विषारी वर्तनाचे मानसशास्त्र

मानसिक अस्वास्थ्यामागील अनेक कारणांमध्ये विषारी नातेसंबंध हे एक महत्त्वाचे कारण आहे. हे नातेसंबंध व्यावसायिक असतात, तसेच ते कौटुंबिकही असतात. या विषारी नातेसंबंधांचे विष व्यक्तीला हळूहळू आतून पोखरू लागते. भावनिक ऊर्जा शोषणाऱ्या या नातेसंबंधांमधून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असते.
विषारी वर्तनाचे मानसशास्त्र
Published on

हितगुज

डॉ. शुभांगी पारकर

मानसिक अस्वास्थ्यामागील अनेक कारणांमध्ये विषारी नातेसंबंध हे एक महत्त्वाचे कारण आहे. हे नातेसंबंध व्यावसायिक असतात, तसेच ते कौटुंबिकही असतात. या विषारी नातेसंबंधांचे विष व्यक्तीला हळूहळू आतून पोखरू लागते. भावनिक ऊर्जा शोषणाऱ्या या नातेसंबंधांमधून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असते.

नातेसंबंध हे मानवी अनुभवातील सर्वात निर्णायक आधारस्तंभ आहेत. प्रेमसंबंध असोत, कौटुंबिक संबंध असोत, व्यावसायिक संबंध असोत किंवा मैत्री असो, इतरांशी असलेले आपले संबंध आपल्या जीवनाला अर्थ आणि उद्देश देतात. प्रेम, आधार, सन्मान आणि सुरक्षितता या सर्व गोष्टी आपण याच मानवी नात्यांतून शोधतो. घट्ट, आधार देणारे सामाजिक नातेसंबंध केवळ भावनिक समाधान देत नाहीत, तर ते आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात आणि आयुर्मान वाढवतात. मनोवैज्ञानिक संशोधनात स्पष्ट झाले आहे की विषारी नातेसंबंध ताण वाढवतात आणि मानसिक आरोग्य बिघडवतात; तर निरोगी, आधार देणारी नाती चिंता आणि तणावजन्य रोग कमी करण्यात मदत करतात. ताण, चिंता किंवा नैराश्य यांसारख्या मानसिक समस्यांविरुद्ध कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजाचा भावनिक आधार अनेकदा व्यावसायिक उपचारांपेक्षा अधिक संरक्षण देतो.

विषारी आक्रमक सावली

परंतु काही नाती अशी असतात की, ती आतून पोखरू लागतात. चेहरे परिचित असतात, संवादात मिठास असते, तरी पृष्ठभागाखाली अदृश्य विषाची धार झिरपत असते. ती ज्याची त्याला जाणवत असते. ज्या नात्यातून तुम्हाला प्रसन्नता वाटत नाही, आत्मसन्मान खच्ची होतो, ते नाते हळूहळू विषारी आणि विकृत बनते.

खेळाच्या मैदानापासून बोर्डरूमपर्यंत आणि अगदी घराच्या चार भिंतींमध्येही अशा नात्यांचे अस्तित्व आढळू शकते. सर्वाधिक वेदना तेव्हा होते, जेव्हा विषारी डंख प्रियजनातीलच कोणाकडून अनुभवावा लागतो. त्यांचे वर्तन हळूहळू मनाच्या गाभ्यात शिरते आणि आपल्याच भावनांवर शंका निर्माण करायला लावते. म्हणूनच आजच्या गुंतागुंतीच्या समाजजीवनात विषारी वर्तन ओळखणे आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे हे मानसिक आरोग्याचे अत्यावश्यक भान ठरते.

प्रत्येक नात्यात मतभेद आणि किंतु असतात. अधूनमधून चिडल्याने किंवा चुका दाखवण्याने कुणी विषारी होत नाही, पण तेच वर्तन निरंतर अपमान, अवहेलना आणि नियंत्रणासाठी वापरले गेले तर ते थेट भावनिक छळात परिवर्तित होते. मनावर अदृश्य ओरखडे उमटतात आणि भावनिक ऊर्जा शोषली जाते. अशा व्यक्तींच्या परिघात राहणे म्हणजे दररोज चालणारी अस्तित्वाची एक अदृश्य लढाई ठरते. त्यांच्या शब्दांनी, नजरेने किंवा कधी मौनानेही दुसऱ्याच्या मनाची शांतता हिरावली जाते. आत्मविश्वास ढासळू लागतो आणि ‘चूक माझीच आहे’ ही खोटी जाणीव आत खोलवर रुजते. त्यांच्या उपस्थितीत आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. स्वत:ला अपराधी वाटते आणि तुम्हाला असे वाटायला लावणे हीच त्यांची विकृत ताकद असते.

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधीतरी अशा विषारी स्वभावाच्या लोकांचा स्पर्श होत असतो. कधी क्षणभराच्या विषकणासारखा, तर कधी अगदी पूर्ण भिजवून टाकणाऱ्या भन्नाट वादळासारखा. असे विकृत लोक समोरच्यांच्या समजुतीचा, शांत स्वभावाचा अमर्याद फायदा घेत राहतात.

अशा लोकांची सर्वात घातक वागणूक म्हणजे त्यांची सूक्ष्मता. ते इतक्या अलगदपणे मनात शिरतात की आपल्या मनात नकळत विचार येतो की, “चूक त्यांची नसून माझीच असेल…” आणि मग आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो की, मीच जास्त संवेदनशील आहे का? मीच अधिक तीव्र प्रतिक्रिया दिली का? गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतल्या का? या विचारात आपण इतके गुंतून जातो की, दिवस, महिने, वर्ष.. कशाचीच शुद्ध राहत नाही.

पण जर वारंवार जखमी होणारे तुम्हीच असाल आणि तुटू नये म्हणून सतत स्वतःचे वर्तन प्रामाणिकपणे बदलणारेही तुम्हीच असाल, तर मग स्पष्ट आहे की, चूक तुमची नाही; त्यांचेच विष भिनलेले आहे. हे विष हळूहळू पसरते आणि आपल्या उशिरा लक्षात येते की, ते विष पार आतमध्ये शिरून बसले आहे.

विषारी वर्तनाची मुळे

विषारी वर्तन हे केवळ दुष्टपणातून निर्माण होत नाही. या वर्तनामागे अनेक मानसशास्त्रीय कारणे गुंतलेली असतात. काहींच्या मनात खोलवर दडलेली असुरक्षितता त्यांना इतरांवर सत्ता गाजवण्यास प्रवृत्त करते. स्वतःच्या कमीपणाला झाकण्यासाठी इतरांना खाली ओढण्याची विवशता असते; न भरलेल्या जखमा संघर्षाच्या रूपाने पेट घेतात, तेव्हा दु:खच आक्रमकतेचे रूप धारण करते. इतरांना अपमानित करणे, कमी लेखणे, त्यांची प्रतिष्ठा मातीमोल करणे- हे त्यांच्या नियंत्रणाचे शक्तिशाली साधन असते. कुणाच्या आनंदावर ताबा मिळवणे, कुणाच्या आत्मसन्मानाला तडा देणे, हाच त्यांचा आनंद.

बालपणातील शिक्षेचे स्वरूप, प्रेम मिळवण्याची चुकीची सवय किंवा सततच्या टीकेमुळे निर्माण झालेली आत्मद्वेषाची भावना, या घटकांमुळे व्यक्तिमत्त्वच विकृत होते. कधी कधी त्यांना स्वतःचे वर्तन किती घातक आहे, हे जाणवतही नाही. त्यांना वाटते की, नातेसंबंध काबूत ठेवण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे. आश्चर्य म्हणजे जिथे गर्वाचा सर्वात भक्कम गड उभा दिसतो, तिथेच अनेकदा सर्वात नाजूक अहंकार लपलेला असतो. सतत बाहेरून मान्यतेची भीक मागणारा, स्वतःमध्ये डोकावण्यास असमर्थ आणि इतरांवर कठोर टीका करण्यात मात्र तत्पर. दारुण विडंबना अशी की, स्वतःच्या भावना समजून घेण्याची किंवा व्यक्त करण्याची कला अवगत नसल्यामुळे मन बाहेरच्यांवर झेपावते - स्वतःकडे पाहण्याचे टाळते. कारण तेवढे धैर्यच नसते.

अशा नात्यांमध्ये राहणारे लोक सतत भीती आणि गोंधळाच्या छायेत जगतात. त्यांना हे नाते सोडण्याची इच्छा असते, पण ते सोडण्यास मन धजावत नाही. कधी प्रेमाची जुनी आठवण अडवते, कधी समाजाचे बंधन, तर कधी बदल घडेल, असा किरकोळ आशेचा धागा. विषारी लोक भावनिकदृष्ट्या आपला जीवनरस शोषतात. सतत लक्ष, सहानुभूती किंवा मान्यता मागत राहतात आणि बळीची भूमिका अतिशय कौशल्याने वठवतात. त्यांच्या नकारात्मकतेमुळे, तक्रारींमुळे आणि मनोवैज्ञानिक खेळांमुळे आपणच स्वतःच्या क्षमतेवर संशय घ्यायला लागतो. आपल्या भावना, मर्यादा आणि नात्यांचा ते कोणताही मान राखत नाहीत; उलट त्यांना मोडून काढण्यातच समाधान मिळते.

अशा लोकांच्या सततच्या दबावामुळे चिंता, नैराश्य, आत्मविश्वासाचा ऱ्हास, एकाकीपणा आणि गंभीर शारीरिक व मानसिक आजारही निर्माण होऊ शकतात. ते केवळ आपल्यालाच नव्हे तर इतरांनाही आपल्या विरोधात उभे करून समोरच्याचे जग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. हे नाते संपले तरी विष लगेच शरीरातून जात नाही. संशय, भीती आणि असुरक्षितता नव्या नात्यांमध्ये सुद्धा पाठलाग करतात. आपले मन पुन्हा कोणावर विश्वास ठेवणे विसरते. आपणच आपली दारे बंद करून घेतो.

विषारी लोक खरेच बदलतात का?

बदल शक्य असतो, पण त्यासाठी प्रथम त्यांच्या मनात प्रकाश पेटला पाहिजे. स्वतःच्या चुकीच्या वर्तनाची जाणीवच होत नाही, संवेदना बोथट झालेली असते आणि चूक नेहमी दुसऱ्याचीच ही वल्गना, अशा अवस्थेत सुधारणा कशी संभवणार? उलट इतरांना कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजण्याची सुखद नशा, वर्चस्वाची चव, नियंत्रणाचा गर्व, हे तात्कालिक सुख त्यांना इतके गोड वाटत राहते की बदलाची गरजच भासत नाही.

मग स्वतःला कसे वाचवायचे?

आपली जबाबदारी काय?

सुरुवात स्वतःच्या जाणिवेपासून आणि स्वत:ला नेमकेपणाने ओळखण्याच्या क्षमतेपासून होते. आपण विषारी नात्यात असताना कोणती लक्षणे दिसू लागतात? त्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे तुम्हाला नक्की कसे वाटते? आणि या विषारी चक्रात तुमच्या वर्तनाचीही काही भूमिका आहे का? जसे की, त्यांना सतत समजावत राहणे, स्वतःलाच दोष देत राहणे, त्यांच्या विखारी खेळात नकळत खेळाडू बनणे. कधी कधी असे होते की, त्या विषारी नात्यातील प्रसंगच डोळ्यांसमोर फिरत राहतात. मन इतके अस्वस्थ, त्रासलेले असते की इतरांसोबत वेळ घालवायची ऊर्जा देखील उरत नाही. भावनिक थकवा इतका खोल जातो की जणू जगण्याची इच्छाच मंदावते.

ही हळूहळू वाढणारी एकाकी भावना परिस्थितीला आणखी गंभीर बनवते. आपल्या माणसांपासून दुरावणे म्हणजे चिंता आणि एकटेपणाच्या अजून खोल दरीत स्वतःला ढकलणे. जसा-जसा हा विषारीपणा वाढतो, तसे-तसे विचारांचे चक्र नकारात्मकतेच्या अखंड भोवऱ्यात अधिकच बुडत जाते. आपले पहिले कर्तव्य म्हणजे स्वतःचे रक्षण करणे. त्यासाठी तीन प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारणे अनिवार्य आहेत.

  • ओळखणे : हे वर्तन विषारी आहे, हे मान्य करणे.

  • सीमारेषा आखणे : ‘यापेक्षा अधिक सहन करणार नाही’ हे स्पष्ट सांगणे.

  • अंतर ठेवणे : भावनिकदृष्ट्या अलिप्त होणे, आपला मोकळा श्वास, आपली शांतता जपणे.

नात्यांच्या या विषप्रयोगातून बाहेर पडणे हा पूर्णपणे स्वतःचा प्रवास आहे. त्या विषारी सावल्यांमधून बाहेर आल्यावर मनाला पुन्हा प्रकाशाची ओळख करून द्यावी लागते. स्वतःबद्दल प्रेमाचे, सुखाचे शब्द पुन्हा शिकावे लागतात. खचलेल्या आत्मविश्वासाचा तुटलेला धागा पुन्हा एकदा संयमाने, काळजीपूर्वक विणावा लागतो.

अशा नात्यांचा परिणाम मनावर खोलवर उमटतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणारा, तणाव कमी करणाऱ्या उपायांसह ठोस दिनक्रम असणे अत्यावश्यक ठरते. ध्यान, योगाभ्यास, गरम पाण्याचे आंघोळीसाठी दिलेले क्षण, कृतज्ञतेची नोंद ठेवणारी डायरी, श्वसनाचे व्यायाम, कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम किंवा मानसिक आरोग्याविषयीचे वाचन या सगळ्या गोष्टी शरीर आणि मनाला नव्याने उभारी देतात. कुठलेही नाते म्हणजे कैद नव्हे; ते समजुतीचे, सन्मानाचे मुक्त आकाशही असू शकते. नात्यांचा मूळ अर्थ विकासात आहे; मोडण्यात नाही, विध्वंसात नाही. जिथे आपणच नाहीसे होत चाललो आहोत, तिथे ते नाते जपण्याची कोणतीही नैतिक जबाबदारी आपल्यावर नाही. शांतता, सुरक्षितता आणि स्वाभिमान हे आपले जन्मसिद्ध हक्क आहेत.

हे मनात खोलवर कोरून ठेवा

प्रेम किंवा विश्वास न वाटता जे नाते घुसमटीचे बनते, त्या नात्यांपासून दूर जाणे म्हणजे पळ काढणे नव्हे. स्वतःला वाचवणे म्हणजे कुणाशी बेईमानी करणे नाही; ते आत्मसन्मानाचे द्योतक आहे. ती स्वतःच्या जीवनासाठी धैर्याने केलेली नवी निवड आहे. म्हणूनच, विषारी नात्यांची वेळेत जाणीव होणे, योग्य अंतर ठेवणे, स्पष्ट सीमारेषा आखणे आणि विश्वासू प्रियजनांसह मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून मदत घेणे- ही आत्मसंरक्षणाची अत्यावश्यक पावले आहेत.

स्वतःला जपणे म्हणजेच योग्य लोकांच्या सहवासात एक निरोगी, उजळ जीवन उभारणे आणि एकदा त्या विषारी बंधनातून आपण मुक्त झालो की, आयुष्य पुन्हा सुंदर होत जाते; वाऱ्यासारखे हलके होते आणि स्वतःच्या उभारीने, अभिमानाने पुन्हा उभे राहते.

ज्येष्ठ मनोचिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता

logo
marathi.freepressjournal.in