उपेक्षित प्रदेशाचा बुलंद रंगरचनाकार

पावसाळ्यात शेती करणाऱ्या कलाकारांकडून उरलेल्या वर्षभरात वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करून घेणाऱ्या रतन थियम यांच्यासाठी नाटक हा स्वान्त सुखाय प्रकार नव्हता. तो विद्रोही स्वर व्यक्त करणारा, दु:खाची तार छेडणारा कलात्मक आविष्कार होता. इतिहास, परंपरा आणि समकाल यांची सांगड घालणाऱ्या मणिपूरमधील या आविष्काराला म्हणूनच जागतिक ओळख मिळाली.
उपेक्षित प्रदेशाचा बुलंद रंगरचनाकार
Published on

विशेष

अक्षय शिंपी

पावसाळ्यात शेती करणाऱ्या कलाकारांकडून उरलेल्या वर्षभरात वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करून घेणाऱ्या रतन थियम यांच्यासाठी नाटक हा स्वान्त सुखाय प्रकार नव्हता. तो विद्रोही स्वर व्यक्त करणारा, दु:खाची तार छेडणारा कलात्मक आविष्कार होता. इतिहास, परंपरा आणि समकाल यांची सांगड घालणाऱ्या मणिपूरमधील या आविष्काराला म्हणूनच जागतिक ओळख मिळाली. अलीकडेच २३ जुलैला त्यांचं निधन झालं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा दोन वेगवेगळ्या नजरांमधून घेतलेला हा मागोवा.

मणिपूर. सुदूर असलेल्या ईशान्य भारतातलं एक सदासर्वकाळ धगधगतं, अस्वस्थ असलेलं राज्य. सततचे कर्फ्यू, दंगल आणि पर्यायानं दहशतग्रस्त वातावरण, मैतई आणि कुकी जमातींमधले संघर्ष, बंडखोरांची बंडं, अशाच आशयाच्या बातम्यांमधून या राज्याचं नाव आपल्या कानांवर पडत आलंय. पण त्यापलीकडे असणारी या राज्याची संस्कृती, त्याला लाभलेलं निसर्गसौंदर्य, त्या राज्याचं खाद्यजीवन, संगीत, नृत्य, साहित्य यांबद्दल मात्र आपल्या खाती असलेली माहिती जवळजवळ ‘ना के बराबर’ अशीच असते. अगदी माहितीच्या आंतरजालामुळे जवळ आलेल्या जगातही भारताचा अविभाज्य भाग असलेल्या सात बहिणींच्या प्रदेशाबद्दल आपल्याला फारसं ठाऊक नाहीच.

परवा पुन्हा मणिपूरचं नाव चर्चेत आलं ते एका वेगळ्याच कारणामुळे. कारण शोकात्मच. मणिपूरचे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, लेखक, नाट्यप्रशिक्षक रतन थियम यांच्या निधनाचं वृत्त आलं आणि भारतीय रंगभूमी शोकाकुल झाली.

मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट‌्स’ विभागाच्या वार्षिक ‘वसंत राष्ट्रीय नाट्योत्सवा’त रतन थियम यांची नाटकं बघण्याचा योग आला होता. तत्पूर्वी त्यांचं नाव फक्त ऐकलं होतं. ‘चक्रव्यूह’चा खेळ कुसुमाग्रज मराठी भाषा भवनाच्या रंगमंचावर उभा राहिला होता. उच्चरव आणि तारसप्तकातलं करुण कंठ आणि वाद्यसंगीत, योद्ध्यांप्रमाणेच काटक अन् घोटीव शरीर असलेल्या नटमंडळींच्या लयबद्ध हालचाली, नृत्य अन् मार्शल आर्टची घातलेली बेमालूम सांगड, रंगमंचाच्या अक्षांश-रेखांशाचा सखोल विचार करून बांधलेली देखणी दृश्यरूपं आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे प्राचीन अन् परिचित कथा निवडूनही त्यातून समकालीन आशय अधोरेखित करून तो विनाअडथळा पोचवण्याचं कसब. कमळ उमलावं तसा रंगमंचावर ‘चक्रव्यूह’चा खेळ हळूहळू उमलत गेला होता...

व्यूहरचनेबद्दल ऐकत असताना सुभद्रेला लागलेली झोप आणि चक्रव्यूहाचं भेदन ऐकण्यासाठी गर्भातल्या अभिमन्यूचं चाललेलं आक्रंदन केवळ महाभारतातली एक कथाच दृश्यरूपात उभी करत नव्हतं, तर मणिपूरची सामाजिक-राजकीय अवस्थादेखील ठसठशीतपणे मुखर करत होतं. असहाय्य अभिमन्यूचं आक्रंदन मणिपूरमधल्या अवघ्या तरुणाईच्या संघर्षाचं रूपक झालेलं होतं, सुभद्रेला लागलेली झोप डोळस असूनही आंधळ्या असलेल्या निबर व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करत होती अन् साऱ्या मणिपूरचीच नव्हे तर आपलीदेखील या क्रूर व्यवस्थेच्या चक्रव्यूहातून सुटकेसाठी चाललेली तडफड रंगमंचावर सजीव होत होती. हा खेळ प्रेक्षक म्हणून पाहताना विलक्षण अस्वस्थपणा दाटून येत होता. तुम्ही फक्त ‘बघे’ आहात हे धारदार विधान आणि त्याचवेळी हे सारं पहावलं तरी कसं जातं तुम्हाला, हा तीक्ष्ण प्रश्न एकाचवेळी हा खेळ करत होता. अगदी प्रत्येकाचं बखोट पकडून विचारत होता. त्यावेळी झालेली विलक्षण कोंडी अद्यापही स्पष्टपणे आठवते. भाषा यत्किंचितही कळत नसताना, सारे वाच्यार्थ, ध्वन्यार्थ थेटपणे कळत, पोहोचत, रुतत होते. शब्द-चित्र-ध्वनी यांची घट्ट वीण घातली गेली होती. त्यातून हे ‘दृक‌्श्राव्य अन् व्याकुळ जीवघेणं काव्य’ उलगडलं जात होतं.

“…मैं खुद से बार-बार पूछ रहा हूँ: एक व्यक्ति के रूप में मैं कहां खड़ा हूं? मैं चिंता का एक पूरा बोझ महसूस करता हूं। शांती की बात करें, युद्ध की बात करें, या संघर्ष की बात करें, मुझे लगता है कि एक व्यक्ती फँसा हुआ है। इन सभी चीजों के साथ, एक व्यक्ति के रूप में, मुझे इस व्यवस्था के खिलाफ, भ्रष्टाचार के खिलाफ, चल रही हिंसा के खिलाफ एक रुख अपनाना होगा। व्यवस्था की बात करते हुए, एक रंगकर्मी के रूप में, मैंने हमेशा इस व्यवस्था पर हमला करना अपना कर्तव्य समझा है...” हे सारं त्या खेळानंतर रतनदा प्रेक्षकांशी संवाद साधताना म्हणत होते. खरंतर इतका देखणा आणि अस्वस्थ करणारा नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर आणखी बोलण्यासारखं वेगळं काय उरलंय? कर्त्यानं इतकं बोलायची आवश्यकता असेल तर मग नाटक करायचंच कशाला? असे प्रश्न त्यावेळी मनात आले होते. आता, इतक्या वर्षांनंतर त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात आणि तेव्हा मनात आलेल्या विचारांची लाज वाटते.

सतत अस्थिर असलेल्या, धगधगत्या प्रदेशातला एक मुलगा आजन्म नाटक करण्याचा निर्धार करतो. आपल्या मुळांचं भरण-पोषण जिथं झालं आहे, त्या प्रदेशातल्या अशांत मातीचा आवाज आपल्या कृतींमधून ठसठशीतपणे मुखर करतो, थेट अन् नि:संदिग्ध सामाजिक-राजकीय भूमिका घेतो आणि हे सारं करत असतानाच ‘थिएटर ऑफ रूट्स’ची चळवळ उभी करतो, हे निश्चितच सोपं काम नव्हे.

संगीत, नृत्य, काव्य, मार्शल आर्ट्स ही जशी त्यांच्या नाटकांची वैशिष्ट्य होती, तसाच Non-violence, अहिंसा हा गुणही त्यांच्या नाटकांचा स्थायीभाव होता. ते कायमच त्यासाठी आग्रही राहिले. अहिंसेचं शस्त्र हातात घेऊन ‘मैं व्यवस्था पर हमला करता हूँ’ म्हणताना त्यांची प्रतिमा विराट होत जाते. भारतीय रंगभूमीच्या पटलावर स्वतंत्रपणे उठून दिसते. आपल्या नाटकांतून टोकाच्या हिंसेची, दारुण युद्धाची दृश्यरूपं बांधताना त्याला ते जाणीवपूर्वक अहिंसा आणि करुणेचं अस्तर जोडत राहिले. आरामबाइ नावाच्या भाल्याप्रमाणे दिसणाऱ्या शस्त्राच्या टोकावर हिंसेची त्वचा अलगद उचलून आत गरम लाव्हाप्रमाणे वाहणाऱ्या दु:खाचं, वियोगाचं दर्शन घडवत राहिले. सतत युद्धविरोधी विधान करत राहिले. मणिपूरसारख्या अस्थिर प्रदेशातून आल्यामुळे असेल कदाचित, पण अहिंसेचं महत्त्व अन् तिचं सामर्थ्य त्यांनी पुरेपूर जोखलं होतं. त्यामुळेच त्यांच्या कलात्मक विद्रोहाला धार चढली. पुढे त्यांचं ‘व्हेन वी डेड अवेकन’ पाहिलं आणि ते अधिकच उमगलं.

प्रत्येक कलावंताची एक शैली असते वा तो कलावंत एक विशिष्ट शैली आत्मसात करून तिच्या शक्यता शोधतो. रतन थियम हे त्या कवी किंवा शायरसारखे आहेत, ज्यांच्या कविता, शेर त्यांचं नाव न सांगताही ओळखता येतात. रतनदांची नाटकं त्यांचं नाव वगळलं तरी सहजपणे ओळखता येतील. त्यांच्या शैलीची नक्कल होणं कदापि शक्य नाही. ‘रतन थियम स्टाईलाईज थिएटर करतात’, हे म्हणणं अर्धसत्य आहे आणि ते त्यांच्यावर अन्याय करण्यासारखंही आहे. नाटकाचं संमिश्र कला असणं त्यांना व्यवस्थित उमजलं होतं. तिच्या अनंत शक्यता उमगल्या होत्या. एकीकडे ‘थिएटर मर चुका है’ म्हणणारे दुबे आणि ‘रंगमंच का अवकाश (स्पेस) मुझे अभी भी अपनी ओर खिंचता रहता है’ असं म्हणणारे रतनदा ही भारतीय रंगभूमीची दोन टोकं आहेत. थिएटर मेलंय म्हणतानादेखील अखेरपर्यंत नाटक करत राहिलेले दुबे आणि थिएटर अजूनही आकर्षून घेतं म्हणणारे थियम यांच्यातून वाहणारं रक्त अखेर ‘थिएटर पॉझिटिव्ह’च होतं. मणिपूर आणि भारतीयत्वाची बूज रतनदांनी अखेरपर्यंत राखली. केवळ नाटकंच नाही, तर साऱ्याच प्रयोगात्म कलांमध्ये नव्या शक्यता शोधणाऱ्यांनी रतनदांशी कृतज्ञ असायला हवं.

भारतीय रंगमंचावरच्या मागच्या पिढीतल्या या शेवटच्या उत्तुंग माणसानं परवा भरतवाक्य गाऊन काढता पाय घेतला. भविष्यातली भारतीय रंगभूमी कुठलं वळण घेईल ठाऊक नाही, मात्र त्या वळणावर कुठेतरी रतन थियम नावाचा मैलाचा दगड ऊन-वारा-पाऊस झेलत घट्ट पाय रोवून दिग्दर्शन करत उभा असलेला दिसेल, एवढं मात्र निश्चित.

अभिनेता, कवी, दास्तानगो

akshayshimpi1987 @gmail.com

logo
marathi.freepressjournal.in