

जगतवारी
मेधा आलकरी
जगातील सात नव्या आश्चर्यांमध्ये मानाचं स्थान मिळवणारी पेट्रा नगरी केवळ तिच्या भव्य वास्तूंमुळे प्रसिद्ध नाही, तर गुलाबी खडकांच्या अनोख्या सौंदर्यामुळेही मनात घर करते. इतिहास, साहस आणि निसर्गाच्या अद्भुत रूपाचा हा अविस्मरणीय प्रवास!
इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात खास ग्रीकांसाठी ‘जगातील सात आश्चर्य’ नावाची प्रवासी पुस्तिका निघाली होती. उच्चभ्रू ग्रीकांसाठी त्या सात जागांना भेट देणं ही प्रतिष्ठेची बाब होती. ही सारी आश्चर्य मानवी करामतीत मोडतात. नैसर्गिक आश्चर्यांची यादी वेगळी. अगदी अलीकडे म्हणजे १९९९ साली स्विस प्रवासी बर्नार्ड वेबरने ‘जगातील नवी सात आश्चर्य’ ही मोहीम सुरू केली. जगाला एका सूत्रात बांधण्यासाठी, अभिमानास्पद असं नावीन्यपूर्ण कारण शोधावं या विचारातून, नव्या सात आश्चर्यांच्या कल्पनेनं त्याच्या मनात घर केलं. युनेस्कोने विश्वठेवा म्हणून गौरविलेल्या साडेआठशे स्थळांपैकी प्रथम दोनशे आणि नंतर फक्त एकवीस स्थळं अंतिम फेरीत निवडली गेली. नवीन सात आश्चर्यांच्या शोधात एक गट सहा सप्टेंबर २००६ रोजी एका महाकाय बलूनमधून त्या एकवीस स्थळांना भेटी देण्यासाठी निघाला. जगभरातील लोकांना या आगळ्यावेगळ्या मतदानासाठी प्रोत्साहित करत ग्रीसमधील अॅक्रोपोलीस इथून निघालेला हा चमू वर्षाअखेरीस ताजमहाल इथे येऊन पोहोचला. लिस्बन, पोर्तुगाल इथे मतमोजणी झाल्यानंतर ०७.०७.०७ या खास दिवशी नव्या सात आश्चर्यांची घोषणा झाली. पहिल्या क्रमांकावर ताजमहाल विराजमान झाला, तर जॉर्डनमधील पेट्रा या प्राचीन नगरीने दुसरा क्रमांक पटकावला. वाह ताज.. वाह पेट्रा!!
समुद्रसपाटीपासून ९५० मीटर उंचीवर खडकाळ डोंगरकपाऱ्यांमध्ये वसलेली नॅबेटियन या भटक्या जमातीची अतिप्राचीन नगरी- पेट्रा! बायबलमध्ये इडम राजाची राजधानी असा या नगरीचा उल्लेख आहे. नॅबेटियन ही जमात इ.स.पूर्व सहाव्या शतकात पेट्रा इथे वस्तीस आली. सुरुवातीला प्रवाशांच्या तांड्यांना लुबाडून त्यांनी बरीच लूट जमवली; परंतु नंतर त्यांनी भारत आणि चीनकडून तुर्कस्तानाकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आपला वचक ठेवून हस्तिदंत, रेशीम, मसाले आणि चंद्रसेनी धूप यांची ने-आण करणाऱ्या मालगाड्यांकडून जबरदस्त कर वसूल करण्याचा धंदा सुरू केला. त्याच्या मोबदल्यात त्यांनी या व्यापारी तांड्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलली. या व्यवसायामुळे त्यांचा नवनवीन लोकांशी, संस्कृतींशी संबंध येत गेला. इतर संस्कृतींना आपल्यात सामावून घेण्याचा विशाल दृष्टिकोन त्यांनी ठेवला. त्यामुळे ही शूर, भटकी जमात हळूहळू मुत्सद्दी आणि सुसंस्कृत होत गेली. सातव्या शतकानंतर मात्र या समृद्ध नगरीस उतरती कळा आली. परकीयांचं राज्य आलं. बेंझन्टाईन, मुस्लिम, रोमन, ख्रिश्चन धर्मयोद्धे पेट्रावर आपापल्या संस्कृतीची छाप सोडून गेले. बाराव्या शतकापासून दुर्लक्षित आणि दुर्बोध राहिलेल्या पेट्रा शहरात नंतर स्थानिक बेदूवीन जमात वास्तव्यास आली.
या इतिहासाबरोबरच माझ्यासारख्या पर्यटकांना भावतं ते पेट्राचं नैसर्गिक रुपडं. दोन हजार वर्षांपूर्वी खडकांतून कोरून काढलेल्या वास्तूंचं मानवीय कसब तर आपल्याला थक्क करून सोडतं. पेट्राचा शब्दशः अर्थ आहे खडक. हा वाळूचा खडक गुलाबी रंगाचा असल्यामुळे पेट्रा ही ‘गुलाबी नगरी’ म्हणून ओळखली जाते. दिवसभरात वेगवेगळ्या कोनातून पडणाऱ्या सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघताना त्यावर विविध रंगाच्या छटा उमटतात. अल्लड प्रेयसीचा गुलाबी, बोहल्यावरील नवरीचा अष्टपुतळी, नवपरिणितेचा सोनेरी तांबडा आणि प्रौढेचा राखाडी!
तिकीटघरापासून पेट्रापर्यंतचा रस्ता म्हणजे अंदाजे शंभर मीटर उंचीच्या दोन डोंगरांमधून जाणारी तीन किलोमीटरची एक घळ आहे. कधी कधी तर डोंगरांची टोकं इतकी जवळ येतात की त्यातून निळ्या आकाशाची फक्त एक रेघ दिसते. एकेकाळी या घळीतून नदी वाहत असे. मार्गातील भिंतीत कोरलेल्या कोनाड्यात नॅबेटियन देवांच्या प्रतिमा पाहून वाटले की, या खिंडीमार्गाचा उपयोग कदाचित धार्मिक मिरवणुकीसाठीही होत असावा. खिंडीतून मार्गक्रमण करीत असताना कुठे उंट, घोडे, घोडेस्वार, सिंह तर कुठे सर्पांच्या आकृत्या कोरलेल्या दिसल्या. सर्प या भूलोकीचा, तर घोडेस्वार परलोकीचा रक्षणकर्ता आहे अशी त्या लोकांची श्रद्धा होती. याबरोबरच आपलं लक्ष वेधून घेतात ते पाण्याची ने-आण करण्यासाठीचे खडकांच्या भिंतीत खोदलेले पाट आणि २००० वर्षांपूर्वीचा टेराकोटा मातीचा अजून शाबूत असलेला पाण्याचा पाईप.
ही नैसर्गिक खिंड कधी पाच मीटर रुंद तर कधी दीड- दोन मीटर चिंचोळी होत, वळणं, वळसे घेत जाते. डोक्यावरील उंच कडा जणू कुऱ्हाडीनं झाडाच्या फांदीचा कपचा तोडलाय असा दिसत होता. चालताना कधी मान उंच करून आकाशाचे विभ्रम पाहावेत तर कधी पायाखालची जमीन निरखावी. एके ठिकाणी फरसबंदी रस्त्याचा उर्वरित भाग पाहायला मिळाला. रोमनांनी पेट्रा काबीज केल्यावर हा रस्ता फरश्यांनी सुशोभित केला होता. घळ संपता संपता खूप चिंचोळी होते, डोंगरांनी माथ्यावर धरलेल्या सावलीची गार वाट संपते आणि अचानक समोरील मोकळ्या पठारावर दिसते सूर्यप्रकाशात चमकणारी, लाल सँडस्टोनच्या डोंगरातून कोरलेली, अतिशय बांधेसूद, भव्य-दिव्य, देखणी वास्तू! हा लोहयुक्त दगड सूर्यप्रकाशात सोन्यासारखा चमकतो. खरं तर, ही आहे नॅबेटीयन राजाची कबर. त्याच्या चिरविश्रांतीकरिता बांधलेली भव्य वास्तू; परंतु इमारतीच्या कळसावरील अजस्र कुंभात इजिप्तच्या फेरोंची संपत्ती दडवून ठेवली आहे असा समज झाल्यामुळे त्याचं ‘अल-खजने’ (ट्रेजरी) हे नाव रूढ झालं.
इ.स.पूर्व दोनशे ते शंभर या दरम्यान ही वास्तू बांधून झाली असावी. या इमारतीचा दर्शनी भाग जितका प्रभावी आणि आकर्षक, तितकाच आतील भाग सर्वसाधारण. नुसती एक खोली. पेट्रातील साऱ्याच इमारतींचा दर्शनी भाग मन मोहून टाकेल इतका सुंदर आणि आतून मात्र पोकळ वासा! खडकातून कोरून काढण्याच्या या महत्प्रयासात फक्त दर्शनी बाजूच सुबक करणं हा निर्णय अगदी पटण्यासारखा. ट्रेजरीपाशी रेंगाळणारं मन ओढून घेत, पुढे असणाऱ्या भव्य अँफिथेटरच्या दिशेने चालू लागताच आपल्याला अनेक छोटी-मोठी घरं आणि कबरी दिसू लागतात. यातील काही उच्चभ्रू श्रीमंतांची, तर काही साधारण लोकांची असावीत. या रस्त्यावरून चालताना सहज मागे वळून पाहिलं. उन्हात न्हाणारे, एकमेकांशी जणू हितगुज करणारे खिंडीचे उंच डोंगर अप्रतिम दिसत होते. समोरील विशाल अँफिथेटर ही रोमनांची नव्हे; तर नॅबेटीयनांची करामत आहे आणि ते बांधलं नाही तर कोरून काढलंय यावर विश्वासच बसेना. पुढे राजा-महाराजांचे महाल, कबरी आणि एक मंदिर यांचे भग्नावशेष पाहत पाहत आम्ही उंच डोंगरावर एकांतात वसलेल्या मॉनेस्ट्रीपर्यंत येऊन पोहोचलो. त्याच्या समोर असलेल्या बेदूवीनांच्या तंबूत बसून चहाचे घुटके घेत, निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरील ती भव्य वास्तू निरखत असता, मनाने एक वेगळीच शांती अनुभवली. तेवढ्यात एक विक्रेता आमच्याकडे आला आणि भोळ्याभाबड्या चेहऱ्याने त्याने माझ्या यजमानांना विचारलं, “साहेब, तुमची सासू जिवंत आहे का हो?” अचानक आलेल्या प्रश्नाला त्यांनी साळसूदपणे ‘नाही.’ असं उत्तर दिलं आणि ‘का?’ असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा तो मिश्किलपणे हसून म्हणाला, “माझ्याकडे एक धारदार बटन चाकू आहे विकायला.” झटक्यानं तो उघडून दाखवत, गळा चिरण्याची कृती करत म्हणतो कसा, “तुम्ही तुमच्या सासूला एका झटक्यात खल्लास करू शकला असता.” त्याची विनोदबुद्धी पाहून आमच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. अरबी भाषेतले असे कितीतरी शब्द आपल्याशी जवळीक साधतात. खलास, मुश्किल, मुमकिन, इशारा, वादी..
दुपार सरल्यावर कलत्या सूर्यप्रकाशात हे गुलाबी दगड फारच मनोहारी दिसतात. एकंदरीतच पेट्रातील हे वाळूचे खडक, त्यांचे आकार आणि रंग यांनी आम्हाला अचंबित करून सोडलं. एका खडकाला मधोमध एक भलंमोठं छिद्र होतं. जणू मधला भाग करवतीने कापून काढून घेतलाय. काही खडकांवरील ही छिद्रं बरोबर दोन डोळे आणि नाकाच्या जागी असल्यामुळे खडकाला मानवी रूप देऊन जात होती. कुठे एखादी उभी भेग, तर काही ठिकाणी असे विलक्षण भूस्तर की जणू लाकडाच्या तंतूंची दिशा दाखवणारं डिझाईन! वाटलं, लाकडाचा ओंडका मधोमध चिरून उघड करून ठेवलाय. निसर्गरूपी चित्रकाराची ही किमया पाहून मी हरखून गेले. भूकंपलहरी या नेहमीच विनाशकारी असतात या माझ्या सामान्यज्ञानाला इथे तडा गेला. पाण्याचा प्रवाह, हवामान आणि भूकंपलहरी या त्रयीनं पेट्राच्या चेहऱ्यामोहऱ्यात विलक्षण आकर्षकता निर्माण केली आहे. त्याचबरोबर वाळूच्या खडकातील धातूंच्या ऑक्साईड्सनी आपल्या वेगवेगळ्या रंगछटा देऊन या पेट्रा नगरीस ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळवून दिला आहे. वर्षातून अंदाजे तीन लाख पर्यटक या नगरीस भेट देतात.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com