

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
भोगावती नदीच्या निळाईपासून शाहू महाराजांच्या दूरदृष्टीपर्यंत आणि गावरान चवींपासून घनदाट जंगलांपर्यंत—निसर्ग, इतिहास व आपुलकी यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर राधानगरी हा कोल्हापूरजवळचा एक अविस्मरणीय मुक्काम ठरतो.
हिवाळा सरून उन्ह तापू लागलं होतं. सूर्यकिरणं झाडाझाडांतून पाझरत नदीच्या पात्रात पडत होती. पाणी अगदी स्वच्छ, नितळ, निळेशार; दोन्ही बाजूच्या तटावरल्या देशी झाडांना पोसत वाहणारं. नदीच्या अशा पाण्यावर पाठ रेलून, पाय पाण्यावर पसरून मी तरंगत होते. पाठीखाली पाण्याची निळाई आणि वर आकाशाची. एकाचवेळी एका निळाईत तरंगण्याचा आणि दुसरी निळाई बघत राहण्याचा आनंद मी घेत होते. शांत, शीतल आणि सुंदर असं नदीचं पात्र होतं—पाण्यातून बाहेर यावंसं वाटत नव्हतं.
ही मोहून टाकणारी नदी म्हणजे भोगावती. कोल्हापूरची शेती आणि उद्योग फुलवणारी लक्ष्मीच जणू. हिच्या काठावर वसलेल्या गावांपैकी एक महत्त्वाचं गाव म्हणजे राधानगरी—छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समृद्ध केलेली नगरी. दुभती शेती, घनदाट जंगल आणि निसर्गसंपन्नता यांमुळे ही भूमी विशेष ठरते.
कोल्हापूरपासून साधारण ५० किमीवर राधानगरी आहे. वाटेतली गावं पाहत दीड तास कसा जातो, कळतही नाही. इथे एक दिवसासाठी आलात, तरी मुक्काम सहज दोन-तीन दिवसांवर जातो—स्वच्छ तजेलदार हवा आणि प्रेमळ आदरातिथ्य यामुळे.
माझ्या मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं—रानमळा रिसॉर्ट. टुमदार परिसरात साध्या, सुटसुटीत, स्वच्छ खोल्या. ऊसशेतीला लागून आणि जंगलाच्या जवळ हे ठिकाण आहे. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते आणि रात्री चांदण्यांनी भरलेलं आकाश पाहत झोप लागते. शेतीच्या पल्याड लगेच भोगावती नदी वाहते. धरणाचं पाणी सोडलं नसलं तर नदी फार खोल नसते. गावातली मुलं आणि म्हशी पाण्यात मस्त डुंबत असतात.
भोगावतीचा उगम राधानगरीच्या पुढे असलेल्या घनदाट अरण्यात आहे. कोल्हापूरची शेती आणि पाण्याची गरज ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी इथे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. दगडी बांधकाम, चुना-शिसे यांचं मिश्रण आणि सात स्वयंचलित दरवाजे—शंभर वर्षांनंतरही धरण ताठ उभं आहे. महाराजांनी धरणाच्या तलावाला पत्नी महाराणी लक्ष्मीबाईंचं नाव दिलं. धरण जवळून पाहताना त्यांच्या दूरदृष्टीची प्रचीती येते.
शाहूकालीन आणखी एक खूण म्हणजे हत्तीमहाल. मुख्य रस्त्यावरून फोंडाघाटाकडे जाताना डावीकडे वळल्यावर थोड्याच अंतरावर ही पडझड झालेली, पण भव्य दुमजली वास्तू दिसते. हत्तींना बांधण्यासाठी उभारलेला हा महाल, आतल्या चौकातून दिसणाऱ्या काटकोनात उभ्या इमारती, प्रवेश कमानी—सगळंच त्या काळात घेऊन जातं.
हत्तीमहालाजवळच फुलपाखरू उद्यान आहे. ऑक्टोबर अखेरपासून जानेवारीपर्यंत इथे असंख्य फुलपाखरं बागडताना दिसतात. त्यांच्या आवडीची झाडं, चालण्यासाठी रॅम्प—लहानमोठ्यांना रमवणारं हे उद्यान.
भटकंतीनंतर भूक लागतेच. कोल्हापुरी मिसळ किंवा गावरान जेवण तर आहेच; पण राधानगरीचा खास पदार्थ—दुधाची आमटी—एकदातरी चाखायलाच हवा. नाव ऐकून नाक मुरडेल, पण चव विलक्षण. धारोष्ण दूध, खास मसाला (लवंग, दालचिनी, वेलदोडे, मिरी, जायफळ, खसखस), कांदा-बटाटा—उकळी आली की आमटी तयार. मीठ वेगळं. मसालेभात किंवा पेटीपावसोबत ही आमटी दिली जाते. इतकी लोकप्रिय की शेफ रणवीर ब्रार यांनीही तिची रेसिपी मांडली आहे. मांसाहारी असाल तर कोल्हापुरी मटण-भाकरीची पर्वणी चुकवू नका.
इथून दाजीपूर गवा अभयारण्याची सफारी, शिवगड ट्रेक, पावसाळ्यात धबधबे-हिरवाई-धुक्याचा साज—सगळंच मोहक. राधानगरी–दाजीपूर–फोंडाघाट कोकण दर्शन पॉईंट हा रस्ता ड्राइव्हसाठी खास. वाटेत उगवाई देवीचं मंदिर आणि विहंगम दृश्य.
इतिहास, निसर्ग आणि आपुलकी यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर दोन-तीन दिवसांचा मुक्काम राधानगरीत जरूर ठेवा. कोल्हापूरमध्ये आलात तर वेळ काढून राधानगरीचा प्लॅन नक्की करा.
लेखिका: ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com