मुलांच्या सर्जनाला वाव देणारे अभिव्यक्ती शिबिर

दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या ३७ एकरच्या निसर्गसंपन्न परिसरातील कायमस्वरूपी कॅम्प साइटवर हे पाच दिवसीय निवासी शिबिर २४ मे ते २८ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
मुलांच्या सर्जनाला वाव देणारे अभिव्यक्ती शिबिर
Published on

नोंद

सिरत सातपुते

आज अभिव्यक्ती शिबिराचा शेवटचा दिवस. दिवस उजाडलाच एक भन्नाट अनुभवाला सामोरा जाणारा. बच्चेकंपनी जमली ती बैलगाडीच्या सफरीच्या तयारीनेच. बैलगाडीच्या सफरीसाठी स्मारक कार्यकर्तेही सज्ज होते. बैलगाड्या आल्या आणि एकच जल्लोश!! बैलांना सवय होती स्मारकातील मुलांना फिरवायची. शांतपैकी उभे राहून मुलांची लगबग बघत होते ते. बैलगाडीत कसं बसायचं याचं प्रात्यक्षिक झालं आणि मंडळी सज्ज झाली बैलगाडीत बसायला. फोटो सेशन झालं आणि पहिली गाडी निघाली. कार्यकर्त्यांचाही उत्साह अफाट होता. घोषणा आणि गाण्यांच्या गजरात गाड्या निघाल्या. मागे राहिलेल्या मुलांना कधी एकदा गाड्या परत येतात आणि आम्ही सफरीला निघतो असं झालेलं आणि गाड्यात बसलेल्यांना ही सफर संपूच नये असं वाटणारं!! बहुतेकांचा हा पहिलाच बैलगाडी प्रवास आणि तोही शिबिराच्या शेवटच्या दिवशीचा!! एकीकडे शिबिर संपल्याचं वाईट वाटणं आणि त्या हुरहुरीतच झालेली रात्रीची झोप. स्मारकातून जाताना पाच दिवसांच्या अगणित आठवणी, त्या सर्वांवर कळस म्हणजे ही बैलगाडीची सफर. काल रात्रीपर्यंत आई-बाबांची आठवण काढणारी मुलं आज आई-बाबा भेटणार हे जणू विसरूनच गेली होती आणि शिबिरातील ताई, दादा आणि मित्र-मैत्रिणींच्या विरहाच्या जाणिवेने हळवी होत होती.

हे वर्णन आहे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील अभिव्यक्ती शिबिराचे. साने गुरुजी हे नाव महाराष्ट्राला अपरिचित नाही. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे; असे म्हणणाऱ्या साने गुरुजींनी मुलांसाठी खूप काम केले. मुलं आनंदी रहावीत, त्यांच्यावर संस्कार व्हावेत, विविध प्रकारचे ज्ञान त्यांना मिळावे यासाठी अमळनेरला असताना छात्रालयात गुरुजींनी विविध उपक्रम राबवले. त्यांच्यासाठी शामची आई या अजरामर पुस्तकाबरोबरच अनेक संस्कारक्षम पुस्तकं लिहिली. गुरुजींच्या खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे; या विचारांचा वसा घेऊन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक (स्मारक) गेली २५ वर्षे गुरुजींचे हे काम पुढे नेत आहे. स्मारकात किशोर, कुमारवयीन आणि युवांसाठी विविध शिबिरं वर्षभर आयोजित केली जातात.

स्मारकातर्फे १० ते १४ वयोगटासाठी अभिव्यक्ती शिबिरं आयोजित केली जातात. पाच दिवस चालणाऱ्या या शिबिरांत मुलांच्या अभिव्यक्तीला चालना मिळेल अशी सत्रांची रचना केलेली असते. घराच्या चार भिंतीत सुरक्षित आयुष्य जगत आलेली ही मुलं स्मारकातील बिनभिंतीच्या शाळेत पूर्वी कधीच न अनुभवलेल्या गोष्टी शिकत असतात, अनुभवत असतात आणि आपापल्या पद्धतीने अभिव्यक्त होत असतात. ही अभिव्यक्तीची जाणीवच त्यांना पुढच्या आयुष्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कारासाठी तयार करत असते. दिवाळी आणि मे महिन्यातील सुट्टीत आयोजित होणाऱ्या या पाच दिवसांच्या शिबिराची सुरुवातच मातीच्या स्पर्शाने होते. मुलं मोकळ्या आभाळाखाली मातीत हात घालून मातीचा स्पर्श मनात साठवतात, मातीशी असलेलं आपलं नातं समजून घेतात, चाकावरचं कुंभारकाम शिकतात आणि मातीपासून स्वतः वस्तू बनवतात. मनात असलेला आकार मातीला देताना बनत असलेली वस्तू बघितल्यावर चकाकणाऱ्या त्यांच्या डोळ्यातून सृजनाचा आनंद डोकावतो आणि मग प्रवास सुरू होतो या निरागस मातीच्या गोळ्याला आकार देण्याचा!!

सकाळी लवकर उठून मुलं संगीताच्या तालावर व्यायाम करतात आणि निघतात पक्षी निरीक्षणाला. स्मारकाच्या आसपास विविध प्रकारचे पक्षी दिसतात. शहरातल्या मुलांना तर याचे फार अप्रुप. कधी सकाळी नदीवर फिरायला मुलं जातात, तर कधी स्मारकातल्याच नेचर ट्रेलला आणि बैलगाडीतील सफरीतील मजा तर औरच!! शिबिरार्थींबरोबरच त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते ताई, दादाही या सफरीचा आनंद घेतात. मुलांमध्ये साहसीवृत्ती वाढावी यासाठी झूमरिंगसारखे साहसी खेळही घेतले जातात. दिवसभराच्या सत्रांनंतर एखादी रात्र ही आकाश दर्शनाची तर हवीच. स्मारकात असलेल्या मोठ्या टेलिस्कोपच्या मदतीने मग मुलं आकाशातील ग्रहगोल बघतात आणि विज्ञान समजू लागतात. त्याआधी अंधारातला थरारही मुलं अनुभवतात आणि अंधार आणि त्याच्याशी संबंधित अंधश्रद्धांबद्दलही मोकळेपणाने बोलतात. नाट्यलेखन व अभिनयाच्या अभिव्यक्तीला कोणत्याच सीमा नसतात हे मुलं शिकतात नाट्याविष्कारातून आणि मग पाच दिवसांत तयार होतात छोट्या छोट्या नाटुकल्या. शिबिरातून परत जाताना या मुलांनी शिकलेले असतात मैदानी खेळ आणि नवनवीन गाणी जी त्यांना समतेची शिकवण देणारी असतात.

हा वयोगट तसा लहान मुलांचा असल्याने आणि पहिल्यांदाच मुलं घरापासून लांब राहणार असल्याने शिबिरात पाठवताना थोडे साशंक असलेले पालक शिबिराच्या समारोपाला स्मारकात येतात तेव्हा मुलांमधील झालेले सकारात्मक बदल बघून आनंदीत होतात. ही कमाल असते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची. त्याचबरोबर स्मारकात वाहणाऱ्या प्रेमाच्या झऱ्याची. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेने भरलेला स्मारकाचा चराचर मुक्तहस्ते हे प्रेम वाटत असतो आणि त्या प्रेमळ वातावरणात हे विचारांचं बीज रूजू लागतं आणि एकदा हे अभिव्यक्ती शिबिरात लागलेलं रोपटं रूजू लागलं की नक्कीच काही वर्षांनी त्याचे सक्षम वृक्षात रूपांतर होणार असतं हे निश्चित!

दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या ३७ एकरच्या निसर्गसंपन्न परिसरातील कायमस्वरूपी कॅम्प साइटवर हे पाच दिवसीय निवासी शिबिर २४ मे ते २८ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. १० ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलं-मुली या अभिव्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकतात. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर, ता. माणगाव, जि. रायगड हे कोकण रेल्वेच्या गोरेगाव रोड रेल्वे स्टेशनपासून १.५ कि.मी. अंतरावर, तर पनवेलपासून १०० कि.मी. व पुण्यापासून १२० कि.मी. अंतरावर आहे.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त

logo
marathi.freepressjournal.in