

जगतवारी
मेधा आलकरी
बैरूटच्या झगमगत्या रूपामागे दडलेला लेबनॉनचा आणखी एक चेहरा पुढच्या लेखात उलगडणार आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर, डोंगर-दऱ्या, खेडी, मातीचा गंध आणि साध्या माणसांच्या जगण्यातून जाणवणारा हा लेबनॉनचा गावरान गंध अनुभवूया.
मध्य पूर्व देशांतील वाळवंट नसलेला लेबनॉन हा एकमेव देश आहे. भूमध्य सागराचा नयनरम्य किनारा, उंचच उंच पर्वतराजी, सेडर वृक्षांची गर्द वनराई, क्वचित कुठे उघडे बोडके खडकाळ डोंगर, तर कुठे खोल दऱ्या. कुठे खळाळते झरे, उफाळते धबधबे, तर कुठे दूरवर पसरलेली हिरवीगार पठारं. अशा या अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या देशाची राजधानी बैरुट तितकीच सुंदर! या शहराला त्याच्या प्रजेनं अभिमानानं वेगवेगळी बिरुदं चिकटवली आहेत. काही जण तिला ‘लेडी ऑफ द वर्ल्ड’ म्हणतात, तर काहीजण ‘अमर शहर’ म्हणून संबोधतात. हे संबोधन सार्थच म्हणायचं कारण अनेक आक्रमणं हे शहर आपल्या छातीवर झेलतच आहे. अगदी आजतागायत!
पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला हा देश. इसवी सनपूर्व चौदाव्या शतकात या देशावर आधी रोमनांचं, नंतर अरब मुसलमानांचं, तद्नंतर ख्रिस्ती क्रुसेडरांचं, मामलुकांचं आणि नंतर तुर्कांचं राज्य होतं. पहिल्या महायुद्धानंतर फ्रेंचांनी आपल्या कब्जात घेतलेला लेबनॉन १९४३ मध्ये स्वतंत्र झाला. आशिया, आफ्रिका आणि युरोप या तीन खंडांच्या सीमेवर असलेल्या मोक्याच्या जागेवर वसलेल्या या छोट्याशा देशाचं क्षेत्रफळ जेमतेम दहा हजार चौरस किलोमीटर असलं, तरी त्याला भूमध्य सागरातील सर्वात मोठं बंदर लाभलंय. आता याला वरदान म्हणावं की शाप? कारण या भौगोलिक स्थानामुळेच त्यांच्यावर सतत आक्रमणं होत राहिली. व्यापारातून मिळालेल्या नफ्यापेक्षा हे नुकसानच अधिक होतं. ही मोक्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न प्रत्येक शक्तिशाली राष्ट्रांनी केला. सफल जेत्यांनी तिथे आपली वसाहत उभारली आणि जाताना लेबनॉनला आपापल्या संस्कृतीचा वारसा देऊन गेले. बैरुटमध्ये म्हणूनच आपल्याला मिश्र संस्कृती पावलोपावली आढळते. चर्च आणि मशिदी अगदी लगटून उभ्या आहेत. हिजाब घातलेल्या स्त्रियांशेजारून मुक्तकेशी तरुणीही चालताना दिसतात. समुद्रकिनारी हुक्का-गुडगुडी ओढत बसलेल्या मच्छिमार अरबाशेजारी ब्रँडेड ट्रॅकसूट घातलेला जॉगरही विसावलेला दिसतो.
बैरूट शहराला एक जिवंतपणा आहे. ऊर्जा आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश येथील माणसांना उद्यमी ठेवतो. व्यवसायात निपुण असलेल्या या लेबनीज लोकांना व्यापारकला चांगलीच अवगत आहे. पश्चिम आफ्रिकेत जागोजागी दिसणाऱ्या सुपर स्टोअर्सच्या शृंखला आणि आपली खास चव असणारी त्यांची आहारगृहं खूपच लोकप्रिय आहेत. निधड्या व्यक्तिमत्त्वाचे हे कष्टाळू लोक सुदूर प्रांतात जाऊन, गोड बोलून आपला जम बसवतात. या शहरातून फेरफटका मारताना वाटलं, आपण पॅरिसमध्येच फिरतोय. फ्रेंचांच्या वसाहतीमुळे आजही बैरुटवर फ्रान्सची छाप आहे. पिवळ्या इमारती, रस्त्यावरील कॅफेमधली छानशी टेबलं आणि सावलीसाठी मोठाल्या छत्र्या. रात्री तर या शहराला उधाण येतं. नाइटक्लबमधून कुठे कर्णमधुर, तर कुठे कर्णकर्कश्श संगीत सुरू होतं आणि रसनेला तृप्त करणारी आहार-उपाहारगृहं दुथडी भरून वाहू लागतात.
‘लेबनीज क्युझिन’ हा फक्त मध्यपूर्व आशियातच नव्हे; तर जगभरात प्रसिद्धी पावलेला आहार आहे. मुख्य जेवणापूर्वी येणाऱ्या लेबनीज मेझेमध्ये गरम आणि गार पदार्थ एकामागोमाग एक हजेरी लावत असतात. त्यात ‘होम्मस’ ही भिजवून उकडलेल्या छोल्यांची, लसूण, तीळ आणि ऑलिव्ह ऑइल घालून केलेली पेस्ट, पांढरं चीज आणि अनेक प्रकारची सॅलेड हमखास असतात. लेबनीज पद्धतीनं केलेलं वांग्याचं भरीत- बाबागनोश तर लाजवाब! याबरोबर देण्यात येणारा गरमागरम लेबनीज ब्रेड म्हणजे काळे तीळ लावलेली टम्म फुगलेली फुलक्याएवढी मैद्याची जाड भाकरी. मुख्य जेवणात कबाबांची रेलचेल असली तरी शाकाहारी माणसाला उपास घडतोय असं कधी होत नाही. शाकाहारी पदार्थांमध्ये माझा आवडता पदार्थ होता डोल्मा! द्राक्षांच्या पानांमध्ये मसाल्यांसोबत भात गुंडाळून लोडासारख्या गुंडाळ्या करून त्या पाण्यात उकडतात. द्राक्षाची पानं मुळात आंबट. पाण्यात उकळूनही त्याचा आंबटपणा थोडासा राहतोच. त्यामुळे या सुरळीच्या वड्या खाऊन दात आंबतातच. गाजर, वांगं, झुकिनी यासारख्या भाज्या कोरून त्यात भात किंवा मसाले भरून उकडल्या की पोटभरीचं जेवण होतं. मात्र लेबनॉनमधील शंभर टक्के शाकाहारी पदार्थ म्हणजे फलाफल सँडविच- स्वस्त नि मस्त! त्यांचा वडापावच म्हणा ना. फलाफल हे भिजवलेल्या छोल्यांचे वाटून तळलेले चपटे वडे असतात. पातळ पोळीसारख्या लेबनीज ब्रेडवर अथवा भाकरीसारख्या ब्रेडच्या पापुद्र्याच्या खिशात आधी होम्मोसची पेस्ट लावून त्यात तीन-चार फलाफल कुस्करून टाकतात, सॅलेड पेरून थोड्या चटण्या घालतात आणि स्वाहा करण्यासाठी गरमागरम सर्व्ह करतात. लेबनॉनमधील या खाद्यसंस्कृतीचा आम्ही पुरेपूर आस्वाद घेतला.
लेबनॉनच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना आपल्याला भेटतात त्यांचे प्रसिद्ध रोशे रॉक्स. हे तीन-चार चुनखडीचे खडक एकमेकांच्या आसपासच आहेत. निरनिराळ्या कोनातून डोळ्यांना, मनाला ते वेगवेगळ्या रूपात दिसतात. आमच्या शेजारच्या पर्यटकाने म्हटलं की हा मगरीसारखा दिसतोय. लागलीच आम्हाला समोर मगर असल्याचा भास झाला. एका खडकाची मात्र सुंदरशी कमान झाली आहे. होडकं पार होऊ शकेल इतकी रुंद! हिरवट पिवळसर रंगाचे हे खडक सायंसमयी अप्रतिम दिसतात. एका कट्ट्यावर बसून मावळत्या सूर्याच्या साक्षीने या खडकाआड चाललेल्या छोट्या छोट्या होडक्यांचा लपंडाव पाहण्यात आम्ही बैरुटमधील एक सुंदर संध्याकाळ घालवली.
बैरूट शहरातील हारिसा या जागी एका उंच टेकाडावर मदर मेरीचा शुभ्र पुतळा उभा केला आहे. तो बघताच मला ब्राझीलमधील ‘क्राईस्ट द रिडिमर’ या पुतळ्याची आठवण झाली. असाच उंच डोंगरावर उभा, हात पसरून अतीव करुणेनं अखिल मानवजातीला कवेत घेऊ इच्छिणारा येशू! तशीच ही करुणामयी मदर मेरी! ‘अवर लेडी ऑफ लेबनॉन’ या नावाने संबोधली जाणारी ही तेरा टनाची श्वेतमूर्ती एकोणिसाव्या शतकात फ्रान्समधून आणली गेली. तिचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला केबल कारने अर्धा डोंगर पार करावा लागतो. खाली दिसत असतं गजबजलेलं बैरूट शहर आणि अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा. बैरूटला मध्यपूर्व देशांचा रेताड रंग नाही. उलट डोळ्यांना निववणारी हिरवाई आहे सगळीकडे. पुतळ्याच्या पायथ्याशी जायला उभा कडा चढणारी फुनिक्युलर रेल्वे घ्यावी लागते. तिथे पोहोचल्यावर मनात भरलं ते मदर मेरीचं विराट पण शांत सौम्य रूप! प्रांगणातली सेडर वृक्षांची झाडं हुबेहूब ख्रिसमस ट्री सारखी दिसतात.
पुतळ्याच्या चौथऱ्याखाली एक छोटंसं चर्च आहे. तिथे येशूचा जन्मसोहळा दृश्यांकित केला होता. आम्ही बैरूटमध्ये होतो तो दिवस होता ख्रिसमसचा. बैरूटमध्ये ईदबरोबरच ख्रिसमसही उत्साहानं साजरा होतो. तबेल्यातील गवतावर अलगद पहुडलेला बाळ येशू फारच गोंडस दिसत होता. सेडर वृक्षांवर दिव्यांची रोषणाई केली होती. मदर मेरीचा पुतळा प्रकाशाच्या झोतात चमकत होता. दीपस्तंभासारखी भासणारी, उंच, धीर गंभीर मूर्ती आज खूप हसरी, आनंदी भासत होती.
प्रांगणाच्या कठड्यावर बसून समुद्रात अस्त होणारा केशरी भास्कर पाहत असताना वाटलं, गरुडाचे पंख उधार घ्यावेत अन् ते पसरून एका झटक्यात समुद्रावरून एक फेरी मारून यावी. आमचं विमान बैरुट विमानतळावर उतरायच्या तयारीत होतं, तेव्हा समुद्राच्या पाण्याच्या थोडंसंच वर उडत होतं. विमानतळ समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ आहे की क्षणभर असं वाटून जातं, त्या निळसर चमचमत्या पाण्यातच उतरायचं आहे आपल्याला.
या निसर्गरम्य बैरूटच्या काळजात त्यांच्या पंतप्रधानांच्या हत्येची एक खोल जखम आहे. २००५मध्ये रोशे रॉक्सजवळच असलेल्या सेंट जॉर्ज हॉटेलजवळ हा हल्ला झाला होता. रफिक हरारे या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानांचा ताफा रस्त्यावरून जात असताना एका ट्रकबॉम्बच्या मदतीने तिथे भीषण स्फोट घडवून आणला. त्यात रफिक हरारे यांच्यासह बावीस जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यात त्यांचे सहा अंगरक्षकही होते. या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हमरस्त्याच्या बाजूस सुशोभित तंबू उभारण्यात आला होता. पंतप्रधानांच्या हत्येनंतर बैरूटमधील हुतात्मा चौकात प्रचंड जनसमुदाय जमला होता. पावसापाण्याची पर्वा न करता आपल्या एकजुटीची साक्ष देत इतक्या विपुल प्रमाणात लोकांचा जमाव बैरुटवासीयांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच अनुभवला होता.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com