

कथा
प्रेमा खांडवे
आई, आई मी आलो शाळा सुटली पाटी फुटली, अन आई मला भूक लागली.”
“अरे, हो, हो केवढा तो आनंद शाळेच्या पहिल्या दिवसाचा.”
“अगं हो आई आजचा दिवस होताच तसा खास!”
“अरे हो का आजचा घरचा दिवस पण छानच आहे कारण आज मी तुझ्यासाठी गोडाचा शिरा केला आहे.”
“अरे वा शिरा! तो तर माझ्या आवडीचाच मग काय मज्जाच मज्जा..! आई अगं आई, माहित आहे का आजचा शाळेचा दिवस एकदम ध.. मा..ल होता तुला केव्हा सांगेन असं झालंय मला.”
“अरे हो हो.. पण आधी हात पाय तर धू, अन मग खायला ये. खाता खाता सांग.”
“हं, अगं, तुला काय सांगत होतो मी की, आज अगदी क.. मा.. ल दिवस झाला. आम्ही सर्व शाळेत गेलो ना तेव्हा शाळेचं प्रवेशद्वार इतकं सुंदर फुलांनी सजवलं होतं की काय सांगू. दारापुढे सुरेख रांगोळ्या घातल्या होत्या आणि माहीत आहे का आमचे सारे शिक्षक, प्रिन्सिपल सारे प्रवेशद्वारापाशी गुलाबाची फुलं हातात घेऊन उभे होते. आम्ही रांगेने एक एक जण आत जात होतो ना, तेव्हा आम्हाला प्रत्येकाला गुलाबाच फूल व शुभेच्छापत्र भेट देऊन आमचं स्वागत केलं.”
“अरे वा सौमित्र एवढं केलं शाळेनी?”
“अगं, हो ना आई इतकं भारी वाटलं ना आम्हाला काय सांगू तुला, एव्हडच नाही तर पुढे वर्गाजवळ गेल्यावर आमच्या वर्गशिक्षिकेनी प्रत्येकाचं पेढा देऊन तोंड गोड केलं. कर्वे मॅडमनी तर हसून मला विचारलं देखील, “काय सौमित्र अजून एक पेढा देऊ का? तुला पेढा खूप आवडतो ना?” “आई मॅडमला कसं कळलं गं?”
“अरे, त्या तुझ्या क्लासटीचर आहेत ना क्लासटीचर म्हणजे शाळेतली दुसरी आईच असते बरं.. त्यांना सर्व मुलांचे स्वभाव, आवडीनिवडी घरची परिस्थिती सारं सारं ठाऊक असतं आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक अडचणीत त्या तुम्हाला मदत करतात ना.”
“हो ग आई तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.
माझा मित्र मनोज आहे ना, त्याला घरच्या काही अडचणीमुळे डबा आणणं जमत नव्हतं तेव्हा कर्वे मॅडम स्वतः त्याच्यासाठी आपल्या डब्याबरोबर भाजी पोळीचा डब्बा त्याच्यासाठी घेऊन यायच्या.”
“क्लास टीचर ही आईसारखीच मुलांकडे लक्ष देते. बरं ते राहू दे, तू काय आजची धमाल सांगणार होतास ती सांग.”
“आई, आज प्रार्थना झाली अन आम्ही रांगेने वर्गात गेलो तेव्हा बघितलं, आमचा वर्ग पताका लावून सजवला होता आणि वर्गातला बोर्ड पण सुंदर चित्रांनी सुशोभित केला होता आणि बोर्डसमोर एक मोठे एका सुंदर स्त्रीचं कटआउट ठेवलं होतं आणि डायसवर एक मोठं लाकडी घर पडद्यांनी झाकून ठेवलं होत.”
“काय लाकडी घर? अरे ते कशाकरिता अन एवढं काय दडवून ठेवलं होतं त्या लाकडी घरात.” “हो ना ग आई आम्हाला सुद्धा तीच उत्सुकता लागून राहिली होती की, याच्या आतमध्ये काय असेल. त्या लाकडी घराला रंगीबिरंगी फुलांचा सुंदर रंगीत पडदा लावला होता आम्हीसारे हे सगळं बघून अचंबितच झालो व पडद्याआड काय असेल याची चर्चा करू लागलो. एवढ्यातच प्रिन्सिपल मॅडम, कर्वे मॅडम अजून दोन-तीन मॅडम व नामदेव चपराशी असे सारे वर्गात आले.
“बसा, मुलांनो खाली बसा.”
“सुस्वागतम, सुस्वागतम..” आम्ही सर्वांनी उभं राहून अभिवादन केलं.
प्रिन्सिपॉल मॅडम म्हणाल्या, “बसा मुलांनो खाली. तुम्ही हे कटआउट आणि लाकडी घर पाहिलत ना?”
“हो, हो मॅडम.”
“बरं. मला सांगा तुमचा काय अंदाज आहे? काय असेल या लाकडी घरात?”
“मॅडम, वर्गासाठी काही नवीन पुस्तकं असतील, नवीन चित्रं असतील किंवा नवीन ब्लॅकबोर्ड असेल.” यावर प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, “नाही, नाही यातलं काहीच नाही.” ठीक आहे मग.
आता तुम्ही श्वास रोखून आणि डोळे ताणून बघा, “नामदेव वर ये अन या लाकडी घराचा पडदा बाजूला सरकव.” आम्ही सारे नजर लावून, श्वास रोखून बघत होतो नामदेव ने पडदा बाजूला करताच, आई काय दिसले माहित आहे का?”
“अरे मला कसे माहीत असणार तूच सांग ना.”
“अगं आई त्या कटआउट मधली ती सुंदर बाई साक्षात आमच्यासमोर उभी झाली.”
“काय?”
“अगं, हो ना प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, “ह्या तुमच्या नवीन शिक्षिका, ईरीस मॅडम. तुम्ही सर्वांनी यांचे स्वागत करा.”
आम्ही सर्व उभे झालो अन सर्वांनी एका सुरात म्हटलं, “सुस्वागतम मॅडम, सुस्वागतम.“
“आई, ईरीस मॅडम इतक्या सुंदर दिसत होत्या ना, त्यांनी लाल चुटुक रंगाची साडी नेसली होती, त्यावर फुलाफुलांचा ब्लाऊज घातला होता, केसांचा बॉयकट होता व गळ्यात चमचमता हार व हसतमुख चेहरा, अशी ती सुंदर बाई आमची नवीन शिक्षिका होती.
तिने मान हलवून गोड स्मित करीत म्हटलं, धन्यवाद मुलांनों.”
प्रिन्सिपॉल मॅडम म्हणाल्या, “मुलांनो, ही तुमची नवीन रोबोट टीचर. हीचे नाव ईरीस. ती तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तत्परतेने देईल. तुम्हांला जर इंग्रजीत समजलं नाही तर ती हिंदीत सांगेल, ज्यांना हिंदीत समजत नसेल व मराठीत हवं असेल त्यांना ती मराठीत समजावून सांगेल. तीला तिन्ही भाषा येतात आणि सर्व विषयांचं परिपूर्ण ज्ञान आहे. आता तुम्ही एका- एकाने तिला आपला परिचय करून द्या. मिस ईरीस आता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना भेटा. त्याबरोबर मिस ईरीस मॅडम हळूच खाली उतरली व प्रत्येक विद्यार्थ्यासमोर जाऊन उभी राहिली व हात पुढे करून हात मिळवला व नाव सांगितल्यावर गोड हसून मान डोलावू लागली. अगं आम्हाला तिची ओळख करून घेताना इतकी मजा आली न की विचारूच नकोस त्यानंतर त्या ईरीस मॅडमनी आमचा एक गणिताचा पिरेड घेतला. अगं आम्ही तिला किती अवघड, अवघड प्रश्न विचारले पण ती एका सेकंदात पटकन उत्तर द्यायची.
प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, मुलांनो आता तुमच्या सर्व शंकांचे समाधान झाले ना, आवडली ना तुम्हांला तुमची ईऱीस मॅडम? ”
“हो मॅडम, आम्ही सारे एकसुरात ओरडलो.
“मग आता तुम्हाला तुमच्या क्लास टीचर कर्वे बाई नकोच ना?”
“नाही, नाही मॅडम असं बिलकुल चालणार नाही आम्हाला आमच्या क्लास टीचर कर्वे मॅडम हव्यातच. त्या आमच्यावर आईसारखं प्रेम करतात.”
“अरे, हो का, पण त्या होमवर्क सुद्धा खूप देतात ना आणि होमवर्क नाही केलं तर छड्या पण पडतात ना? ईरीस मॅडम होमवर्क देत नाही व छड्या पण मारणार नाही मग दोघींपैकी कोण हवं तुम्हाला?”
“मॅडम आम्हाला दोन्ही मॅडम हव्यात. अवघड प्रश्न समजून घ्यायला ईरीस मॅडम व आमच्यावर आभाळभर माया करायला कर्वे मॅडम आम्हाला हव्यात.”
“समजलं, समजलं मुलांनो चला आता ईरीस मॅडमला निरोप द्या.”
आम्ही सर्वांनी उठून मॅडमला हात हलवून निरोप दिला. ईरीस मॅडमनी पण हसतमुखाने आपला हात हलवला अन मंद मंद पावलांनी चालत आपल्या लाकडी घरात जाऊन बसल्या व लगेच पडदा पडला.
“अरे वा! छानच आहे तुझ्या ईरीस मॅडमची गोष्ट.”
“काय मुलांनो, आवडली ना तुम्हांला अद्भुत ईरीस मॅडम! तुम्हालाही वाटतं ना की, आपल्याही शाळेत अशीच रोबोट मॅडम यावी?
premakhandwe@rediffmail.com