेल्यांमध्ये होती. ‘हक हक’ असा आवाज येऊ लागला आणि अचानक जादूगाराच्या परडीखालून बाहेर यावा तसा तो पेंग्विन मला दिसला. अगदी स्पष्ट! दिसला ग बाई दिसला.…

दिवसभर समुद्रात माशांची शिकार करून रात्री हे इवलेसे पेंग्विन थकले-भागले आपल्या घराकडे परतत होते. एक-दोन नव्हे; तर शेकड्याने, हजारोंच्या संख्येत. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन, लाट परत जायच्या आत ओल्या वाळूवर पाय ठेवून आपल्या सवंगड्यांची वाट पाहत उभे होते. मग तुकड्या तुकड्यांनी लेफ्ट-राईट करत त्यांची परेड सुरू झाली. एकामागून एक, छोटी छोटी पावलं टाकत, ठुमकत ठुमकत वाळूच्या किनाऱ्यावर सुरू झालेली त्यांची परेड, रेतीच्या डोंगरांमधील बिळात शिरल्यावर संपली. काही काही बिळातून छोटी छोटी पिल्लं, डोकं बाहेर काढून आपल्या आई-बाबांची वाट पाहत होती. एकमेकांची भेट झाल्यावर छानसा प्रेमाचा कल्ला ऐकू आला. त्या कोलाहलात बहुदा नुकतंच चालू लागलेल्या, बिळ सोडून आईला भेटायला दहा पावलं पुढे आलेल्या एखाद्या पिल्लाला बसलेली प्रेमळ टपलीही असावी.

मधला काळ थोडा शांत गेला. थोड्याच वेळात पुढच्या लाटेवर विराजमान होऊन पेंग्विनांची एक छोटी तुकडी आली. जरा वेळ पाण्यात डुंबून ते तिथेच उभे राहिले. पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यात पाय खळबळवत, रेंगाळत घराकडे उशिरा पोहोचणारे माझे शाळासोबती आठवले. बघता बघता ते पुन्हा पाण्यात शिरले. काय झालं असावं? मागे राहिलेल्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावायला गेले की भक्ष्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या एखाद्या जलचरांची चाहूल लागली त्यांना? बहुदा हे सुरक्षिततेसाठीच होत असावं. समूहात असले तर शिकारीचा धोका कमी. जसजसा अंधार वाढू लागला तसतशा समुद्रातून त्यांच्या फौजाच्या फौजा बाहेर पडू लागल्या. प्रेक्षकांच्या स्टॅण्डसमोरून जाताना (दिव्याच्या प्रकाशामुळे असेल) सलामी दिल्यासारखे ते ‘दाहिने देख’ करत होते. फ्लॅशफोटो काढण्यास सक्त मनाई होती. कॅमेऱ्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळे दिपून पेंग्विनांना अंधत्व येण्याची शक्यता असते. फ्लॅश न वापरता एकच फोटो काढून आम्ही आमचं मन कॅमेऱ्याच्या तांत्रिकतेतून काढून पेंग्विनांच्या सजीवतेत ओतलं. त्यामुळे त्यांच्या हालचाली, चाल, रंग, रूप, सगळं अगदी बारकाईनं न्याहाळता आलं. फिलिप आयलंडवर सुमारे ३२००० पेंग्विनची वस्ती आहे.

समुद्रातून सफर करताना माणसाला दिशेच्या ज्ञानासाठी होकायंत्र लागतं, मात्र या तथाकथित बुद्धिहीन प्राण्यांना दिशाही कळते, समुद्रकिनाऱ्यावर ते नेमक्या जागी येतात आणि नेमके आपल्याच बिळात शिरतात. त्यांचा प्रत्येकाचा आवाज वेगळा असावा का? की आपल्या पिल्लांना हाक मारायची एखादी विशिष्ट लकब? पहाटे सूर्योदयाच्या आधी तासभर हे गडी दर्यावर जायला निघतात. दर्यात शिकार करून ते दुपारपर्यंत फिलिप आयलंडवरील पाण्यात जमतात आणि सूर्यास्तानंतर टोळीटोळीने एकत्र समुद्रकिनाऱ्यावर उतरतात. पुढे मग छोट्या छोट्या तुकड्या बनवून आपापल्या घरांकडे कूच करतात. वर्षानुवर्षं याच धोपट मार्गाने त्यांची ये-जा सुरू असते. घरी परतण्याआधी अंग झटकून, पंखावरील पिसं छान पिंजून विंचरून मग त्यांची परेड सुरू होते. त्यांची ही निळीशार पिसं इतकी सुंदर असतात की या पेंग्विनना ‘परिराज्यातील पेंग्विन’ असं म्हटलं जातं.

परेड करणाऱ्या या छोट्या जवानांच्या पिसांची मोठी गंमत आहे. आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांपेक्षा चार पटींनी अधिक घनदाट आणि छोटी असतात ही पिसं. जवळजवळ आणि एकमेकात गुंफलेली असल्यामुळे छान ऊब देतात. त्यांचा हा ‘फरकोट’ उबदार तर आहेच; पण त्यावर पाणी टिकत नाही. ते आपल्या पिसांची काळजीपूर्वक निगाही राखतात. आपल्या चोचीच्या आधारे पिसांना तेल लावून चकचकीत बनवतात. त्यांच्या शेपटीच्या तळाशी असलेल्या ग्रंथींमधून मेणासारखा एक ओशट पदार्थ स्त्रवतो. तो चोचीत शोषून त्याला आपल्या या पिसांवर पसरवण्याचं काम ते अगदी लीलया करतात. पाठीवरच्या गडद निळ्या आणि पोटावरच्या शुभ्र पांढऱ्या ‘गणवेशा’ची ते अशी काळजी घेतात. हे ‘महारथी’ लक्ष्यवेधातसुद्धा तरबेज! अणकुचीदार चोचीत पकडलेला पंधरा सेंटीमीटर लांबीचा मासा गळ्याच्या एक दोन झोकदार झटक्यात पोटात स्वाहा होतो.

२००१ मध्ये एकदा फिलिप आयलंडजवळ मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली होती. हे सुंदर पंख तेलाने माखल्यावर पेंग्विनना थंडी वाजू लागली आणि चोचीने पिसं गोंजारताना ते तेल त्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. यावर उपाय म्हणून ‘फिलिप आयलंड नेचर पार्क’ने लोकांना या चिमुकल्यांसाठी स्वेटर विणून पाठवायचं आवाहन केलं होतं. या स्वेटरची ऊब मिळाल्यामुळे ९६% पेंग्विनचा जीव वाचवता आला होता. शिवाय स्वेटर असल्यामुळे त्यांना त्यांची पिसं चोच लावून साफ करता येत नव्हती. २०१४ मध्ये पेंग्विन फाऊंडेशनने आपत्कालीन साठा म्हणून स्वेटरच्या मदतीचे आवाहन केले, तेव्हा तर जगभरातून स्वेटरचा अगदी पाऊस पडला. १०९ वर्षांच्या आल्फ्रेड डेटने विणून पाठवलेल्या स्वेटरमुळे पेंग्विन संवर्धनाच्या मोहिमेला मोठी प्रसिद्धी मिळाली. तिथे असलेल्या म्युझियममध्ये हा स्वेटर घातलेला पेंग्विन पाहायला मिळाला.

या इवल्याशा पेंग्विनांची आणखीनच इवलीशी पिल्लं दोन महिन्यांची झाली की आपल्या आईबापांएवढी ‘धिप्पाड’ दिसायला लागतात. मग मोठी झालेली ही बाळं, बापाच्या खांद्याला खांदा लावून कमाईसाठी बाहेर पडतात. त्यातील काही अभागी जीव उपासमारीनं, तर कधी रोगाची लागण झाल्यामुळे समुद्रातच मरून जातात. जे तरतात त्यांना वर्षभर तरी किनाऱ्यावर येण्याची गरज भासत नाही. किनाऱ्यावर यायचं ते फक्त प्रजननासाठी नाही तर ‘कात’ टाकण्यासाठी. वर्ष सरलं की हे जवान गडी आपल्या ‘पुरखों के मकान’मध्ये परततात. कात टाकायचा समारंभ करायचा असतो. सगळी जुनी पिसं गळून त्या जागी नवी पिसं येतात. (आपल्या दुधाच्या दातांसारखी). पिसं नसली की त्यांना शिकारीसाठी पाण्यात जाता येत नाही. त्या काळात सक्तीची उपासमार! नवी पिसं येईपर्यंतच्या पंधरा-वीस दिवसांच्या काळात तग धरू शकतील इतकी चरबी जर त्यांनी अंगात साठवली नसेल तर भुकेपोटी त्या अवस्थेतही त्यांना समुद्रावर जावं लागतं आणि थंडी-ओलाव्यामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढवतो. पिसं हे त्यांचं थंडीपासून बचाव करणारं संरक्षक कवच आहे. फेब्रुवारी ते एप्रिल हा त्यांचा पिसंगळतीचा कालावधी होय.

पंख असून न उडणारे, दोन पायांवर उभे राहिले की तेहतीस सेंटीमीटर उंचीत बसणारे आणि एक किलो वजनाचे हे पिटुकले पेंग्विन खरेखुरे समुद्रप्रेमी! पंखांचा उपयोग हवेत नव्हे तर पाण्यात ‘उडण्या’साठी! पाण्यात वरच्या आणि खालच्या बाजूंनी सूरकांड्या मारताना त्यांना पंखातलं स्नायुबल जास्त वापरावं लागतं. पोहताना आपले ठेंगणे पाय मागे ओढून आपला देह टोरपेडोसारखा करण्यात हे वाकबगार. मात्र या पायांचा उपयोग पोहण्यासाठी नसतो. पाय आणि शेपटी मिळून तयार होतं त्यांचं रडार. पाठीचा निळा आणि पोटाचा पांढरा रंग बेमालूमपणे पाण्यात मिसळतो आणि छोट्या माशांना आणि मोठ्या जलचरांना छान ठकवतो.

सरासरी सात वर्षांची आयुर्मर्यादा असलेल्या ‘उडीप्टुला’ असं काहीसं क्लिष्ट आणि रुक्ष नाव असलेल्या या पेंग्विनांची ही परेड पाहून मला वाटलं की बालगोपाळांचा एक विविधरंगी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहून प्रसन्न चित्तानं घरी परततो आहोत.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

पुढील लेखात वाचा सिडनी हार्बर ब्रिजच्या कमानीवर चढण्याचा चित्तथरारक अनुभव.

logo
marathi.freepressjournal.in