
रसास्वाद
सुकल्प कारंजेकर
एका माणसाने दुसऱ्या माणसाला गोष्ट सांगणं यातूनच मानवी संस्कृतीचा विकास झाला. गोष्टींमधून व्यक्तींचा समूह परस्परांशी जोडला गेला. गोष्टी आनंद देतात, तशा अंतर्मूखही करतात. कारण त्यात एक मूल्य असतं. अशा मूल्याधारित गोष्टींचा अनुभव प्रसाद कुमठेकर यांची कथा देते.
माणसं अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. गोष्टींशिवाय मात्र ते जगू शकतात,’ ती म्हणाली.
‘नाही, तू चुकते आहेस. माणसं गोष्टींशिवाय देखील जगू शकत नाहीत!’ तो विचारपूर्वक म्हणाला.
रस्किन बॉण्ड यांची ‘टोपाझ’ (Topaz) नावाची गोष्ट आहे. वर दिलेलं संभाषण हे या गोष्टीतील एका तुकड्याचा भावानुवाद आहे. गोष्टींचा विषय निघाला की या संभाषणाची आवर्जून आठवण येते. मानवी संस्कृतीच्या उदयापासून आजवरचा प्रवास हा विविध गोष्टींच्या आधारे झाला आहे. गोष्टींच्या आधारे माणसाने जग समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रभावी गोष्टींनीच माणसांना एकत्र आणलं आणि माणसांचा समाज घडवला. देवाबद्दलच्या, धर्माबद्दलच्या मानवी संकल्पना गोष्टींच्या आधारेच प्रसारित केल्या गेल्या. मूल्याधारित गोष्टींनी मानवी इतिहासाला नवी दिशा दिली. प्रसाद कुमठेकर यांच्या पुस्तकातील गोष्टी वाचतांना ‘टोपाझ’ मधील गोष्टींबद्दलचं संभाषण आठवलं. ‘…इत्तर गोष्टी’ हे प्रसाद यांचं चौथं पुस्तक.
याआधी त्यांची ‘बगळा’, ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’, आणि ‘अतीत कोण? मीच’.. ही पुस्तकं आली आहेत. या सगळ्या पुस्तकांमध्ये सुंदर वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. या गोष्टींचे विषय वेगवेगळे आहेत. मराठवाड्यातील छोट्याशा गावातील शाळकरी मुलाचं निरागस भावविश्व रंगवणारी गोष्ट (बगळा), किंवा मुंबईच्या धावपळीत धडपडणाऱ्या सामान्य माणसांच्या गोष्टी, कोरोनाकाळाच्या गोष्टी, पर्यावरणाच्या ह्रासापासून ते मराठी भाषेचं मूळ शोधण्याच्या गोष्टी (अतीत कोण? मीच) यात आहेत. तसेच मराठवाड्यातील गावातील लोकांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट घटनांची एका कुटूंबाच्या केंद्रबिंदूपासून ते समग्र समाजजीवनाच्या परिघापर्यंत आडवा छेद घेणाऱ्या बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या आहेत.
‘…इत्तर गोष्टीं’ हा दहा वैविध्यपूर्ण गोष्टींचा संग्रह आहे. यात गावातील सरंजामी एकत्र कुटुंबपद्धतीच्या वर्तमान आणि भवितव्याचा वेध घेणारी ‘आडगावचे पांडे’ आहे, रशियाची स्कायलॅब पडण्याच्या पार्श्वभूमीवर छोटंसं गाव ‘जगबुडी’ ला सामोरं जायला कसं तयार होतं याची गमतीदार पण भेदक कहाणी ‘आस्मानी, सुल्तानी हौर गाढवलाला’ आहे. नोकरीमधील ताणतणाव, असह्य घुटमट, अगदी सेवानिवृत्तीनंतरही वाट्याला येणारा मन:स्ताप यांचं चित्रण करणारी ‘इन्सलटेड सेल्स’ आहे. साखरपुडा, लग्नाची चाहूल, लग्नातील मानापमान आणि हनिमूनचं ‘प्रेशर’ यावरील गमतीदार पण नकळत महत्त्वाचं सामाजिक भाष्य करणाऱ्या ‘जमवाजमव’, ‘जुते दो पैसे लो’, ‘फळशोभन’, ‘माचो, ये तो बडा टॉइंग है!’ आहेत. गावातल्या परप्रांतीय तरुण जोडप्यातील महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्यावर ढवळून निघणाऱ्या समाजजीवनाचं भेदक वर्णन करणारी ‘हॅमरशिया…’ आहे.
या गोष्टी आनंद देणाऱ्या आहेत, अस्वस्थ करणाऱ्या देखील आहेत. हसवता हसवता अंतर्मुख करणाऱ्या आहेत. या गोष्टी एकाच ‘साच्यातील’ नाहीत तर त्यात मांडणीचे कल्पक प्रयोग आहेत. उदाहरणार्थ, ‘हॅमरशिया’ गोष्टीत सुरुवातीला उपसंहार आणि नंतर उपोद्घात असा उलटा क्रम आहे. असाच एक साहित्यक्षेत्रातील वैचारिक आणि ललित लेखनाचे सांधे जोडणारा विलक्षण प्रयोग एका गोष्टीत केला आहे. या कल्पक प्रयोगाची विशेष दखल घेणं आवश्यक आहे.
‘इत्तर गोष्टी’ पुस्तकाची सुरुवात होते ‘क्ष’ च्या गोष्टीने. या गोष्टीचा पट खूप व्यापक आहे. माणसाला लाखो वर्षांपूर्वी आगीचा शोध लागला तिथून सुरुवात करत ते आजपर्यंतचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनाक्रम या गोष्टीत येतो. ही कल्पित गोष्ट असली तरी यात दिलेला घटनाक्रम हा वास्तवावर आधारित आहे आणि तो अचूक असण्याची काळजी लेखकाने घेतल्याचं जाणवतं. उदाहरणार्थ, यात हिमयुगांच्या काळात बदललेल्या भूगोलाचं किंवा जीनमधील म्युटेशनमुळे मानवी सवयींमध्ये घडलेल्या बदलांचं सहज चित्रण येतं. हे खरे तर शास्त्रीय शोधप्रबंधांचे किंवा विज्ञानकथांचे विषय आहेत. ‘क्ष’ च्या गोष्टीत मात्र साध्या, कल्पक गोष्टीरूपात हे सगळे संदर्भ येतात. अशा प्रकारची गोष्ट रचण्याचा प्रयोग इंग्रजीत कोणी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठीत मात्र अशी गोष्ट अद्वितीय ठरते यात शंका नाही. याबद्दल विचार करताना उत्पल व. बा. यांनी चार्ल्स डार्विनच्या जयंती निमित्ताने लिहिलेल्या लेखाची आठवण येते. या लेखाचं शीर्षक होतं, “उत्क्रांतीच्या ‘सांस्कृतिक राजकारणा’ची गरज’’. जग समजून घेण्यासाठी उत्क्रांतीचा सिद्धांत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. परंतु धार्मिक श्रद्धेच्या अडथळ्यांमुळे किंवा या विषयावरील वैचारिक पुस्तकं समजण्यास अवघड असल्यामुळे सामान्य माणसं या ज्ञानापासून दूर राहतात. सामान्य माणसांपर्यंत उत्क्रांतीसारखे महत्त्वाचे विषय पोहोचवण्यासाठी सुंदर छोट्या गोष्टी, इतर सृजनशील माध्यमांचा कल्पक वापर होणं गरजेचं आहे, हा मुद्दा उत्पल यांनी या लेखात मांडला होता. ‘रंजनमूल्य’ असलेल्या माध्यमातून कलात्मक पद्धतीने ज्ञानाचा प्रसार करण्याची जी अपेक्षा लेखात व्यक्त केली आहे त्याचं उत्तम उदाहरण ‘क्ष’ च्या गोष्टीत सापडतं. उत्क्रांती, समग्र जागतिक इतिहास हे मुख्यत्वे गंभीर वैचारिक पुस्तकांचे विषय आहेत. इथे मानवप्रजातीचा समग्र इतिहास मांडणाऱ्या नंदा खरे यांच्या ‘कहाणी मानवप्राण्याची’ या सुंदर पुस्तकाची आठवण येते. पण अशा पुस्तकांचा वाचकवर्ग मर्यादित असतो. सर्वसामान्य लोकांना ज्ञानसमृद्ध वैचारिक पुस्तकांची भीती वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रसार करण्याचा दुसरा मार्ग शोधणं गरजेचं ठरतं. ‘क्ष’ च्या छोट्याशा गोष्टीत अनेक महत्त्वाचे सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्रीय, तसेच सांस्कृतिक इतिहासाचे संदर्भ दिले आहेत. नुसता व्यापक घटनाक्रम दिलेला नाही, तर त्यावर ठिकठिकाणी सहज, सटीक शब्दात केलेलं भाष्य देखील आहे. सामाजिक, राजकीय, स्त्री-पुरुष विषमतेची बीजं ‘क्ष’ च्या गोष्टीत दिसतात. ‘क्ष’ ची गोष्ट ज्ञानसमृद्ध आहे, तशीच ती उत्तम ललित कलाकृती देखील आहे. ‘क्ष’ सारख्या गोष्टी भाषेच्या पाठ्यपुस्तकात असतील तर विज्ञान, इतिहास आणि भाषा हे विषय वेगवेगळ्या काटेकोर चौकटीत बंदिस्त होणार नाहीत. शालेय शिक्षणात विविध विषयांचे तास आणि शिक्षक वेगळे असतात. वास्तवात मात्र ज्ञानाचं असं सरळसोट विभाजन करता येत नाही. ज्ञानसमृद्ध परंतु रंजक अशा कल्पक गोष्टी शालेय विषयांचे सांधे जोडण्याचं महत्वाचं काम करू शकतात. सुंदर, बोलीभाषेत, सृजनात्मक पद्धतीने विज्ञान किंवा जागतिक इतिहास शिकवता आला तर? अशी छान संकल्पना आणि शक्यता यातून सामोरी येते. सद्यस्थितीत साहित्यविश्वात एकीकडे वैचारिक पुस्तकं आणि दुसरीकडे ललित पुस्तकं असं ठळक विभाजन आहे. ही पुस्तकं लिहिणारे लेखकही वेगवेगळे आहेत. यामागचं कारण असं की, बऱ्याचदा ललित लेखकांचा विज्ञानाचा किंवा जागतिक इतिहासाचा अभ्यास कमी पडतो. दुसरीकडे अभ्यास करून वैचारिक लिखाण करणारे लेखक सर्जनशील, कल्पक पद्धतीने विषय मांडण्यात किंवा विषयाचं गोष्टीच्या स्वरूपात चित्रण करण्यात कमी पडतात. वैचारिक लेखनाचे विषय ललित पद्धतीने हाताळणं हे आव्हानात्मक काम आहे. कारण अशी मांडणी कृत्रिम न वाटता सहजपणे जमायला हवी. कथा, कादंबऱ्यांमधून वेगळे विषय सहजपणे हाताळण्याचं धाडस आणि कौशल्य खूप कमी लेखकांजवळ आहे. त्यामुळेच असे प्रयोग महत्त्वपूर्ण ठरतात.
‘..इत्तर गोष्टींची’ या पुस्तकाची अर्पणपत्रिका ‘न पकडता उचलता आलेल्या गोष्टींना’ समर्पित आहे. ज्ञानाला, वास्तवाला सहजपणे कवेत घेऊ शकतील अशा गोष्टी घडवणं सोपं नक्कीच नाही. हिमयुगांमध्ये नवे प्रांत शोधणाऱ्या, गुहांमधील भिंतींवर चित्र रेखाटणाऱ्या, शेतीचा-पशुपालनाचा शोध लावणाऱ्या अज्ञात मानवांच्या, जीनमधील म्युटेशन्समुळे सवयींमध्ये बदल घडण्याच्या, जागतिक तापमानवाढीमुळे बदलत्या जगाच्या, होलोसीन महाविनाशाच्या अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचे विषय केवळ रुक्ष शोधप्रबंधांच्या चौकटीत अडकले जाणं योग्य नाही. त्यांना कल्पक रूप देणाऱ्या लेखनाची आज गरज आहे. ‘क्ष’ ची गोष्ट आज एकमेव ठरली तरी उद्या अशा अनेक नव्या सुंदर गोष्टी जन्माला याव्यात, ‘..इत्तर गोष्टीं’ प्रमाणे इतरही समृद्ध गोष्टींचा घमघमाट साहित्यक्षेत्रात पसरावा, अशी आशा आहे.
लेखक, साहित्याचे अभ्यासक.