पेट्रा बाय नाईट

रात्रीच्या अंधारात मेणबत्त्यांच्या प्रकाशाने जिवंत होणारं पेट्रा, पहाटेच्या सोनेरी किरणांनी उजळणारं वाळवंट आणि अंगावर रोमांच उभा करणारी नदीतली साहसी भटकंती! जॉर्डनच्या भूमीत इतिहासाच्या खुणा आहेत, निसर्गाची किमया आहे आणि मनाचा ठाव घेणारे अनुभवही आहेत. ही सफर आहे, डोळ्यांनी पाहिलेल्या आणि मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या अद्भुत क्षणांची!
पेट्रा बाय नाईट
पेट्रा बाय नाईट(Photo - pelago.com)
Published on: 

जगतवारी

मेधा आलकरी

रात्रीच्या अंधारात मेणबत्त्यांच्या प्रकाशाने जिवंत होणारं पेट्रा, पहाटेच्या सोनेरी किरणांनी उजळणारं वाळवंट आणि अंगावर रोमांच उभा करणारी नदीतली साहसी भटकंती! जॉर्डनच्या भूमीत इतिहासाच्या खुणा आहेत, निसर्गाची किमया आहे आणि मनाचा ठाव घेणारे अनुभवही आहेत. ही सफर आहे, डोळ्यांनी पाहिलेल्या आणि मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या अद्भुत क्षणांची!

पर्यटकांची गर्दी खेचून घेणाऱ्या जॉर्डन देशातील पेट्रा या प्रेक्षणीय स्थळाला दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाशात दिलेली भेट आपल्याला अचंबित करून सोडणारी असली, तरी ‘पेट्रा बाय नाईट’ या कार्यक्रमाची जादू काही औरच!

आठवड्यातून तीन दिवस हा दोन तासांचा कार्यक्रम असतो. खिंडीच्या दुतर्फा साधारण हाताच्या अंतरावर मेणबत्त्या लावलेल्या असतात. वाऱ्यानं विझू नयेत म्हणून त्यावर ब्राऊन कागदाच्या उघड्या तोंडाच्या पिशवीचं आवरण असतं. प्रिय व्यक्तीच्या हातात हात गुंफून, ‘दो दो के कतार में’ चालत पर्यटक मूकपणे त्या घळीतून मार्गक्रमण करत असतात. तशी सूचना चालायला सुरुवात करण्यापूर्वी दिली जाते. तेथील नीरव शांततेचा भंग करण्याची कुणाचीच इच्छा नसते. दिवसा गर्दीने, घोडागाड्यांच्या टापांच्या आवाजाने गजबजलेला हा रस्ता एका गूढ शांततेत बुडून जातो. याच मार्गाने दिवसा चालताना हवीहवीशी वाटणारी गार सावली आता अंधाऱ्या थंडीत परिवर्तित झालेली असते. खडकांचा थंडपणा रात्री बोचरा होतो. मात्र त्या अंधारात चालताना मनात भीतीचा लवलेशही नसतो. मेणबत्तीच्या मंद प्रकाशाच्या साथीने आपण भारावल्यागत चालत राहतो.

घळ संपते आणि आपण ट्रेजरीच्या समोरील पटांगणात दाखल होतो. सकाळच्या उन्हात सोन्यासारखी चमकणारी, एकाच खडकातून कोरून काढलेली ही ३९ मीटर उंच वास्तू, पटांगणात लावलेल्या शेकडो मेणबत्त्यांच्या विखुरलेल्या प्रकाशात धूसर दिसत असते. खाली अंथरलेल्या जाजमांवर बूड टेकत नाही तोच वाफाळता अरेबिक पुदिना चहा सगळ्यांना दिला जातो. वाळवंटी गारव्यात त्याची ऊब हवीहवीशी वाटते. बेदूवीन जमातीतील काही कलाकार आपली पारंपरिक वाद्य (रबाबा) वाजवून दाखवतात. अरबी भाषेतच पेट्राचा इतिहास सांगितला जातो. इतक्यात ट्रेजरीच्या चबुतऱ्यावर उभा राहून बासरीचे सूर छेडत एक बेदूवीन अरब मेणबत्त्यांच्या रांगांमधून चालत, प्रेक्षकांसमोरून जात, डोंगरातील अंधारात लुप्त होतो. त्याच्या बासरीच्या सुरांना तेथील मातीचा गंध आहे. मात्र तिथे त्या जाजमावरील फळकुटावर बसले असताना मला राहून राहून हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीचे सूर आठवत होते. कल्पना करा, उंच डोंगरांचे कडे, चांदण्यांनी फुललेलं आकाश, त्या चांदण्यांच्या मांडवाखाली, गार वारं अंगावर घेत मोकळ्या पटांगणात, मेणबत्त्यांच्या धूसर प्रकाशात डोक्याखाली हात घेऊन पहुडलेले आपण आणि त्या नीरव शांततेत, अंधाराला चिरत जाणारे हरिप्रसादांच्या सुरेल बासरीचे मंत्रमुग्ध करणारे सूर!

पेट्राच्या प्रेमात पडले असले, तरी वाळवंट मला दुरूनच पाहायला आवडतं. वाळूच्या टेकड्या तर फोटोतच अधिक सुंदर दिसतात. उंटावर चढणं-उतरणं, तो ‘तिरका’ चालत असताना त्यावर तोल सांभाळत बसणं हे माझ्यासाठी महादिव्य आहे. बसलेला उंट आपले समोरील पाय टेकून उभा राहत असताना त्याच्या पाठीवर बसलेली मी तोंडावर पडून आपटेन अशी भीती मला नेहमी ग्रासत असते आणि वाळवंटात अंधारल्यावर दिशा न समजल्यामुळे आपण भरकटलोय आणि तहानेनं व्याकुळ होऊन प्राण कंठाशी आले आहेत या दुःस्वप्नामुळे मी आजही खडबडून जागी होते. अशी पार्श्वभूमी असली तरीही मी अगदी ठासून म्हणेन की जॉर्डनमध्ये आल्यावर ‘वादी रम’ ही वाळवंटातील रपेटीची सहल आणि रात्री तंबूत राहण्याचा अनुभव प्रत्येक पर्यटकाने अगदी आवर्जून घ्यावा. पेट्रासारखेच लाल गुलाबी डोंगर, सूर्यकिरणांच्या लपंडावामुळे बदलणारे त्यांचे रंग, त्यानुसार हिंदोळणाऱ्या आपल्या भावना, जिकडे तिकडे पसरलेली लाल वाळू… सगळंच मंत्रमुग्ध करणारं!

वादी रमच्या तंबूत काढलेली रात्र अवर्णनीय होती. त्या रात्री चांदण्यांनी गच्चं भरलेल्या आकाशाखाली बसून, निखळलेल्या ताऱ्याकडे पाहून मनात इच्छा धरण्याचंही भान राहिलं नव्हतं. नीरव शांतता, गूढ अंधार! असं वाटत होतं जणू जग थांबलंय. मीही क्षणभराकरता माझा श्वास रोखून धरला. वाळवंटात इतका सुखावह क्षण असतो यावर माझा विश्वास बसेना. संध्याकाळी रेतीच्या धुळीमुळे धूसर झालेल्या डोंगराआड अस्तास गेलेल्या सूर्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे सुहास्य वदनाने सज्ज होऊन बसलो होतो. निरभ्र आकाशात लाली पसरलेल्या पूर्व दिशेकडून रविराजानं प्रवेश केला. क्षणार्धात त्या प्रकाशकिरणांमध्ये न्हाऊन वादी रममधील रेती सोन्यासारखी चमकू लागली. पहाटेचा गारवा, वातावरणात जाणवणारा शुद्ध ताजा प्राणवायू आणि शिखरांनी कातरलेल्या गुलाबी डोंगरांचा सहवास. एका वेगळ्या चैतन्यशक्तीचा संचार आपल्या शरीरात होतोय असं वाटू लागलं.

वादी रम ही जागा ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. कर्नल टी. ई. लॉरेन्स या इंग्लिश लष्करी अधिकाऱ्यानं १९१७ साली अरब बंडाला साथ देऊन तुर्कांचा पराभव केला होता. सोळाव्या शतकापासून इथे तुर्की सुलतानाची राजवट होती. या बंडातील प्रमुख व्यक्ती फैसल बीन हुसेन आणि कर्नल लॉरेन्स या जोडगोळीचं मुख्य कार्यक्षेत्र हे वादी रमचं वाळवंट होतं. इथे एक गोड्या पाण्याचा झरा आहे. समोरील डोंगर असा दिसतो जणू सात खांब एकास एक खांदे लावून ओळीत उभे आहेत. पुढे लॉरेन्सने आपल्या साहसी मोहिमेवर आणि विलक्षण अनुभवांवर एक पुस्तक लिहिलं आणि त्याला शीर्षक दिलं - द सेवन पिलर्स ऑफ विस्डम!

या वाळवंटात फिरण्यासाठी खास जीपच हवी. वाळवंटातली ‘टॅक्सी’ म्हणजे उंटाची सवारीही उपलब्ध आहे. आम्ही जीपचा पर्याय निवडला. लॉरेन्सच्या घराची तुटकी भिंत, तो झरा, सेवन पिलर्स डोंगर, या प्रसिद्ध स्थळांबरोबरच इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील नॅबेटीयन मंदिराचे भग्नावशेष पाहायला मिळाले. एका अरुंद खिंडीच्या भिंतीवर, दगडांवर कोरलेली त्या काळातली चित्र आहेत. संध्याकाळी अस्तास जाणाऱ्या सूर्याच्या ‘बिदाई’चा क्षण टिपण्यासाठी आम्ही एका टेकाडावर चढलो. त्या विस्तीर्ण वाळवंटात गुलाबी डोंगरापलीकडे अस्तास जाणारा तो किरमिजी सूर्य मती गुंग करून गेला. डोळ्यांनी जे पाहिलं ते अंशभरसुद्धा कॅमेऱ्यात येत नाही याचं राहून राहून वाईट वाटत होतं.

अमेरिकेच्या ग्रँड कॅनियनची आठवण व्हावी अशी जॉर्डनमधली एक खिंड आहे. तिला म्हणतात ‘वादी मुजीब’! पेट्राच्या खिंडीतून चालताना एकेकाळी वाहणाऱ्या नदीच्या कोरड्या पात्रातून आपण चालत असतो; इथे मात्र आपल्याला खरंच नदीच्या प्रवाहातून चालायचं असतं. सुरुवातीची आमची वाटचाल गोल गोटे असलेल्या आणि पावलं भिजतील एवढ्या पाण्यातूनच झाली होती. नंतर मात्र मोठ्या दगडांवरून कोसळणारं पाणी वाढत वाढत कमरेपर्यंत आलं. आता पुढे तीनचार अवाढव्य दगडांवर पाऊल रोवून, एकमेकांचा आधार घेत, स्वतःचा भार उचलत, तोल सांभाळत वर जायचं होतं. ते दिव्य पार केल्यावर तिथे लावलेल्या दोरखंडांना धरून आणखी वर गेलो, तेव्हा पाणी छातीपर्यंत येऊन पोहोचलेलं होतं. नदीचं पात्रही थोडं रुंदावल्याची जाणीव झाली. डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याचा ओघ थोडा जास्त वाटला. भिंतीजवळील साखळ्यांना धरून पुढची वाटचाल करायची होती. थोड्या अंतरावर एक उंच कपार दिसत होती आणि तिथे एक गाईड उभा होता. त्याच्या मदतीनं तोही अडथळा पार केला आणि वर पोहोचलो. तिथे आमचं स्वागत करण्यासाठी एक लडिवाळ धबधबा ओसंडून वाहत होता. त्याखाली चिंब भिजलो तेव्हा या द्रविडीप्राणायामाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पुढे नदीच्या उगमापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा तिथेच निरोप घेऊन आल्या रस्त्याने घसरत घसरत खाली येऊन पोहोचलो. वादी मुजीबची ही सहल धाडसी असली तरी कठीण नाही. अतिशय आनंददायी आहे.

लाल समुद्राच्या टोकावर वसलेलं अकाबा हे जॉर्डनमधील बंदराचं शहर, देशी-परदेशी पर्यटकांचं आवडतं गंतव्यस्थान! समुद्रकिनाऱ्यावरचं खारं हवामान, मोकळा वारा, सूर्यस्नानाची संधी, पोहण्यासाठी स्वच्छ आणि पारदर्शक पाणी, स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायव्हर्ससाठी कोरल्सचा खजिना आणि सागरसंपत्तीचा कॅलिडोस्कोप, बोटिंग किंवा वॉटर स्पोर्टसाठी लाटा नसलेलं शांत पाणी आणि खवय्यांसाठी भरपूर मत्स्याहार! अम्मानमधील स्थानिकांना हिवाळ्यात अकाबाच्या वीस डिग्रीची ऊब हवीहवीशी वाटते आणि सौदी अरेबियातील श्रीमंत नागरिक त्यांच्या सीमेपासून अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवर असलेल्या आणि कडक निर्बंध नसलेल्या अकाबात येण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. कोरल्सच्या दर्शनासाठी काचेचा तळ असलेल्या बोटीतून केलेला प्रवास मात्र निराश करणारा ठरला. तळ स्वच्छ नसल्यामुळे कोरल्सचे वेधक रंग काही दिसले नाहीत. येथील फेरोच्या बेटावर एक दिवसीय सहल आयोजित केली जाते. अकाबा बंदरातून इजिप्तसाठी नियमित बोटी सुटतात. त्यामुळे इजिप्त-जॉर्डन अशी एकत्र सहल करणारे बरेच पर्यटक हा जलमार्ग निवडतात.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in