

समाजचिंतन
जगदीश काबरे
भारतीय समाज आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगतो; मात्र सार्वजनिक जीवनातील बेशिस्त व बेजबाबदार वर्तनामुळे त्याची प्रतिमा अनेकदा मलिन होते. स्वच्छता, शिस्त आणि नागरी जबाबदारीचा अभाव ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर समाजाच्या प्रगल्भतेसमोरील गंभीर आव्हाने आहेत.
भारतीय समाजाला स्वतःबद्दल फाजील अभिमान बाळगण्याची सवय आहे. प्राचीन संस्कृती, अध्यात्म, योग, लोकशाही, अशा अनेक क्षेत्रांतील कामगिरीचा उल्लेख करताना आपण स्वतःकडे जगाला दिशा देणारा समाज म्हणून पहातो. परंतु अनेक भारतीय नागरिक जेव्हा सार्वजनिक जागांमध्ये, पर्यटनस्थळांवर, रेल्वे स्थानकांवर, रस्त्यांवर, धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा परदेशात वावरतात तेव्हा त्यांच्या वर्तनातून शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी यांचा गंभीर अभाव दिसून येतो. विमानतळाच्या धावपट्टीवर जाऊन गरबा खेळण्याची तलफ भागवून भारतीयांनी जगभर आपली नाचक्की करून घेतली. कॅनडात मॉल्समध्ये जय श्रीरामाच्या घोषणा देऊन पोलीस बोलावून घेतले. युरोपमध्ये हॉटेलमधील नाष्टा पिशव्यांत कोंबून भरून घेतला. विमानांत खाकरा, चकल्या खाऊन वेष्टणांचा कचरा तसाच फेकला. बालीत हॉटेलची भांडी चोरली. ऑस्ट्रेलियात लॉजच्या बेडशिट्स वापरून बूट पुसून घेतले. थायलंडमध्ये एवढा गोंगाट केला की त्यांनी भारतीयांना तेथील मंदिरांत जाणे बॅन केलंय. शिकागोहून निघालेल्या विमानाच्या शौचालयात भारतीयांनी फ्लश करताना कपडे, प्लास्टिक पिशव्या, डायपर टाकल्यामुळे विमानातील बारापैकी आठ शौचालये बंद पडली. या कारणाने विमान अर्ध्या वाटेतून परत फिरवावे लागले. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
भारताची सर्वात मोठी समस्या गरिबी, बेरोजगारी किंवा अशिक्षितपणा नसून त्यांच्यात मुरलेली सार्वजनिक जीवनाविषयीची उदासीनता आणि शिस्तीचा अभाव आहे, असे अनेक समाजशास्त्रज्ञ मानतात. भारतीय माणूस स्वतःच्या घराची स्वच्छता राखतो, परंतु घराबाहेरचा परिसर स्वच्छ ठेवायची जबाबदारी घेण्यासाठी मात्र तो हात झटकतो. भारतीय जनमानसात मुरलेली ही एक बेशिस्तीची सामाजिक मानसिकता आहे. या मानसिकतेची मूळे 'माझे काम झाले की झाले मग इतरांचे काही का होईना', या विचारात आहे. नियम हे इतरांनी पाळण्यासाठी असतात, आपण अती हुशारीने त्यातून मार्ग काढायचा असतो, अशी समजूत अनेकांच्या मनात रुजलेली असते. त्यामुळे नियम मोडणे हा अपराध नसून चातुर्याचा पुरावा समजला जातो. समाजाला फसवण्यामध्येही काही लोकांना प्रतिष्ठेचे लक्षण वाटते. त्याची हीच मानसिकता मग परदेशात गेल्यावरही बदलत नाही.
परिणामी परदेशात भारतीय पर्यटकांबद्दल नकारात्मक मत तयार झाले आहे. भारतीय जगात जिथे जातील तिथे घाण करून ठेवतील अशी त्या देशातील नागरिकांना भीती वाटत असते. मोठ्या आवाजात बोलणे, समूहाने गोंधळ घालणे, नियमांकडे दुर्लक्ष करणे, सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ खात कचरा करणे, फोटो काढण्यासाठी इतरांना त्रास देणे, धार्मिक किंवा राष्ट्रीय ओळख आक्रमकपणे प्रदर्शित करणे, स्थानिक संस्कृतीचा आदर न राखणे अशा तक्रारी विविध देशांतून वेळोवेळी समोर येतात. अर्थात या सर्व घटना प्रत्येक भारतीयाशी जोडणे चुकीचे आहे, परंतु अशा घटना मोठया प्रमाणात घडतात हेही नाकारता येत नाही. त्यामुळे काही लोकांच्या वर्तनामुळे संपूर्ण देशाची प्रतिमा प्रभावित होते. यामागे आणखी एक गंभीर कारण म्हणजे भारतात सार्वजनिक शिस्तीपेक्षा वैयक्तिक संबंधांना अधिक महत्त्व दिले जाते. नियमांपेक्षा ओळखी, शिफारशी, जुगाड आणि अपवाद यांना महत्त्व मिळते. त्यामुळे अनेकांना नियमांचे पालन करणे ही नागरी जबाबदारी वाटत नाही. जेव्हा असे लोक विकसित देशांमध्ये जातात, तेव्हा तिथल्या शिस्तबद्ध व्यवस्थेशी त्यांचा संघर्ष होतो. कारण तेथे नियम हे चर्चेचे विषय नसून जीवनपद्धतीचा भाग असतात.
भारतीय समाजामध्ये आत्मपरीक्षणाचा अभाव हीदेखील एक मोठी समस्या आहे. एखाद्यावर टीका झाली की तिच्यावर विचार करण्याऐवजी आपण लगेच बचावात्मक भूमिका घेतो. 'इतर देशांतही असे होते', 'हा आमच्याविरुद्ध कट आहे', 'परदेशी लोक वंशवादी आहेत', अशा बचावात्मक प्रतिक्रिया लगेच केल्या जातात. प्रगल्भ समाज स्वतःच्या कमतरतांची कबुली देतो. अपरिपक्व समाज मात्र सतत स्वतःचे गौरवगीत गात राहतो. सध्या सामाजिक माध्यमांनी या समस्येला आणखी एक वेगळे रूप दिले आहे. परदेशात जाऊन स्थानिक संस्कृती समजून घेण्याऐवजी अनेकांना तिथे स्वतःची उपस्थिती दाखवण्यात अधिक रस असतो. प्रसिद्धीच्या हव्यासामुळे सभ्यता आणि संवेदनशीलता मागे पडते.
विशेष चिंतेची बाब म्हणजे आपल्यात निर्माण झालेला वृथा राष्ट्राभिमान आणि राष्ट्रवाद यांच्यातील गोंधळ. खरा राष्ट्राभिमान म्हणजे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व जबाबदारीने करणे असते. परंतु काही लोक राष्ट्रवादाचा अर्थ सतत घोषणा देणे, प्रतीकांचे प्रदर्शन करणे किंवा इतरांवर स्वतःची ओळख लादणे असा घेतात. परिणामी वर्तनातील सभ्यता आणि नागरिकत्वाची जाणीव मागे पडते. भारतीय समाजातील अनेक दोषांचे मूळ शिक्षण पद्धतीतही आहे. आपण परीक्षा, गुण आणि करिअर यांवर भर देतो; पण नागरिकशास्त्राचा प्रत्यक्ष सराव शिकवत नाही. परिणामी उच्चशिक्षित व्यक्तीसुद्धा सार्वजनिक जीवनात बेजबाबदार वर्तन करताना दिसते.
आज भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आर्थिक महासत्ता होण्यापेक्षा नागरी संस्कृती विकसित करण्याचे आहे. खरा प्रश्न असा आहे की आपण जगाला काय शिकवणार यापेक्षा आपण जगाकडून काय शिकणार? स्वच्छता, वेळेचे महत्त्व, सार्वजनिक जबाबदारी, शिस्त, कायद्याचा आदर आणि सामूहिक हिताची जाणीव या मूल्यांचा स्वीकार केल्याशिवाय कोणताही समाज खऱ्या अर्थाने आदर्श ठरू शकत नाही. आत्मगौरव आणि आत्ममुग्धता यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या उणिवांकडे डोळसपणे पाहण्याची तयारी नसलेला समाज प्रगती करू शकत नाही. म्हणूनच भारतीय समाजाला आज सर्वाधिक गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. भारतात अनेकदा नियम मोडणाऱ्याला सामाजिक शिक्षा मिळत नाही; उलट त्याला हुशार समजले जाते, चलाख समजले जाते. माझ्या मते या समस्येचे मूळ भारतीय डीएनएत किंवा भारतीय संस्कृतीत नसून तीन गोष्टींमध्ये आहे: कमकुवत नागरी शिक्षण, नियमांची असमान अंमलबजावणी आणि समूहकेंद्री मानसिकता. ज्या देशांत नियम मोडल्यास त्वरित दंड होतो तेथे हेच लोक तुलनेने अधिक शिस्तीत वागतात.
लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com