विचारभान
संध्या नरे-पवार
जगाच्या दृष्टीने निरक्षर असणारी, पण मातीमध्ये मुळाक्षरं गिरवणारी आणि झाडाचे पान न् पान वाचणारी माय थिमक्काचे १४ नोव्हेंबरला निधन झाले. शंभरीपार आयुष्यात तिच्या अंगावर जितक्या सुरकुत्या होत्या त्यापेक्षा अधिक झाडं तिने लावली, जगवली, वाढवली. देश-विदेशातून मिळणाऱ्या मान-सन्मानाबरोबरच पर्यावरणवादी स्त्री ही तिची ओळख बनली. तिला स्वत:ला जैविक मूल झाले नाही, पण तिने हिरव्या निसर्गाची एक परिसृष्टी जन्माला घातली आणि तिथल्या साऱ्या गणगोताची ती माय झाली.
ती गेली. ती कोणी नेता नव्हती, उद्योजक नव्हती, साहित्यिक नव्हती. ना ती जगातील एखादी अब्जाधीश होती.
तरीही तिची आठवण का करायची?
कारण खरे नेतृत्व कसे असते, हे तिने आपल्या कृतीतून दाखवले. संपूर्ण आयुष्य उद्यमशील राहात कसे जगावे, हे तिने सांगितले. ‘अक्षर’ असे काही कसे निर्माण करावे, हेही तिने दाखवून दिले. आणि ती अब्जाधीश नव्हती असे तरी कसे म्हणावे? काही शतके टिकणारा असा समृद्ध वारसा ती मागे सोडून गेली.
आजूबाजूला ओसाड वाळवंट असताना ती एक हिरवं आयुष्य जगली. म्हणजे सगळ्यांसाठी जे वास्तव होते तेच तिच्यासाठीही होते.
माथ्यावर तळपणारा सूर्य, पायाखाली तापलेला रस्ता...
ग्लोबल वॉर्मिंगचे हे वर्तमान...हळूहळू सगळ्यांच्या अंगवळणी पडणारे. उपाय काय? तर ज्यांना परवडत आहे त्यांच्यासाठी वातानुकुलित घर, वातानुकुलित गाडी आणि वातानुकुलित ऑफिस. ज्यांना परवडत नाही त्यांनी रस्त्यावर उष्माघात होऊन मरावे किंवा अंगाची लाहीलाही सहन करत जगावे. विकासाच्या मागे धावत निसर्गाला ओरबाडणे मात्र तसेच सुरु. नवे नवे चौपदरी, सहा पदरी महामार्ग, फ्लायओव्हर, आकाश छेदणाऱ्या इमारती, जमिन ओरबाडणाऱ्या खाणी...आणि या साऱ्यासाठी होणारी अविरत वृक्षतोड. जंगलंच्या जंगलं कापली जात असताना कोरडे सुस्कारे टाकण्यापलिकडे नागरिक म्हणून आपली प्रतिक्रिया काय? तर कोरड्या चर्चा. आणि शासन-प्रशासनावर ओढलेले ताशेरे.
पण हा असा वांझोटा संताप तिने नाकारला. ती कोणालाच काही बोलली नाही. फक्त उठली, घराबाहेर पडली आणि रस्त्यावर आली. ओसाड, तापलेल्या रस्त्यावर तिने एक खड्डा खणला. जपून आणलेले हातातले रोप त्या खड्ड्यात लावले. त्याला पाणी दिले. त्याचा वेलू गगनावरी जावा म्हणून तिने त्या रोपाची निगुतीने काळजी घेतली. तेवढ्यावर न थांबता ती एका मागोमाग एक रोपं रोवत गेली. तब्बल साडेचार किलोमीटरच्या रस्त्यावर ती न थकता रोपं लावत गेली, रोपं जपत राहिली. रोपं वाढत गेली, रोपांचे वृक्ष झाले आणि बघता बघता रस्ता हिरव्या छायेने बहरला. आपल्या संपूर्ण आयुष्यात तिने ३८५ वडाची झाडे लावली.
होय, तीच ती. माय थिमक्का.
वरकरणी एक साधी, खेडवळ बाई. पण अपार शहाणपण असलेली. धरणी जपायला हवी, तर माती राखायला हवी, माती राखायला हवी, तर झाडं जपायला हवी...झाडं जपली तरच माणूस जगेल..हे मूलभूत ज्ञान-विज्ञान तिला अचूक माहीत होते. खरे तर, हे पिढ्यान् पिढ्या चालत आलेले ज्ञान. पण विकासाच्या नादाने खुळावलेल्या माणसाने आधुनिक होण्याच्या नादात ते नाकारले. पण थिमक्काने हे आधुनिक खुळावलेपण नाकारले. आणि मातीशी असलेली आपली बांधिलकी जपली.
माय थिमक्काला ‘पर्यावरण’ हा शब्द माहित नव्हता. पण आज ती जगातली एक मुख्य ‘पर्यावरणवादी’ मानली जाते. एकटीने ८,३८५ झाडे लावली म्हणून? असे तर वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतच असतात देशभर. ढिगभर झाडं तोडल्यानंतरचा तो मूठभर उतारा असतो. आपणच आपले केलेले निरर्थक सांत्वन असते ते. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात लावलेली किती झाडे जगतात? यावर एक स्वतंत्र संशोधन केले पाहिजे.
मग माय थिमक्काच्या या वृक्षारोपणाचे वेगळेपण काय? लावलेले प्रत्येक झाड तिने जगवले. पण एवढ्यानेही तिचे वैशिष्ट्य संपत नाही. केवळ एक शासकीय कार्यक्रम म्हणून तिने झाडे लावली नाहीत. तर तिची ती एक विचारपूर्वक केलेली कृती होती. त्या झाडं लावण्यामागे एकूण वनसंपदेच्या रक्षणाचा, पशुपक्ष्यांसह वन्य जीवसृष्टीच्या संरक्षणाचा विचार होता. म्हणूनच तिने उथळपणे केवळ छान दिसतात म्हणून आपल्या मातीला अपरिचित असणारी कोणतीही परदेशी झाडं लावली नाहीत. किंवा तथाकथित सौंदर्यवादी होत फुलझाडं लावली नाहीत. ती संपूर्ण आयुष्यभर तिच्या परिसराला अनुकूल अशी देशी झाडं लावत राहिली. आणि त्याचबरोबरीने एका मुख्य झाडाचं बी निगुतीने रुजवत राहिली. ते म्हणजे वडाचं, वटवृक्षाचं.
माय थिमक्काला पर्यावरणवादी का म्हणायचे? याचे उत्तर तिने केलेल्या या ‘वृक्ष’निवडीमध्ये आहे. खोलवर मुळं पसरवत रुजणारे, शतकापेक्षा अधिक काळ जगणारे, चौफेर पसरत पक्ष्यांना आधार देणारे आणि निसर्गाची परिसंस्था तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वडाचे झाड पेरणारी थिमक्का जल-जंगल-जमिनीला, त्यातल्या ऋतुचक्राला नीट ओळखत होती. हे ऋतुचक्र नीट चालायला हवे असेल तर आधी वटवृक्ष जगवायला हवा, हेही तिच्या परंपरागत शहाणपणाला माहीत होते.
सर्वसामान्य भाषेत ज्याला निरक्षर म्हणतात, अशी होती माय थिमक्का. शाळेची पायरीही न चढलेली. कर्नाटक राज्यातल्या रामनगर जिल्ह्यातल्या हुलिकल गावची थिमक्का एक मजूर म्हणून आयुष्य जगत होती. तिच्या वृक्षारोपणाची सुरुवात कशी झाली? याची कहाणीही तिच्या वृक्षारोपणाच्या दीर्घ प्रवासाइतकीच रोचक आणि विचार करायला लावणारी आहे. थिमक्का आणि तिचा नवरा चिकैय्या या जोडप्याला मूल होत नव्हते. अशा वेळी अनेक स्त्रिया उपासतापास करु लागतात, वेगवेगळ्या बुवाबाबांकडे जाऊन अंगारेधुपारे आणू लागतात, तीर्थयात्रा करु लागतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वत:च्या बीजाचे मूल हवेच, हा आग्रह यामागे असतो. पण थिमक्काने ‘मूल’ या संकल्पनेचा अधिक व्यापक विचार केला. मूल हवे असणे म्हणजे नेमके काय? तर - ‘मातृत्वाची म्हणजेच बाल संगोपनाची इच्छा’ आणि ‘आपला वारसा मागे सोडणे’. या दोन इच्छा पूर्ण करण्याचा एक वेगळा मार्ग या थिमक्काने शोधला. आपली मुलांची इच्छा या जोडप्याने झाडांच्या माध्यमातून, झाडं लावून, त्यांना वाढवून पूर्ण केली. आपल्याला मूल झाले नाही तर काय झाले? आपण झाडं लावूया आणि ती जगवूया. तिच आपली मूले, असे तिने ठरवले. तिच्या या निर्णयाला चिकैय्यानेही साथ दिली आणि एका दीर्घ वाटचालीला सुरुवात झाली.
त्यांच्या हुलिकल ते कुडुरु गावाच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग होता. तसाच उघडाबोडका. सतत तापलेला. या दोघांनी हा रस्ता निवडला. आधी त्यांनी वडाची कलमं करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी दहा कलमं तयार केली आणि ती या महामार्गावर पाच किलोमीटरच्या अंतरात लावली. अर्थात हे काम सोपे नव्हते. या पावसात लावलेली रोपे पुढच्या पावसात नीट मूळं धरत. कलमं लावल्यानंतर त्या कलमांची निगा राखणे, गुराढोरांनी त्यांना खाऊ नये म्हणून त्याभोवती निवडुंगाचे काटेरी कुंपण करणे, त्यांना वेळेवर पाणी देणे - थोडक्यात बाल संगोपन करणे - थिमक्काने पतीच्या मदतीने हे काम अतिशय निगुतीने केले. चार ते पाच किलोमीटरचे अंतर कापून ती रोपांसाठी पाणी नेत असे. दुसऱ्या वर्षी आणखी १५, तर त्याच्या पुढच्या वर्षी आणखी २० रोपे लावली. सुरुवात ‘मुलांच्या ऐवजी झाड लावू’ म्हणून झाली आणि अल्पावधीतच थिमक्काचे हे गोकुळ झाडांनी भरुन गेले. थिमक्काला जणू हिरवाईचे वेड लागले. वडाच्या सोबतीने ती इतरही देशी वाणाची झाडे लावू लागली. तरुणपणात सुरु केलेले काम तिने निष्ठेने आयुष्यभर केले. जणू निसर्ग तिला साद घालत होता आणि ती त्या हाकेला ओ देत होती.
थिमक्काचे नेमके वय कोणाला माहीत नाही. तिचा जन्म १९११ सालचा होता, असे सांगितले जाई. त्यानुसार १४ नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला तेव्हा तिला ११४ वर्षं पूर्ण झाली होती. काहीजणं तिचे जन्मसाल १९२७ होते असे सांगतात. त्यानुसारही तिने वयाची ९८ वर्ष पूर्ण केली होती. थिमक्काने लावलेली झाडेच आता ७० वर्षांची झाली आहेत.
हळूहळू आजूबाजूच्या गावात तिची किर्ती पसरली. लोकं तिला कन्नडमध्ये ‘सालुमरदा’ (झाडांची रांग) म्हणू लागले.
२०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने तिला गौरविले गेले. तिला देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कारही मिळाला. १९९९ मध्ये तिच्यावर माहितीपट बनवण्यात आला. २००० मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला. २०१६ मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली आणि प्रेरणादायी स्त्री म्हणून बीबीसीतर्फे थिमक्का यांची निवड झाली.
अर्थात एकीकडे हा मानसन्मान मिळत असतानाच आधुनिक विकासाची दृष्टी थिमक्काच्या झाडांवरही पडली नसती तरच नवल. अलिकडेच २०१९ मध्ये एका रस्तेरुंदीकरण प्रकल्पात थिमक्काने लावलेल्या काही झाडांवरही विकासाची कुर्हाड पडणार होती. थिमक्का जीवाच्या कराराने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्या दारी धावली. ‘माझी झाडे वाचवा’ म्हणाली. तोवर थिमक्काचे नाव झालेले होते. थिमक्काची विनंती झिडकारणे मुख्यमंत्र्यांना शक्य नव्हते. थिमक्काची झाडे वाचली. थिमक्काने लावलेल्या ३८५ वडाच्या झाडांची किंमत साधारण १.५ दशलक्ष रुपये आहे, असे सांगितले जाते.
एकूणच गेल्या काही वर्षांमध्ये थिमक्का एक आयकॉन बनली होती - वृक्षसंवर्धनाचा, पर्यावरण रक्षणाचा.
वडासोबत नाते जोडणारी माय थिमक्का स्वत:च एक वटवृक्ष झाली. वडाच्या झाडासारखीच शंभरीपेक्षा अधिक काळ जगली. जाताना कशासाठी जगायचे? कसे जगायचे ? हे सांगून गेली. शिवाय जाता जाता तिने लावलेली झाडे जपण्याची जबाबदारी ती आपल्या खांद्यावर टाकून गेली आहे.
निरंतर सुरु असलेला संघर्ष
एखाद्या उद्योगासाठी, खाणीसाठी, रस्तारुंदीकरणासाठी आजवर वृक्षतोड होत आली. पण आता साधुग्रामच्या विस्तारासाठीही नाशिकमधील तपोवनातील तब्बल १७०० झाडे छाटण्याचा प्रस्ताव नाशिक महापालिकेने मांडला आहे. २०२६ मधील आगामी कुंभमेळ्यात जवळपास १० लाख साधू इथे येतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या निवासाच्या सोयीसाठी साधुग्रामचा विस्तार करण्याची योजना तयार होत असून त्या परिसरात असणाऱ्या १७०० झाडांचा अडथळा दूर करण्याचे घाटत आहे. नाशिकमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि नागरिक या प्रस्तावाला विरोध करत असून त्यांनी चिपको आंदोलन करण्याचा, झाडांना मिठी मारुन राहण्याचा निर्धार केला आहे. सत्तरच्या दशकात उत्तराखंडमधल्या स्त्रियांनी गौराबाईच्या नेतृत्वाखाली आपल्या गावातील झाडे वाचवण्यासाठी असे ‘चिपको आंदोलन’ केले होते. त्याला सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभले होते. उत्तराखंडमधले महिलांचे चिपको आंदोलन यशस्वी झाले असले तरी नंतरची अशी आंदोलने मात्र शासनाने बळाचा वापर करत मोडून काढली. याचे अगदी अलिकडचे मुंबईतील उदाहरण म्हणजे मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील २७०० झाडे तोडायचे ठरले तेव्हा त्याला मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी कसून विरोध केला होता. यात पर्यावरणप्रेमी तरुणाईचा अधिक सहभाग होता. पण रातोरात २७०० झाडं तोडण्यात आली. आता तपोवनमधील १७०० झाडे संकटात आहेत. २०१९ मध्ये थिमक्कांनाही आपण लावलेली, संगोपन करुन वाढवलेली झाडे वाचवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घ्यावी लागली होती. थिमक्का यांचे नाव आणि कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले असल्याने प्रशासकीय यंत्रणेला माघार घ्यावी लागली.
झाडं लावणे ही जशी एक निरंतर प्रक्रिया आहे, तशीच असलेल्या झाडांना जपण्यासाठी संघर्ष करणे, ही सुद्धा आज एक सतत करावी लागणारी कृती बनली आहे. माय थिमक्काची स्मृती जागवायची ती या संघर्षाचे प्रतीक म्हणूनही.
पर्यावरणीय स्त्रीवादाचा कृतिशील वारसा
स्त्रीवाद किंवा फेमिनिझम म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर बहुतेक लोकं ‘पुरुषांना विरोध करणे’, ‘पुरुषांची बरोबरी करणे’ असा करतात. स्त्रीवादाविषयीचे हे अपुरे, चुकीचे आकलन आहे. शोषण करणारी पुरुषसत्ताक मूल्यव्यवस्था नाकारत शोषणविरहीत व्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी, व्यवस्थाबदलासाठी बळ देणारी विचारसरणी म्हणजे स्त्रीवाद. स्त्रीवाद हा समतेची, सामाजिक न्यायाची मागणी करतो. स्त्रीवादाचा हा गाभा असला तरी तो एकसाची नाही. वेगवेगळ्या विचारसरणींनुसार स्त्रीवादामध्येही विविध प्रवाह आहेत. उदा. मार्क्सवादी स्त्रीवाद, समाजवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवाद, काळा स्त्रीवाद. या विविध स्त्रीवादी प्रवाहांमध्ये ‘पर्यावरणीय स्त्रीवाद’ हा नव्वदीच्या दशकानंतर अलिकडच्या काळात उदयास आलेला निसर्गकेंद्री प्रवाह आहे. इंग्रजीत त्याला ‘इको फेमिनिझम’ म्हणतात.
फ्रँककॉइज युबोनी, मारिया मेस, वंदना शिवा, बिना अग्रवाल यांनी पर्यावरणीय स्त्रीवादाची मांडणी केली. निसर्ग आणि स्त्रिया यांच्यात एक दुवा असून पुरुषसत्ताक व्यवस्था ज्याप्रमाणे स्त्रियांचे दमन करते त्याचप्रमाणे पुरुषसत्ताक मूल्यांवर आधारलेली विचारप्रणाली ही निसर्गाचेही शोषण करत असते. पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रिया आणि निसर्ग दोघांनाही दुय्यम स्थान असते. निसर्ग आणि स्त्रिया या दोघांनाही उपभोग्य मानले जाते, खासगी मालमत्ता मानली जाते. ज्याप्रमाणे स्त्रियांच्या शोषणाचे मुद्दे हे पुरुषसत्ताक भांडवली विचारसरणीतून जन्माला येतात, त्याचप्रमाणे पर्यावरणीय मुद्दे हेही मुलत: पुरुषसत्ताक भांडवली विचारांमुळे निर्माण झालेले आहेत, हे पर्यावरणीय स्त्रीवादाने अधोरेखित केले. पर्यावरण आणि स्त्रिया यांच्या शोषणशासनाच्या व्यवस्था जशा समान आहेत, त्याचप्रमाणे या दोन्ही घटकांमध्ये अनेक साम्य आहेत. निसर्ग ज्याप्रमाणे सर्जक आणि संगोपक आहे त्याचप्रमाणे स्त्रियाही सर्जक आणि संगोपक आहेत. निसर्ग जपला, जल-जंगल-जमीन यांचे संरक्षण झाले तरच स्त्रिया आणि भावी पिढ्या एक निकोप आयुष्य जगू शकतील, हा पर्यावरणीय स्त्रीवादी विचारसरणीचा गाभा आहे.
माय थिमक्का गेली सत्तर वर्षे तिच्या कृतीमधून हाच पर्यावरणीय स्त्रीवाद मांडत आली, स्वत: हा स्त्रीवाद जगत आली. आज वंध्यत्वावरच्या उपचारांच्या नावाखाली ‘मूल जन्माला घालण्याचा’ एक उद्योग विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे उभा राहिला आहे. आयव्हीएफच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करत ‘आपल्या बीजाचे मूल हवे’ ही इच्छा पूर्ण केली जाते. पण थिमक्काने झाडांनाच आपली मूलं मानत ती झाडं लावत राहिली आणि झाडांचे, निसर्गाचे संगोपन करत राहिली. आपण लावलेल्या इवल्याशा रोपाचे महाकाय वृक्षात रुपांतर होतानाचे टप्पे पाहताना तिच्यातील मातृत्त्व सुखावत होते. एखाद्या रोपाची वाढ खुंटली की तिची घालमेल होत असे. त्यावर किड पडू नये, त्याला पुरेसे पाणी मिळावे म्हणून ती दक्ष होती. आणि एक दोन झाडं लावून ती थांबली नाही. वयाच्या तिशीत सुरु केलेला हा उद्योग वयाची शंभरी गाठल्यावरही तिने सुरुच ठेवला होता.
कारण झाडांच्या, निसर्गाच्या संगोपनात मानवी भविष्याचे संगोपन आहे, हे तिने ओळखले होते. तिने पर्यावरणीय स्त्रीवाद वाचला नव्हता, पण ती तो स्वत: जगली होती.
sandhyanarepawar@gmail.com