हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
आपले आयुष्य म्हणजे निर्णयांची साखळी असते. प्रत्येक घेतलेला आणि न घेतलेला निर्णय आपल्या आयुष्याच्या जडणघडणीवर प्रभाव टाकत असतो. व्यक्तीच्या निर्णयावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक दबाव असतात. या दबावांमधून मुक्त होत स्वत:च्या मनाने विचारपूर्वक निर्णय घेणे, यासाठी आपल्या भावनिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे.
कधी आपण क्षणभर थांबून विचार केला आहे का? आपले जीवन नेमके कोण घडवते? आपल्याभोवती असलेली माणसे, परिस्थिती की आपण घेतलेले निर्णय?
या जगात प्रत्येक क्षणी कोणी ना कोणीतरी आपल्या विचारांवर, भावनांवर किंवा कृतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा परिस्थितीत स्वतःचे निर्णय स्वतः घेणे हे केवळ स्वातंत्र्याचे नव्हे, तर आत्मसशक्तीकरणाचे प्रतीक ठरते. दररोज सामाजिक माध्यमं, मित्रपरिवार, कुटुंब, समाज यांच्याकडून आपल्यावर सल्ले, शिफारशी या रूपाने सूक्ष्म सांस्कृतिक दबाव प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या येत असतो. या सगळ्यांत आपण घेतलेले निर्णय अनेकदा आपल्या वास्तविक इच्छा आणि गरजांपेक्षा बाह्य प्रभावांचेच प्रतिबिंब ठरतात.
मात्र स्वतःचे निर्णय जाणीवपूर्वक घेणे म्हणजे आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच्या हातात घेण्याचे सामर्थ्य दाखवणे होय. हा मूलभूत विचार आपल्याला आत्मनिर्णय आणि व्यक्तिगत विकासाच्या क्षेत्रात पुढे घेऊन जातो. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ स्टीफन कोव्ही म्हणतात, “मी माझ्या परिस्थितीचा नव्हे, तर माझ्या निर्णयांचा परिणाम आहे.” म्हणजेच मी परिस्थितीमुळे नव्हे, तर माझ्या निर्णयांमुळे घडलो आहे, असे ते सांगतात.
निर्णय घेण्याची भीती का वाटते?
अनेक कारणांमुळे आपण निर्णय घेण्यास घाबरतो, टाळतो किंवा पुढे ढकलतो. बालपणापासूनच आपल्याला स्वतः निर्णय घेण्याच्या संधी कमी मिळतात. अनेकदा पालकच मुलांसाठी सर्व काही ठरवतात - काय घालायचे, काय खायचे, काय शिकायचे, कधी झोपायचे, कधी उठायचे. परिणामी, स्वतः निर्णय घेण्याची गरज त्यांना जाणवत नाही. स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय लागत नाही. पुढे मोठेपणी मित्र, जोडीदार, सहकारी किंवा नातेवाईक यांच्या अपेक्षांनुसार निर्णय घेण्याची सवय लागते. मोठे झाल्यावरही आपल्या क्षमतेवर, निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आवाज सतत आपल्या परिघात असतात. कधी सासू आपल्या पालकत्वाच्या निर्णयावर टीका करते, तर कधी कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचा नीट विचार न करता टीका केली जाते. अशा अनुभवांची सवय होत गेल्यावर शंकेची बीजे मनात रुजतात आणि आत्मविश्वास ढासळू लागतो. अनेकजण बाह्य मान्यतेवर अवलंबून राहतात आणि आपल्या आयुष्याचे नियंत्रण इतरांच्या हातात देतात.
खरे तर, आपण लहानपणापासूनच शिकतो की, आपण घेतलेला निर्णय शंकास्पद आहे, बाहेरच्यांचे मत अधिक योग्य आहे. ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती आणि कमी आत्मविश्वास यामुळे अपराधीपणा आणि लाज वाटण्याची प्रवृत्ती अधिक वाढते. अपराधीपणा कधी कधी योग्य दिशा दाखवतो; पण तोच लाजेत बदलल्याने स्वतःवरील विश्वास खिळखिळा होतो. अशा वेळी आपण अंतर्मनाचा आवाज दाबतो आणि दुसऱ्यांचा सल्ला घेतो, पण नंतर पश्चात्ताप करतो.
तुम्हाला वाटत असते की योग्य निर्णय घेण्याचा विवेक अजून तुमच्यात आलेला नाही. पण विचार करा जेव्हा तुम्ही इतरांचे निर्णय मान्य करता, तेव्हाही अंतिम निर्णय तुमचाच असतो. कोणावर किती विश्वास ठेवायचा, हे निवडणे ही तुमचीच जबाबदारी आहे. म्हणून दुसऱ्यांनी सुचवलेली प्रत्येक गोष्ट तपासा, ती तुमच्या वास्तवाशी किंवा तर्कांशी पडताळा. जरी इतरांना पसंत नसले तरी जे तुम्हाला योग्य वाटते तेच करा. बालपणी हे करण्याची मुभा नव्हती, पण आता प्रौढ म्हणून ती मुभा तुम्हाला आहे.
जीवन म्हणजे निर्णयांची अखंड शृंखला
आपले जीवन दिवसाच्या प्रत्येक क्षणी घेतलेल्या निर्णयांनी विणलेले असते. काही निर्णय साधे असतात. उदा. आज कोणते कपडे घालायचे, काय खायचे. पण लग्न, करिअर, व्यवसाय यांसारखे निर्णय पूर्ण आयुष्यभर आपलं जगणं घट्ट धरून ठेवतात आणि त्याचे बरे-वाईट परिणाम भोगावे लागतात. आपण घेतलेला प्रत्येक निर्णय, कितीही छोटा असो, आपल्या भविष्याचा इतिहास घडवत असतो.
एकीकडे निर्णय घेण्याचे आपले स्वातंत्र्य जपणे महत्त्वाचे असले, तरी त्याच्या मर्यादाही ओळखायला हव्यात. आपण जगातील सर्व काही ठरवू शकत नाही आणि तसे करण्याचा अधिकारही आपल्याला नसतो. इतरांचे अधिकार आणि त्यांचे निर्णय आपण मान्य केलेच पाहिजेत. पण आपले नाते, आपला वेळ, आपले शरीर, आपले आरोग्य आणि आपली जीवनदिशा या गोष्टींबाबत निर्णय घेणे हा ज्याचा त्याचा स्वाभाविक व वैयक्तिक हक्क आहे.
भावनांचा अदृश्य प्रवाह
निर्णयप्रक्रियेचा पाया तर्कात असला तरी अंतिम क्षणी त्यावर भावनांचाही मोठा प्रभाव पडत असतो. जागृत जाणिवेतल्या तसेच अचेतनात दडलेल्या भावना आपल्या निवडींवर अगदी अलगद गूढ प्रभाव टाकत असतात. भीती आपल्याला धोक्यांपासून दूर नेऊ शकते, तर अचानक आलेला उत्साह धाडसी पावले उचलण्यास भाग पाडू शकतो. हे स्वभावत: चुकीचे नसते. कारण भावना आपल्याला खऱ्या गरजांचे इशारे देतात. परिणामी आपण ‘आपल्यासाठी खरे महत्त्वाचे काय’ याकडे लक्ष देतो. पण भावनांवर अति अवलंबून राहिल्यास दिशाभूल होऊ शकते. भावनांच्या या अदृश्य प्रवाहाची जाणीव नसल्यास, निर्णयांची दृष्टी धूसर होते आणि अनपेक्षित परिणामांची सावली जीवनावर उमटू शकते.
आपण निर्णय घेतो तेव्हा मेंदू उपलब्ध माहितीचे विश्लेषण करतो. मानसशास्त्रानुसार दोन विचारप्रणाली कार्यरत असतात. एक विचारप्रणाली वेगवान, स्वयंस्फूर्त आणि भावनांवर आधारित असते. उदा. आज कोणते कपडे घालायचे, जेवणात काय करायचे या दैनंदिन निर्णयांसाठी ती उपयुक्त ठरते; तर दुसरी विचारप्रणाली सावध, विश्लेषणात्मक, तर्कशुद्ध आणि धीमी असते. उदा. आर्थिक नियोजन कसे करावयाचे, करिअरविषयक मोठे निर्णय कसे आखायचे, या गुंतागुंतीच्या निर्णयांसाठी ती मदत करते.
दोन्ही विचारप्रणाली आवश्यक आहेत. तरीही त्यांच्यात अनुभूतीचा किंवा संज्ञानात्मक पक्षपातीपणा (cognitive biases) असतोच. हे असे मानसिक शॉर्टकट असतात, जे आपल्याला नकळत चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. त्यांपैकी काही सामान्य वैचारिक पक्षपात आपण सर्वांनी अनुभवलेले आहेत आणि पस्तावलो आहोत. आपल्याच मतांना पोषक माहितीला जास्त महत्त्व देणे, खोलवर विचार न करता सहज आठवणीत येणाऱ्या उदाहरणांवर निर्णय घेणे, ‘हे तर आधीच माहिती होते’ असे नंतर वाटणे, यामुळे हुशार व्यक्तीसुद्धा कधी कधी चुकीचा निर्णय घेऊ शकते.
फोर्ब्समध्ये ख्रिस्टीन कोमाफोर्ड सांगतात की, अत्यंत बुद्धिमान व्यक्तीसुद्धा तणावाच्या परिस्थितीत भावनिक सापळ्यात अडकू शकते. जेव्हा परिस्थिती गंभीर असते, तेव्हा मेंदूतील ‘लिंबिक प्रणाली’ आपल्या भावनात्मक प्रतिसादांचे नियोजन करताना आपल्या तर्कबुद्धीवर मात करते. त्या क्षणी घेतलेले निर्णय योग्य वाटतात, पण नंतर त्यांचे दुष्परिणाम जखमा देतात.
जेव्हा आपल्यासमोर सारखेच आकर्षक वाटणारे पर्याय असतात, तेव्हा तर निर्णय अधिक गुंतागुंतीचा होतो. अशावेळी अंतर्ज्ञान आणि तर्क या दोन्हींचा समतोल आवश्यक असतो. मात्र, अबोध मनात दडलेले पूर्वग्रह आणि नजरेआड राहिलेले पैलू कधी कधी निर्णय घेताना दिशाभूल करतात. त्यामुळे आपण निर्णय का घेतला किंवा त्यामागील प्रक्रिया नेमकी कशी होती, हे समजणे नेहमीच सोपे नसते. बऱ्याचदा निर्णय चुकू शकतात. पण त्यांना स्वीकारणे आणि सोडून देणे, हाच पुढील सुधारणेचा मार्ग असतो.
चांगले निर्णय घेण्यासाठी
निर्णय घेण्याआधी आवश्यक तितकी उपलब्ध माहिती गोळा करा.
फायदे-तोटे शांतपणे विचारात घ्या.
आवश्यक तेव्हा सल्लामसलत करा.
महत्त्वाच्या निर्णयांवर घाई न करता स्वतःला पुरेसा वेळ द्या.
हे उपाय साधे असले तरी ते घाईत घेतलेले निर्णय टाळण्यास मदत करतात.
आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. त्यामुळे विधायक निवड करण्याची क्षमता वाढते.
निर्णय घेण्याची शक्ती म्हणजे व्यक्तीचे खरे सामर्थ्य आहे. बरेच लोक निर्णय घेण्याचे धाडस करत नाहीत, कारण त्यांना ‘बरोबर किंवा अचूक निर्णय’ हवा असतो. धोका पत्करायचा नसतो आणि मग ते ‘कोणताच निर्णय’ घेत नाहीत. पण जीवन खूप छोटे आहे. जे खरेच महत्त्वाचे आहे ते करा; स्वप्नांच्या मागे जाण्याचे धैर्य ठेवा आणि निर्णय घ्या.
निवडींचा अतिरेक
जीवनात अनेकदा एकच एक ‘बरोबर निर्णय नसतो. पर्यायांची रेलचेल असेल, तर संभ्रम वाढू शकतो आणि घेतलेल्या निर्णयाबद्दलचे समाधान कमी होत जाते. कधी कधी आपण स्वतःलाच दोषी ठरवतो, पण प्रत्यक्षात आपण ‘निवडींचा अतिरेक’ (choice overload) या अवस्थेमधून जात असतो. म्हणून निवडी साध्या ठेवा, पुढे चालत रहा आणि न निवडलेल्या मार्गांबद्दल स्वतःला दोष देऊ नका.
निर्णय घेणे हा तणावपूर्ण अनुभव असू शकतो. तरीही निर्णयावर ठाम राहणे तितकेच आवश्यक असते. भीती, असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव हे सर्व निर्णयप्रक्रियेचा स्वाभाविक भाग आहेत, हे स्वीकारावे लागते. पण आत्मविश्वासाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्राप्त करणे शक्य आहे. निर्णय घेण्याची कला जन्मजात नसते. पण ती सजगतेने विकसित करता येते.
ज्येष्ठ मनोचिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता