

विशेष
अभिराम घड्याळपाटील
रा. स्व. संघाने विचारसरणीत सातत्य ठेवत मध्यममार्गी बदल स्वीकारले असून सामाजिक समतोल, संविधाननिष्ठ भूमिका आणि समरसता जपण्यावर भर दिला आहे; पुढील काळातही अतिरेकी प्रवृत्ती रोखून भारतीय समाजात व्यापक संतुलन राखण्याचा प्रयत्न दिसेल.
शंभरी गाठलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी पुढच्या पंचवीस वर्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे संघाचे राजकीय अपत्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे भारताच्या सत्ताकारणातील अभूतपूर्व स्थान. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत केंद्रामध्ये भाजपचे अथवा भाजप नेतृत्वातले सरकार आतापर्यंत जेमतेम सतरा वर्षे राहिले आहे. मात्र पुढचा बराच काळ भाजप वा भाजपप्रणित सरकार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघाचा पुढला काळ हा सत्तेच्या छायेत जाणारा असेल. दुसरं कारण म्हणजे नरेंद्र मोदींचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न. संघाचे कार्यक्रम-योजना या सरकारप्रणित नसतात. मात्र संघाचे आजचे सर्वव्यापी स्वरूप बघता तसेच विकसित भारत कार्यक्रमाची व्याप्ती लक्षात घेता त्या कार्यक्रमापासून आणि त्याचे भारतीय जनमानसावर जे काही परिणाम होतील त्यांपासून संघ आणि संघाची यंत्रणा फार अलिप्त राहू शकणार नाही. किंबहुना संघाच्या पुढील पंचवीस वर्षांच्या कार्यक्रमाची योजना आणि रचना ही विकसित भारताच्या स्वप्नाला पुरकच नव्हे तर त्या कार्यक्रमावर प्रभाव टाकणारी असू शकेल.
या दृष्टिकोनातून विचार करता संघाच्या पुढच्या प्रवासाचा अंदाज संघाच्याच शताब्दी उत्सवापासून घेता येईल. मागच्या वर्षी विजयादशमी म्हणजे संघ स्थापना दिवसाच्या निमित्ताने संघाने पंचकर्तव्य किंवा पंचपरिवर्तन अभियान सुरू केले. ही पंचकर्तव्ये म्हणजे- सामाजिक समरसता, कुटुंब व्यवस्था, स्वदेशी, पर्यावरण आणि नागरिक कर्तव्ये. हा पंचसूत्री प्रकल्प केवळ शताब्दी सोहळा नसून संघाचा दीर्घकालीन कार्यक्रम आहे, तसाच तो सव्वाशे वर्षांनंतरच्या संघाचा आकृतिबंध देखील आहे. हिंदुत्वाच्या मूळ भूमिकेशी तडजोड न करता कालानुरूप लवचिकता दाखवण्याचा धोरणीपणा संघाने गेली शंभर वर्षं दाखवलेला आहेच. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे या ठाम भूमिकेतून सुरू झालेला हा प्रवास संघाला भारतीय समाजजीवनाशी अधिकाधिक समरस करणारा प्रवास राहिलेला आहे. पुढची पंचवीस वर्षं या समरसतेला नवीन आयाम प्राप्त करून देतील तसेच नवीन आव्हाने देखील उभी करतील. त्यामुळे २०५० मधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वरूप कसे असेल यांची कल्पना करताना पुढील दोन-तीन दशकांमधल्या संभाव्य बदलांचा विचार करावा लागेल. संघाच्या पंचसूत्री कार्यक्रमाला त्या संभाव्य बदलांचा आणि त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या आव्हानांचा संदर्भ आहे.
संघाची सामाजिक समरसतेची भूमिका ही नेहमी व्यापक राहिलेली आहे. त्यामध्ये केवळ हिंदू समाजामध्ये अंतर्भूत असलेल्या जाती-जमातींमधली समरसता अपेक्षित नसून संपूर्ण भारतीय समुदायामध्ये एका समंजस सामाजिक ऐक्याची आणि राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी ही भूमिका आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी हीच व्यापक भूमिका त्यांच्या अलीकडच्या संवाद कार्यक्रमांमधून आणखी स्पष्टपणे मांडलेली आहे. संघाचे आणि संघपरिवाराचे आजचे स्वरूप पाहता हिंदू समाजामधल्या सामाजिक समरसतेच्या मूळ भूमिकेने नेत्रदीपक यश मिळवलेले आहे, हे निर्विवाद सत्य आहे. संघाला आणि संघाच्या हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या मांडणीला भारतीय समाजामध्ये व्यापक आणि खोलवर मान्यता मिळालेली आहे. भारतीय समाजामधील, विशेषतः हिंदू समाजामधील विलक्षण वैविध्य लक्षात घेता संघाची ही उपलब्धी थक्क करणारी आहे हे संघविरोधक सुद्धा मान्य करतील. अर्थात या समरसतेच्या कार्यक्रमासमोर असलेली सर्व आव्हाने आणि अडचणी पूर्णपणे दूर झालेल्या आहेत असे नाही. आधीपासूनच असलेली आव्हाने आणि समरसतेच्या आड येणाऱ्या समस्या येत्या पंचवीस-तीस वर्षांमध्ये अधिकच तीव्र होण्याची दाट शक्यता आत्ताच दिसू लागलेली आहे. शिवाय भारतामध्ये आणि भारतीय समाजामध्ये होत असणारे बरेवाईट बदल नवीन समस्या निर्माण करू शकतील. भारताची होत असलेली आर्थिक प्रगती तसेच आर्थिक-भौतिक विकासाचा आपण निवडलेला मार्ग हा यामधला सर्वाधिक दूरगामी परिणाम करणारा बदल असेल आणि त्याचा थेट संबंध संघाने हाती घेतलेल्या पंचपरिवर्तन कार्यक्रमाशी आहे. आर्थिक प्रगती आणि त्यातून निर्माण होणारी संपन्नता ही भारतासाठी आवश्यक असली तरीही त्या संपन्नतेतून निर्माण होणाऱ्या समाजामध्ये बरेच ताणतणाव असण्याची शक्यता आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये भारतीय समाजाची, विशेषतः मध्यमवर्गाची आर्थिक संपन्नता वाढलेली आहेच. मात्र आता त्या आर्थिक प्रगतीला आणि वाढलेल्या क्रयशक्तीला अंदाधुंद फोफावलेल्या समाज माध्यमांची तसेच निर्मम तंत्रज्ञानाची धार प्राप्त झालेली आहे. संघाच्या हिंदू संघटनांचा आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या भूमिकेचा आत्मा हिंदूंचे किंवा भारतीय समाजाचे सामुदायिक जीवन (collective life) राहिलेला आहे. मात्र आर्थिक विकास व संपन्नता समाजामध्ये अपरिहार्यपणे व्यक्तिकेंद्रित तसेच स्वान्तःसुखाय प्रवृत्तींना बळ देतं आणि समाजाच्या समुदाय जीवनाला तडा जातो. संघाच्या सामाजिक समरसतेच्या तसेच कुटुंबव्यवस्था मजबूत राखण्याच्या कार्यक्रमासमोर पुढच्या पंचवीस-तीस वर्षांमध्ये विकसित होणारा नव-आर्थिक मात्र एकलकोंडा समाज एक गंभीर आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. या आव्हानाची चाहूल संघाला लागल्याचे संघाच्या पंचपरिवर्तन कार्यक्रमातून दिसते.
संघाने विचारसरणीतली निरंतरता कायम राखून बदल केले आहेत आणि ते बदल मध्यममार्गी तसेच हिंदू समाजाचा समतोल सांभाळणारे राहिलेले आहेत. पुढच्या काळात असा समतोल राखण्याच्या दिशेने संघ विशेष प्रयत्नशील राहू शकण्याची चिन्हं आजच दिसतात आहेत. संघाला हा समतोल केवळ हिंदू समुदायामध्ये नाही तर संपूर्ण भारतीय समाजामध्ये राखायचा आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे. या संयत भूमिकेचे उदाहरण म्हणजे सरसंघचालकांनी अलीकडे वारंवार अधोरेखित केलेला मध्यममार्ग व धोरणी सामोपचार वाद. पंचपरिवर्तनांमधले शेवटचे नागरिक कर्तव्य आणि संविधानाचा मार्ग हे सूत्र त्याचेच सूचक आहे. आजच हिंदू समाजासमोर आणि पर्यायाने संघासमोर थोड्या अंतिरंजीत आणि कधी कधी हिंदू उच्चवर्णीय दुराभिमानी प्रवृत्तींचे आव्हान उभे राहिले आहे. त्या प्रवृत्तींचा प्रादुर्भाव व्यापक हिंदू समाजामध्ये होऊन त्याचे अतिरेकी प्रगटीकरण होऊ नये तसेच त्यामुळे शंभर वर्षे खपून बांधलेली सामाजिक समरसतेची वीण उसवू नये यासाठी संघ पुढील काळात दक्ष होताना दिसेल.
लेखक वरिष्ठ पत्रकार असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक
abhiramgpatil@gmail.com