

विशेष
डॉ. गणेश देवी
मानवी नैसर्गिक स्मरणशक्ती क्षीण होत चालली आहे आणि त्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा पायाही ढासळू लागला आहे. आता त्या जागी प्रतिमा हे ज्ञाननिर्मितीचे खरे अधिष्ठान ठरू लागले आहे. या नवीन पर्वाला मी ‘स्मृती-पश्चात ज्ञान’ (post-memory knowledge) असे संबोधतो. हे स्मृती-पश्चात ज्ञान डिजिटल चिन्हांच्या रूपात ‘लिहिले’ जात असून, या चिन्हांमध्ये पारंपरिक काळ वा व्याकरणाच्या बंधनांपलीकडे अर्थ नेण्याची क्षमता आहे. १७ जुलै रोजी आपण इमोजी डे साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर मानवी स्मृती व चिन्हांची भाषा या माध्यमातून मानवाच्या झालेल्या दीर्घकालीन प्रगतीच्या प्रवासावर व भवितव्यावर भाष्य करणारा लेख.
संपूर्ण मानवी इतिहासात नैसर्गिक घटनांचे वर्णन करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत. या घटनांची रूपवैशिष्ट्ये वेगवेगळ्या कल्पक पद्धतींनी सांकेतिक स्वरूपात मांडली गेली आहेत. प्राचीन इजिप्शियन चित्रलिपीपासून ग्रीक त्रिकोणमितीपर्यंत आणि मध्ययुगीन युरोपातील जादूई सांकेतिक भाषा ही त्याची काही ठळक उदाहरणे आहेत. या सर्व प्रयत्नांचा मुख्य उद्देश मानवी अनुभव साठवून ठेवणे, त्यांची देवाण-घेवाण करणे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक काळानंतरही जिवंत ठेवणे हा होता. मानवी ज्ञान नोंदवणे, जतन करणे, व्यवहारात आणणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची ही गरज अखेरीस सतराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ लाइब्निझ यांच्या 'शुद्ध भाषा' या संकल्पनेत प्रकट झाली. ही अशी भाषा होती, ज्यातील चिन्हांना स्वतःचा अर्थ नसतो, पण ती स्थिर व पूर्णतः व्यक्तिनिरपेक्ष अर्थ (गणितीय चिन्हांसारखे) व्यक्त करू शकते. त्यांनी या प्रणालीला 'तार्किक गणित' (logical calculi) असे संबोधले (पाओलो रॉस्सी, २००६, पृ. १८५). लाइब्निझपूर्वीही अनेकांनी कल्पना मांडण्याच्या आणि त्यांना अमूर्त संकल्पनांमध्ये रूपांतरित करण्याच्या पद्धती विकसित करण्याचे प्रयत्न केले होते. सोळावे आणि सतरावे शतक हा युरोपमध्ये असा काळ होता, जेव्हा विद्वानांनी बौद्धिक आणि सर्जनशील कार्यासाठी लॅटिनऐवजी आधुनिक युरोपीय भाषांचा वापर करण्यास सुरुवात केली. या संक्रमण काळात ‘ज्ञान व्यक्त करण्यासाठी’ सांकेतिक प्रणाली निर्माण करण्याच्या कल्पनेने अनेक विद्वानांना भुरळ घातली. या आकर्षणापायी त्यांनी कल्पनांचे वर्गीकरण करण्याच्या अशा पद्धती विकसित केल्या, ज्यांना नंतर 'सार्वत्रिक शास्त्र' (universal science) म्हणून मान्यता मिळाली. १५८२ साली जिओर्डानो ब्रुनो यांनी एक महत्त्वाची कल्पना मांडली. त्यांचे भाष्यकार पाओलो रॉस्सी यांनी ही कल्पना संक्षेपात सांगितल्यानुसार, सोप्या प्रतीकांच्या साहाय्याने ‘कल्पनांचे संयोग’ केले तर मानवी स्मरणशक्तीच्या मर्यादित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ज्ञान साठवता येते.
मनात ‘साखळ्या’ किंवा विविध ‘छायां’मधील (कल्पनांच्या प्रतिकृतींमधील) संबंध जपून ठेवल्यास, विचारांना हळूहळू स्पष्ट करून त्यांच्या खऱ्या परस्परसंबंधांचा शोध घेता येतो. अनेक विस्कळीत तपशीलांमागील एकता विचारात घेतल्यास, तेव्हा आपण कल्पनांमधील तर्कसंगत नाते समजू शकते (रॉस्सी, २००६). सुमारे शतकभरानंतर १६७५ मध्ये लाइबनिट्झ यांनी एक अजरामर वचन मांडले- ‘existere nihil aliudessequamharmonicumesse’: ‘सुसंवादातच अस्तित्व आहे’ (रॉसी, २००६, पृष्ठ १९२). ब्रुनोच्या काळापासून ते लाइब्निझपर्यंत, दीडशे वर्षांच्या कालखंडात, युरोपातील विचारवंतांनी मानवी मनाच्या अद्भुत क्षमतेचा शोध लावला - माणसाचे मन वेगवेगळे अनुभव आणि विचार एकत्र करून, ‘सुसंवादी समज’ निर्माण करू शकते, जी अमूर्त स्वरूपात मांडता येते. तत्त्वज्ञानात या क्षमतेला ‘तर्कशक्ती’ म्हटले जाते. जर रिने देकार्त (१५९५–१६५०) यांनी ‘je pense, donc je suis ’(मी विचार करतो, म्हणून मी आहे) या विधानाद्वारे युरोपला तर्कशक्तीचे तत्त्वज्ञानिक अधिष्ठान दिले असेल, तर ब्रुनो, लाइब्निझ आणि त्यांच्या समकालीन विचारवंतांनी ज्ञानाला तर्कशक्तीच्या भक्कम पायावर ज्ञान स्थिर ठेवण्याची शिकवण दिली. युरोपमधील ‘कल्पना वर्गीकरण आणि संग्रहित करण्याचा’ इतिहास आपल्यासाठीही महत्त्वाचा ठरतो. कारण या प्रक्रियेत स्मरणशक्ती ही केवळ सर्वसामान्य वारसा न राहता, तिचे माणसाच्या बौद्धिक क्रियांना दिशा देणाऱ्या आणि त्यांना अधिकृत मान्यता देणाऱ्या उच्चस्तरीय व्यासपीठात रूपांतर झाले. याच प्रक्रियेतून ‘सार्वत्रिक ज्ञान’ ही संकल्पना आणि विद्यापीठांचे खरे कार्य पुढे आले.
प्राचीन काळापासून भारतीय शिक्षणपरंपरेत स्मरणशक्तीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. शिकण्यालायक गोष्टींचं वर्णन करण्यासाठी ‘स्मृती’ (आठवणे आणि आठवलेले) हा शब्द वापरण्यात येत असे. भगवद् गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की स्मृतीच्या दुर्बलतेमुळे माणसाची विचारशक्तीही नष्ट होते- स्मृतीभ्रंशात् बुद्धिनाशः. प्राचीन भारतीय साहित्यात आणि सैद्धांतिक ग्रंथांमध्ये मजकूर सहज लक्षात राहावा यासाठी विविध सोपी स्मरणतंत्रे वापरण्यात आली. जगातील इतर कोणत्याही संस्कृतीने स्मरणशक्तीला इतके महत्त्व दिले नाही जितके भारताने दिले. हजारो वर्षांपासून भारतात स्मरणशक्ती ही ज्ञानप्राप्तीचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून स्वीकारली गेली. १७व्या शतकात युरोपमध्ये स्मृतीचा वापर भारतातील विचारपरंपरेपेक्षा वेगळ्या प्रकारे करण्यात आला. याचं एक कारण असं असावं की भारतात 'ज्ञानविज्ञान' किंवा 'सार्वत्रिक ज्ञान' ही संकल्पना पारंपरिक ज्ञानधारकांनी स्वीकारलेली नव्हती.
भारतात ज्ञान म्हणजे ‘जाणून घेणे’, म्हणजे बुद्धी आणि अंतर्ज्ञान यांचा घनिष्ठ संबंध आहे, अशी धारणा होती. यासोबतच, भूतकाळातील ग्रंथ अचूकपणे लक्षात ठेवून त्यांची नितळ पुनरावृत्ती करण्यासाठी स्मृतीचा अत्यंत परिष्कृत पद्धतीने वापर केला जात होता. त्यामुळे, पूर्वी नमूद केल्याप्रमाणे, ‘शिष्यवृत्ती’ किंवा थेट गुरूकडून शिकणे ही पद्धत शिक्षण घेणे व देणे यासाठी सर्वाधिक पसंतीची ठरली. ही पद्धत फक्त वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, शिल्पकला, वास्तुकला, धातुविज्ञान, नृत्य, संगीत आणि हस्तकला यांसारख्या कौशल्यप्रधान विषयांसाठीच नाही, तर तत्त्वज्ञान, काव्य, गणित आणि खगोलशास्त्र यांसारख्या अमूर्त विचारांना आणि नवचिंतनाला चालना देणाऱ्या शाखांसाठीही वापरण्यात आली. परंतु, भारतीय समाजात दोन हजार वर्षांहून अधिक काळ रुजलेल्या सामाजिक विभाजनामुळे ही गुरुकुलाधारित ज्ञानपद्धती खऱ्या ‘सार्वत्रिक विज्ञान’निर्मितीसाठी एक मोठा अडथळा ठरली. पूर्वीच्या काळी, नव्या कल्पना आणि विचारांचे जतन करण्यासाठी अत्यंत अचूक स्मरणशक्ती हीच मुख्य साधन होती. मात्र, अशा स्मरणशक्तीचा लाभ घेण्याची संधी व्यक्तीच्या सामाजिक स्थानावर अवलंबून होती. परिणामी, वसाहतपूर्व काळात दोन व्यापक स्मृतीआधारित ज्ञानपरंपरा एकत्र अस्तित्वात होत्या, पण त्यांच्यात परस्पर देवाणघेवाण किंवा विचारांची सांगड फार क्वचितच घडत असे. लेखन व प्रतीकात्मक चिन्हे वापरण्याची मुभा असलेला एक गट आणि अशा प्रतीकात्मक अभिव्यक्तीपासून वंचित ठेवण्यात आलेला दुसरा गट.
भारतीय साहित्यपरंपरेत बहुतेक सर्जनशील कार्य हे मौखिक परंपरेतूनच घडले. लोकांना लेखनकौशल्य अवगत असले तरी, पुढच्या पिढीला शिक्षण देणे किंवा रचनांचे स्मरण करून देणे यासाठी लेखन हे प्रमुख साधन नव्हते. याचा अर्थ असा नाही की लेखन अस्तित्वातच नव्हते—हरप्पा काळातही लिखित नोंदी होत्या आणि प्राचीन तमिळ तसेच वेदोत्तर संस्कृतमध्ये विपुल साहित्यनिर्मिती झाली होती. तरीसुद्धा, ज्ञान, साहित्य आणि परंपरा या प्रामुख्याने वाणी व मौखिक माध्यमातूनच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जेव्हा मुद्रणतंत्रज्ञानाने भारतीय भाषांना नवसंजीवनी दिली, तेव्हा अप्रकाशित व अलिखित भाषांमधील ज्ञानाचे महत्त्व जवळपास संपुष्टात आले. परिणामी, अक्षरज्ञान सहज उपलब्ध असलेल्या आणि त्यापासून वंचित राहिलेल्या समाजघटकांतील दरी, भारताच्या मध्ययुगीन काळातून आधुनिकतेकडे संक्रमणाच्या त्या निर्णायक क्षणी, अधिकच वाढली. याचा अर्थ असा नाही की अप्रकाशित भाषांतील स्मृती आणि ज्ञानाच्या मौखिक परंपरा तत्काळ नाहीशा झाल्या. वसाहत काळातील ‘ज्ञान’ या संकल्पनेच्या प्रभावामुळे भारतीयांनी साहित्याकडे पाहण्याची पद्धत बदलली. लिखित स्वरूपात असलेले ते ‘साहित्य’ आणि लिखित स्वरूपात नसलेले ‘लोकसाहित्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचप्रमाणे, जरी भारतीयांनी घरांची उभारणी नेहमीच केली होती, तरी वास्तुशास्त्राला ‘लोकवास्तुकला’ आणि ‘वास्तुकला’ अशा दोन गटांत विभागण्यात आले. तसेच लोक बोलत असलेल्या भाषांची नोंद ‘भाषा’ आणि ‘बोली’ अशा वेगवेगळ्या गटांत करण्यात आली. या प्रकारे, भारताच्या ‘स्मृतीक्षेत्रा’त खोलवर विभागणी निर्माण झाली. गेल्या दोन शतकांपासून, या जखमेच्या पार्श्वभूमीवर भारत ‘सार्वत्रिक ज्ञान’ या संकल्पनेला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. एकोणिसाव्या शतकातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत, भारताला प्रथम सर्व लोकांची स्मृती आणि चिन्हे एकत्र असणारी अशी समाजरचना तयार करावी लागली. त्यानंतरच, ‘सार्वत्रिक’ विज्ञान किंवा शास्त्र म्हणून पात्र ठरणाऱ्या नव्या ज्ञानक्षेत्रांची निर्मिती करण्याचा विचार वास्तवात येऊ शकला.
भारतात व्यापक सांस्कृतिक विस्मरण होऊ लागले त्याच काळात युरोपमध्येही स्मृतीला दुय्यम किंवा कल्पनेपेक्षा कमी महत्त्व दिले जाऊ लागले. सर्वप्रथम जर्मनीतील इमॅन्युएल कांट आणि नंतर इंग्लंडमधील सॅम्युएल टेलर कोलरिज यांनी स्मृती म्हणजे ‘केवळकल्पनारम्य गोष्टींशी खेळणारी एक प्रक्रिया’ आहे असे मांडले. त्यांच्या मते, कल्पना ही ‘पुनर्निर्माण’ करणारी मनाची शक्ती आहे (कोलरिज, १८१७).या अद्भुतरम्य ज्ञानमीमांसेवर भाष्य करताना टीकाकार एम. एच. अब्रॅम्स यांनी म्हटले आहे की, स्मृती ‘आरशा’सारखे कार्य करते तर कल्पना ‘दिव्या’सारखी असते. सुमारे अर्ध्या शतकानंतर, सिगमंड फ्रॉईड यांच्या मानवी मनाच्या विश्लेषणात स्मृतीला पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण स्थान लाभले. फ्रॉईड यांच्या मानसिक आजारांच्या विश्लेषणात स्मृतीला मध्यवर्ती स्थान होते. जर स्मृती उपलब्ध झाली नसती तर संपूर्ण मनोविश्लेषणशास्त्राची रचना करणे शक्य झाले नसते. कल्पनांच्या इतिहासात अनेकदा दोन विरुद्ध आणि स्पर्धात्मक विचार किंवा प्रवृत्ती एकाच वेळी विकसित होताना दिसतात. तथापि, हे हेगेलियन द्वंद्ववादाचे उदाहरण म्हणून पाहण्याची गरज नाही. एकोणविसाव्या शतकात, हेगेल यांच्या इतिहासाच्या सिद्धांतात, मार्क्स यांच्या भौतिक द्वंद्वाच्या तत्त्वज्ञानात आणि फ्रॉईड यांच्या मनोविश्लेषणशास्त्रात, इतिहासाच्या रूपात रचलेली आणि कथन केलेली स्मृती केंद्रस्थानी होती. याच काळात कॅमेरा तंत्रज्ञानाचा उदय झाला, आणि सुमारे पन्नास वर्षांनी, विसाव्या शतकात, चित्रपट हे प्रतिमा, अद्भूतरम्यता आणि स्वप्न यांचे सामूहिक प्रभावाचे सर्वात शक्तिशाली माध्यम ठरले. शतकाच्या अखेरीस, प्रतिमा निर्माण करणारी उपकरणे आणि प्रतिमा प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आणि त्यामुळे मानवी जीवनात मूलभूत बदल घडू लागले. ब्रिटीश रोमँटिक कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी हरपलेल्या ‘काळाच्या ठिपक्यांचा’ शोधाला त्यांचे काव्यात्म ध्येय बनवले होते. त्यांच्या मते, असा एखादा ‘ठिपका’ काळ आणि अवकाश यांना शुद्ध स्वरूपात एकत्र आणू शकतो. ‘अंक’ हे ज्ञानाचे माध्यम म्हणून अलीकडेच शोधले गेले असून उपरोधिकपणे, त्या शोधाचा तंत्रज्ञानात्मक कळस आहे. आता हे अंक, म्हणजेच माहिती, विद्युत चुंबकीय लहरींमधून अत्यंत लांब अंतरावर पाठवली जात आहे. मानवी इतिहासात विद्युत अंकांचा प्रभाव जगावर कधी नव्हे इतका पडू लागला आहे. अगदी अल्पावधीत, माणसांनी हजारो वर्षांपासून अनुभवलेले, आणि इमॅन्युएल कांट यांनी ज्याला ‘अभूतपूर्व जग’ म्हटले आहे ते आता डिजिटल जगाशी कायमस्वरूपी विलीन होऊ पहात आहे. माणसाची नैसर्गिक स्मृती त्याला जवळपास पारखी होत आहे हे भौतिक आणि डिजिटल जगाच्या अभिसरणाचे पहिले लक्षण आहे.
आताच्या काळात, बहुतांश लोक, पूर्वी पिढ्यान् पिढ्या स्वतः करत असलेल्या स्मरणाधारित कामांसाठी बाह्य मेमरी-चिप्स वर विसंबून राहू लागले आहेत. मानवी उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात, स्मृती हा पूर्णपणे व्यक्तीचा विशेषाधिकार होता. नंतर, समाजाच्या विकासात सामूहिक स्मृतीची संकल्पना आली आणि शाळा या स्वरूपात ती समाजात स्थिर झाली. पाओलो रॉसी यांच्या ‘लॉजिक अँड द आर्ट ऑफ मेमरी’ (२००६) या प्रसिद्ध पुस्तकात या संकल्पनेचा आणि स्मृतीच्या विकासाचा सविस्तर आढावा घेतला आहे. युरोपियन प्रबोधन काळात, ज्ञान साठवून व्यवस्थित मांडण्यासाठी विद्यापीठे, संग्रहालये आणि ग्रंथालये अशा नव्या संस्थांचा उदय झाला. या संस्थांनी ‘सार्वत्रिक ज्ञान’ अभ्यासासाठी एक ‘वस्तुनिष्ठ’ आधार दिला. परंतु आजच्या युगात, मानवी नैसर्गिक स्मरणशक्ती क्षीण होत चालली आहे आणि त्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा पायाही ढासळू लागला आहे. आता त्या जागी प्रतिमा हे ज्ञाननिर्मितीचे खरे अधिष्ठान ठरू लागले आहे. या नवीन पर्वाला मी ‘स्मृती-पश्चात ज्ञान’ (post-memory knowledge) असे संबोधतो. हे स्मृती-पश्चात ज्ञान डिजिटल चिन्हांच्या रूपात ‘लिहिले’ जात असून, या चिन्हांमध्ये पारंपरिक काळ वा व्याकरणाच्या बंधनांपलीकडे अर्थ नेण्याची क्षमता आहे (जी आधीच्या स्मृती-आधारित ज्ञानाला लाभली नव्हती).
मानवी मेंदू सतत उत्क्रांत होत असल्याने आणि त्यातून त्याला अशक्य अशा गुंतागुंतीच्या वास्तवांचे आकलन करण्याची अद्भुत क्षमता प्राप्त होत असल्यामुळे, मानवी भाषा आणि विचार हे पारंपरिक काळ, अंतर, स्मृती, कल्पना, वेळ आणि अवकाश यांच्या मर्यादांपलीकडे जात आहेत. त्यामुळे भविष्यात मानवाला अधिक जटिल आणि बहुआयामी वास्तव समजून घेता येईल आणि विविध माध्यमातून ते तो व्यक्त करू शकेल, असा विश्वास वाटतो. मायकेल सी. कॉर्बॅलिस यांच्या अभ्यासानुसार, मानवी मेंदूची रचना आणि कार्यपद्धती पुनरावृत्त (recursive) पद्धतीची असली तरी, भाषेची रचना मात्र तशी नाही:
भविष्यात स्मृती आणि मेंदू, किंवा भाषा आणि मेंदू यांचा संबंध तुटल्यास, मेंदू ‘विचार करण्याचे’ नवे मार्ग शोधू शकतो. मानवी उत्क्रांतीत स्मृतीने जास्त काळ व्यापलेल्या मेंदूच्या कार्यक्षेत्रात, कदाचित कल्पनाशक्ती आपले स्थान निर्माण करेल.
(लेखक हे विचारवंत व ख्यातनाम भाषाशास्त्रज्ञ आहेत)
पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या 'इंडिया अ लिंग्विस्टीक सिव्हीलायझेशन' या ग्रंथातील लेखाचा दयानंद असोलकर यांनी केलेला अनुवाद