प्रगतिशील लेखक आणि अस्तित्ववादाचा अन्वयार्थ

भटक्या-बहुजन समाजातल्या तरुणाने गावाहून मुंबईत येत, कष्ट करत शिक्षण घेत या महानगरात बस्तान बसवणं, ते करत असतानाच शब्दांशी जवळीक साधत या महानगरी जगण्याला कागदावर उतरवणं आणि त्याचवेळी आत्ममग्न न राहता हिंदी भाषेच्या सक्तीपासून कोकणातील हानिकारक प्रकल्पांपर्यंत प्रत्येक बाबतीत भूमिका घेणं.. यातलं काहीच आजच्या जगण्यात सोपं नाही. पण प्रदीप कोकरे यांनी हे सारं सहज करून दाखवलं आहे.
प्रगतिशील लेखक आणि अस्तित्ववादाचा अन्वयार्थ
Published on

विशेष

आशिष शिंदे

भटक्या-बहुजन समाजातल्या तरुणाने गावाहून मुंबईत येत, कष्ट करत शिक्षण घेत या महानगरात बस्तान बसवणं, ते करत असतानाच शब्दांशी जवळीक साधत या महानगरी जगण्याला कागदावर उतरवणं आणि त्याचवेळी आत्ममग्न न राहता हिंदी भाषेच्या सक्तीपासून कोकणातील हानिकारक प्रकल्पांपर्यंत प्रत्येक बाबतीत भूमिका घेणं.. यातलं काहीच आजच्या जगण्यात सोपं नाही. पण कबीरांची भजनं गात कबीरयात्रेत पायी फिरणाऱ्या, मुकूल शिवपुत्र यांचे सूर कानात साठवणाऱ्या प्रदीप कोकरे यांनी हे सारं सहज करून दाखवलं आहे. कदाचित म्हणूनच युवा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळणं, हेही सहजतेने घडल्यासारखं वाटत आहे.

तरुण लेखक प्रदीप कोकरेच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला २०२३-२४ या वर्षीचा मराठी भाषेचा ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला आणि गेली काही वर्षं सुरू असलेल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांबद्दलच्या नापसंतीयुक्त चर्चेला काही प्रमाणात ब्रेक लागला. प्रगल्भता आणि सामाजिक जाणीव या दोन्ही अनुषंगाने प्रदीप मागच्या पाच-सहा वर्षांतल्या पुरस्कार विजेत्यांमध्ये वेगळ्या उंचीवर दिसतो.

‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने चालू झालेल्या साहित्यविषयक फेलोशिप अंतर्गत लिहिली गेली आहे. डॉ. नितीन रिंढे, डॉ. रणधीर शिंदे, आसाराम लोमटे आणि इतर अनेक ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली या फेलोशिप अंतर्गत मिळालेले प्रकल्प एका वर्षात पूर्ण केले जातात. ही कादंबरीही या प्रकल्पांतर्गत एका वर्षात लिहिली गेली आहे.

पाचेरी आगर, गुहागर या कोकणातल्या खेड्यातून प्रदीप वयाच्या नवव्या वर्षी मुंबईला स्थलांतरित झाला. घरकाम, धुणी-भांडी करत त्याने रात्रशाळेत शिक्षण घेतलं, मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आता शिवाजी विद्यापीठात, कोल्हापूर येथे ‘मुंबई शहरावर लिहिलेल्या मराठी कवितांचा वाङ्मयीन अभ्यास’ या विषयावर त्याची पीएचडी सुरू आहे. दरम्यान, प्रदीप लोकवाङ‌्मय गृह प्रकाशन संस्थेत २०१९ पासून सहाय्यक संपादक म्हणून काम करतोय. विशेष म्हणजे प्रदीपने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून आई-वडिलांना स्वतःबरोबर राहायलाही आणलं आहे. भटक्या-बहुजन जातसमूहाच्या तरुणाला आजच्याही काळात अशा प्रकारे संघर्ष करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी लागते हे सामाजिक सत्य आहे. त्यासाठी प्रदीपचं कौतुक करावंच लागेल.

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरुवातीलाच इतकं सांगण्याचं कारण म्हणजे, प्रदीपची कादंबरी. ज्या निमित्ताने त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय ती कादंबरी म्हणजे एका तरुणाच्या आयुष्याच्या अस्तित्ववादी संघर्षाचा तुकडा आहे. कादंबरीच्या नायकाचं आयुष्य आणि प्रदीपचं आयुष्य यामध्ये वरकरणी फार साम्यस्थळं दिसून येतात. मात्र ही कादंबरी थेट आत्मकथनात्मक नाही. मराठीमध्ये अस्तित्ववादी कादंबऱ्यांची मोठी परंपरा आहे. गावाकडून, निमशहरातून शहरात किंवा महानगरात आलेल्या नायकांचं शिक्षण आणि नोकरीची धडपड, शहराशी जुळवून घेत आपल्या मुळांना घट्ट पकडून ठेवण्याचा अट्टाहास हे या सगळ्या कादंबऱ्यांचं सूत्र. गावच्या आयुष्याचं उदात्तीकरण आणि शहरात हरवलेलं माणूसपण हे दाखवण्याची स्पर्धाच जणू या कादंबऱ्यांमध्ये दिसते. प्रदीप मात्र त्याला छेद देत मुंबईचं अधिक मानवी चित्रण करतो. दुसऱ्या बाजूला महानगरी कादंबरीच्या परंपरेशीही या कादंबरीची तुलना करता येईल. भाऊ पाध्येंच्या कादंबरीचा थोडा प्रभाव या कादंबरीवर दिसतो. पण अस्तित्ववादी, व्यक्तिकेंद्रित मांडणीमुळे प्रदीपच्या कादंबरीचं स्वतंत्र अस्तित्व दिसतं. भाऊ पाध्येंच्या नायकाप्रमाणे ‘खोल खोल दुष्काळ डोळे’चा नायक विश्वाच्या भानगडीत अडकलेला नाहीए आणि शहाणेंच्या नायकांप्रमाणे कौटुंबिक गुंतागुंतीतही फारसा अडकलेला नाहीए. कादंबरीचा पट छोटा असल्याने कादंबरीच्या शेवटापर्यंत नायकाला स्वतःचा, स्वतःच्या ठळक अस्तित्वाचा, आयुष्याच्या दिशेचा शोध लागलेला नाही. ही कादंबरी त्याअर्थी पुढच्या शक्यतांसाठी खुल्या शेवटाकडे जाणारी कादंबरी आहे. तुलनेने नवीन लेखकांपैकी जयवंत दळवी, जयंत पवार यांच्या शहरी वर्णनाचा प्रभाव काही प्रमाणात कादंबरीवर जाणवतो. भाषेच्या बाबतीत कादंबरी सशक्त आहे. मुंबईच्या भाषेचे विविध चेहरे या कादंबरीत दिसतात. मुंबय्या, चाकरमानी मराठी, चाळीची भाषा, मुंबईतल्या तरुणांची भाषा, रस्त्यावरच्या लोकांची भाषा आणि उच्चभ्रू इंग्रजी-हिन्दी मिश्रित भाषा असे भाषेचे सगळे स्तर प्रदीपच्या या कादंबरीत येतात. शिवाय संत तुकारामांच्या ओळी आणि त्या अनुषंगाने काही टिपणं आल्याने भाषेचं वैविध्य लेखकाने गंभीरपणे घेतलेलं आहे, हे जाणवतं.

तुकाराम, मुकुल शिवपुत्र, कबीर यांचे उल्लेख, अवतरणं/ओळी आणि अस्तित्ववादासंबंधी चिंतन, थोडा सर् रिॲलिझम या गोष्टी या कादंबरीच्या नायकाला सामान्य व्यक्तीपासून अधिक अभिजात ओळख देतात. त्याचवेळी नायकाचं हेडफोन घालून गाणी ऐकणं, नोकरीनिमित्त शहरभर, ओळखी-अनोळखी जागी फिरणं, तारुण्यसुलभ प्रेमप्रकरणं या गोष्टी नायकाला सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्याशी थेट जोडण्याचंही काम करतात. चाळीतील रोजच्या आयुष्यातील घटनाक्रम याआधीच्या कादंबऱ्यांमध्ये आलेले असूनही जुगाराचे संदर्भ, गुन्हेगारीत अडकत जाण्याच्या घटनाक्रमाचे वर्णन, पात्रांचं होणारं सहज गुन्हेगारीकरण या गोष्टी लेखक समाजाकडे उघड्या डोळ्याने बघतोय याचंच लक्षण आहे. अर्थात पुन्हा कादंबरीच्या व्यक्तिकेंद्रित रूपामुळे या सामाजिक घटकांना-घटनांना अतिशय छोटा अवकाश मिळालेला आहे. नायकाच्या भावविश्वात आणि लेखकाच्या भावविश्वात मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. यामुळे नायक बुद्धिवादी गटाचं प्रतिनिधित्व करतो असं वाटण्याची शक्यता निर्माण होते. ही गोष्ट नायकाच्या आवडी-निवडी सामान्य तरुणाशी मिळत्या-जुळत्या दाखवून टाळता आली असती.

काफ्काच्या अस्तित्ववादी आणि त्याचवेळी विस्मयकारी चमत्कारिक रुपकयुक्त लिखाणाचा प्रभाव कादंबरीतल्या चिंतनात्मक तुकड्यांवर जाणवतो. कथात्म मांडणी चालू असताना आलेले चिंतनाचे तुकडे कादंबरीच्या प्रवासात काही प्रमाणात खोडा घालतात. त्यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, की किती सामान्य पार्श्वभूमी असलेल्या पंचविशीतल्या तरुणांचे भावविश्व इतके विविधांगी आणि समृद्ध असते? यातून लेखकाच्या वाचनाचं आणि व्यासंगाचं कौतुक वाटत असलं तरी नायकाच्या पात्रासाठी ते अनावश्यक आणि काही वेळा अनैसर्गिक वाटतं. या सगळ्या व्यासंगाची पार्श्वभूमी कादंबरीत तयार झालेली नाही. अर्थात, अशा अनेक गोष्टींची पार्श्वभूमी कादंबरीत आलेली नाही. ती नसणं ही बाब कादंबरीच्या छोट्या अवकाशाचा परिणाम म्हणून मान्य करावी लागते. उदाहरणार्थ, सुधा या नायकाच्या प्रेयसीचं अस्तित्व कादंबरीत फारच तोंडी लावल्यासारखं आलेलं आहे. तिची, तिच्या भेटीची, त्यांच्या प्रेमप्रकरणाची पार्श्वभूमी आणि एकूण प्रसंग खूपच तोकडे आहेत. त्या तोकडेपणामुळे नायकाची प्रेमाविषयी असलेली तारुण्यसुलभ अनिश्चितता ही प्रेयसीप्रतिचा निष्काळजीपणा असल्यासारखी दिसते. तसंच नायकाच्या कुटुंबसदस्यांविषयी नायकाची कुठलीही भावना नीटशी प्रकट होत नाही. बऱ्याच कादंबऱ्यांबद्दल ‘अनावश्यक पसरटपणा आहे’ ही वाचकांची साधारण तक्रार असते. इथे बरोबर उलट होतं आणि कादंबरी अनावश्यकरीत्या आटोपशीर होऊन बसलेली दिसते. एका वर्षाचा आणि मुंबईच्या नगरा-उपनगराचा पैस या कादंबरीत आहे. मुंबईच्या अनुषंगाने आलेली सामाजिक निरीक्षणं या कादंबरीत दिसतात. पण समकालीन राजकारण, स्त्रीवाद आणि लिंगभावाचा प्रश्न, जातीय आणि धार्मिक परिस्थिती याविषयीची निरीक्षणंही कादंबरीत येणं गरजेचं होतं. ही निरीक्षणं हा कुठल्याही आधुनिक, शहरी, अस्तित्ववादी कादंबरीचा, कथेचा खरंतर न टाळता येणारा भाग असतो; त्याचा प्रसंगानुरूप उल्लेख या कादंबरीत अगदीच तोकड्या प्रमाणात आलेला आहे, राजकारणाचा तर अगदी आलेलाच नाही.

अर्थात वर म्हटल्याप्रमाणे फेलोशिपची कादंबरी एका वर्षात पूर्ण करण्याची अट पाळून प्रदीपने उत्तम निर्मिती केलेली आहे. प्रवीण बांदेकर, आसाराम लोमटे, रवींद्र लाखे अशा अनेक ज्येष्ठ आणि तरुण साहित्यिकांनी, समीक्षकांनी कादंबरीची पाठराखण केलेली आहे.

या कादंबरीचे निमित्त हाताशी धरून प्रदीपच्या इतर साहित्यिक चळवळींचा उल्लेख करणं मला इथे गरजेचं वाटतं. प्रदीप उत्तम कवी, संपादकसुद्धा आहे. त्याचे बहुजनवादी साहित्य परंपरेवर विशेष प्रेम असून आंबेडकर-फुले विचारांचा त्याच्यावर प्रभाव आहे. जिथे गरजेचं आणि प्रस्तुत असेल तिथे सुधारणावादी आणि प्रगतिशील भूमिका प्रदीप मांडत असतो. कादंबरीच्या औपचारिक प्रकाशनाच्या वेळी प्रदीप म्हणतो, “... गावाकडची शाळा सुटल्यांनंतर मी शहरात आलो आणि रात्रशाळेत शिकत जगण्याचा संघर्ष करू लागलो. या प्रवासाकडे मी निव्वळ संघर्ष म्हणून बघत नाही तर त्यामागची जी प्रेरणा आहे, फुल्यांची असेल, आंबेडकरांची असेल, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची असेल, ती प्रेरणा, तो प्रवास मी माझ्यासोबत बाळगलेला आहे आणि तोच प्रवास, संघर्ष मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्या मरतात आणि त्या गोष्टी सांगण्याचा मी नेहमी माग घेत आलेलो आहे.”

प्रगतिशील लेखक संघ, मुंबईचा तो सदस्य असून डाव्या चळवळींशीही त्याची जवळीक आहे. हिन्दी सक्तीविरोधी भूमिका, बारसू रिफायनरीविरोधी आंदोलन, शाश्वत कोकण चळवळ अशा सामाजिक चळवळींमध्ये त्याचा सक्रिय सहभाग आहे. प्रदीप स्वतःचं पुस्तक वितरण आणि पुस्तक प्रकाशनही चालवतो. ‘टिंब’ नावाने त्याने चालवलेल्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘आडतासच्या कविता’ या श्रीकांत ढेरंगे यांच्या कवितासंग्रहाला विविध पुरस्कार आणि अनेकांचं कौतुक मिळालेलं आहे. युगवाणी, खेळ, मुक्तशब्द, अभिधानंतर इत्यादी नियत/अनियतकालिकांमध्ये त्याच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याच्या कवितेमध्येही अस्तित्ववादी आणि सामाजिक जाणिवेचा स्वर स्पष्ट दिसतो. कबीर-तुकाराम-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ या परंपरेचा मार्ग प्रदीपने स्वीकारलेला आहे हे त्याच्या एकूण साहित्यातून जाणवतं. त्याच्या एखाद-दुसऱ्या कवितेमध्ये स्त्री-पुरुष प्रेमासंबंधीचे उल्लेख पण येतात, परंतु ते अगदीच सौंदर्यवादी किंवा विरह-आवेग-हळवे वगैरे अतिभावनिकही नाहीत. काही वेळा चमत्कृतीपूर्ण शब्दयोजना करून त्याची कविता अडखळते किंवा वाचकाला अडखळायला लावते. पण तरीही कवितेमध्ये आशयाचा सूर हरवत नाही.

उदाहरणार्थ -

“कुठल्याही दवाउपचाराने शांत होत नाही,

ही शरीर पोखरत चाललेली कीड अथवा

नष्ट होत नाही तीचं दर्शनी कवडीइतकं नामोनिशान..”

किंवा

“असत्याचे अश्रुधूर

हवेत गोळीबार सामसूम

जिवाची किंमत मुखमंत्रीनिधी

अकॅडेमीक चर्चासत्र विशेष पुरवणी

आणि तू बोल्तेस

आपण सुखी आयुष्य जगू प्रिये!..”

किंवा

“वाडवडला महापुरुषा आज्यापणज्या ठिकानदारा

मालका गणपतीबाबा गजानना उभा ऱ्हा ज्याची करणी

त्याच्या मस्तकी आपट आणि सुखी ठेव बावा म्हणत

बाप ओवाळतो अगरबत्ती रोज आंघोळ करून..”

या कवितांच्या तुकड्यांतून त्याच्या विविधांगी कवितेची एक झलक आपल्याला दिसते.

यशवंतराव चव्हाण राज्यवाङ‌्मय पुरस्कार, यशवंतराव चव्हाण सेंटरचा कविवर्य ना. धो. महानोर पुरस्कार, स्वर्गीय दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार आणि असे इतरही पुरस्कार आता प्रदीपच्या नावावर जमा झालेले आहेत. साहित्य अकादमीचा हा पुरस्कार यात कौतुकास्पद भर टाकणाराच आहे. प्रदीपकडून भविष्यात अधिक गंभीर आणि समावेशक लिखाण व्हावं, अशी अपेक्षा आणि त्याच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा!

लेखक, संपादक shindeashishv@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in