खरा जादूगार कोण बरं?

चमत्कार म्हणजे जादू नव्हे, तर एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणारी छोटीशी मदतसुद्धा चमत्कारच असते! विहानला हे कसं समजलं त्याची ही गोष्ट-
खरा जादूगार कोण बरं?
खरा जादूगार कोण बरं?
Published on: 

कथा

मंगल देवदत्त परुळेकर

चमत्कार म्हणजे जादू नव्हे, तर एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणारी छोटीशी मदतसुद्धा चमत्कारच असते! विहानला हे कसं समजलं त्याची ही गोष्ट-

चमत्कार म्हणजे नक्की काय रे?”

विहानने सायन्सच्या वहीवर निळ्या बॉलपेनाने मोठे प्रश्नचिन्ह काढले आणि पेन हनुवटीवर टेकवून तो खिडकीबाहेर बघू लागला.

दुसऱ्या दिवशी शाळेत ‘माझ्या आयुष्यातला चमत्कार’ या विषयावर तीन मिनिटे बोलायचे होते. सुट्टीत मित्रांच्या गप्पा ऐकून विहानचे डोके पार चक्रावून गेले होते. कबीर वैष्णोदेवीला हरवलेला भाऊ कसा सापडला, ते सांगणार होता; रोहन जुन्या देवराईतल्या अद्भुत गोष्टीची तयारी करत होता, तर रिया तिच्या यूट्यूबवर पाहिलेल्या गूढ व्हिडीओबद्दल बोलणार होती.

विहानला मात्र काहीच सुचत नव्हते. चमत्कार म्हणजे काय? हवेत हात फिरवून काहीतरी गायब करणे, की अशक्य अशी एखादी जादू अचानक घडणे? त्याच्या साध्या आयुष्यात असा कोणताही चमत्कार घडलेला नव्हता.

शाळा सुटल्यावर सोसायटीच्या आवारात नेहमीप्रमाणे बाकावर जोशी आजोबा बसले होते. पांढरा सदरा, चष्मा आणि हातात जाडजूड पुस्तक. विहानचा पडलेला चेहरा बघून आजोबांनी विचारले, “काय रे विहानबाबू! आज इतका विचारात का?”

विहानने बाकावर बसत शाळेतली सगळी डोकेदुखी आजोबांसमोर मांडली. आजोबा शांतपणे हसले. त्यांनी पुस्तक मिटले आणि म्हणाले, “अरे, मग तुला काय वाटतं? चमत्कार म्हणजे काय?”

“म्हणजे… जे माणसाला करता येत नाही, काहीतरी अद्भुत किंवा जादू!” विहान म्हणाला.

“हं… विहान, चमत्कार शोधायला आकाशाकडे किंवा जुन्या अद्भुत गोष्टींकडे बघू नकोस. आजूबाजूला काय घडतंय, माणसे कशी वागतात, ते फक्त शांत डोळ्यांनी बघ. तुला चमत्कार आपोआप दिसेल.”

आजोबांचे बोलणे विहानला पूर्ण समजले नाही, पण त्याने तो विचार मनात पक्का ठेवला.

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्याला त्याची उत्तरे मिळू लागली. शाळेच्या बसमधून उतरताना गेटजवळ एका लहान कुत्र्याच्या पिल्लाचा पाय जुन्या प्लास्टिकच्या दोरीत करकचून अडकला होता. ते वेदनेने विव्हळत होते. पहिली घंटा वाजायला दोनच मिनिटे बाकी होती. उशीर झाला तर सरांचा ओरडा बसण्याची भीती होती. मनात एक सेकंद विचार आला, पण लगेच विहान तिथेच थांबला. त्याने बॅग बाजूला ठेवली, पिल्लाच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि कंपासमधल्या छोट्या कात्रीने ती प्लास्टिकची दोरी हळूच कापून काढली.

पाय मोकळा होताच पिल्लाने विहानच्या हाताला ओल्या नाकाने चाटले आणि आनंदाने शेपटी हलवत ते बागेत पळाले.

विहान वर्गात उशिरा पोहोचला. सरांनी त्याला दारात उभे ठेवले; पण विहानच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.

दुपारी मधल्या सुट्टीत आरव धावत आला. “ए विहान, ग्राऊंडवर आपली क्रिकेट मॅच आहे, चल पटकन!”

विहान बॅट घेणार, तितक्यात शेजारी बसलेली सानिया दिसली. तिचा सायन्स प्रोजेक्टचा मोठा चार्ट अजून अर्धवट होता आणि तिच्या हातून त्यावर पाण्याचा रंग सांडल्याने ती रडवेली झाली होती. पुढच्याच तासाला तो जमा करायचा होता. विहानने बॅटकडे पाहिले आणि क्रिकेटचा मोह बाजूला ठेवला. “आरव, तुम्ही खेळा, मला जरा काम आहे,” म्हणत तो सानियाच्या शेजारी बसला. त्याने आपल्याकडचा नवा कागद देऊन तिला भराभर सुंदर डायग्राम्स काढून दिले. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यावर सानियाच्या डोळ्यांत तरळलेला आनंद पाहून विहानला मॅच जिंकल्यापेक्षा जास्त आनंद झाला.

संध्याकाळी घरी आल्यावर मोबाईल गेममधली एक महत्त्वाची मॅच सुरू होणार होती. तो फोन घेणार तेवढ्यात आई म्हणाली, “विहान, आजीचे गुडघे खूप दुखतायत. तिला दवाखान्यात नेशील का रे?”

विहानचा मूड गेला. त्याने नाराजीने आजीकडे पाहिले. वेदनेने आजीने डोळे मिटले होते आणि हात गुडघ्यावर दाबून धरला होता. विहानच्या मनात काहीतरी हलले. त्याने कसलाही विचार न करता मोबाईलची स्क्रीन लॉक केली आणि फोन बाजूला ठेवला.

“चल आजी, मी धरतो तुझा हात. हळूहळू जाऊया.”

दवाखान्यात पायऱ्या चढताना आजीने त्याचा हात घट्ट धरला होता. डॉक्टरांच्या केबिनबाहेर बसताना आजीने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. “तू सोबत आलास ना, की मला खूप धीर मिळतो रे!” त्या एका वाक्याने विहानची गेम चुकल्याची उरलीसुरली नाराजी पार धुवून काढली.

रात्री जेवण झाल्यावर विहानने वही उघडली. वर लिहिले होते- ‘माझ्या आयुष्यातला चमत्कार.’ आता मात्र शब्द झरझर कागदावर उतरत होते.

दुसऱ्या दिवशी वर्गात विहान स्टेजवर उभा राहिला. माईक हातात धरून तो अगदी सहज म्हणाला, “मित्रांनो, कालपर्यंत मला वाटायचं की चमत्कार म्हणजे एखादी जादू किंवा आकाशातून काहीतरी अशक्य घडणे. पण मला काल समजले- जेव्हा आपल्याला स्वतःचा खेळ, मोबाईल किंवा सोय महत्त्वाची वाटत असते, पण त्याच क्षणी आपण स्वतःचा विचार बाजूला ठेवून दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून जातो… तेव्हा आपल्या मनात एक सुंदर बदल घडतो. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे आणि दुसऱ्याची काळजी घेणे, हाच या जगातला खराखुरा चमत्कार आहे!”

वर्गात दोन सेकंद शांतता पसरली आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला! विहान हसत आपल्या जागेवर येऊन बसला. खिडकीबाहेर शाळेच्या गेटजवळ तेच छोटे पिल्लू उन्हात मस्त बागडत होते. त्याने विहानकडे बघून आनंदाने शेपटी हलवली.

विहानच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटले. खरोखरच, चमत्कारासाठी कुठल्या जादूची गरज नसते; डोळे आणि मन उघडे ठेवले, तर तो आपल्या प्रत्येकाच्या आतच घडत असतो!

mdparulekar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in