गंगाराम गवाणकर - अस्सल मालवणी 'गजालिया'

वस्त्रहरण नाटकाच्या पलीकडे गंगाराम गवाणकरांची एक ओळख होती. माणूस म्हणून, कलाकार म्हणून, लेखक म्हणून. या सगळ्या ओळखींचा लसावी म्हणजे गजालिया. नाना गजाली रंगवून सांगणारा अवलिया. त्यांना अलविदा करताना त्यांच्यातल्या गजालियाचं स्मरण करायलाच हवं.
 गंगाराम गवाणकर - अस्सल मालवणी 'गजालिया'
Published on

स्मरण

श्रीनिवास नार्वेकर

वस्त्रहरण नाटकाच्या पलीकडे गंगाराम गवाणकरांची एक ओळख होती. माणूस म्हणून, कलाकार म्हणून, लेखक म्हणून. या सगळ्या ओळखींचा लसावी म्हणजे गजालिया. नाना गजाली रंगवून सांगणारा अवलिया. त्यांना अलविदा करताना त्यांच्यातल्या गजालियाचं स्मरण करायलाच हवं.

गजालिया...

मुद्दामच हा शब्द वापरलाय. या लेखाच्या शीर्षकासाठी विचार करताना अचानकच हा शब्द सुचला. अगदी साधं राहून प्रचंड काही करत राहणाऱ्या थोर, तपस्वी वगैरे व्यक्तीसाठी आपण ‘अवलिया’ हा शब्द वापरतो. त्याच अर्थाने हा लेख लिहिता लिहिता ‘गजालिया’ हा शब्द सुचला आणि तो नेमक्या गंगाराम गवाणकरांसारख्या गजाली सांगणाऱ्या, आपल्या नाटकांच्या माध्यमातून रसिकांना नेहमीच दर्जेदार व निखळ अनुभव देणाऱ्या, कायम रसिकांच्या मैफलीत रमणाऱ्या नि स्वभावत:च गप्पिष्ट असणाऱ्या माणसाच्या बाबतीत सुचावा, हा नक्कीच एक योग आहे.

गंगाराम गवाणकर.

मच्छिंद्र कांबळी यांनी ज्यांच्या लेखनाच्या माध्यमातून मालवणी बोली मराठी व्यावसायिक रंगभूमीवर रुजवली, फुलवली, सातासमुद्रापार पोहोचवली त्या विक्रमी ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक. गवाणकरांची बहुतांशी ओळख ही ‘वस्त्रहरण’मुळे असली, तरी त्यांची ओळख त्यापलीकडे कितीतरी अधिक आहे आणि ‘वस्त्रहरण’इतकीच ती फार महत्त्वाची आहे. ती ओळख केवळ एका नाटककाराची किंवा लेखकाची नाही, तर कधी काळी गावचे खोत असूनही नंतर कष्टात बालपण गेलेल्या, ऐन तारुण्यात जगण्यासाठी प्रचंड धडपड केलेल्या, स्वत:ची ओळख घडवू पाहताना कष्टाने जे काही करायला लागेल, ते करायला अजिबात न कचरणाऱ्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळवून पदविका मिळवणाऱ्या दामू केंकरेंना वाचण्यासाठी दिलेल्या एकांकिकेची संहिता हरवल्यानंतरही त्याच संकल्पनेवर ‘वस्त्रहरण’ नावाचं नाटक लिहून ते जगभरात पोहोचवणाऱ्या आणि सगळं काही मिळाल्यानंतरही आपले पाय जमिनीवर ठेवून वावरणाऱ्या एका मोठ्ठ्या असलेल्या अगदी साध्या माणसाची ती ओळख आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी राजापुरातल्या माडबनमधल्या आपल्या गावातल्या हौशी कलाकारांना घेऊन ‘वस्त्रहरण’ बसवणाऱ्या आणि त्यामध्ये तात्या सरपंचाची भूमिका उत्साहाने स्वत:च करणाऱ्या गंगाराम गवाणकर नावाच्या खेळियाची ती ओळख आहे.

गवाणकरांशी माझी प्रत्यक्ष ओळख कशी झाली ते आता अजिबातच आठवत नाही. पण एकदा ओळख झाल्यानंतर मात्र स्नेहबंध म्हणून जे काही जुळणं असतं, ते नेमकं कधी झालं, सांगता नाही येणार. वर्ष २०१४.. गवाणकरांच्या एका अप्रतिम नाटकामध्ये राज्य नाट्य स्पर्धेसाठी काम करण्याची संधी मला मिळाली. नाटकाचं नाव ‘अशा या दोघी’. हे नाटक कैक वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगमंचावर आलं आणि गाजलंही. त्यावेळी नाटकाचं नाव होतं- ‘दोघी’. दिग्दर्शक कमलाकर सारंग आणि प्रमुख भूमिकेत रिमा लागू व लालन सारंग. शशिकांत निकतेसुद्धा होते. गवाणकरांच्या एकूण नाटकांमधलं उत्कृष्ट म्हणता येईल असं नाटक. ‘वस्त्रहरण’च्याही पलीकडे गंगाराम गवाणकरांची वेगळी ओळख आहे, हे जे मी वर म्हटलं, त्यातली अत्यंत महत्त्वाची आणि दोन वेगळी नाटकं म्हणजे ‘दोघी’ आणि ‘वन रूम किचन’, तर ‘दोघी’ हे नाटक ॲड. देवेंद्र यादव या आमच्या ज्येष्ठ नाट्यकर्मी मित्रांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी करायचं ठरवलं. त्यावेळी निकते करत असलेल्या, फक्त दोन प्रसंग असलेल्या एका भूमिकेसाठी गवाणकरांनी मला बोलावून घेतलं. पहिल्याच प्रसंगाचं वाचन झाल्यावर गवाणकर म्हणाले, ‘ह्याच होया होता माका.. म्हणान तुका बोलयलंय..’ मी केलेलं काम त्यांना आवडलं, याचं मलाही समाधान वाटलं.

त्यानंतर अधूनमधून बऱ्याचदा आम्ही भेटत-बोलत राहिलो. दरम्यानच्या काळात ते अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात आपल्या बोलीभाषा समृद्ध व्हायला हव्यात आणि त्यासाठी बोली नाट्य स्पर्धा व्हायला हव्यात, असे गवाणकर यांनी सांगितले. बोली टिकवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमधली ही फार महत्त्वाची गोष्ट होती. त्यांनी शासनदरबारीदेखील त्यादृष्टीने प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. मराठी रंगभूमीला अनेक उत्तमोत्तम नाटके देणारे हरहुन्नरी नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी गवाणकरांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले आणि २०१६ पासून ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’ सुरू झाली. गवाणकरांच्या संकल्पनेतल्या या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या २०२२ ते २०२५ या चार वर्षांच्या आयोजनात आमच्या ‘व्हिजन व्हॉईस एन ॲक्ट’चा महत्त्वपूर्ण सहभाग होता, याचंही समाधान आहे.

साधारण चारेक वर्षांपूर्वीची गोष्ट...एका संध्याकाळी गवाणकर त्यांच्या गावी असताना अचानक त्यांचा फोन आला, “एक नवीन नाटक लिहिलंसंय.. तू तेचा दिग्दर्शन करुचा, असा माका वाटता. तू मस्त करशीत नक्की. निर्मातो माणूस मी दितंय तुका...” असं म्हणून ते त्याबद्दल बराच वेळ बोलत राहिले. मुंबईत आल्यावर त्यावर बोलूया आणि ठरवूया, असं मी म्हटलं. दरम्यान, आमच्या ‘चला, वाचू या’ या २०१५ पासून सुरू असलेल्या मुंबईतल्या एकमेव मासिक अभिवाचन चळवळीअंतर्गत २०२२ मध्ये ‘चला, आता माणसं वाचू या’ अशा टॅग लाइनने या चळवळीचं ७६ वं पुष्प गुंफलं ते गंगाराम गवाणकरांच्या दिलखुलास गप्पांचं. त्या कार्यक्रमासाठी त्यांना आणण्यासाठी बोरिवलीला गेलो, तेव्हा त्यांनी आठवणीनं मला सांगितलेल्या त्या नव्या नाटकाची संहिता सोबत घेतली होती आणि गाडीत बसल्या बसल्या “ही आता तुझ्या ताब्यात” असं म्हणून माझ्याकडे दिली.

ही संहिता मी जेव्हा नंतर वाचली, तर त्यातली मला जाणवलेली गंमत म्हणजे त्यात कबड्डीच्या खेळाचा, संघाचा जाणवण्याजोगा उल्लेख होता. याचं कारण गवाणकर त्यांच्या तरुण वयात तयारीचे कबड्डीपटू होते. आपल्या आयुष्यातील अनुभवांचा लेखक आपल्या लेखनात वापर करतो, तो असा. गवाणकरांना ऐकावं तर गप्पांमध्येच. स्वत:च्या, दुसऱ्यांच्या नाटकांच्या प्रयोगांच्या, दौऱ्यांच्या शेकडो किश्शांचा साठा त्यांच्याकडे होता. त्यांच्या सहज बोलण्यालाही मालवणी मातीचा गंध यावा, असं त्यांचं खुसखुशीत बोलणं. ‘चला, वाचू या’ची ती संध्याकाळ गवाणकरांच्या गप्पांमध्ये धमाल रंगली. प्रेक्षकांना काळ-वेळेचंही भान नव्हतं, इतकं त्यांच्या गप्पांनी प्रेक्षकांना आपलंसं करून टाकलं. आपल्या अख्ख्या प्रवासाचा लेखाजोखा त्यांनी अगदी हसतखेळत मांडला. कुठेही कसलीही तक्रार नाही, कोणाबद्दल वावगं बोलणं नाही, सगळं काही अगदी मनापासून स्वीकारून केल्यासारखं. कष्टांचा, गरिबीचा उल्लेखसुद्धा ‘बघा, मी किती त्रास सहन केला आहे’ या आविर्भावाने नाही, तर ते कष्टाचे दिवससुद्धा आपण कसे सहजपणे स्वीकारून सुसह्य करत गेलो, अशा अकृत्रिमपणाने आला.

‘...व्हाया वस्त्रहरण’ या गवाणकरांच्या आत्मकथनाला ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना आहे. मधुभाई म्हणतात, “गवाणकरांनी या महामुंबईत एकेकाळी काय काय पाहिलं, सोसलं, भोगलं याची कहाणी वाचताना ठायी ठायी थांबावं लागतं. तसं थांबल्यामुळे याहून पुढे काय? असं वाटेपर्यंत पूर्वीपेक्षाही विदारक प्रसंग समोर येतात आणि वाटतं, नंतरच्या वयात ‘वस्त्रहरण’सारख्या नाटकाद्वारे जगाला तिन्ही त्रिकाळ हसवून सोडणाऱ्या या नाटककाराने बालपणी दुर्दैवाचे किती दशावतार पाहिलेले आहेत. खळखळून हसणे सोडाच, पण रडणे तरी किती? एकेकाळच्या त्या कोंडलेल्या हुंदक्यांनी तर पुढील वयात हास्याची कारंजी थुईथुई नाचवली नसतील?” जीवनातला हा विरोधाभास त्यांच्या गप्पांमधून अगदी हसतखेळत येतो, हे गवाणकरांनी आपल्या जगण्याला दिलेल्या अर्थाचं महत्त्व अधोरेखित करतं.

शिवडीच्या स्मशानभूमीजवळ चार बाय सहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या बारा-पंधरा वर्षांत चेहरा न बघितलेल्या आपल्या बापासमोर आत्यासोबत अचानक उभा राहिलेला मुलगा, “ये मेहमान कौन” असं बापाने आत्याला विचारताच “ह्यो तुझो गंगाराम, शिकूसाठी मुंबैत इलोसा” असं सांगणारी आत्या आणि मुलगा आला म्हणून आनंद होण्याऐवजी आता हासुद्धा राहणार का इथे, असा कपाळावरच्या आठ्यांमधून दिसणारा प्रश्न आणि त्यापाठोपाठ “इधर मेरा रहने का ठिकाना नहीं, इस को मैं किधर रखूं” असा थेट आलेला बापाचा सवाल गवाणकर आपल्या गप्पांमध्ये अगदी खुमासदार शैलीत सहजपणे सांगतात खरा, पण आपल्या डोळ्यांत मात्र पाणी तरळतं, सर्वांगातून शिरशिरत जातं काहीतरी. पायांपासून डोक्यापर्यंत अंगभर गोणपाट अंगावर घेऊन झोपायचं, का तर रात्री उंदीर चावतात पायाला...राहायला जागा नाही म्हणून स्मशानाजवळच्या त्या जागेत झोपणं, हमाली करणं, रात्रशाळेत जाऊन शिकणं, टपाल खात्यात काम करणं...किती आणि काय काय...

त्याच दरम्यान कधीतरी चित्रकलेच्या आवडीपोटी जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये गवाणकर प्रवेश घेतात, पदविका मिळवतात. तिथेच त्यांच्या नाटकाच्या आवडीला वाव मिळतो. पण ‘आज नाटक होवचा नाय’ ही त्यांनी लिहिलेली, दामू केंकरेंना वाचण्यासाठी दिलेली एकांकिका केंकरेंकडून हरवते, नंतर त्याच संकल्पनेवर गवाणकर ‘वस्त्रहरण’ लिहितात, हे सगळं खरं तर जेवढं स्वप्नवत आहे, तेवढंच प्रसंगी अंगावर काटा आणणारं आहे.

‘वस्त्रहरण’चे पहिले दिग्दर्शक राजा मयेकर. पांडू तात्यांची भूमिकाही त्यांनीच केली होती. नंतर व्हिक्टोरिया मिलमधून रमेश रणदिवे यांनी नाट्य स्पर्धेसाठी हे नाटक केले. त्याकाळी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या नाटकाच्या प्रयोगात राजा मयेकरांनी ‘तात्या सरपंच’ आणि रमेश रणदिवेंनी ‘गोप्या’ची भूमिका केली होती. त्यानंतर १९८२ मध्ये मच्छिंद्र कांबळींच्या भद्रकाली प्रॉडक्शनने ‘वस्त्रहरण’ सुरू केल्यानंतरचा इतिहास तर सर्वश्रुत आहे. ‘वस्त्रहरणाच्या रूपाने तुम्ही मराठी रंगभूमीला देशी फार्सचे भरजरी वस्त्र अर्पण केले आहे’, या पुलंच्या अभिप्रायाला गवाणकर आशीर्वादच समजत. पुलंनी हा अभिप्राय दिल्यानंतर ‘वस्त्रहरण’चे जोरदार प्रयोग सुरू झाले. त्या काळात ‘वस्त्रहरण’ नाटकाची कॅसेट घरा-घरातून ऐकू यायची. लोकांचं अख्खं नाटक पाठ होतं. ‘वस्त्रहरण’चे पाच हजारांहून अधिक, तर दोन हजारांहून अधिक प्रयोग झालेलं गवाणकरांचंच ‘वात्रट मेले’ हेसुद्धा मराठी रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं नाटक!

गवाणकरांबद्दल लिहावं तितकं कमीच.. कलावंत म्हणून आणि त्याहीपेक्षा अधिक-जिंदादिल माणूस म्हणून. आपणा सगळ्याच रंगकर्मींच्या, रसिकांच्या गवाणकर आठवणीत राहतील ते आपल्या लेखनातून, किश्शांमधून, गजालींमधून, नाटकांमधून हसता हसवता खूप काही सांगणारा गजालिया म्हणूनच!

लेखक, दिग्दर्शक व चित्रपटाचे अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in