प्रकाशाचा उत्सव

अभ्यासाशी कट्टी, दिवाळीशी बट्टी” बाळू मस्त सुट्टीचं गाणं गुणगुणत होता.
प्रकाशाचा उत्सव
Published on

बालोद्यान

एकनाथ आव्हाड

... सु...सुट्टी, शाळेला बुट्टी

अभ्यासाशी कट्टी, दिवाळीशी बट्टी” बाळू मस्त सुट्टीचं गाणं गुणगुणत होता.

“काय बाळकोबा, कसली कट्टी-बट्टी चाललीय?” त्याच्या ताईने त्याला हटकलंच.

“हॅ....हॅ... अगं तायडे गाणं म्हणतोय सुट्टीचं. शाळेला दिवाळीची सुट्टी लागली ना, मग आपसुकच सुट्टीचं गाणं आलं ओठावर. तुला सांगून ठेवतो तायडे, या दिवाळीच्या सुट्टीत ना मी खूप धमाल, मजा, मस्ती करणार. सुट्टीचा आनंद मनमुराद लुटणार.” बाळू उत्साहानं म्हणाला.

“हो रे बाबा, दिवाळीची सुट्टी म्हणजे मज्जा, नवे कपडे, फराळ, उटणं, आकाशकंदील, रोषणाई सारं ठाऊक आहे मला. पण आता तुझं हे सुट्टीपुराण बंद कर आणि या सुट्टीचा सदुपयोग करून घे. म्हणतात ना, ये छुट्टी ना आयेगी दोबारा....त्यापेक्षा तू असं का करत नाहीस... तू या दिवाळीच्या सुट्टीत ‘गणितं सोडवा झटपट’... या कोर्सला ॲडमिशन घे.”

ताईचं ऐकून बाळू म्हणाला, “नको नको. म्हणजे ताई, या कोर्सच्या नावाखाली सुट्टीतही अभ्यास एके अभ्यासच करायचा ना? कुठल्यातरी नावडत्या कोर्सला प्रवेश घेऊन अडकून पडल्यावर माझ्या सुट्टीचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहील का? तुला माहितीच असेल, तुझ्या आग्रहाखातर गेल्या दिवाळीच्या सुट्टीत मी नृत्याच्या क्लासला प्रवेश घेतला. त्याचं काय झालं, गाण्याच्या ठेक्यावर माझं अंग जरा वळलं तर शप्पथ. अगं, नृत्यातली एबीसीडी तरी ठाऊक झाली का मला? पैशापरी पैसा गेला आणि सुट्टीचा खेळखंडोबा झाला. पण तुझा आपला नेहमीचाच अट्टाहास. सुट्टीत हे शिक, नाहीतर ते शिक.”

“अरे, गणिताचा क्लास नको तर निदान गाण्याचा तरी क्लास लाव. कुणी सांगावं पुढे मोठा गायक होशील.”

“अगं ताई, गाणं शिकण्यासाठी आधी गाणं कळावं लागतं. सप्तसूर गळ्यात घुमावे लागतात. एखाद्या गोष्टीच्या मागे नुसते धाव म्हटलं तर धावून कसं चालेल मला? पार थकून जाईन मी.”

“अरे, गाणं शिकलास तर तूच टीव्हीवर चमकशील. तुझाच पुढे फायदा होईल?”

“अगं ताई, माझा फायदा कशात आहे ते सांगू तुला? मला ना गाणी, गोष्टी, कविता वाचायला खूप आवडतात. वाचनात माझं मन रमतं. वाचलेल्या गोष्टी रंगवून सांगायला तर मला खूपच आवडतं. अगं ‘कथाकथन’ ही सुद्धा एक कला आहे. व. पु. काळे, गिरिजा कीर, द. मा. मिरासदार, विजया वाड, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे हे सर्व कथाकथनकार लोकांना कथा सांगून किती आनंद द्यायचे. तुला आधीच सांगून ठेवतो ताई, या दिवाळीच्या सुट्टीत मी खूप खूप दिवाळी अंकही वाचणार. अगं, मी दिवाळीवर लिहिलेली ‘प्रकाशाचा उत्सव’ ही माझी कविता यावर्षीच्या ‘खेळगडी’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालीय. तू आहेस तरी कुठे. खरंच या दिवाळीच्या सुट्टीत मी फक्त याच आवडत्या गोष्टी करणार.”

“बरं ते जाऊ दे बाळू. तू असं कर, निदान फाडफाड इंग्रजी बोलायच्या क्लासला तरी जा.” ताईचा हेका काही सुटेना. तेव्हा बाळू म्हणाला, “खरं सांग ताई, तू माझ्यामागे सारखा एकच लकडा का लावतेस? हा क्लास लाव नाहीतर तो क्लास लाव. सुट्टीत मला कुठल्यातरी कोर्समध्ये का बरं अडकवतेस? कृपा करून कुठल्या तरी नावडत्या कोर्सला मला घालण्यापेक्षा एक काम करशील? माझी आपल्या घराजवळच्या सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक वर्गणी भरशील? मग बघ, मी छान छान गोष्टींची, कवितांची पुस्तकं वाचेन. दिवाळी अंक वाचेन, वाचलेलं तुम्हाला सांगत जाईन. वाचता-वाचता नवं काही सुचलेलं वहीत लिहीत जाईन. अगं ताई, पुस्तकांशी दोस्ती करायला मला फार आवडते. कालच एका पुस्तकात वाचलेल्या काही ओळी आजही माझ्या मनात रुंजी घालतात...

“जे अवघड आहे, ते सोप्पं करावं

जे सोप्पं आहे, ते सहज करावं

जे सहज आहे, ते सुंदर करावं

आणि जे सुंदर आहे, ते सतत करावं..

...ताई, वाचन हा सुद्धा एक सतत करावयाचा सुंदर संस्कार आहे ग. या दिवाळीच्या सुट्टीत मला छान-छान पुस्तकं वाचू दे. अग, वाचनात घालवलेला वेळ हा कधीच वाया जात नाही, असं आमच्या शाळेतल्या घारपुरेबाई नेहमी सांगत असतात. ‘दिवसामाजी नियमित वाचावे काही..’ असा सुविचार नुसता वहीत लिहायचा कशाला? बरं का ताई...

पुस्तक करतात माझ्यावरी, आईपरी माया

पुस्तकांसोबत जातो मी, जग फिराया...

सांग ना ताई, या दिवाळीच्या सुट्टीत भरशील ना माझी वाचनालयाची वर्गणी?”

ताई त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली, “हो रे बाबा. भरते वाचनालयाची वर्गणी. पण तुझी ‘खेळगडी’ दिवाळी अंकातील ‘प्रकाशाचा उत्सव’ ही कविता ऐकव बघू आधी.”

“अरे व्वा, माझी गुणाची ताई. आत्ता ऐकवतो माझी दीपावलीची कविता. ऐक हा...

दिवाळीच्या सुट्टीत, मज्जा येई भारी

प्रकाशाचा उत्सव, सजे घरोघरी

दारी तोरण लागे, आकाशकंदील डोले

अंगणातली रांगोळी, रंगात रंगूनी बोले

अभ्यंग स्नानाची तर, खास असे बात

साऱ्या अंगा येई, उटण्याचा सुवास

दिवाळीच्या फराळाला, अंगतपंगत बसे

गप्पा रंगत जाताना, घर गालात हसे

आम्ही किल्ले बांधतो, खेळ नवे खेळतो

दिवाळीचे बालअंक, मजेमजेत वाचतो

अशी ही दीपावली, आमच्या घरी येते

आनंदाचे इंद्रधनू, अलगद फुलवून जाते...

...ताई कशी वाटली कविता?”

“.... व्वा ..व्वा. सुंदर कविता कविराज.

प्रकाशाची अंधारावर मात

दिवाळीची हीच खरी बात...

दे टाळी..!”

दोघेही भाऊ-बहीण आनंदाने एकमेकांना टाळ्या देऊ लागले. त्यांच्या आनंदात घरही जणू आता आनंदून गेले होते. n

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

logo
marathi.freepressjournal.in