विवेकनिष्ठ जीवन

विवेकनिष्ठ जीवन म्हणजे तर्क, पुरावा आणि अनुभव यांवर आधारित निर्णय घेण्याची प्रक्रिया, जी मानवी जीवनात नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संतुलन साधते. हे जीवन केवळ ज्ञानप्राप्तीपुरते मर्यादित नसून, मूल्यनिर्मितीसाठी वैज्ञानिक वृत्तीचा आदर्श मार्ग दाखवते.
विवेकनिष्ठ जीवन
छायाचित्र : Freepik
Published on

समाजचिंतन

जगदीश काबरे

विवेकनिष्ठ जीवन म्हणजे तर्क, पुरावा आणि अनुभव यांवर आधारित निर्णय घेण्याची प्रक्रिया, जी मानवी जीवनात नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संतुलन साधते. हे जीवन केवळ ज्ञानप्राप्तीपुरते मर्यादित नसून, मूल्यनिर्मितीसाठी वैज्ञानिक वृत्तीचा आदर्श मार्ग दाखवते.

विवेकनिष्ठ किंवा विवेकाधिष्ठित जीवन म्हणजे मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक क्षेत्रात तथ्यनिष्ठ, कारणनिष्ठ आणि परीक्षणक्षम वृत्तीचा वापर करून निर्णय घेण्याची प्रक्रिया होय. विश्वात काय घडते, ते कसे घडते आणि त्या घटनांचा परस्परसंबंध काय असतो याचे ज्ञान विवेक आणि वैज्ञानिक शोध पद्धतीकडूनच प्राप्त होते, ही विवेकवादाची प्राथमिक भूमिका आहे. परंतु विवेकवाद केवळ ज्ञानप्राप्तीचा मार्ग नसून आधुनिक जीवनशैलीचा पाया आहे. तेव्हा हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो की वैज्ञानिक पद्धती आणि जीवनाच्या मूल्यप्रधान निर्णयांत परस्परसंबंध आहे काय? कारण वैज्ञानिक पद्धती ‘काय आहे’ आणि ‘कसे आहे’ या प्रश्नांची उत्तरे देते, परंतु ‘काय असावे’ किंवा ‘कसे वागावे’ या मूल्याधारित निर्णयांचे उत्तर देणे ही तिची धारणा नसते. तरीही विवेकनिष्ठ जीवन हे नेमके याच वैज्ञानिक वृत्तीच्या सहाय्याने एक आदर्श नैतिक चौकट निर्माण करू शकते. विवेकवादाचे मूलभूत तत्त्व असे मांडता येते की, आपले सर्व निर्णय हे पुरावे, तर्क आणि अनुभव यांच्या आधारावर असावेत. परंपरेने, श्रद्धेने किंवा अधिकाराने दिलेल्या आदेशांमधून मूल्ये प्राप्त होऊ नयेत; त्याऐवजी मानवी हित, मानवी मुक्ती, सामाजिक न्याय आणि मानवकल्याण यांचा तर्काधारित पुनर्विचार करून जीवननीती ठरवावी. वैज्ञानिक पद्धती मानवी मूल्यांचे थेट निर्धारण करू शकत नाही हे खरे; तरीही त्या मूल्यांचे परीक्षण करण्याचा, त्यातील विसंगती उलगडण्याचा आणि समाजहितकारक परिणाम ओळखण्याचा मुळाचा आधार तीच पुरवते. म्हणून विवेकनिष्ठ जीवन हे विज्ञानाला पर्यायी नसून विज्ञानाचा विस्तार आहे; विज्ञान हे तथ्यांचे विश्लेषण, तर विवेकवाद ही मूल्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली तर्कनिष्ठ चौकट आहे.

विवेकनिष्ठ जीवनाची पहिली पायरी म्हणजे वास्तविकतेचा स्वीकार. अनेकदा मानवाच्या भावनांमधून, परंपरांमधून किंवा दंतकथांमधून निर्माण झालेल्या धारणांना तो सत्य मानतो. अशा धारणांची उत्पत्ती समाजरचनेत खोलवर रुजलेली असल्याने त्या सहजपणे तपासण्याच्या पलीकडे जातात आणि अनेक लोकांना त्या ‘स्वाभाविक’ वाटतात. परंतु विवेकवाद यावरच आघात करतो. तो सांगतो की, वास्तवता ही आपल्या श्रद्धेवर अवलंबून नसते. कारण वास्तवता तपासता येते, पडताळता येते आणि प्रमाणित करता येते. एखादा दावा परंपरेच्या दृष्टिकोनातून योग्य असला किंवा लोकप्रिय असला म्हणून तो सत्य ठरत नाही. विवेकनिष्ठ जीवन म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या गृहितकांचीही कठोरपणे परीक्षण करण्याची तयारी. या वृत्तीमुळे मनुष्य अंधश्रद्धांपासून, धार्मिक भयागंडापासून, अकल्पित चमत्कारांपासून आणि अधिकारवादी विचारसरणीपासून मुक्त होतो. मुक्तता हीच विवेकवादाची पहिली पायरी आहे, कारण जेव्हा मानवाला वस्तुस्थितीचे ज्ञान आकळते तेव्हा तो धार्मिक गुलामगिरीतून बाहेर पडतो.

विवेकनिष्ठ जीवनात दुसरी गोष्ट म्हणजे कारणमिमांसेचे महत्त्व. विश्वात घडणाऱ्या घटना कार्यकारण संबंधाने बांधलेल्या आहेत, हे विज्ञानाचे मूलभूत गृहितक आहे आणि विवेकवादी त्याचा स्वीकार करतो. त्यामुळे कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण करताना अदृश्य शक्ती, दैवी हस्तक्षेप किंवा कर्मफलासारख्या अतीत कारणांची गरज उरत नाही. उदाहरणार्थ, मानवी वर्तनाचे विश्लेषण करताना विवेकवादी जीवशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यांसारख्या क्षेत्रांचा आधार घेतो. वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केल्यास मानवी निर्णयांमागे जैविक प्रेरणा, सामाजिक संरचना, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक संधी, ताणतणाव आणि वातावरणीय परिणाम यांसारख्या घटकांचा वाटा असतो हे स्पष्ट होते. यामुळे ‘मनुष्य स्वभावतः चांगला की वाईट?’ अशा नैतिक प्रश्नांची उत्तरे विवेकवाद अधिक संतुलितपणे देऊ शकतो. मनुष्याचे वर्तन त्याच्या पर्यावरणाशी असलेल्या संवादातून निर्माण होते आणि ते बदलू शकते. म्हणून हे विवेकनिष्ठ जीवनाचे एक मूल्य ठरते. त्यामुळे समाजातील विसंगती, अन्याय किंवा हिंसा यांना ‘दैवताची इच्छा’ म्हणून न पाहता, बदलण्यासारखी, सुधारणेसाठी खुली परिस्थिती मानली जाते. ही धारणा समाजसुधारणेसाठी अत्यंत महत्त्वाची असते.

वैज्ञानिक पद्धती थेट नैतिक मूल्ये ठरवू शकत नाही, हे मान्य असले तरी नैतिक मार्गदर्शनासाठी आवश्यक असलेला विचाराचा पाया ती नक्की पुरवते. कारण नैतिकता म्हणजे केवळ काही काल्पनिक आदेशांचे पालन नसून मानवी कृतींचे परिणाम, त्यांची फायदे-तोट्यांची तर्कनिष्ठ पडताळणी आणि समाजाच्या सामूहिक कल्याणाचा विचार या प्रक्रियेवर आधारित असते. विवेकनिष्ठ जीवन त्यामुळे “काय करणे योग्य आहे?” या प्रश्नातही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग करते. जर एखाद्या कृतीचा परिणाम दुखापत, अन्याय किंवा दमन करणारा असेल तर विवेकवादी ती कृती अयोग्य ठरवतो. नीतिशास्त्राला तो मानवकेंद्रित आणि अनुभवाधारित बनवतो. यामुळे नैतिकता स्थिर नसून बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार विकसित होणारी प्रणाली ठरते. उदाहरणार्थ, स्त्रियांचे हक्क, LGBTQ+ व्यक्तींची समानता, जातविहीन समाज, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक शिक्षण, पर्यावरण संरक्षण यांसारख्या संकल्पना आज नैतिकदृष्ट्या योग्य मानल्या जातात, कारण वैज्ञानिक माहिती आणि अनुभवाने असे दाखवले आहे की, या धोरणांमुळे व्यापक मानवी कल्याण घडते. म्हणून विवेकनिष्ठ नैतिकता ही गतिमान, सुधारण्यास तत्पर आणि पुराव्यांवर आधारित असते.

विवेकनिष्ठ जीवनाचा पुढील महत्त्वाचा पैलू म्हणजे भावनांचे स्थान. काही जणांना वाटते की, विवेकवाद म्हणजे भावना नाकारणे; पण वस्तुतः विवेकवाद भावना नाकारत नाही, तर भावनांची भूमिका वास्तवाच्या चौकटीत कशी हाताळावी हे शिकवतो... भावनांचे बुद्धिगम्य व्यवस्थापन करतो. मानव फक्त तर्कावर चालत नाही; भीती, सहानुभूती, राग, प्रेम आणि असुरक्षितता या सर्व भावनांचा त्याच्या निर्णयांवर परिणाम होतो. विवेकवादी याला नाकारत नाही; तो भावनांना वैज्ञानिक चौकटीत समजून घेण्याचा आग्रह धरतो. भावनिक आवेगात घेतलेले निर्णय अनेकदा हानिकारक होतात, त्यामुळे भावनांना तर्कशुद्ध नियंत्रणाखाली ठेवण्याची आवश्यकता असते. मनातील पूर्वग्रह, अविवेकी भीती किंवा धार्मिक अपराधभाव यांचा अभ्यास करून आत्मपरीक्षण करणे ही विवेकनिष्ठ जीवनाची गरज आहे. भावनांना नाकारण्याऐवजी त्या समजून घेऊन त्यांचे विवेकी व्यवस्थापन करणे हे आधुनिक मानसशास्त्राशी सुसंगत आहे. अशा प्रकारे विवेकवाद मानवी भावनांचा शत्रू नसून त्यांना अधिक आरोग्यदायी आणि संतुलित बनवण्याचे साधन आहे.

विवेकनिष्ठ जीवनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानाचा सायास शोध. श्रद्धाधारित जीवनात ज्ञान ही बाहेरील एखाद्या अधिकाऱ्याने दिलेली गोष्ट मानली जाते, परंतु विवेकवादी ज्ञानाला सतत विकसित होणारी प्रक्रिया मानतो. विज्ञानाने बनवलेला कोणताही सिद्धांत, संरचना अंतिम नसते; ती नवीन पुरावे आल्यानंतर बदलते. त्यामुळे विवेकनिष्ठ जीवनात बदलाची तयारी, विचारांची लवचिकता आणि चुका मान्य करण्याची प्रामाणिकता आवश्यक असते. एखादा विचार किंवा मत हे माझे असल्यामुळे ते बरोबरच आहे अशी आढ्यता येथे मान्य केली जात नाही. पुरावा चुकीचा सिद्ध झाल्यास मत बदलणे हे कमीपणाचे लक्षण नसून वैज्ञानिक वृत्तीचे लक्षण आहे. ही वृत्ती व्यक्तीला बौद्धिक प्रामाणिकतेकडे नेते, जी विवेकनिष्ठ जीवनाची मुळाक्षरे आहेत. व्यक्ती जेव्हा असे वर्तन करू लागतो तेव्हा तो समाजातील चर्चा अधिक सभ्य, तर्काधारित आणि पुराव्यांवर आधारित बनवतो.

विवेकनिष्ठ जीवनाचा सामाजिक पैलूही अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेकवादी जीवन वैयक्तिक पातळीवर जितके महत्त्वाचे आहे तितकेच सामाजिक रचनेतही आवश्यक आहे. कारण समाजातील विसंगती, अंधश्रद्धा, भेदभाव, रूढी आणि अयोग्य सत्ताकेंद्रे यांचा उगम बहुधा अविवेकी विश्वासांमध्ये असतो. विवेकनिष्ठ व्यक्ती फक्त स्वतः विवेकवादी नसते, तर समाजातील चुकीच्या विश्वासरचनांचा उलगडा करण्याचे धाडसही दाखवते. तर्काधारित चर्चा, वैज्ञानिक साक्षरता, समानता, मानवी हक्क आणि धर्मनिरपेक्षता ही विवेकवादाची सामाजिक मूल्ये आहेत. धर्म किंवा जात यांच्या आधारावर बनवलेली मूल्ये अनेकदा विभाजनकारी आणि दमनकारी ठरतात; त्याउलट विवेकवाद सार्वत्रिक मानवी समानतेवर भर देतो. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आणि मूल्यवान आहे, त्याचे हक्क त्याच्या जन्मावरून ठरत नाहीत, ही धारणा विवेकनिष्ठ जीवनाचा सामाजिक पाया आहे. त्यामुळे विवेकवादी जीवन समाजाच्या प्रगतिशील आणि मानवतावादी विकासासाठी अनिवार्य ठरते. विवेकवादामुळेच समाजातील वैज्ञानिक शिक्षणाची, आरोग्याची, स्वच्छतेची, पर्यावरणरक्षणाची आणि मानवी हक्कांची जाणीव सुदृढ होते.

विवेकनिष्ठ जीवनाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे निर्णयक्षमता. श्रद्धाधारित विचारात निर्णय हा बहुधा मान्यतेवर किंवा आदेशावर आधारित असतो; परंतु विवेकवादी एखादा निर्णय घेताना उपलब्ध पुरावे, तर्कसंगती, परिणामांचे विश्लेषण आणि भूतकाळातील अनुभव यांचा वापर करतो. ही पद्धत केवळ वैयक्तिक जीवनापुरती मर्यादित नसून समाजव्यवस्था, सार्वजनिक धोरणे, शैक्षणिक प्रणाली आणि न्यायव्यवस्था यांना लागू होते. उदाहरणार्थ, कारागृह धोरणे, आरोग्यसेवा, शिक्षण, कायदे, कर-नीती यांसारख्या गोष्टींचे निर्णय श्रद्धा, भावनावश निर्णय किंवा लोकप्रिय मागणी यावर न घेता पुराव्यांवर आधारित (evidence-based) घेणे समाजासाठी अधिक हितकारक असते हे आज जगातील अनेक देशांनी सिद्ध केले आहे. विवेकवाद याच प्रकारच्या निर्णयक्षमतेला प्रोत्साहन देतो. वैज्ञानिक पद्धतीमुळे आपण मानवी वर्तन, सामाजिक रचना आणि आर्थिक प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजू शकतो आणि त्यावर आधारित निर्णय अधिक न्यायकारी आणि टिकाऊ असतात.

विवेकनिष्ठ जीवन म्हणजे केवळ नकारात्मक पद्धतीने 'हे करू नका' असे सांगणारी चौकट नाही; उलट ती सर्जनशील, समाधान-केंद्रित आणि भविष्याभिमुख विचारधारा आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी विवेकवादी तर्काचा वापर करतो. उदाहरणार्थ, आरोग्याच्या समस्या जादूटोणा किंवा धार्मिक विधींनी सुटत नाहीत; परंतु वैज्ञानिक वैद्यकाने त्या नियंत्रित होतात. आर्थिक विषमता ‘कर्मफल’ म्हणून स्वीकारण्यात काहीही अर्थ नाही; त्या दूर करण्यासाठी पुराव्यावर आधारित आर्थिक धोरणे गरजेची आहेत. पर्यावरणीय संकटे ‘दैवी कोप’ मानून टाळता येत नाहीत; ती मानवी क्रियांच्या कारणात्मक विश्लेषणातून आणि वैज्ञानिक उपाययोजनांतून सोडवावी लागतात. विवेकनिष्ठ जीवन या सर्व समस्यांकडे समाधानाभिमुख दृष्टीने पाहते आणि हेच त्याचे सामर्थ्य आहे.

अखेर विवेकनिष्ठ जीवनाचा सर्वोच्च परिणाम म्हणजे मानवी स्वातंत्र्य. श्रद्धा, अंधश्रद्धा, धार्मिक बंधने आणि अधिकारवादी नियंत्रण यांचा पाश कापून जेव्हा व्यक्ती स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारते तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होते. ही स्वतंत्रता केवळ वैयक्तिक नाही; ती सामाजिकही आहे. विवेकनिष्ठ समाजात प्रत्येकाला समान संधी, समान हक्क आणि प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य मिळते. प्रश्न विचारणारी संस्कृती टिकवण्यासाठी विवेकवाद हा समाजाच्या नैतिक आधारभूत संरचनेत आवश्यक घटक ठरतो. कारण जेथे विवेक नष्ट होतो तेथे अंधश्रद्धा, दडपशाही आणि हिंसा वाढते आणि जेथे विवेक वाढतो तेथे समता, स्वातंत्र्य आणि न्याय यांचा पाया मजबूत होतो. थोडक्यात सांगायचे तर, वैज्ञानिक पद्धती ‘काय आहे’ हे सांगते आणि विवेकवाद ‘काय करावे’ याचा तर्कशुद्ध मार्ग दाखवतो. वैज्ञानिक पद्धती नसती तर आपल्याला विश्वाचे, निसर्गाचे आणि मानवी व्यवहारांचे सत्य कळले नसते आणि विवेकवाद नसता तर त्या सत्याच्या आधारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली नसती. विवेकनिष्ठ जीवन म्हणजे तर्क आणि मूल्ये, तथ्य आणि कृती, ज्ञान आणि नैतिकता यांच्या सुंदर समन्वयातून घडणारी मानवी समृद्धीची चौकट आहे. अशा जीवनामुळे व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या स्वतंत्र, नैतिकदृष्ट्या मजबूत आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनते. विवेक, विज्ञान, मानवी कल्याण आणि नैतिक तर्क यांच्या आधारावर उभारलेली ही जीवनशैली आधुनिक मानवाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या शाश्वत भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

लेखक विज्ञान प्रसारक आहेत.

jetjagdish@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in