दिलासा

बालरंगभूमीपासून प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांपर्यंत, साहित्यापासून सामाजिक चळवळींपर्यंत रत्नाकर मतकरी यांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देतानाच त्यांच्या आजही सुरू असलेल्या कार्याचा घेतलेला हा वेध.
दिलासा
दिलासा
Published on: 

विशेष

गणेश मतकरी

बालरंगभूमीपासून प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांपर्यंत, साहित्यापासून सामाजिक चळवळींपर्यंत रत्नाकर मतकरी यांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देतानाच त्यांच्या आजही सुरू असलेल्या कार्याचा घेतलेला हा वेध.

आपल्या जवळचं माणूस गेलं तर काही वर्षांत आपल्याला त्याच्या नसण्याची सवय होईल असं मानलं जातं पण ते काही खरं नाही. अशी सवय वगैरे होत नाही. ती जागा रिकामी आहे हे जाणवतंच. माझे वडील रत्नाकर मतकरी गेले, त्याला आता सहा वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी त्यांचं नसणं त्रास देत राहतं. बाबांना सतत कामात राहायची सवय होती. कोविडकाळाच्या स्तब्धतेतही तो उलटल्यावर काय काय करायचं याच्या नव्या योजना त्यांच्या डोक्यात सुरूच होत्या. आपल्या स्वभावानुसार त्यातलं बरंच काही त्यांनी तडीला नेलं असतं याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

बाबा आपल्याकडले महत्त्वाचे लेखक आहेत आणि त्यात त्यांची कामगिरी अष्टपैलू म्हणण्यासारखी आहे. एकांकिका, बालनाट्य, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं, गूढ आणि इतरही प्रकारच्या कथा, ललित लेख, सदरं, आत्मकथनात्मक लेखन आणि पटकथा, यातलं सारं त्यांनी लिहिलं आणि अगदी यशस्वीपणे लिहिलं. आजदेखील त्यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे मुलांचं आणि ‘एकदा पहावं करून’ हे मोठ्यांचं अशी दोन नाटकं रंगभूमीवर गाजतायत आणि वाचन कमी होत असल्याची चाहूल लागलेल्या काळात त्यांच्या साहित्याला उत्तम वाचकवर्ग आहे, यावरूनही ते सिद्ध होईल. पण तसं असूनही त्यांना केवळ लेखक असण्यात समाधान नव्हतं. परफॉर्मन्स हे त्यांच्या लिखाणाचं एक मोठं अंग मला वाटतं. प्रेक्षकांसमोर सादर होण्याची शक्यता ही त्यांच्या लिखाणाचा एक भागच आहे आणि ते प्रेक्षकांसमोर काय रीतीने मांडलं जावं याबद्दलही त्यांची निश्चित मतं होती. त्यामुळेच ते निव्वळ लेखक राहिले नाहीत तर दिग्दर्शकही झाले. बालनाट्य चळवळीचा पाया असलेली दोन नाटकं ‘मधुमंजिरी’ आणि ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’ ही सुधाताई करमरकरांच्या लिटल थिएटरसाठी लिहिल्यावर त्यांना वाटायला लागलं की नाटकं निव्वळ सुंदर, भव्य असण्यापेक्षा मुलांच्या जवळची हवीत, त्यांना विश्वासात घेऊन ती करायला हवीत. या विचारातून त्यांनी ‘निम्मा शिम्मा राक्षस’ करायला घेतलं आणि आई आणि काही विश्वासू कलावंतांसह ‘बालनाट्य’ संस्था उभी केली. ‘बालनाट्य’, ‘सूत्रधार’ आणि ‘महाद्वार’ या तीन संस्था त्यांनी चालवल्या. आरण्यक, लोककथा ७८, दुभंग, घर तिघांचं हवं, इंदिरा, अशी त्यांची अनेक महत्त्वाची नाटकं त्यांनी आमच्या संस्थांसाठी किंवा इतर निर्मात्यांसाठीही केली. त्यांच्या कथांमधून ‘गहिरे पाणी’सारखी मालिका किंवा ‘इन्वेस्टमेन्ट’सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ते बनवू शकले.

या सगळ्यातून एक गोष्ट झाली की वेगवेगळ्या वाचकप्रेक्षकांसाठी त्यांच्या वेगवेगळ्या ओळखी बनत गेल्या. मुलांसाठी नाटकं करणारे मतकरीकाका, गूढकथाकार मतकरी, ‘लोककथा ७८’सारखी प्रायोगिक कलाकृती देणारा नाटककार, ‘चार दिवस प्रेमाचे’ किंवा ‘एकदा पहावं करून’सारख्या उत्तम व्यावसायिक नाटकांचे लेखक, नाट्य-चित्रपट दिग्दर्शक असे अनेक मतकरी त्यांच्या चाहत्यांना माहीत होते. मला कधी कधी असं वाटायचं की या अनेक प्रकारचं काम करण्यापेक्षा एकाच प्रकारच्या लेखनावर ते लक्ष केंद्रित करत असते तर आत्तापेक्षा अधिक लेखन होऊ शकले असते का किंवा चाहत्यांसमोरही एक ओळख अधिक ठळकपणे उभी राहिली असती का? पण नाही. हे सारे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भागच होते. एकच ओळख कदाचित अधिक ठळक झालीही असती, पण ती अपुरीही राहिली असती.

साहित्य, नाट्य, यांच्या जगापलीकडे एका गोष्टीचा विचार बाबा नेहमीच गंभीरपणे करत आणि ती गोष्ट म्हणजे सामाजिक बांधिलकी. साहित्यिक हे अनेकदा पॅसिव्ह ॲक्टिविस्ट असल्याचं दिसतं. याचा अर्थ त्यांचा लढा हा त्यांच्या लेखणीमार्फत चालतो. रस्त्यावर ते क्वचितच उतरतात. आता मला हा दृष्टिकोन अमान्य आहे असं अजिबातच नाही. प्रत्येकाने आपल्याला लढण्यासाठी जो मार्ग योग्य वाटेल तो निवडावा याच मताचा मी आहे. पण बाबांनी नेहमीच शक्य त्या सगळ्या मार्गांनी लढण्याचा प्रयत्न केला. ‘लोककथा ७८’, ‘गणेशगिरणीचा धैकाला’सारखी सामाजिक अत्याचाराला तोंड फोडणारी नाटकं, ‘इन्वेस्टमेन्ट’सारखा समाजावर परखड टीका करणारा चित्रपट, ‘कायमचे प्रश्न’ या लेखसंग्रहात दिसणारे सामाजिक आणि राजकीय लेख, यांमधून त्यांनी आपली लेखणी वापरली, पण त्यावर ते थांबले नाहीत. साहित्यसंमेलनातल्या राजकीय हस्तक्षेपापासून, निर्भय बनो आंदोलनापर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. नर्मदा बचाव आंदोलनासाठी त्यांनी नाट्यकृती वा लेखाऐवजी चित्रांच्या माध्यमातून आपले विचार मांडले (ही चित्रं साने गुरुजी स्मारकामध्ये आताही पाहता येतात). समाजाच्या विकासात जगभरातल्या रंगभूमीने कसा सहभाग घेतला याचा विचार करताना त्यांना आपल्याकडेही असं थिएटर असणं आवश्यक वाटलं आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या मदतीने त्यांनी ठाणे परिसरात ‘वंचितांचा रंगमंच’ हा उपक्रम सुरू केला. संजय मंगला गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आजही चालू आहे. प्रत्येकाला आपल्या समस्या आपल्या शब्दांत मांडण्यासाठी या रंगमंचावर संधी मिळते. बाबांसाठी त्यांचं लेखन जितकं महत्त्वाचं होतं, तितकीच ही समाजविधायक कामंही होती, ज्यांमध्ये त्यांनी मागेपुढे न पाहता आणि आपल्या वैयक्तिक फायदा-नुकसानाचा विचार न करता कायमच सहभाग नोंदवला.

मी आणि माझी बहीण सुप्रिया यांच्यावर त्यांचे संस्कार झाले का? तर झाले असणारच. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. आम्ही दोघं आणि आई केवळ त्यांच्या कुटुंबातलेच होतो असं नाही, तर त्यांचे सहकारीही होतो. आमचं घर हे थोडं घर, थोडं ऑफिस, थोडी कार्यशाळा, थोडं वाचनालय असं संमिश्र स्वरूपाचं होतं. बालनाट्य, सूत्रधार या संस्था ऐन जोमात असताना दिलीपकाका (प्रभावळकर), सोमणकाका (वसंत सोमण), रवीकाका (पटवर्धन), औंधेकाका (अरविंद औंधे) अशा अनेकांची घरी कायमच ये-जा असे. त्यांच्याबरोबर राहून, नाटकांमध्ये कामंही करून त्यातल्या क्रिएटिव प्रोसेसची, प्रत्यक्ष जबाबदारीची, कष्टांची माहिती तर आम्हाला प्रत्यक्षच मिळत गेली. पण बाबांचं लेखन जसं या कक्षा ओलांडून पुढे जात गेलं, तसं आम्हालाही त्यातून शिकता आलं. बाबांच्या तोंडून त्यांचं नवं लेखन कायम ऐकता आलं, त्यांच्याशी त्यावर आणि इतर कलाविश्वाविषयी चर्चा करता आली. आम्ही काय शिकावं यावर घरी बंधन नव्हतं, त्याप्रमाणे सुप्रियाने कलाशिक्षण घेतलं, तर मी वास्तुकलेचं. पण फिरून आम्ही आलो ते घराने शिकवलेल्या क्षेत्रांकडेच. तिने अभिनय निवडला आणि मी लेखन. कधी कधी वाटतं, की त्यांनीच आम्हाला या दिशेने जावं असं का सुचवलं नाही? तसं ते करते तर कदाचित आमची काही वर्षं वाचली असती. पण प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य मिळायला हवं अशी एक भावना त्यांच्या मनात असावी. शिवाय आपला मार्ग आपण निवडण्यातही एक वेगळी गंमत असतेच. कदाचित त्यांना ती आमच्याकडून हिरावून घ्यायची नसेल.

१७ नोव्हेंबरला बाबांचा वाढदिवस, ते गेल्यानंतरचा सातवा. ते नसण्याची सवय अजून झालेली तर नाहीच आणि तसं पाहिलं तर ती होणंही कठीण आहे. त्यांची नवी नाटकं, नव्या कथा आता लिहिल्या जाणार नाहीत. त्यांनी आखलेल्या योजना त्यांच्या गतीने पुऱ्या होणार नाहीत.

तरीही, मेहता प्रकाशनातर्फे नुकत्याच आलेल्या ‘काळी राणी’सारखी त्यांची अजूनही प्रकाशित होणारी नवी कोरी पुस्तकं, त्यांची चालू असलेली आणि नव्याने रंगभूमीवर येणारी नाटकं, त्यांच्या पुस्तकांवर येणारे अभिप्राय, त्यांच्या नाटकांच्या स्पर्धांमधल्या प्रयोगांसाठी नव्या-जुन्या रंगकर्मींकडून सतत होणाऱ्या विचारणा, हे सारं मात्र अजूनही पूर्वीसारखं सुरू आहे आणि तसं ते सुरू राहीलही. ते होते तेव्हा ते सतत कामात असत. आता ते नसतानाही त्यांचं काम तसंच जोरात चालू आहे, हाच एक दिलासा!

ganesh.matkari@gmail.com