रसास्वाद
भारती बिर्जे-डिग्गीकर
कवींच्या तरुण पिढीत संकेत म्हात्रे हे नाव महत्त्वाचे आहे. कवितेच्या मंचीय सादरीकरणाची परंपरा ते पुढे नेत आहेतच, पण भाषेशी खेळत ते आशयाचा विविधांगी शोध घेतात. त्यांच्या 'तिथे भेटूया मित्रा' या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहामध्ये काही आश्वासक संकेत दिले आहेत.
'तिथे भेटूया मित्रा' हा कवी संकेत म्हात्रे यांचा मराठीतील पहिलाच आणि कवितेच्या पुरेशा अभ्यास-अनुनयानंतर सिद्ध झालेला कवितासंग्रह आहे. तो हाती घेतानाच आपल्याला संग्रहातील कवितेच्या आवाक्याचे आश्वासक संकेत मिळतात. अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा संग्रह सुभाष अवचट यांचं जलरंगातील अमूर्त मुखपृष्ठ आणि हार्ड बाईंडिंग यामुळे अतिशय देखणा झालेला आहे. संकेत म्हात्रे हे नाव तसं मराठी कवितेला अनेक अंगांनी परिचित आहे. मंचीय सादरीकरणाची परंपरा पुढे नेणारे आणि त्या परंपरेला द्वैभाषिक आयाम देणारे असे तरुण कवी म्हणून ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. 'तिथे भेटूया मित्रा' ही त्यांची शीर्षक कविता त्यांच्या 'नवकोरं' या कवितावाचन कार्यक्रमात महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी सादर झाल्याने रसिकांना परिचित आहे.
संकेतची कविता प्रतिमा आणि प्रतिकांच्या अतिवृष्टीमधून अतार्किकपणे रसिकाला तीक्ष्ण संवेदना-प्रत्यय देते. ही कविता दुर्बोध आणि सुबोध अशा वर्गीकरणात बसत नाही. ती स्वप्नबोधासारखी भाषेशी खेळते. कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला ती भिडू शकते, हे तिचं मुख्य बलस्थान आहे. या संग्रहाचे 'मी', 'तो', 'ती', 'ते', 'आपण' असे कवितागत विभाग केलेले आहेत. कवितेतून केलेला हा दृष्टिक्षेत्रविभाजनाचा अभिनव प्रयोग आहे. आशयाच्या या वाफ्यांमधून कवितेचं पाणी मुक्तपणे खळखळत राहतं. आशयानुसार केलेल्या रेखाटनांशी थबकतच आपण एकेका विभागात शिरतो. 'मी' या विभागात विशुद्ध आत्म-आकलनाच्या कविता आहेत. 'वैकुंठ' ही पहिलीच कविता वारकरी परंपरेतून जन्मलेली आहे. ही कविता वैकुंठाची आस अतिशय नवीन परिभाषेतून व्यक्त करते.
"सूर्याचे अंश पडावे देहावर शरीराच्या काचेतून आरपार जावे जन्मू द्यावे एखादे इंद्रधनुष्य आशेवर असंख्य डोळे उघडावे आतून सूर्यफुलांचे पहावे अमृताने निथळणारे वैकुंठाचे द्वार चोख्याच्या नजरेतून..."
ही संपूर्ण कविता पंचतात्विक आकांक्षांचं सनातन रूप आधुनिकोत्तर पद्धतीने चित्रित करते. सर्वच संवेदनांचं, त्यातील दृक-ध्वनी-गंध प्रत्ययांचं झालेलं उन्नयन आणि त्यातून साकारलेलं वैकुंठ आपल्याला या कवितेत प्रतीत होतं. कालच्या संतकवींचा भावाशय आजही सौंदर्यपूर्ण समकालीन भाषेत व्यक्त झालेला जाणवतो. 'एकदा तरी' या कवितेत संकेत अतिशय भावपूर्ण अशा कवी-रीतीने अस्तित्वाच्या अधोविश्वाशीच म्हणजे स्वतःच्या आतल्या त्या काळ्याकुट्ट अंधाराशीच संवादत आहे. जणू एखाद्या वयातीत झालेल्या जिवलग बालमित्राची मायेने चौकशी करावी, तसा हा संवाद आहे. हेच अधोविश्व ओलांडून आपल्याला ताऱ्यांच्या प्रदेशात जायचं आहे, याची कवीला पूर्ण जाणीव आहे. अदम्य आशावाद अशा रीतीने कवितेत प्रतिबिंबित झाला आहे.
"एकदा तरी माझ्यातल्या मिट्ट अंधाराला मला गच्च मिठी मारायची आहे.. एकदा तरी त्याच्या काळ्याकुट्ट होडीतून त्यानेच वसवलेल्या चंद्रहीन प्रदेशात पोहोचायचे आणि मग त्याला पार करायचे मगच मला ताऱ्यांचा एक तरी दरवाजा उघडता येईल, एकदा तरी..."
'कविता लिहिल्यावर', 'कविता वाचण्याआधी', 'संमेलन' अशा मेटाफिक्शनीय कवितांमधून संकेत कोणत्याही कवीला नेहमीच अनाकलनीय वाटणाऱ्या निर्मिती आणि सादरीकरण प्रक्रियेचा शोध घेत राहतो, जे कवीसाठी अध्यात्मच असतं.
'तो' या विभागातल्या कविता अनेक तृतीय पुरुषांकडे निर्देश करतात, ज्यात अनेक व्यक्तिमत्वं येतात, ज्यांनी कवीवर प्रभाव टाकला आहे. पण हे इतकंच नाही. स्वतः मधल्या 'तो' कडेही या कविता अलिप्तपणे पाहतात. कित्येकदा निसर्गही 'तो' च असतो. प्रवासाच्या अनेक कविता या विभागात येतात. 'ती' या विभागातील कवितांमधून अर्थातच स्त्रीची भावविश्वाला वेढून असलेली असंख्य रूपं संपृक्त होऊन येतात. 'ती' आई असते, आजी असते, सनातन प्रेयसी असते, स्वप्नातली राजकुमारी असते.
"कवितेत हरवलेली राजकुमारी जेव्हा फुंकर मारते पुस्तकांवर तेव्हा धुळीसकट कविताही वाऱ्यावर उडून जातात आणि रसरसलेले काहीतरी पक्ष्यासारखे येऊन बसले रित्या कागदावर .."
तिची रूपं अशी अलौकिक आहेतच, म्हणून नात्यांचं परिचित अवकाशही खूप वेगळेपणाने कवितेत येतं. जसं की, आईचं नाहीसं होणं मांजराच्या आकारात सामावतं. "काल-परवा प्राण्यांशी बोलणाऱ्या मैत्रिणीला मांजरीने निरोप दिला 'त्याला सांग तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस काहीतरी खाऊन घेत जा..' तेव्हा कळलं आई हळूहळू घरातलं मांजर होते आणि मांजर घरातली आई"
या अशा सर्वच कवितांमधून संकेत अशाच असांकेतिक व्यूहांमधून नेणिवेतील आदिबंधांचा शोध घेतो. 'ते' आणि 'आपण' या दोन्ही विभागांमध्ये मानवी भावसंबंधांच्या संकीर्ण कविता येतात. हे संबंध माणसांशी असतात आणि निसर्गाशीही.
या कवितांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं अद्वैत चर आणि अचरात, सचेतनात आणि अचेतनात साकारलं जातं. ही सर्वत्राची आणि सर्वस्वाची कविता होत जाते. ही सर्वस्वाची कविता संकेतने अतिशय उत्कटतेने शब्दबद्ध केली आहे. ही कविता या पिढीची कविता तर आहेच, पण समकाळ ओलांडून सर्वकाळाला मिठी घालायची क्षमता तिच्यात जाणवते.
"लिहून झाल्यावर कसे आभाळभर पसरतो आपण कोरडे होतो, निःशब्द हात गळून पडतात, त्या जागी पंख येतात दोन्ही बाजूंना घिरट्या घालत राहतो आपण आयुष्यभर उजळलेल्या क्षणावर आणि एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो जे घडते आहे आणि जे घडेल ते आपले शब्दांमधून शुभ्र होणारे वास्तव आहे..."
भ्रमवून टाकणाऱ्या आणि केंद्रबिंदूविरहित अशा कोलाहलात ही कविता अभिव्यक्तीमधली आंतरिक एकात्मता, सौंदर्यसत्ता टिकवून धरते आहे. आपले कवितापण जपते आहे, हे हा संग्रह हातावेगळा करताना ठळकपणे जाणवत राहाते.
साहित्याच्या आस्वादक व समीक्षक