दिवाळी अंक २०२६ : पुलंचा कालातीत विनोद

पुलं गेले, पण त्यांचा विनोद अजूनही आपल्या आसपास वावरतोय ! नारायण, चितळे मास्तर, सखाराम गटणे, पंत आणि बटाट्याच्या चाळीतील मंडळी आजच्या डिजिटल युगातही आपल्याला भेटतात, फक्त त्यांचे चेहरे आणि माध्यमे बदलली आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा आजच्या काळाशी असलेला संबंध उलगडणारा हा विशेष लेख...
दिवाळी अंक २०२६ : पुलंचा कालातीत विनोद
दिवाळी अंक २०२६ : पुलंचा कालातीत विनोद
Published on: 

सॅबी परेरा

पुलं गेले, पण त्यांचा विनोद अजूनही आपल्या आसपास वावरतोय ! नारायण, चितळे मास्तर, सखाराम गटणे, पंत आणि बटाट्याच्या चाळीतील मंडळी आजच्या डिजिटल युगातही आपल्याला भेटतात, फक्त त्यांचे चेहरे आणि माध्यमे बदलली आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा आजच्या काळाशी असलेला संबंध उलगडणारा हा विशेष लेख...

मागील पाऊणशे वर्षे ज्या एका लेखकाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय ते नाव म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ 'पुलं'. तंत्रज्ञानाचा वेग, धावपळीची जीवनशैली आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिदममध्ये अडकलेल्या आजच्या डिजिटल युगातही पुलंचे विनोद, त्यांची नाटके आणि व्यक्तिचित्रे तेवढीच ताजी, टवटवीत आणि आजही समर्पक वाटतात. याचे मुख्य कारण म्हणजे पुलंचे लेखन जरी तत्कालीन मध्यमवर्गीय जीवनावर बेतलेले असले तरी त्यातील मानवी स्वभावाचे, ढोंगीपणाचे, मध्यमवर्गीय आकांक्षांचे आणि विसंगतींचे चित्रण आजही तितकेच लागू पडते. मानवी व्यवहाराचे स्वरूप आणि तपशील काळानुसार बदलत असले तरी माणसांचा मूळ स्वभाव बदलत नाही; म्हणूनच पुलं आजही अप्रस्तुत (irrelevant) ठरत नाहीत.

पुलंनी व्यक्तीपेक्षा मनुष्य स्वभावातील विसंगतींचा वेध घेतला. कोणत्याही लग्नात किंवा समारंभात राबणारा नारायण आजच्या इव्हेंट आऊट सोर्सिंगच्या जमान्यात आपल्याला कदाचित दिसणार नाही. पण 'मी आहे म्हणून हे व्यवस्थित चाललंय' असा आव आणणारा 'नारायण' देशाच्या शीर्षस्थ नेत्यांपासून, कॉर्पोरेट लीडर्स ते अगदी व्हॉट्सअॅपच्या फॅमिली ग्रुप्समध्ये अॅडमिनच्या भूमिकेत आपल्याला पदोपदी दिसतो. इतिहासातून बाहेर पडायला तयार नसलेल्या चितळे मास्तरांच्या गंगाजलाचा गडू कधीच उपडा झालेला असेल, पण 'आमच्या काळी असं नव्हतं किंवा आजच्या पिढीला जबाबदारीचं भानच नाही' असं म्हणत भूतकाळातच अडकलेले अनेक दुवाचार्य घरोघरी आढळतील. पुस्तकी ज्ञानाचे ओझे वाहणारा आणि संभाषणात अवजड, पुस्तकी शब्द वापरून पांडित्य मिरवणारा 'सखाराम गटणे' आज सोशल मीडियावर लांबलचक ज्ञान पाजळणाऱ्या नेटिझन्सच्या रूपाने जिवंत भासतो. कधीतरी ध्वनिप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एखाद्या विद्यानंद बापटांचे बोलणे देखील आपल्याला गटणेची आठवण करून देते.

आजच्या स्टैंडअप कॉमेडीच्या जमान्यात, जाहीररीत्या ट्रोल किंवा रोस्ट करणे ही विनोदाची नवी व्याख्या होऊ घातली असतानाच्या पार्श्वभूमीवर, एखाद्याच्या विसंगतींवर बोट ठेवताना वाचकांना त्या पात्राबद्दल आकस किंवा घृणा न वाटता कणव, सहानुभूती किंवा आपुलकी कशी वाटेल हे पुलंच्या साहित्यातून शिकण्यासारखे आहे.

'म्हैस' ही कथा वरवर पाहता एका एसटी बसला म्हैस आडवी आल्यामुळे घडलेल्या साध्या, विनोदी प्रसंगाचे वर्णन वाटते. परंतु या कथेच्या अंतरंगात डोकावल्यास ती प्रशासकीय अनागोंदी, लालफितीचा कारभार आणि सार्वजनिक अकार्यक्षमतेवर केलेलं एक अत्यंत टोकदार भाष्य ठरते. एका लहान समस्येचे निवारण करण्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या भूमिकेतून पोळी भाजून घेणे, जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे आणि मूळ समस्या बाजूला ठेवून पंचनामा करत बसणे ही शासकीय व सामाजिक प्रवृत्ती आजही रस्ते, खड्डे किंवा स्थानिक प्रशासकीय गोंधळात पदोपदी पाहायला मिळते. बसचालक, कंडक्टर, गावचे पुढारी, पोलीस आणि प्रवासी यांच्यात होणारे संभाषण आणि आजच्या 'न्यूज चॅनेल डिबेट्स' किंवा सोशल मीडियावरील एखाद्या व्हायरल मुद्द्यावर होणाऱ्या वादविवादांत फारसा फरक नाही. आज मध्यमवर्गाने एसटीचा पदर सोडून विमानाचा किंवा वंदे मातरमचा हात धरलेला असला आणि एसटीही शेवटचे आचके देत स्क्रॅपयार्डच्या दिशेने निघालेली असली तरी मुद्दा भरकटवणारी आणि मुद्द्यावरून गुद्द्यांवर येणारी मानसिकता अजून हमरस्त्यावरच आहे.

चाळ संस्कृती जाऊन हाय-राइज टॉवर्समधील गृहनिर्माण सोसायट्यांचं युग आलंय खरं, परंतु बटाट्याच्या चाळीतील लोकांचा मानवी स्वभाव मात्र तोच आहे. 'बटाट्याची चाळ' हे केवळ एका इमारतीचे आणि इतिहासजमा झालेल्या चाळ संस्कृतीचे वर्णन नसून मध्यमवर्गीय आकांक्षांचे कायमस्वरूपी मानसशास्त्र आहे. वजन कमी करण्यासाठी 'पंत' करत असलेली केविलवाणी धडपड, डाएटचे फॅड, पंतांनी सुरू केलेला 'उपास' आजच्या 'इंटरमिटंट फास्टिंग', 'कीटो डाएट', जिमचा ट्रेंड आणि इन्स्टाग्रामवरील फिटनेस इन्फ्लुएन्सर्सच्या जमान्यात अधिकच चपखल बसतात. यूट्यूबवरील एका व्हिडीओत 'तूप खाल्ले की चरबी वितळते' सांगतात, तर दुसऱ्याच व्हिडीओत 'फॅट्स म्हणजे विष' असा दावा केला जातो. पंतांप्रमाणेच आजचा सामान्य माणूसही या परस्परविरोधी सल्ल्यांच्या चक्रव्यूहात पुरता भरडला जातो. बटाट्याच्या चाळीतील लोकांचे बिनबुडाचे सल्ले आणि सोशल मीडिया पोस्टखाली कॉमेंट्सच्या रूपात मिळणारे स्वयंभू तज्ज्ञांचे अचाट सल्ले यात तुलनात्मकरीत्या शून्य फरक आहे.

जागेचा अभाव असताना घरातच ट्रेडमिल घेऊन त्यावर कपडे वाळत घालणारा आधुनिक मध्यमवर्ग हा चाळीत दोरीच्या उड्या मारणाऱ्या पंतांचाच डिजिटल अवतार आहे. आहार सोडायचा, पण साबुदाण्याची खिचडी तुपात तळून खायची हा मध्यमवर्गीय अंतर्विरोध आजही कायम आहे. चाळीत स्वतःच्या मुलाने इंग्रजी कविता म्हणून दाखवावी यासाठी चाललेली चढाओढ असो किंवा नवीन रेडिओ/उपकरण आले की शेजाऱ्यांनी कौतुकापेक्षा असूयेने केलेली चर्चा असो. आजच्या काळात सोशल मीडिया स्टेटसवर लावले जाणारे फोटो आणि त्यावरून होणारं गॉसिप यात फक्त माध्यम बदललं आहे, आत्मा तोच आहे. स्वतःच्या संकल्पापेक्षा इतरांना दाखवण्यात आणि लोकांकडून 'लाइक्स' किंवा शाबासकी मिळवण्यात त्या काळात आणि आजच्या काळात खर्च होणारी ऊर्जा यांत दृश्यात्मक फरक बऱ्याच किलोवॅटचा असला तरी गुणात्मक फरक अवघ्या काही क्वांटाचाच असेल.

शेजाऱ्याच्या घरात काय चालले आहे यावर बारीक नजर ठेवणारी 'चाळीतील संस्कृती' आज भौतिक भिंती ओलांडून व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर स्थिरावली आहे. बिग बॉससारख्या इतरांच्या खासगी जीवनात डोकावून पाहणाऱ्या टीव्ही शोला मिळणारा टीआरपी हा आपल्यातील चाळकरी मानसिकता केवळ जिवंत असल्याचाच नव्हे, तर विकृतीच्या पातळीला पोहोचल्याचा पुरावा आहे.

जोवर केवळ भाषा आणि पेहरावावरून माणसाचे मूल्यमापन करणारा दांभिक समाज अस्तित्वात आहे तोवर 'ती फुलराणी 'मधील मंजुळा आऊटडेटेड व्हत नाय. पुलंच्या काळासारखं परदेशवारीचं अप्रूप आज राहिलेलं नसलं तरी परदेशात गेल्यावर तेथील प्रत्येक गोष्टीची तुलना आपल्या शहरातल्या गल्लीशी आपण आजही करतोच. आज आपण प्रवासाचा निखळ आनंद घेण्यापेक्षा 'इन्स्टाग्राम रील' कशी बनेल, यात अधिक इंटरेस्टेड असतो. पुलंनी प्रवासवर्णनातून दिलेली दृष्टी ही जगाकडे कौतुकाने, संवेदनशीलतेने आणि मोकळ्या मनाने बघायला शिकवते, ज्याची आजच्या आपल्या सेल्फीजिवी पिढीला अधिक आवश्यकता आहे.

ज्या गोष्टींशी आपला काही संबंध नाही, तिथे नाक खुपसणे, विद्वत्तेचा आव आणणे आणि समस्या सोडवण्याऐवजी ती अधिक गुंतागुंतीची करणे, या 'खोगीरभरती' किंवा 'नस्ती उठाठेव 'मध्ये दिसणाऱ्या ज्या प्रवृत्तीवर पुलंनी कोरडे ओढले आहेत, तीच वृत्ती आज ऑनलाइन ट्रोलिंग आणि नको त्या वादांत उडी घेणाऱ्या युजर्समध्ये स्पष्ट दिसते.

पुलंच्या लिखाणांत दिसणारा, नवीन तंत्रज्ञानामुळे (उदा. टेलिफोन, ट्रान्झिस्टर, कार) मध्यमवर्गीय कुटुंबात उडणारा नैतिक आणि मानसिक गोंधळ आजही कायम असून सोशल मीडिया, मॉल्स, ऑनलाइन पेमेंट, मेट्रो ट्रेन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स अशा प्रत्येक बदलांच्या पायरीवर मध्यमवर्गीय माणूस अडखळतच आहे. आयुष्याची गाडी तंत्रज्ञानाचे रूळ बदलते तेव्हा होणारा खडखडाट हसत हसत टिपण्यासाठी लागणारी ही दृष्टी आणि श्रुती आपल्याला पुलंनी दिली.

पुलंच्या विनोदाचा प्राण त्यांची 'भाषा आणि कोटी' हा होता. हा शाब्दिक विनोद समजण्यासाठी ज्या भाषिक आणि सांस्कृतिक संदर्भाची गरज असते, ते संदर्भ आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी पिढीला किती समजतील हा एक प्रश्न आहे. 'अपूर्वाई' किंवा 'पूर्वरंग'मधील परदेश प्रवासाचे कुतूहल आज इंटरनेट, यूट्यूब, ब्लॉग्स आणि थेट पर्यटनामुळे पूर्णपणे संपले आहे. त्यामुळे परदेशात मराठी माणूस कसा वागतो, याचे पुलंनी केलेले चित्रण आता जागतिक नागरिक बनलेल्या तरुणाईला जुनाट वाटणे शक्य आहे. 'सामाजिक जाणिवांचा विस्तार, सर्वसमावेशकता आणि मानवी मूल्यांची पुनर्मांडणी या आधुनिक निकषांवर पुलंचे साहित्य घासून पाहिले, तर त्यातील विनोद हा एका विशिष्ट काळाचा,

विशिष्ट वर्गाचा आणि जुन्या समाजव्यवस्थेचा अवशेष वाटतो' असा आक्षेप घेतला जातो. मात्र प्रत्येक कलाकृती ही त्या त्या काळाचे दस्तावेजीकरण असते. आपल्या काळातील परिस्थितीला कलाकार कसा भिडतो हे मला अधिक महत्त्वाचे वाटते आणि पुलं केवळ स्वतः भिडले नाहीत तर त्यांनी लाखो वाचकांनाही जीवनाला भिडण्याची किंवा समस्यासहित सहजीवनाची एक हसरी दृष्टी दिली, जी मागील पाऊणशे वर्षे आपल्याला वाट दाखवत आली आहे आणि पुढेही दाखवत राहील.

पुलंची ओळख आपण विनोदी लेखक अशी संकुचित करून ठेवलेली असली, तरी त्यांचे ललित, वैचारिक, व्यक्तिचित्रणात्मक, चरित्रात्मक आणि अनुवादित साहित्य अतिशय गंभीर, चिंतनशील व संवेदनशील आहे. 'गुण गाईन आवडी' आणि 'दाद 'मधून दिसणारे दर्दी, गुणग्राहक पुलं, 'मित्र'मध्ये दिसणारे मैत्र जपणारे पुलं, 'गणगोत' आणि 'आपुलकी'मध्ये भेटणारे, नाती जपणारे संवेदनशील पुलं, परदेशी भाषांतील उत्तम साहित्याला आपल्या मातीचं आंगडं-टोपडं घालून भारतीय करणारे पुलं, 'अपूर्वाई आणि पूर्वरंग 'द्वारे त्या त्या देशांतील संस्कृती, सामाजिक वास्तव, माणसांची मानसिकता आणि इतिहास यांचे सखोल व गंभीर दर्शन घडवून प्रवासवर्णन या साहित्य प्रकाराला एक नवा आयाम देणारे पुलं, 'पुलं : एक साठवण 'मध्ये गवसणारे चिंतनशील पुलं, त्यांना कधीच कालबाह्य होऊ देणार नाहीत. जोपर्यंत मानवी स्वभावात विसंगती, अहंकार, ढोंग आणि त्याचबरोबर जगण्याची धडपड शिल्लक आहे, तोपर्यंत पु. ल. देशपांडे यांचे साहित्य आणि त्यातील विनोद कालसुसंगत आणि दीपस्तंभासारखे ताजेच राहतील.

sabypereira@gmail.