

विचारपान
संदीप प्रधान
एकेकाळी रॉकफेलरांनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट आजच्या सामाजिक वास्तवाशी विलक्षण साम्य सांगून जाते. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पैसा, पालकत्व आणि संस्कार यांचे नाते पुन्हा एकदा तीव्रपणे ऐरणीवर आले आहे.
एकेकाळी जगातील श्रीमंत व्यक्ती असा नावलौकीक असलेले रॉकफेलर एकदा एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवणानंतर त्यांनी मामूली रक्कम टीप म्हणून ठेवली. वेटरने त्यांना ओळखले होते. न राहवून वेटर त्यांना म्हणाला की, आपला मुलगा जेव्हा या हॉटेलमध्ये जेवायला येतो तेव्हा जाताना घसघशीत टीप देतो. आपण माझी निराशा केली. त्यावर रॉकफेलर म्हणाले की, माझ्या मुलाने घसघशीत टीप देण्यात काहीच आश्चर्यजनक नाही. कारण त्याचा बाप श्रीमंत आहे. माझा बाप श्रीमंत नव्हता. ही गोष्ट आठवण्याचे कारण ठरले ती पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील काही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने केलेली टिप्पणी. मुलांना मोटारीच्या चाव्या देणे आणि मौजमजेसाठी अमाप पैसा देणे हे मुळीच स्वागतार्ह नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. पोर्शे प्रकरण गाजले. परंतु देशातील वेगवेगळ्या शहरात श्रीमंतांची मुले ज्या बेदरकारपणे वाहने चालवतात, आपल्याकडील शस्त्रांचा वापर करतात किंवा किरकोळ कारणांवरुन हाणामारीवर येतात त्याची शेकडो उदाहरणे दररोज वाहिन्या व सोशल मीडियावर दिसतात.
पुण्यातील हे पोर्शे प्रकरण बरेच गाजले. गडगंज पैसा असलेल्या बापाच्या पोरांनी बेदरकारपणे पोर्शे चालवून जीव तर घेतलेच पण वर हे प्रकरण दडपण्याकरिता बऱ्याच्या लांड्यालबाड्या केल्या. यातील मुख्य आरोपीला छोटेखानी निबंध लिहून सोडल्याने तर जनमन प्रक्षृब्ध झाले होते. या प्रकरणातील काही आरोपी हे आजही तुरुंगाची हवा खात आहेत. सध्याची तरुणाई ही अनेकदा हट्टी, दुराग्रही भूमिका घेते. अमूक एक गोष्ट हवी म्हणजे हवीच. बहुतांश कुटुंबात एक मुलगा, मुलगी असतात. लहानपणापासून त्यांचे लाड, कोडकौतुक केले जाते. त्यामुळे अनेक महागड्या वस्तू त्यांना लहानपणापासून दिल्या जातात. किंबहुना नकार एैकण्याची त्यांना सवयच नसते. यातूनच मग मोबाईल दिला नाही किंवा पॉकेटमनी दिला नाही म्हणून आत्महत्या करण्याच्या घटना वरचेवर घडतात. अॉनलाइन गेमच्या जाळ्यात अडकून तीन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. पालक व मुले यांच्यातील संवादाचा अभाव हा सध्याचा सर्वात जटील प्रश्न आहे. मुलांना आपल्या पालकांकडे आपले मन मोकळे करावेसे वाटत नाही आणि पैसे कमावण्याच्या मागे धावणाऱ्या पालकांना वाटते की, मुलांना घसघशीत पॉकेटमनी दिला की, आपण त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. संवादाची उणिव पैशाने भरुन निघू शकत नाही. बहुतांश मुले खेळत असलेल्या कॉम्प्युटर गेममध्ये एक दहशतवादी हातात बंदूक घेऊन अंदाधुंद गोळीबार करीत माणसे टिपत आहे किंवा भरधाव वेगाने मोटारसायकल किंवा मोटार चालवताना रस्त्यात येणाऱ्यांना बेदरकारपणे उडवून देत आहे, अशा गेमचा समावेश असतो. संस्कारक्षम वयात जर मुले असे गेम खेळली तर मोठे झाल्यावर आपल्या मोटारीच्या वाटेत येणाऱ्याला उडवले तर गैर ते काय? अशी भावना येणे स्वाभाविक आहे. आपली मुले कोणते गेम खेळतात याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
एका उच्चभ्रू, श्रीमंतांच्या टॉवरमध्ये एक मध्यमवर्गीयाला सरकारी कोट्यातून घर मिळाले. टॉवरमधील मुलांसोबत वावरताना, खेळताना त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलामध्ये न्यूनगंड वाढू लागला. या मुलाला जेव्हा त्याच्या वडिलांनी पेजर दिला तेव्हा बड्यांची मुले मोबाईल घेऊन खेळायला यायची. जेव्हा मोबाईलवर संभाषण करण्याकरिता (इनकमिंग व आऊट गोइंग कॉल) मिनिटाला १६ रुपये दर होता तेव्हा ही लहानगी मुले मोबाईलवर बोलायची. या मध्यमवर्गीय कुटुंबातील त्यांच्याच वयाच्या मुलाला सोबत खेळायला घेण्यास नकार द्यायची. श्रीमंत मुलांच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून इतक्या महागड्या वस्तू दिल्या जायच्या की, त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला तेवढ्या महागड्या गिफ्ट देणे अशक्य व्हायचे. त्या लहान मुलाची व त्याच्या पालकांची ही कुचंबणा त्यांना असह्य होत होती. अखेरीस त्या मध्यमवर्गीयाने त्या टॉवरला रामराम केला आणि आपल्या मुलाची न्यूनगंडातून मुक्तता केली. इन्स्टाग्रामपासून अनेक सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर समाजातील वेगवेगळ्या थरातील मंडळी कोणकोणत्या सुखसोयी उपभोगातात हे सारेच पहातात. त्या सुखांची अभिलाशा ही तरुणाईतील वाढत्या नैराश्याचे एक कारण आहे. एकेकाळी मोटार, वातानुकूलित यंत्रे इतकेच काय टेलिफोन ही श्रीमंतीची लक्षणे होती. परंतु आता मध्यमवर्गीय कुटुंबात या सुखसुविधा सहज आढळतात. श्रीमंतीच्या कल्पना जशा बदलल्या तशीच एका विशिष्ट वर्गातील लोकांच्या उत्पन्न वाढीला मर्यादा आल्या आहेत. हेच सध्याच्या सामाजिक अस्वस्थतेचे एक महत्वाचे कारण आहे.
अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे स्वतःची मोटार हौसेनी खरेदी करतात. मात्र सोमवार ते शुक्रवार ती घराखाली धूळ खात पडलेली असते. शनिवार-रविवारीच घरोघरच्या मोटारी रस्त्यावर येतात. पालक नोकरीला गेल्यावर या मोटारींचा ताबा मुला-मुलींकडे असतो. ही अल्पवयीन मुले मोटारी घेऊन रस्त्यावर येतात. आपला मुलगा अथवा मुलगी मोटार चालवत असल्याने निदान तिचा वापर होतो या भावनेतून अनेकदा पालक चावी मुला-मुलींकडे सोपवतात. आता नाईट आऊटच्यानिमित्ताने मित्रांसोबत घराबाहेर पडल्यावर जर त्यांनी मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन मोटार चालवली तर अपघाताची दाट शक्यता असते. अशा पद्धतीच्या अपघाताकरिता पोर्शे कार दरवाजापुढे झुलत असायला हवी, असे नाही.
घरामध्ये गरजेपेक्षा जास्त पैसा येत असेल तर आणि तरच तरुणाईच्या डोक्यात पैशांची मस्ती शिरु शकते. घरात गडगंज पैसा असला तरी पैसा कमावण्याकरिता करावे लागणारे कष्ट आणि पैशांचा अपव्यय याबाबत लहानपणापासून मुला-मुलींना जाणीव करुन देणे गरजेचे आहे. एका उद्योजक कुटुंबातील मुलगा वयात आल्यावर वडिलांना सहकार्य करण्याकरिता कंपनीत गेला. मुलाला थेट केबिनमध्ये नेऊन न बसवता वडिलांनी मशिनवर नेले आणि तेथे काम करणाऱ्या कामगाराला मदत करण्यास भाग पाडले. वंगण लागून माखलेल्या कपड्यातील कामगाराच्या हाताखाली काम करायला लागल्याची लाज वाटून घेऊ नकोस. तुला जर आपल्या व्यवसायातील बारकावे शिकुन घ्यायचे असतील तर तळागाळापासून सुरुवात कर, हाच संदेश त्या उद्योजकाने आपल्या पुत्राला दिला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे यात दोष नाही. सोन्याचा चमचा तोंडात असल्याने बेदरकारपणे जीवन जगणे ही चूक आहे.
pradhansandeep19@gmail.com