

जगतवारी
मेधा आलकरी
जर्मनीतील ‘रापुन्झेल’ या परीकथेतील लांबसडक केसांची नायिका जशी कल्पनेत भेटते, तशीच तिचा मूर्तिमंत आविष्कार मला दक्षिण चीनमधील रेड याओ जमातीच्या स्त्रियांमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळाला.
रापुन्झेल ही जर्मनीतील एक अत्यंत लाडकी परीकथा! युरोपातील सिंड्रेलासारखी. गोरीपान, मंजुळ आवाज आणि लांबसडक केस असलेल्या या नक्षत्रासारख्या सुंदर मुलीला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून तिच्यावर आईसारखं प्रेम करणारी चेटकीण तिला एका उंच मनोऱ्यात बंद करून ठेवते. त्याला दार नसतं, फक्त एक खिडकी असते छोटीशी. वर जायचं असेल तेव्हा चेटकीण रापुन्झेलला हाक मारायची. ती मग आपले लांबसडक केस खिडकीतून खाली सोडायची. त्या केसांच्या दोरखंडाला धरून चेटकीण वर जात असे. कर्मधर्मसंयोगाने एक राजकुमार रापुन्झेलचे केस बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. चेटकिणीच्या आवाजाची नक्कल करत तो रापुन्झेलच्या केसांच्या दोरावरून वर चढून जातो आणि तिच्याशी लग्न करतो. अशी
ही सुखांतिका!
या लांबसडक केसांच्या रापुन्झेल मी प्रत्यक्ष पाहिल्या, दक्षिण चीनमधील भातशेतीच्या व्हांगलो नामक खेड्यात. लाल रंगाच्या ब्लाऊजवर नाजूक कशिदा आणि काळ्या स्कर्टवर टपोऱ्या गुलाबांचं भरतकाम असलेल्या या ‘रेड याओ’ जमातीच्या बायका म्हणजे चीन देशीच्या रापुन्झेल! प्रत्येकीचे केस टाचेपर्यंत लांब आणि काळे कुळकुळीत. केसांची २.१ मीटर लांबी हा व्हांगलो गावातील जागतिक विक्रम आहे. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तशी नोंद आहे.
रेड याओ जमातीतील बायका आयुष्यात फक्त एकदाच केस कापतात. वयाच्या सोळाव्या वर्षी समारंभपूर्वक कापलेले हे केस मुलीच्या आजीच्या हाती सुपूर्द केले जातात. आजी काळजीपूर्वक त्याचं एक गंगावन करून सुबक अंबाडा घालते. मुलीच्या लग्नात हा अंबाडा सजवून जावयाला आहेर म्हणून दिला जातो. रोजचं गुंतवळ फेकून न देता त्याचंही एक गंगावन बनवतात. लग्नानंतर मुलीने रोजच्या केशरचनेत त्या दोन्ही गंगावनांचा उपयोग करायचा असतो. आधीच स्वतःचे टाचेपर्यंत रुळणारे लांब केस आणि त्याला या दोन गंगावनांचं शेपूट! हा भलामोठा भारा डोक्यावर गुंडाळून त्याची अगदी सुबक केशरचना करण्यात या मुली पटाईत. या केशरचनेत ही ललना आपले सारे केस डोक्यावरून पुढे घेते, त्याचा घट्ट पिळा करते आणि चुंबळीसारखा तो डोक्याच्या शिरोभागी गुंडाळते. मग अर्ध्यात त्याला ही गंगावनं जोडते. प्रत्येक वेळी केसाचा पिळा गुंडाळताना चुंबळ वर उचलते, त्याच्याखालून घेतलेला शेपटा लाकडाच्या कंगव्यानं छान विंचरते आणि पुन्हा चुंबळीखालून काढते. असं करत करत तिच्या डोक्यावर केसांचा जणू एक ट्रे तयार होतो.
रेड याओ जमातीच्या परंपरेप्रमाणे अविवाहित मुली पुरुषांची नजर पडू नये म्हणून आपले केस नीटनेटकेपणाने बांधलेल्या एका काळ्या स्कार्फने झाकून ठेवतात. कपाळावर कुंकवाच्या जागी येणाऱ्या स्कार्फच्या टोकावर लाल रेशमाचं नाजूक भरतकाम केलेलं असतं. लग्न झालं की स्कार्फच्या बंधनातून मुक्ती! आता तिला गंगावनं वापरून ती चुंबळीची केशरचना करायची मुभा असते. एकदा का ती लेकुरवाळी झाली की त्या चुंबळीतूनच कपाळावर टेंगुळ यावं असा एक अंबाडा घालायचा असतो. काळ्याभोर तुकतुकीत केसांची ही रचना खूपच सुबक आणि आकर्षक दिसते.
चार-पाचशे वर्षं जुन्या व्हांगलो गावात आम्ही प्रवेश केला तोच मुळी एका झुलत्या पुलावरून. पुलाच्या दोन्ही बाजूस या ‘लाल’ना सुरेल स्वागतगीत गात उभ्या होत्या. गावात शिरताच आधी लक्ष वेधून घेतात ती त्यांची बांबूवर उभी असलेली, लांबोळक्या खोल्यांची, शाकारलेल्या कौलारू छपरांची, चिनी लाल कंदील लटकवलेली तिमजली घरं. तळमजला लहान आणि दुसरा व तिसरा मजला क्रमाक्रमानं मोठा होत गेलेला. पूर्वी तळमजला गोठ्यासाठी वापरला जाई. आता ती जागा तांदूळ साठवण्याच्या गोदामांनी घेतली आहे. पहिला मजला हे कुटुंबीयांचं राहतं घर. त्यात माजघर ऐसपैस, पुढच्या बाजूस मोकळं ढाकळं स्वयंपाकघर आणि मागे विश्रांतीच्या खोल्या. कुतूहलापोटी स्वयंपाकघरात डोकावले. डुकराचं मांस धुरी घेत होतं, मक्याची कणसं खुंटीवर अंग वाळवत होती आणि चुलीवर भाताचं आधण रटरटत होतं. या जमातीच्या मुख्य जेवणात भाताबरोबर बटाटा, मका, सोयाबीन, लाल भोपळा यांचा समावेश असतो; तर सणासुदीला एखादा खमंग भाजून रुचकर बनवलेला पक्षी!
बायका अगदी हरहुन्नरी! फावल्या वेळात हात भरतकामात गुंतलेले. त्या सगळ्याजणींचा वेष सारखा. लाल झंपर, काळा स्कर्ट, कंबरेला पट्टा, काळे कापडी बूट आणि गुडघ्यापर्यंत येणारे लाल मोजे. चांदीच्या दागिन्यांचा खूप सोस यांना. कानात मोठ्या रिंगा, गळ्यात माळा, हातात जाड कंकण, कमरेच्या पट्ट्यात लाकडी कंगवा खोचलेला आणि उजवीकडे लटकणारी लाल रेशीमकाम केलेली कापडी पर्स. या सगळ्या सरंजामाबरोबर त्यांच्या मुखावर असतं एक मधाळ लाघवी स्मित!
गावातील बायका पर्यटकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम करतात. त्यात त्यांच्या परंपरा, संस्कृती, नाच-गाणी, शिवाय एक लुटुपुटुचा लग्नसोहळाही सादर केला जातो. या जमातीतील स्त्रियांना आपला जोडीदार आपणच निवडायची मोकळीक आहे. तिथे पालकांची लुडबुड नसतेच. घरजावई होणं नामुष्कीचं समजलं जात नाही. ‘आपली आवड’ दर्शविण्याची एक विचित्र पद्धत आहे त्यांच्याकडे. आवडलेल्या पुरुषाच्या पार्श्वभागाला चिमटा काढून ही ‘अपना बना ले मेरी जान’ इच्छा जाहीर केली जाते. हे ‘चिमटलेले’ पुरुष मग त्यांच्या वाग्दत्त वधूची निवड करताना प्रामुख्याने तीन गोष्टींची पारख करून घेतात. पहिली, तिचा आवाज खणखणीत हवा. डोंगरावरील भातशेतीच्या कामात गुंतलेल्या नवऱ्याला ‘भात निवून चालला होsss!’ अशी घरधनीणीची दमदार हाक पोहोचायला हवी. दुसरी, तिची पावलं फताडी हवीत. ती कशाला? चिनी बायकांच्या नाजूक, आकाराने छोट्या पावलांच्या अट्टाहासाच्या अनेक क्लेशदायक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. पुरुषांना आवडतात म्हणून राजघराण्यातील आणि उच्चभ्रू समाजातील कुमारिकांची पावलं कोवळ्या वयात घट्ट लोखंडी बुटात बांधून ठेवत असत आणि हे रेड याओ जमातीतले पुरुष म्हणताहेत की त्यांना फताड्या पावलांची वधू हवी. आश्चर्यच आहे! त्यांच्या मते रोज डोंगरमाथा तुडवायला नाजूक पावलं कामाची नाहीत. तिसरी गोष्ट ही की पाय फताडे असले तरी हात मात्र त्यांना नाजूक हवेत. घ्या! पावलांची तहान हातांवर? नव्हे! भरतकाम करायला नाजूक आणि छोटे छोटे हात हवेत, तरच टाके घट्ट आणि सुबक घातले जातात म्हणे. ऐकावे ते नवलच!
सांस्कृतिक कार्यक्रमात काही पर्यटकांनाही चिमट्यांचा प्रसाद मिळाला. त्यानंतर झालेल्या लुटुपुटुच्या लग्नात त्यांना रेड याओ पद्धतीप्रमाणे त्यांच्या वाग्दत्त वधूला पाठुंगळी बसवून पळवून न्यावं लागलं. याच कार्यक्रमात या स्त्रियांचे अंबाड्यातून खळकन सुटलेले दाट, काळे, मोकळे रेशमी केस पाठीवरून घसरत, पोटऱ्यांना स्पर्शून टाचेखाली घरंगळत गेलेले पाहिले आणि मला कवी ग्रेस यांची कविता आठवली.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी,
तुझे केस पाठीवरी मोकळे,
इथे दाट छायांतुनि रंग गळतात
या वृक्षमाळेतील सावळे!
नदीकिनारी केस धूत असलेल्या बायकांचं दर्शन आता जरी सर्रास झालं असलं; तरी ऐंशीच्या दशकापर्यंत परपुरुषाने केस पाहणं आक्षेपार्ह होतं. वाट चुकलेल्या एखाद्या वाटसरूनं अशा कुणा ‘गावकी छोरी’ला पाहिलंच, ‘घनदाट कुंतली, नजर गुंतली, मोहून गे सुंदरी’ असं काव्य त्याच्या मनात स्फुरलं आणि तो क्षणभर जरी तिथे थबकला, तर तिथल्या प्रथेप्रमाणे त्याला पुढची किमान तीन वर्षं घरजावई म्हणून तिच्या घरात राहावं लागे.
कार्यक्रमात सादर केलेल्या अशा चालीरीती पाहत असताना रंगमंचावरील खिडक्यांमधून या स्त्रियांनी आपले केस खाली सोडले तेव्हाच मी मनोमनी त्यांना ‘रापुन्झेल’ हा किताब बहाल केला. त्यानंतर त्यांनी आमच्यासमोर या विविध केशरचना सादर केल्या. इथल्या ऐंशी वर्षांच्या म्हातारीचा चेहरा सुरकुतलेला असला तरी केसांमध्ये रुपेरी झाक अजिबात नाही. यामागचं गुपित जाणून घ्यायची आमची इच्छा शिगेला पोहोचली होती. स्थानिक जडीबुटी विकत घ्यायची मानसिक तयारीही केली आम्ही. परंतु ते गुपित लपलं होतं त्यांच्या स्वयंपाकघरात- तांदळाचं धुवण किंवा भाताची पेज! रेड याओ बायकांसाठी हा लांब केशसंभार म्हणजे परमसौभाग्य, लक्ष्मीचा वरदहस्त आणि उदंड आयुष्य!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com