तो परत आलाय

तब्बल २१ वर्षांनंतर 'भूमिका' या नाटकामधून सचिन खेडेकर याचं रंगभूमीवर पुनरागमन झालं आहे. चित्रपट आणि मालिकांमधून कितीही यश मिळालं तरी रंगमंचाचा पडदा उघडतानाची धाकधूक, योग्य वेळी मिळणारी रसिकांची दाद हे सगळे अस्सल कलाकाराला हवं असतं. म्हणूनच सचिन परत आला, रंगमंचावर उभा राहिला आणि प्रेक्षकांनीही दाद देत नाट्यगृहाबाहेर 'हाऊसफुल्ल 'चा बोर्ड लावला.
तो परत आलाय
Published on

कलारंग

संजय कुलकर्णी

तब्बल २१ वर्षांनंतर 'भूमिका' या नाटकामधून सचिन खेडेकर याचं रंगभूमीवर पुनरागमन झालं आहे. चित्रपट आणि मालिकांमधून कितीही यश मिळालं तरी रंगमंचाचा पडदा उघडतानाची धाकधूक योग्य वेळी मिळणारी रसिकांची दाद, नाटकाच्या उत्कर्षविंदूच्या वेळी स्वतःला झोकून देतानाची बेहोशी. हे सगळे अस्सल कलाकाराला हवं असतं. म्हणूनच सचिन परत आला, रंगमंचावर उभा राहिला आणि प्रेक्षकांनीही दाद देत नाट्यगृहाबाहेर 'हाऊसफुल्ल 'चा बोर्ड लावला.

२१ वर्षांनंतर पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर परत आला आहे. ‘भूमिका’ या नाटकातून त्याने पुनरागमन केलं आहे. तो आला आणि त्याने जिंकले, या माहोलात ‘भूमिका’ नाटक हाऊसफुल्ल होत आहे. २१ वर्षांनंतरच्या या पुनरागमनाला प्रेक्षकांनी पसंतीची दाद दिली आहे.

हे दमदार पुनरागमन अर्थातच अभिनेता सचिन खेडेकर याचं आहे.

‘भूमिका’ या नाटकात सचिनने ‘विवेक जयंत’ ही भूमिका साकारली आहे. सचिनने आपल्या भूमिकेचा साज या व्यक्तिरेखेला चढवला आणि ‘भूमिका’ नाटकाकडे प्रेक्षक ओढले गेले. सर्वत्र या नाटकाची चर्चा सुरू आहे. कुठल्याही कलाकारासाठी हे असं यश अनोखं असतंच. त्याच्या या यशस्वी पुनरागमनाचा कुणालाही हेवा वाटेल.

गेली काही वर्षं सचिन चित्रपटात आणि मालिका क्षेत्रात इतका बिझी होता, की त्याला नाटक करायला फुरसत नव्हती. पण कोणत्याही अभिनेत्याला असतं तसं त्याला नाटकांचं वेड होतंच. ज्या ज्या वेळी तो नाटकं पहायला जायचा तेव्हा तेव्हा समोरचं नाटक पाहताना त्याच्या मनात एकच विचार यायचा, ‘मला पुन्हा कधी नाटक करायला मिळेल?’ कलाकारांच्या अभिनयाला दाद देताना आणि प्रेक्षकांचीही तशी दाद मिळताना पाहून ‘मला सुद्धा ही अशी दाद कधी मिळेल?’ असा विचार त्याच्या मनात नेहमीच यायचा. बरोबर २१ वर्षांनंतर ‘भूमिका’ या नाटकामुळे त्यालाही अशी प्रेक्षकांची दाद आता प्रयोगागणिक अनुभवायला मिळत आहे. प्रयोगानंतर आवर्जून आत विंगेत येऊन भेटणारे आणि कौतुक करणारे प्रेक्षक आणि त्यांचा प्रतिसाद पाहून सचिन देखील भारावून जातोय. तो सुद्धा स्वतःच्या मनाला सांगतोय, की ‘तुझं पुनरागमन यशस्वी झालंय बुवा, लगे रहो सचिन...’

सचिन खेडेकर हा व्यावसायिक रंगभूमीवरचा एक गुणी अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत ज्या ज्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमधून भूमिका केल्या त्या सर्वच लोकप्रिय झालेल्या आहेत. ‘भूमिका’ हे नाटक म्हणजे त्याच्या नाट्य कारकीर्दीतला एक माईल स्टोनच म्हणावा लागेल. आपल्या २१ वर्षांनंतरच्या व्यावसायिक रंगभूमीवरच्या पुनरागमनाविषयी बोलताना सचिन सांगतो, “बरेच दिवस मी चंदूच्या (चंद्रकांत कुलकर्णी) मागे लागलो होतो, की मला नाटक करायचंय. पण ती वेळ येत नव्हती. मनासारखी स्क्रिप्ट मिळत नव्हती. क्षितिज पटवर्धन यांनी ‘भूमिका’ नाटकाची संहिता लिहिलेली होती. त्यावर चंदू आणि क्षितिज यांचं बरेच दिवस काम चाललं होतं. ती संहिता सहा महिन्यांपूर्वी चंदूने मला वाचून दाखवली. वाचल्यावर मला ती आवडली. वेळेचा प्रॉब्लेम होताच. पण ही भूमिका करावी, असं मला तीव्रतेने वाटत होतं. नवीन नाटक करण्याऐवजी एखादं पुनरुज्जीवित नाटक करूया का? असं सुद्धा मनात येऊन गेलं. पण ‘भूमिका’ हे नवीन नाटक आहे म्हटल्यावर आणि मला मनापासून ते आवडल्यामुळे मी होकार दिला.”

एका अभिनेत्याला एका महामानवावरच्या मालिकेत त्या महामानवाची भूमिका साकारायची संधी मिळते. ही भूमिका साकारताना त्या अभिनेत्यामध्ये कसा कसा बदल होत जातो, आधीचा तो आणि नंतरचा तो यात किती फरक पडतो, या प्रवासावर ‘भूमिका’ हे नाटक आधारित आहे. सचिन म्हणतो, “मला अशी व्यक्तिरेखा उभी करता आली याचं मला समाधान वाटतंय. प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येताहेत त्या पाहून, ऐकून मला बरं वाटतंय. क्षितिजच्या लेखनातच सारे बारकावे खूप अप्रतिमपणे आले आहेत. नटाला उत्कृष्ट आविष्कार करण्यासाठी लिखित पानावर जे असावं लागतं ते सगळं या नाटकाच्या संहितेत आहे. एका अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेत होणाऱ्या बदलाचा प्रवास क्षितिजने मस्त रेखाटलाय. त्यामुळेच मला तो चांगल्या पद्धतीने साकार करता आला. ही भूमिका साकारताना मला समाधान वाटतंय.”

हे नाटक तसं पाहता चर्चा नाट्य आहे. पण त्या चर्चेला एक स्थायिभाव आहे. नाटक पाहताना ती चर्चा ऐकत राहावी असंच वाटतं. त्याचं सर्व श्रेय अभिनेता म्हणून सचिन यालाच देणं उचित ठरेल. पण तो त्याचं क्रेडिट स्वतःला न देता नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना देतो. त्याच्या मते या नाटकाची तालीम हा एक वेगळा प्रवास होता. सचिन सांगतो, “मी चंदूबरोबर चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत. पण दिग्दर्शक म्हणून तो नाटकात जास्त पारंगत आहे. त्याची पात्र योजना, नाटक बसवण्याची पद्धत आणि वेगवेगळे बारकावे यांची सांगड तो बेमालूमपणे घालतो. तालमीत आम्ही संहितेचे वाचन मनापासून करायचो. त्या त्या व्यक्तिरेखेची मानसिकता तो प्रत्येकाला नीट समजावून सांगायचा. तीन आठवडे तर ते सगळं आत्मसात करण्यातच गेले. त्यानंतर आम्ही अभिनयासाठी उभे राहिलो. चर्चानाट्याला तालमीची तेवढी पार्श्वभूमी ही लागतेच. या नाटकासाठी आम्ही वेगवेगळे कलाकार एकत्र आलो होतो. आम्ही सगळ्यांनी आधी कधी एकत्र काम केलेलं नव्हतं. त्यामुळे एकमेकांशी जुळवून घेणं हा सुद्धा एक भाग असतो. ही प्रोसेस पुन्हा एकदा ट्युशन लावल्यासारखी होती. खरोखर माझी ती सवय गेली होती. पण सगळं जमून आलं. नाटक नेमकेपणाने वास्तववादी झालंय.”

कोणत्याही महामानवाच्या विचारांच्या नाण्याला दुसरी बाजू असते, याचा आपण कधी विचार केलेला नसतो. सचिन २१ वर्षांनंतर नाटक करत होता आणि ते सुद्धा या वेगळ्या विषयावर असलेल्या चर्चात्मक बाजाच्या नाटकामध्ये. शुभारंभाच्या पहिल्या प्रयोगादरम्यान त्याच्या मनात कोणते विचार आले असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. सचिन म्हणाला, “खूप वर्षांनंतर मी नाटक करीत होतो. तेव्हा प्रेक्षक माझ्याकडे कुठल्या भूमिकेतून पाहतील हे दडपण होतंच. जसजसे प्रवेश होत गेले आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत गेला तसा मला हुरूप आला. प्रत्येक प्रयोगाचा प्रेक्षक वर्ग हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाचा पडदा सरकताना टेन्शन हे असतंच. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय की नाही हे जाणवत असतं.”

या नाटकातील दुसऱ्या अंकातील तिसरा प्रवेश हा फार महत्त्वाचा आणि उत्कर्षबिंदू गाठणारा आहे. रंगमंचावर प्रत्यक्ष महामानव अवतरतात. सचिन त्या रंगभूषेत आणि वेशभूषेत महामानव वाटतो. त्याचं श्रेय खंदारे या रंगभूषाकाराला देणं उचित ठरेल. त्याबद्दल तो म्हणाला, “आपण कशाबद्दल तरी बोलणं आणि आपण स्वतः ते होणं यातला जो फरक असतो तो ज्याक्षणी जाणवतो त्याक्षणी अंगावर सपशेल काटा येतो. आजपर्यंत सादर झालेल्या ३० प्रयोगांमध्ये प्रत्येकवेळी अंगावर हा काटा आलेला आहे. या प्रवेशासाठी मी अडीच मिनिटांत तयार होतो. ती रंगभूषा करताना विंगेत हा बदल जाणवत राहतो. मला भारावल्यासारखं होतं. ते पाहिल्यावर प्रेक्षकही नाटक संपल्यावर विंगेत भेटायला येतात ते भारावूनच.”

सचिन खेडेकर २१ वर्षांनंतर जरी व्यावसायिक रंगभूमीवर उभा राहिलेला असला तरी गेली २१ वर्षं त्याचा खर्जातला आवाज इतर नाटकांच्या श्रेय नामावलींमध्ये प्रेक्षकांनी ऐकलेला आहे. नाट्यरसिक जणू दुधाची तहान ताकावर भागवत होते. मात्र आता ‘भूमिका’ नाटकातील ‘विवेक जयंत’ या भूमिकेतला त्याचा अभिनय पाहताना आणि तो खर्जातला आवाज ऐकताना मिळणारा अनुभव हा आश्वासक आहे. सचिन म्हणतो, “नाटकाला प्रेक्षक लाभताहेत, ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागतोय, हा कौतुकाचा भाग आहेच. पण यातून मराठी प्रेक्षकांची प्रगल्भताही समोर येतेय. त्यांना विनोदी नाटकं जशी आवडतात तशी विचार करायला लावणारी नाटकंही आवडतात. कोविडच्या आधी क्षितिजने पहिला अंक लिहिला होता. पण नंतर काही काळाने दुसरा अंक लिहितानाही तो लेखक म्हणून या विषयावर ठाम होता, ही केवढी मोठी गोष्ट आहे. माझं पुनरागमन यशस्वी झालंय की नाही, याचं उत्तर प्रेक्षकांनीच ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावून दिलं आहे.”

ज्येष्ठ नाट्य समीक्षक.

logo
marathi.freepressjournal.in