दिवाळी अंक २०२६ : सेम बर्थडे

एका अनोळखी फोन कॉलमधून सुरू झालेला संवाद, मनात निर्माण झालेला संशय आणि अचानक समोर आलेलं एक साम्य... केवळ एका वाढदिवसाने दोन अनोळखी माणसांमध्ये असा कोणता भावनिक धागा निर्माण केला, की व्यवहार संपल्यानंतरही तो मनात रेंगाळत राहिला?
दिवाळी अंक २०२६ : सेम बर्थडे
दिवाळी अंक २०२६ : सेम बर्थडे
Published on: 

प्रणव सखदेव

एका अनोळखी फोन कॉलमधून सुरू झालेला संवाद, मनात निर्माण झालेला संशय आणि अचानक समोर आलेलं एक साम्य... केवळ एका वाढदिवसाने दोन अनोळखी माणसांमध्ये असा कोणता भावनिक धागा निर्माण केला, की व्यवहार संपल्यानंतरही तो मनात रेंगाळत राहिला?

“हा कॉल स्पॅम असू शकतो” असं नोटिफिकेशन दिसत असूनही मी तो कॉल उचलला. “अं... हॅलो,” मी इतकंच म्हणतो न म्हणतो, तोच समोरून माहितीचं बम्बार्डिंग सुरू झालं. आवाज एका पस्तिशीच्या बाईचा वाटला : “हॅलो, अनिकेत सर से मेरी बात हो रही हैं ना? सर, मैं सीयू बँक से अमरिता बोल रही हूँ. आपको हम एक प्री-क्वालिफाइड लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर कर रहे हैं. जिसकी लिमिट एक लाख से तीन लाख तक होगी. आप इंडिया में कहीं भी पेट्रोल भरोगे ना सर, तो आपको सरचार्ज नहीं लगेगा और सर अगर आप डिपार्टमेंटल स्टोअर हो या ऑनलाइन हो, कहीं पे भी खरीदी करोगे ना तो पांच परसेंट रिवॉर्ड पॉइंट्स मिलेंगे...” त्यानंतरही तिने मला बरीच फीचर्स सांगितली. मी ऐकून घेतली.

प्रीअप्रुव्ह्ड लोनसाठी, क्रेडिट कार्डासाठी किंवा बँकेच्या इतर प्रॉडक्टसाठी बँकेच्या किंवा वित्तसंस्थांच्या कॉलसेंटरमधून असे फोन कॉल्स सगळ्यांनाच येत असतात. पूर्वी बऱ्याचदा मी हे कॉल घेत नसे किंवा डिक्लाइन करत असे. पण आता मी हे कॉल उचलतो आणि शक्यतो ते मी मध्येच कट करत नाही. बोलणाऱ्या व्यक्तीकडून माहिती ऐकून घेतो आणि शांतपणे मला तुमची ऑफर नको आहे असं सांगून संभाषण संपवतो. कारण सगळ्यांनीच या कॉलसेंटरवाल्यांचे फोन उचलले नाहीत तर त्यांचा जॉब जाईलच की! सगळ्यांप्रमाणे हे लोकही ‘पापी पेट के लिए’ तर काम करतात. नाहीतर कोण ही सतत बोलण्याची, शिव्या ऐकून घेण्याची नोकरी पत्करेल? त्यात एआयमुळे म्हणे या क्षेत्रात भरपूर नोकऱ्या गेल्या आहेत. एआयचा तो यांत्रिक, खोटी अदब आणि चुकीचे उच्चार असलेला आवाज ऐकण्यापेक्षा खऱ्याखुऱ्या माणसाचं ऐकलेलं आणि त्याच्याशी बोललेलं काय वाईट, असा एक विचार करून मी असे फोन उचलतो.

तर तिची माहिती मी थोडी प्रोसेस केली. मी क्रेडिट कार्ड एन्थुझिअॅस्टिक – म्हणजे जे लोक क्रेडिट कार्डाचा वापर क्रेडिट म्हणून नव्हे, तर रिटर्न्ससाठी, वैयक्तिक फायनान्स टूल म्हणून करतात आणि त्याकरता वापराच्या स्ट्रॅटेजीज ठरवतात असे लोक असल्याने मला ती सांगत असणाऱ्या कार्डात रस निर्माण झाला. कारण ते कार्ड फ्री होतं आणि त्याचे रिटर्न्सही तसे चांगले होते.

मी तिला विचारलं, “क्या करना पडेगा?”

“आप कोई दूसरा क्रेडिट कार्ड यूज करते हो?”

“हा,” मी सांगितलं.

“तो सर कार्ड टू कार्ड हो जाएगा. आप मुझे वो कार्ड की पिछले तीन महिने की स्टेटमेंट्स भेज दो. उसके साथ आप अपना आधार कार्ड, पॅन कार्ड, एक कलर फोटो मुझे व्हॉट्सअॅप करदो. हो जाएगा आपका काम. कब भेजोगे?”

एवढा लवकर काम होणार? माझ्या मनात हा फ्रॉड तर नसेल ना असा विचार क्षणात टपकला. जणू माझ्या मनातलं ओळखल्यागत ती म्हणाली, “सर, टेन्शन मत लो. मैं सीयू बँक से बोल रही हूँ. आपको मैं व्हॉट्सअॅप पे पिंग करती हूँ. मेरा आयडी फोटोभी सेंड करती हूँ. फिर आप भेज देना डॉक्युमेंट.”

“ओके,” असं म्हणून मी फोन कट केला आणि काय करावं, या विचारात असताना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आला : हाय... मग कोणती डॉक्युमेंट हवीयेत याची यादी पाठवण्यात आली. कार्डाची माहिती सांगणारी ब्रोशरची पीडीएफ. तिच्या आयडीचा फोटो वगैरेही मेसेजमध्ये आलं. मी बघू पाठवू का विचार करत माझ्या कामाला लागलो.

थोड्या वेळाने तिचा परत मेसेज आला, पण मी एका मीटिंगमध्ये असल्याने तो पाहिला नाही. नंतरच्या दिवशी असाच व्यस्ततेत गेला. मग दुसऱ्या दिवशी लंचच्या वेळेस पुन्हा मेसेज आला : “सर डॉक्युमेंट कब भेजोगे? आज भेजो ना, एक दिन में हो जाएगा आपका काम.” त्यापाठोपाठ फोन. मी घेतला नाही. काय करावं? ही शंका. इतकी मागे का लागतेय ही? काही काळं-बेरं तर नसेल? तिचा पुन्हा फोन. मी घेतला. “सर, आप कब भेजोगे? आज भेज दिजिये. मेरा टार्गेट पूरा हो जाएगा सर.”

“हा-हा. मैं अभी टेहेल कर रहा हूँ. भेजता हूँ,” असं कारण देत फोन ठेवला. पण मग मलाच कसंतरी झालं. मी स्वतःहूनच कार्डाचं रस दाखवला होता आणि आता टाळत होतो, खोटं बोलत होतो. तिला उगाच लटकवत ठेवत होतो. अर्थात तिला असं करणारे दिवसाला कितीतरी जण भेटत असतील हे मला माहीत होतं, पण तरी मनाला टोचणी लागून राहिली ती राहिलीच आणि कार्डातही रस निर्माण झाला होता. पण “फ्रॉड तर नसेल ना”ची मनात मधूनच चुकचुक होत होती.

शेवटी हो-नाही करत मी आवश्यक त्या डॉक्युमेंट्सचे फोटो काढून पाठवून दिले. तत्काळ व्हॉइस मेसेज आला : “सर, आप आधार कार्डवाले पतेपेही रहते हो ना. थँक यू सर. आज काम होएगा आपका.” तिचा आवाज थोडा खरखरीत आणि जाड होता. त्यावरून मी ती दिसायला कशी असेल असे आडाखे बांधू लागलो... बहुतेक गव्हाळ, फॉर्मल शर्ट-पँट. केस कातर केलेले किंवा कुणास ठाऊक घरीच बसून काम करत असेल तर साध्याच कपड्यात असेल...

मग पुन्हा व्हॉइस मेसेज : “सर मेरी भी सेम बर्थडे हैं!”

माझ्या मनात शंकांचं रान माजलं : भेंडी, हा भलताच प्रकार तर नसेल ना? बर्थडे सेम असणं हे तसं किती रेअर असतं... तिने तिच्या आयडीचा फोटो पाठवला होता खरा, पण तो फोटो एआयडी आरडी दिलेल असा होता. पण हल्ली तर असं खोटंनाटं कुणीही सहज करू शकतं? एुआयला प्रॉम्प्ट दिला की झालं! काय असावं हे प्रकरण? तेवढ्यात तिचा फोन आला : “सर आपका बिजनेस हैं क्या?”

मी जरा घुश्श्यातच विचारलं, “मैं क्यू दू मेरी इतनी इन्फॉर्मेशन?” हा प्रश्न खरंतर महामूर्खपणाचाच आविष्कार होता. आता बँकेला क्रेडिट घ्यायचं असेल, तर हे सगळं विचारणारच ना!

ती म्हणाली, “सर, बँक को तो ये मालूम होना पडेगा ना?” मी सांगितलं की, मी ट्रान्सलेटर आहे. एडिटिंगची कामं करतो वगैरे. लिहितोदेखील.

“अच्छा. तो सर आपका कोई डिजिटिंग कार्ड?”

“नहीं, वो तो नहीं है.”

“अच्छा, तो ऑफिस का फोटो निकाल के भिजवा सकते हो?”

“ऑफिस? मॅडम एक कंप्यूटर और टेबल यही है मेरा ऑफिस. घरसेही काम करता हूँ. ऑनलाइन ज्यादा रहते हैं प्रोजेक्ट्स.”

“हा-हा सर, लेकिन बँक को दिखाना पडेगा ना कुछ तो. या आपके पिताजी का या फ्रेंड का कोई बिजनेस हैं क्या? उसका पता दे दिजिये हो जाएगा काम.”

मी हर्ट झालो. मला तो माझ्या कामाचा अपमान वाटला. मी म्हणालो, “देखिये मॅडम, एक तो आपके बँकने मुझे फोन किया है, अगर आपके बँक को मेरा प्रोफेशन व्हॅलिड नहीं लगता है तो मत दीजिये कार्ड. लेकिन मैं जो सही इन्फॉर्मेशन है वही बताऊंगा, दुसरों का बिजनेस वगैरा क्यू दिखाऊं मैं?”

ती म्हणाली, “सर, समझ गई मैं. पर प्रॉब्लेम वैसा नहीं है. आपको कुछ तो प्रूफ देना पडेगा सर. आप गुस्सा मत किजिये सर.”

“देखिये जो हैं वो मैंने दे दिया है. उस के ऊपर कार्ड हो सकता है तो दीजिये, नहीं तो ठीक हैं,” असं म्हणून मी फोन कट केला.

काही क्षणांत त्या मुलीचा व्हॉइस मेसेज : “सर, इन्सल्ट नहीं कर रही थी मैं. प्रोसीजर है, क्या करू? ठीक है, आप जिस कंपनी को सर्विस प्रोव्हाइड करते हो, उसका तो पता दे सकते हो ना?” मी विचार केला आणि मला ते योग्य आणि व्हॅलिड वाटलं. म्हणून तिला मी तशी अधिकची माहिती पुरवली.

जरा शांत झाल्यावर मी तिला विचारलं, “आपके पास क्रेडिट कार्ड हैं क्या?”

तिचा मेसेज आला, “क्या सर मजाक कर रहे हो क्या? हमको कौन देगा कार्ड. इतना पगार.”

“अरे ऐसे कुछ नहीं. चलो छोडो. रोज कितने फोन करती हो आप?”

“क्या बताऊं? दिमाग फिरने लगता हैं सर. रात को निंद आती नहीं, आवाज आते हैं लोगों के कान में... और लोग बहोत गंदी गंदी गालियां देते हैं और लडकी देखी तो... फ्लर्टिंग... ऐसे वैसे मेसेजेस... पूछो मत. सोसायटी का पूरा पिक्चर मालूम पडता है इधर बैठ के...”

आपणही फ्लर्ट करतोय असं तिला वाटलं तर? असं वाटून मी पुढचं बोलणं थांबवलं. त्या दिवशी सीयू बँकेकडून सिबिल स्कोअर चेक केला गेल्याचा मेसेज आला. तो पाहून मी हुश्श केलं. म्हणजे फ्रॉडबिड नव्हता तर तो कॉल. जेन्युइन होतं. मग व्हिडिओ केवायसी वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी बँकेकडून कार्ड अप्रुव्ह झाल्याचा मेसेज आला. मला तिला कळवावंसं वाटलं, पण पुन्हा वाटलं, नको. बरोबर नाही दिसणार ते. कदाचित तिलाही मी इतर पुरुषांसारखाच वाटेन. जाऊ दे. पण मनातला लेखक जागा झाला होता. ती कुठे राहते, कुठून आली आहे, शिक्षण काय झालंय, तिच्या घराबद्दल, ती काय, कशी खातेपिते... असे बरेच प्रश्न मला तिला विचारावेसे वाटत होते. एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटल्यावर विचारतो ना तसं. तितक्यात सहज, शिवाय ‘सोसायटी का पूरा पिक्चर मालूम पडता इधर बैठ के...’ हे तिचं वाक्य माझ्या मनात रुतलं होतं. इनसाईट होती त्यात. ती आणखी जाणून घ्यायची होती, पण काम झाल्यावर तिच्याशी बोलणं अयोग्य वाटलं, असं वाटून मी गप्प बसलो.

पुढच्या दोन दिवसांत क्रेडिट कार्ड माझ्या हाती आलंही! मग मात्र न राहवून तिला मेसेज केला, “मॅडम, कार्ड आ गया घर पे. थँक्स.”

काही क्षणांत तिचा मेसेज : “हू इज देअर?”

मी हिरमुसला झालो. मला वाईट वाटलं. आपल्याला विसरून गेली ती... नि आपण तिच्याबद्दल काय काय विचार करत बसलो होतो... शेवटी लेखक ना असेच येडे असतात... व्यवहारातही भावनिक धागे जोडायचा फुकटचा प्रयत्न करत बसतात... मन थोडं शांत झाल्यावर मी स्वतःला समजावलं की, अरे बाबा, ती रोज कितीतरी जणांना फोन करत असेल. तिला कोण कोण लक्षात राहणार? शक्य तरी आहे का ते? आणि का ठेवावं तिने लक्षात? तिचं टार्गेट पूर्ण झालं, तिच्या बाजूने काम संपलं आणि तुलाही ती फ्रेंड असेल असं वाटत होतंच ना... मग?

थोडा वेळ गेला. मग न राहवून मी तिच्या मेसेजला रिप्लाय पाठवला : “सेम बर्थडे!”

काही सेकंदांत स्मित करणारा इमोटिकॉन आला आणि मग मेसेज : “Oh! Aniket Sir!”

मी तिला पुढे काही विचारलं नाही. आम्हाला जोडणारा एक तंतू आमच्यात निर्माण झाला होता. मला तो पुरेसा वाटला. कालांतराने तो विरून गेला असता, कारण तितकंच त्याचं आयुष्य होतं. माझे डोळे किंचित ओलावले.

sakhadeopranav@gmail.com