पेंग्विन : अंटार्क्टिकाचा अनभिषिक्त राजा

कुठल्याही देशाचं स्वामित्व नसलेला अंटार्क्टिका अजूनही निसर्गदेवतेच्या अधिपत्याखाली आहे. अंटार्क्टिकाला जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. अर्जेंटिनातील उश्वाया इथून प्रस्थान असल्यामुळे अर्जेंटिनाचा व्हिसा मात्र लागतो. इथले मूळचे रहिवासी म्हणाल तर लाखोंच्या संख्येत राहणारे पेंग्विन.
पेंग्विन : अंटार्क्टिकाचा अनभिषिक्त राजा
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

कुठल्याही देशाचं स्वामित्व नसलेला अंटार्क्टिका अजूनही निसर्गदेवतेच्या अधिपत्याखाली आहे. अंटार्क्टिकाला जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. अर्जेंटिनातील उश्वाया इथून प्रस्थान असल्यामुळे अर्जेंटिनाचा व्हिसा मात्र लागतो. इथले मूळचे रहिवासी म्हणाल तर लाखोंच्या संख्येत राहणारे पेंग्विन. पांढरं पोट आणि पाठीवर काळा कोट! पंखांचा हातासारखा उपयोग करत, डुलत डुलत चालणाऱ्या या पेंग्विनच्या बऱ्याच उपजाती आहेत. ‘नॅशनल जॉग्राफिक’च्या मुखपृष्ठावर दिसलेला भीमकाय एम्परर पेंग्विन, त्याच्यापेक्षा शरीराने थोडा किरकोळ म्हणावा असा किंग पेंग्विन, नारिंगी चोचीचा गेंटू, डोळ्याभोवतीची पांढरी वर्तुळं मिरवणारा चौकस ॲडले, हनुवटीखाली हेल्मेटचा पट्टा बांधल्यागत दिसणारा भोळाभाबडा चिनस्ट्रॅप, खडकावरून उड्या मारत चढणारा रॉकहॉपर आणि पिवळ्या तुऱ्याचा मॅकरोनी. अंटार्क्टिका द्वीपकल्पाच्या सफरीत आम्ही गेंटू आणि ॲडले यांच्या वसाहती पाहिल्या. दक्षिण शिथलॅन्ड बेटावर चिनस्ट्रॅप आणि त्यांच्या घोळक्यात पिवळे तुरे मिरवत उभ्या असलेल्या मॅकरोनी पेंग्विनचंही दर्शन घडलं. बोटीवरील पेंग्विन अभ्यासक पथकामुळे बाह्यरूपाबरोबरच पेंग्विनच्या सवयी-लकबी, आहार-विहार, जीवनशैली यांची मनोरंजक माहिती मिळाली.

पेंग्विनना जवळून बघण्यासाठी आपल्याला अंटार्क्टिकाच्या वेगवेगळ्या बेटांवर उतरावं लागतं. मोठ्या बोटीला विश्रांती देऊन छोट्या रबरी बोटीतून किनाऱ्यावर यावं लागतं. बेटावर लागणारे कपडे म्हणजे लाल रंगाचं जॅकेट, त्याच रंगाची वॉटरप्रूफ पॅन्ट आणि गमबूट. टूर कंपनीकडून मिळालेला हा गणवेश घालून एकामागोमाग एक बर्फावरून चालताना आमची ही रांग जणू लाल पेंग्विनची परेड वाटत होती.

नील आर्मस्ट्राँगच्या आवेशात आम्ही अंटार्क्टिका भूभागावर पहिलं पाऊल टाकलं आणि अंटार्क्टिकाच्या अनभिषिक्त राजाने, पेंग्विनने आमचं स्वागत केलं. नर, मादी आणि त्यांची प्रत्येकी दोनच पिल्लं अशा हजारो लाखो कुटुंबांनी गजबजलेली बडबड्या पेंग्विनची कॉलनी जवळून बघणं, त्यांचे हावभाव न्याहाळणं, हा एक अद्वितीय अनुभव आहे. गंमत म्हणजे त्या भाऊगर्दीत मादीला आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे साद घालणारे नर अन्नासाठी वा शिकार कोणी कुठे करायची यावरून कधी भांडत नाहीत. सामंजस्याने कुणी किनाऱ्यालगत, तर कुणी खोल समुद्रात भक्ष्य शोधायला जातात. मात्र मादीवरून त्यांची एकमेकांत खूप जुंपते. एकानं प्रियाराधनाची साद घातली तर ताबडतोब सगळे त्याची नक्कल करतात. कर्कश्श गोंगाट करतात. जीवाचा आटापिटा करत छोट्या छोट्या दगडांचं घरकुल तयार करणारे, त्यासाठी शेजाऱ्याचा ‘माल’ बळकावणारे आणि त्याची चोरी उघडकीला आल्यावर अगदी फिल्मी हाणामारी करणारे पेंग्विन आम्ही इथे पाहिले. चोचीत मऊ करून आणलेलं अन्न पिल्लांच्या चोचीत भरवतानाचं वात्सल्यही पाहायला मिळालं. ‘चोचीत चोचींनी घास द्यावा, पिलांचा हळूच पापा घ्यावा.’

पिलांना या घरट्यात उबदार वाटलं तरी खरी ऊब आईबाबांच्या शरीराची. पेंग्विनच्या दोन पायांमध्ये पोटाशी असलेला, बिना पिसांचा कातडीचा उघडा भाग हा त्याच्या अंगातील उष्णतेचा स्रोत! या भागात असतं रक्तवाहिन्यांचं जाळं आणि आजूबाजूला जाड पिसांचा थर! पायावर तोलून धरलेलं अंडं उबवताना शरीरातील उष्णता या रक्तवाहिन्यांद्वारे अंड्याला आवश्यक ऊब देते. ही उबवण्याची प्रक्रिया चालू असताना पेंग्विन नर किंवा मादी यांना समुद्रात अन्नासाठी जावं लागलं, तर ते हा वीण भाग पोटावरील पिसांनी काळजीपूर्वक झाकून घेतात. जेणेकरून त्याची उष्णता कमी होऊ नये.

पंख असूनही उडता न येणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत समावेश होत असल्यामुळे पेंग्विन इतर पक्ष्यांसारखे थंडीपासून संरक्षणासाठी स्थलांतर करून उत्तर गोलार्धात जाऊ शकत नाहीत. त्यातून उष्ण पाणी त्यांच्यासाठी वर्ज्य! थंड पाण्यातच त्यांची जीवनज्योत तेवत राहू शकते. पाण्यात पोहत असताना त्यांची गर्द निळ्या रंगाची पाठ समुद्राच्या रंगाशी मिसळून जाते आणि समुद्राच्या पाण्याखालून पाहिलं असता त्यांचं पांढरं पोट निळसर आकाशाच्या रंगात मिसळून जातं. हा रंगांचा कोट म्हणजे शत्रूंपासून बचावाचं निसर्गाने बहाल केलेलं संरक्षणकवचच! पोहोण्याचा वेग आणि चपळता वाढावी म्हणून त्यांना खास ‘फ्लिपर’ची देणगीही लाभली आहे. नर असतो मादीपेक्षा धिप्पाड, चोच दणकट आणि फ्लिपर थोडे लांब. आमच्या डोळ्यांना गोंडस आणि एकसारखे दिसणाऱ्या पेंग्विनमधील हा लिंगभेद आम्हाला बोटीवरील तज्ज्ञांनी समजावून सांगितला.

उडायचं नसल्यामुळे पेंग्विनना वजनाकडे लक्ष ठेवावं लागत नाही. मग ते खूप चरबी साठवतात. (ठेंगणी, ठुसकी!) त्या चरबीचा उपयोग मात्र शरीरातील उष्णता आणि ऊर्जा साठवण्यासाठी केला जातो. चरबीयुक्त पंख अंगाला लगटून ठेवल्यामुळे हवा अंगाशी लपेटून राहते. अगदी आपल्या ब्लँकेटमध्ये राहते तशी. हे गडी हवेत भरारी मारू शकत नसले तरी पाण्यात सूर मारण्यात पटाईत. त्यांचे पाय म्हणजे जणू रडार आणि पाण्यात फडफडणारे पंख म्हणजे जणू जहाजाचा पंखा. पोहताना त्यांचे पंख दबतात आणि त्यातील हवा हळूहळू बाहेर पडते. त्यामुळे पोहणाऱ्या पेंग्विनमागे पाण्याच्या पृष्ठभागावर या हवेच्या बुडबुड्यांची एक सुंदर रेघ दिसते.

अंगात उष्णता साठवून ठेवण्याची ईश्वरदत्त देणगी, त्यांना उन्हाळ्यात मात्र नको जीव करते. धापा टाकल्यानं किंवा पंख पसरल्यानं उष्णताउत्सर्जन होतं. उन्हाचे चटके फारच जाणवू लागले तर पेंग्विन चक्क आपले फ्लिपर आणि पाय हवेत तरंगत ठेवून पोटावर मस्त लोळण घेतात, नाहीतर हक्काच्या समुद्रात डुबकी मारून येतात. पेंग्विनचं भक्ष्य म्हणजे मासे. सुळकन पळणाऱ्या या माशांना पेंग्विन एकाच घासात मटकावतात. तोंडात मांजरीच्या जिभेसारखा खरखरीतपणा असल्यामुळे एकदा पकडलेला मासा सहसा निसटून जात नाही.

पेंग्विनची पिसं गळणं कात टाकल्यासारखं असतं. सगळी पिसं एकदम गळून पडतात. नवीन पिसांना जगात यायची घाई झालेली असते. त्यामुळे ती जुन्या पिसांना अक्षरशः ढकलून देतात. पिसांची टोकं एकमेकांना बिलगलेली असल्यामुळे ती वेगवेगळी न पडता झुपक्यांनी जमिनीवर पडतात. नवी पिसं मात्र वेगाने वाढतात आणि पंखांवर त्यांची आवश्यक तेवढी जाडी जमली की, हे गडी समुद्रात जायला मोकळे. हा ‘पिसगळी’चा काळ असतो तीन आठवड्यांचा. तेवढे दिवस त्यांची एकादशी! पिसं म्हणजे त्यांचे जल आणि उष्णतारोधक मित्र. त्या कवचाशिवाय समुद्रात नो एंट्री! बेगमीची सारी शक्ती पिसांच्या नूतनीकरणात खर्च झालेली असते. या काळात थंडी आणि भूक या दोन दैत्यांशी त्यांना सामना करावा लागतो. अशा कठीण समयी मग थोरामोठ्यांनी सांगितलेला नियम पाळला जातो. शक्तिसंवर्धनासाठी कमीत कमी हालचाल करतात आणि पिसं गळलेले पेंग्विन समुद्राकाठी निश्चल उभे असलेले दिसतात. एकदा का ही पिसं वाढली की, मग त्यांना आंजारण्या गोंजारण्याचे लाड सुरू होतात. त्यांच्या शेपटीच्या मुळाशी असलेल्या ग्रंथीमध्ये तेलासारखा ओशट पदार्थ असतो. चोचीने तिथे टोचलं की हा द्रव बाहेर येतो. त्याचा थर या पिसांवर पसरला की ती छान तुकतुकीत दिसतात आणि त्यावर पाणीही राहत नाही. पाठ, पोट ठीक आहे हो, पण डोकं आणि मानेपर्यंत चोच कशी पोहोचणार? अशावेळी ते आपल्या फ्लिपरचा उपयोग करतात. चोचीनं ते तेल फ्लिपरच्या टोकाशी लावून डोकं व मान त्यावर घासतात. किंग पेंग्विन माणसासारखे चतुर! ते हे काम आपल्या बायकोकडून करून घेतात.

पेंग्विनची परेड ही नेत्रसुखाची पर्वणी! शिस्तीत एकामागोमाग चालताना मध्येच एखादा थांबतो, मागच्यांशी गप्पा मारतो आणि चालायचा कंटाळा आला तर चक्क पोटावर घसरत जातो. या गोंडस गोजिरवाण्या पेंग्विनची एकच सवय मात्र अतिशय किळसवाणी. आपल्याच विष्ठेत यथेच्छ लोळणारा हा अजब जीव! पांढरं पोट गुलाबी विष्ठेनं बरबटून जातं आणि त्याची तीव्र दुर्गंधी आपल्या नाकात ठाण मांडून बसते.

पुढच्या लेखात पाहू सील आणि व्हेल या लकारांती जलचरांच्या जलक्रीडा!

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in