गावकुसाबाहेरच्या मरणकळा : साबर बोंडं

निवडुंगाचं फळ कायम गावकुसाबाहेर, कुठेतरी कोपऱ्यात फुलतं, फळतं. समलैंगिकांचं अस्तित्वही असंच गावकुसाबाहेर असतं. समाज त्यांच्या नात्याला मान्यता देत नाही, ते नातं स्वीकारत नाही. या नकाराची घुसमट अवघं जीवन व्यापून उरते. या घुसमटीचं तरल चित्रण म्हणजे ‘साबर बोंडं’ हा चित्रपट.
गावकुसाबाहेरच्या मरणकळा : साबर बोंडं
Published on

विचारभान

संध्या नरे-पवार

निवडुंगाचं फळ कायम गावकुसाबाहेर, कुठेतरी कोपऱ्यात फुलतं, फळतं. समलैंगिकांचं अस्तित्वही असंच गावकुसाबाहेर असतं. समाज त्यांच्या नात्याला मान्यता देत नाही, ते नातं स्वीकारत नाही. या नकाराची घुसमट अवघं जीवन व्यापून उरते. या घुसमटीचं तरल चित्रण म्हणजे ‘साबर बोंडं’ हा चित्रपट.

डोळ्यात पाणी तरळतंय, डोळ्यांच्या कडा ओल्या होताहेत, सगळे बांध फोडून एक अश्रू पापणीच्या कडेवर येऊन थांबतो, खाली ओघळायच्या आधी तिथेच क्षणभर विसावा घेतो. आता डोळ्यांच्या आत राहताही येत नाहीए आणि डोळ्यांची साथ सोडून खाली ओघळूनही जायचे नाहीए. कारण ओघळून तरी कुठे जाणार? गालांवरच सुकून जाणार. जिथे जन्म झाला ते डोळेही थारा देत नाहीएत. आतही नाही आणि बाहेरंही नाही, अशा अवस्थेत ते थेंब डोळ्यांच्या कडेवरच काही काळ थांबतात आणि अखेरीस असह्य होत गालांवर ओघळतात. अगदी हळूहळू.

अश्रूंच्या घुसमटीचं हे असं विलक्षण दृश्य ‘साबर बोंडं’ सिनेमात दोन-तीन ठिकाणी येतं. पाहणाऱ्यालाही बसल्या जागी घुसमटवून टाकतं. एकीकडे अश्रूंची ही घुसमट, आत्यंतिक खासगी; तर दुसरीकडे विना अश्रूंचं धो-धो रडणं. केवळ हेल काढणारं. मोठ मोठे हुंदके देणारं. जणू एखादा विधी असल्यासारखं. हे असं सामाजिक, राजकीय रडणंही ‘साबर बोंडं’ सिनेमात कानावर येऊन आदळतं.

हे परस्पर विसंगत चित्रं सिनेमात दिग्दर्शकाने अचूक उभं केलं आहे. हे खासगी असलेले अश्रू आणि त्यांची घुसमट एका सामाजिक, राजकीय वातावरणात निर्माण झाली आहे, हेही दिग्दर्शक कोणतंही विधान न करता अतिशय सौम्य पद्धतीने पण ठामपणे सांगतो. नि:शब्द करणारा एक तरल अनुभव हा सिनेमा देतो.

काय आहे या सिनेमात? तर मयत विधीभोवती गुंफलेलं एक विधीनाट्य आहे आणि या सगळ्या विधीनाट्यापासून फटकून असलेला तरुण मुलगा आहे. त्या तरुणाचा बालमित्र आहे. या दोघांमधली ‘दोस्ती’ आहे. मूकपणे सगळं तोलू पाहणारी आई आहे. शहरातल्या रुग्णालयात वडिलांचा मृत्यू झाला आहे. अंतिम संस्कार एकत्रित कुटुंबासोबत गावी करायचे आहेत. आई सुमन आणि मुलगा आनंद शववाहिनीतून वडिलांचं शव घेऊन गावी जातात. अंतिम संस्काराचे विधी होतात. त्यानंतर दहाव्या दिवसापर्यंत पुढचे विधी. या विधींसाठी शहरात नोकरी करणारा आनंद गावातच अडकून पडतो. घरात त्याच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. आजी, काका-काकी, चुलत भाऊ त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणतात. वडील मेल्यावर वर्षाच्या आत लग्न व्हायला हवं, म्हणून सांगतात. आनंद निकराने नाही..नाही.. म्हणत लग्नाचा विषय टाळत राहतो. आपला मुलगा ‘नाही’ का म्हणतोय हे आईला उमगतंय. पण सासरच्या माणसांसमोर ती ‘गप्प’ आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, चरणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांसोबत, दूरवर शीळ घालणाऱ्या पक्ष्यांच्या नादासह आणि वाहत्या नदीच्या खळाळासह आनंद आणि बाळ्या यांच्यातील समजुतीचा, जवळकीचा प्रवास सुरू होतो. या सगळ्या प्रवासात एक संथपणा आहे. सगळ्या जगाला एक वेग आलेला असताना त्या दहा दिवसांतलं या दोघांचं जग अतिशय संथ आहे, कोमल आहे. पुरुषप्रधानतेच्या कठोर सामाजिक साच्यातून पुरुषाला वेगळं काढलं की, तो असा ‘कोमल’ होतो, होऊ शकतो, जशी निवडुंगांच्या काट्यांमध्ये वाढणारी बोंडं गोड असतात, अगदी तसंच. एक आंतरराष्ट्रीय विषय ग्रामीण पातळीवर, गावच्या सगळ्या माहोलासकट, गावच्या सगळ्या ध्वनी-प्रतिध्वनींसह स्थानिक संदर्भात मांडला आहे.

“तुझ्यासारखी आणखी मुलं आहेत गावात?” आनंद बाळ्याला विचारतो.

“मी आहे, म्हणजे माझ्यासारखी आणखी असणारच ना?” बाळ्या सांगतो.

विषय जितका व्यापक असतो, तितकाच तो सूक्ष्म, स्थानिक असतो, हे या अशा संवादातून उलगडत नेलं आहे.

“तू पुन्हा परत गावी आला नाहीस?” बाळ्या आनंदला विचारतो.

“मला वाटलं तुझ्या लक्षात आलं असेल.” आनंद सांगतो.

बालवयातील मैत्रीमध्ये पौंगडावस्थेत काही वेगळं घडलंय. कदाचित दोघांच्या नकळत. त्यानंतर आनंद गावी आलेला नाही. छोट्याशा संवादातून भूतकाळाचा धागा अलगद वर्तमानापर्यंत आणला आहे. तुटलेला तो बंध आता दहा दिवसांच्या या मुक्कामात पुन्हा जुळू लागतोय. या मधल्या काळात या दोघांचाही आपापल्या ‘वेगळ्या’ लैंगिक ओळखीबद्दल आपल्या घरात, परिसरात संघर्ष सुरू आहे. आपल्या वेगळ्या ओळखीसह त्यांना मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे सन्मानाने जगायचं आहे. समाजाच्या दृष्टीने असलेलं त्यांचं ‘वेगळेपण’ हे प्रत्यक्षात वेगळेपण नसून तेही ‘सामान्य’च आहे, हे समाज जोवर समजून घेत नाही, तोवर साबर बोंडांना जशी फळ म्हणून मान्यता नाही, गावकुसाच्या आत त्यांना अस्तित्व नाही, तशीच अ‌वस्था आनंद, बाळ्या आणि त्यांच्यासारख्या सगळ्या समलैंगिकांची आहे. शिखंडी, बृहन्नडा, अय्यप्पा यांचे पौराणिक संदर्भ, वेगवेगळ्या मंदिरांवरील मिथुनशिल्पांमधील समलैंगिक संबंध हा सगळा वारसा असूनही वर्तमानातील प्रश्न नाकारला जातो. त्याचं अस्तित्वच मान्य केलं जात नाही आणि तरीही हा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्याकडे गुन्हा म्हणून पाहिलं जातं. जन्मदाते आईबाप अशा मुलांचं अस्तित्व नाकारतात. त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवतात.

या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे आनंदच्या आईवडिलांचं आपल्या मुलाला समजून घेणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं. समलैंगिक संबंधांना समाज स्वीकारत नसल्याने अशा समाजाला तोंड कसं द्यायचं? आपल्या इतर मुलांच्या भवितव्याचं काय? समाजाने संपूर्ण कुटुंबाशीच संबंध तोडले तर? असे अनेक पेच स्त्री-पुरुष या साच्यातल्या लिंगभावापेक्षा वेगळा लिंगभाव असलेल्या मुला-मुलींच्या पालकांसमोर असतात. बहुतेक पालक ‘मुलांशी नातं तोडणं’ हा त्यावरचा सोपा उपाय निवडतात. खूप कमी पालक मुलांसोबत उभं राहण्याचं धाडस दाखवतात. अलीकडच्या काळात उच्चभ्रू वर्गात काही पालक उघडपणे आपल्या समलैंगिक मुला-मुलींच्या ‘स्वओळखीला’ पाठिंबा देत जाहीर भूमिका घेतात. उदा. सिनेदिग्दर्शिका चित्रा पालेकर. मात्र सामान्य कुटुंबातील पालकांसाठी हे अवघड बनतं.

पण सिनेमात ही अवघड बाब सुमन आपल्यापुरती सोपी करतात. जगासमोर, विस्तारित कुटुंबासमोर स्पष्ट काही सांगता येत नसलं तरी त्या मुलाशी मोकळेपणाने बोलतात. “मला कळलं होतं खूप आधीच” असं सांगत मुलाला ओळखणारी आईची नजर स्पष्ट करतात. “बोलत जा रे माझ्याशी मोकळेपणाने, बरं वाटतं”, असंही कळवळून सांगतात. दुसरीकडे बाळ्याचे पालक त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत असतात. त्याला मारहाण करण्याचं टोकाचं पाऊल त्याचे वडील उचलतात. या विषयात पालकांचं वर्तन, त्यांची भूमिका किती कळीची भूमिका बजावते, हे लेखक-दिग्दर्शकाने अचूक दाखवलं आहे. समलैंगिकता या विषयावरील एक सुंदर नाट्य उभं करताना त्याचे वेगवेगळे कंगोरे स्पष्ट केले आहेत. समाज म्हणून आपली भूमिका किती कोती आहे, याची जाणीव हा सिनेमा करून देतो. आपली समानता, समावेशकता यांचा कस आपण ‘विभिन्न ओळखी’ असलेल्यांना कसं स्वीकारतो, यावरच लागत असतो आणि बऱ्याच वेळेला समाज म्हणून आपण तिथे कच खातो. निसर्गात जे अस्तित्वात आहे, त्याचं अस्तित्व आपण समाज म्हणून नाकारतो. म्हणूनच या सिनेमाभर पसरलेली मृत्यूची, मयतविधींची पार्श्वभूमी समलैंगिकांचं असणं आणि असूनही नसणं, रोजच्या रोज मरणकळांना सामोरं जाणं अधिक ठळक करते.

सिनेमाच्या अखेरीस आईच्याच पुढाकाराने आनंद आणि बाळ्या एकत्र मुंबईच्या दिशेने निघतात.

समुद्राच्या दिशेने...मोकळ्या वाऱ्याच्या दिशेने..

प्रेक्षक म्हणून आपणही खुर्चीवरून उठतो. निवडुंगाचं फळ कधीतरी नीट बघायला हवं, त्यांचं अस्तित्व स्वीकारायला हवं, या समजुतीसह.

sandhyanarepawar@gmail.com

सन डान्सचे ग्रँड ज्युरी प्राईज

रोहन कानवडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘साबर बोंडं’ या सिनेमाला सन डान्स फिल्म फेस्टिवल या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘ग्रँड ज्युरी प्राईज’ हा पुरस्कार मिळाला आहे. सन डान्स फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण १७००० चित्रपटांचं नामांकन झालं होतं. या महोत्सवात दाखल होणारा ‘साबर बोंडं’ हा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसंच पहिला मराठी चित्रपटही आहे. नागराज मंजुळे, सई ताम्हणकर, निखिल अडवाणी, विक्रमादित्य मोटवानी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीचा भार उचलत एक वेगळा विषय समाजासमोर आणला. दिग्दर्शक असलेल्या रोहन कानवडे यांनीच या सिनेमाची कथा-पटकथा लिहिलेली असल्याने हा विषय गोळीबंदरीतीने प्रेक्षकांसमोर येतो. समलैंगिकतेला आजही अनेक देशांमध्ये मान्यता नाही. अनेक देशांमध्ये तो गुन्हा आहे. समलैंगिकतेच्या चेहऱ्यावरून हा कलंक पुसण्यासाठी अनेक संस्था-संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. एक आंतरराष्ट्रीय विषय स्थानिक, ग्रामीण पातळीवर मयतविधींना समांतर नेत फुलवण्याचं, काहीतरी मरताना काहीतरी जगत आहे, हे दाख‌वण्याचं अनोखं कौशल्य रोहन कानवडे यांनी दाखवलं आहे. भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप या तिन्ही प्रमुख कलाकारांनी आपल्या सहज अभिनयाने या भूमिका अक्षरश: जिवंत केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in