

समाजचिंतन
जगदीश काबरे
विवेकाचा पुरस्कार करणाऱ्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या विचारांची चिकित्सा करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पुरोगामी चळवळींची ताकद ही प्रश्न विचारण्यात, प्रस्थापित समजुतींना आव्हान देण्यात आणि चिकित्सक विचार करण्यात असते. मतभेद असणे ही समस्या नाही; पण मतभेदांपलीकडे जाऊन संवाद टिकवता न येणे, हीच समस्या.
चार पुरोगामी एकत्र आले की चार दिवसही एकत्र राहू शकत नाहीत; मात्र अंधानुयायी वर्षानुवर्षे एकजूट दाखवू शकतात, असे उपहासाने म्हटले जाते. या विधानात अतिशयोक्ती असली, तरी त्यामागे एक गंभीर सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रश्न दडलेला आहे. विवेक, विज्ञाननिष्ठा, समता, स्वातंत्र्य आणि चिकित्सक विचारांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी विधायक संवाद साधणे इतके कठीण का व्हावे? ज्या चळवळी समाजातील अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीयता आणि विषमता नष्ट करण्यासाठी उभ्या राहतात, त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक असहिष्णुता, व्यक्तिकेंद्रित संघर्ष आणि परस्परांविषयी अविश्वास निर्माण होत असेल, तर तो गंभीर आत्मपरीक्षणाचा विषय आहे असे नाही वाटत?
या समस्येच्या मुळाशी असलेला एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय घटक म्हणजे वैचारिक अहंकार आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेविषयी असलेली अवास्तव खात्री. एखाद्या व्यक्तीने भरपूर वाचन केलेले असते, विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास केलेला असतो किंवा अनेक वर्षे सामाजिक चळवळीत काम केलेले असते. त्यामुळे तिच्याकडे निश्चितच ज्ञान आणि अनुभव जमा झालेला असतो. परंतु ज्ञानसंपन्न असणे आणि आपले ज्ञान अंतिम सत्य असल्याचा समज करून घेणे, या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्यापेक्षा वेगळे मत मांडणारी व्यक्ती अज्ञानीच असली पाहिजे, असा समज निर्माण झाला की संवादाची जागा विसंवाद घेतो. त्यानंतर सत्याचा शोध घेण्याऐवजी स्वतःचे बौद्धिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होते. अशा वेळी समोरच्याचा युक्तिवाद समजून घेण्यापेक्षा त्यातील एखादी त्रुटी शोधून त्याला नामोहरम करण्यात अधिक समाधान मिळते.
मानसशास्त्रात याचा संबंध पुष्टीकरण पूर्वग्रहाशी जोडता येतो. माणूस अनेकदा आपल्या आधीपासून असलेल्या मतांना अनुकूल असलेली माहिती सहज स्वीकारतो; परंतु विरोधी पुराव्यांची अधिक कठोर छाननी करतो. विशेष म्हणजे हा पूर्वग्रह केवळ अशिक्षित किंवा अंधश्रद्धाळू व्यक्तींमध्येच आढळतो असे नाही. उच्चशिक्षित आणि बुद्धिमान व्यक्तीसुद्धा आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग स्वतःचे चुकीचे मत समर्थनीय ठरवण्यासाठी करतात. थोडक्यात, चिकित्सक विचारांचा पुरस्कार करणे आणि स्वतःच्या विचारांची चिकित्सा करण्याची तयारी असणे, यात महदंतर असते. यातूनच चर्चेचे वितंडवादात रूपांतर होण्यास सुरुवात होते. चर्चेचा उद्देश एखाद्या प्रश्नाचे विविध पैलू समजून घेणे आणि शक्य असल्यास अधिक विश्वसनीय निष्कर्षापर्यंत पोहोचणे हा असतो. वितंडवादाचा उद्देश मात्र समोरच्याचे म्हणणे कोणत्याही परिस्थितीत खोडून काढणे हा असतो. एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या विचाराचा एकंदर आशय लक्षात न घेता त्यातील एखादा शब्द पकडणे, त्याचा संदर्भ बदलणे आणि त्यावरून संपूर्ण विचारच चुकीचा ठरवणे, ही अशा वितंडवादाची वैशिष्ट्ये असतात. शब्दांच्या नेमकेपणाला महत्त्व असले पाहिजे. त्याचबरोबर शब्दांच्या चिकित्सेचा उपयोग विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी झाला पाहिजे, विचार मांडणाऱ्याला अपमानित करण्यासाठी नव्हे. शब्दांच्या व्याख्यांवरील वादामुळे मूळ सामाजिक प्रश्नच बाजूला पडत असेल, तर ती बौद्धिक चिकित्सा न राहता ते बौद्धिक मैथुन ठरते.
दुसरे असे की, या वर्तनामागे सामाजिक प्रतिष्ठेची स्पर्धाही कधीकधी कार्यरत असते. एखाद्या चर्चेत आपल्यापेक्षा दुसऱ्याचे म्हणणे अधिक योग्य असल्याचे मान्य करणे म्हणजे आपली प्रतिष्ठा कमी होणे, अशी काही व्यक्तींची धारणा असते. त्यामुळे सार्वजनिक चर्चेत त्यांना आपली चूक मान्य करणे अधिक कठीण जाते. इतरांसमोर पराभूत झाल्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून या व्यक्ती आपल्या मूळ भूमिकेचे समर्थन करत राहतात. अशा वेळी चर्चा सत्य आणि असत्य यांच्यातील संघर्ष न राहता दोन व्यक्तींच्या प्रतिष्ठेचा संघर्ष बनते. एखाद्या मुद्द्यावर झालेला मतभेद हळूहळू वैयक्तिक संघर्षात परिवर्तित होतो. कालपर्यंत एकत्र काम करणारे सहकारी एकमेकांच्या हेतूंविषयी संशय घेऊ लागतात. परिणामी वैचारिक मतभेदांचे रूपांतर मनभेदात होते. याचा अर्थ स्वतःच्या विचारांबद्दल ठाम भूमिका घेऊ नये असा नाही. उलट, आपली भूमिका ठामपणे मांडतानाच तिच्यातील संभाव्य त्रुटी स्वीकारण्याची तयारी ठेवणे, हेच खऱ्या विवेकनिष्ठेचे लक्षण आहे.
या प्रश्नाला आणखी एक सामाजिक पैलू आहे. पुरोगामी विचारसरणीमध्ये स्वातंत्र्य, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक न्याय आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांसारख्या विविध मूल्यांना महत्त्व दिले जाते. परंतु या मूल्यांचा परस्परांशी संबंध कसा असावा, कोणत्या प्रश्नाला प्राधान्य द्यावे आणि सामाजिक परिवर्तनाची कोणती पद्धत स्वीकारावी, याविषयी मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे. मात्र आपल्या भूमिकेशी असहमती दर्शवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वैचारिक प्रामाणिकपणावरच संशय घेतला जाऊ लागला, तर संघटनात्मक ऐक्य टिकवणे कठीण होते. एखाद्या संघटनेतील सदस्यांची दीर्घकालीन एकजूट ही त्यांच्या विचारांच्या सत्यतेचा किंवा बौद्धिक गुणवत्तेचा पुरावा नसते. सामूहिक ओळख, नेतृत्वावरील निष्ठा, संघटनात्मक शिस्त, सामाजिक दबाव आणि समान उद्दिष्टे यामुळेही एकजूट निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे मतभेद असणे हे पुरोगामी चळवळीचे अपयश मानता येत नाही. लोकशाहीवादी संघटनेमध्ये मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असणे आवश्यकच आहे. *खरा प्रश्न मतभेदांचा नसून, मतभेदांचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेचा आहे. पण सामाजिक परिवर्तनाचे व्यापक उद्दिष्ट बाजूला पडून व्यक्तिगत प्रतिष्ठेचे संघर्षच केंद्रस्थानी येत असतील, तर त्याची मोठी किंमत चळवळीला मोजावी लागते.* कार्यकर्त्यांची ऊर्जा समाजातील समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी अंतर्गत आरोप-प्रत्यारोपांत खर्च होते. नवीन कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होतो. त्यामुळे काही नवागत तरुणांना चळवळीत सामील होण्यापेक्षा तिच्यापासून दूर राहणे सोयीचे वाटू लागते. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करण्यासाठी आवश्यक असलेला परस्परविश्वास कमी होतो. परिणामी वैचारिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींचा समूहदेखील सामूहिक कृती करण्यात अयशस्वी ठरू शकतो.
पुरोगामी असणे म्हणजे केवळ पुरोगामी विचार मांडणे नव्हे, तर त्या विचारांशी सुसंगत आचरण करणे होय. इतरांच्या अंधश्रद्धेची चिकित्सा करणाऱ्यांनी स्वतःच्या वैचारिक अहंकाराचीही चिकित्सा केली पाहिजे. इतरांकडून सहिष्णुतेची अपेक्षा करणाऱ्यांनी मतभिन्नतेचा आदर केला पाहिजे. विवेकाचा पुरस्कार करणाऱ्यांनी आपल्या निष्कर्षांनाही विवेकाच्या कसोटीवर तपासण्याची तयारी ठेवली पाहिजे. भारतातील राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाचे परिणाम अनेक ऐतिहासिक, आर्थिक, संस्थात्मक आणि सांस्कृतिक घटकांवर अवलंबून असतात. मात्र एक गोष्ट निश्चित म्हणता येईल की, ज्या संघटनेला अंतर्गत मतभेद विधायक पद्धतीने हाताळता येत नाहीत, तिच्या सामूहिक कार्यक्षमतेवर मर्यादा येतात. म्हणून *पुरोगाम्यांनी चिकित्सा करताना स्वतःला एक मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे; तो म्हणजे आपल्याला आपली विद्वत्ता दाखवायची आहे की आपल्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी करायचा आहे? आपलेच म्हणणे खरे करण्याच्या प्रयत्नात सामूहिक उद्दिष्टच हरवत असेल, तर त्या बौद्धिक विजयाला अर्थ उरत नाही. विचारांची चिकित्सा ही पुरोगामित्वाची शक्ती आहे; परंतु चिकित्सेच्या नावाखाली अट्टाहासाने आपलाच मुद्दा रेटणे मात्र चळवळीला मारक ठरू शकतो हे लक्षात ठेवलेले बरे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com