सफर मासळी बाजाराची

घरातलं वातावरण कट्टर मत्स्यप्रेमी... अशा वेळी एका सारस्वत गृहस्थाची मासळी बाजारात होणारी ‘शोभा’ सांगणारी ही रंजक मुशाफिरी!
सफर मासळी बाजाराची
सफर मासळी बाजाराची
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

घरातलं वातावरण कट्टर मत्स्यप्रेमी... अशा वेळी एका सारस्वत गृहस्थाची मासळी बाजारात होणारी ‘शोभा’ सांगणारी ही रंजक मुशाफिरी!

आज आपण दर रविवारची खाद्यभ्रमंती थोडी बाजूला ठेवून निघालो आहोत मासळी बाजाराची मनसोक्त भ्रमंती करायला. तर आमच्या घरापासून अगदी पाच सात मिनिटांच्या अंतरावर आमचा मासळी बाजार. आम्ही GSB अर्थात गौड सारस्वत ब्राम्हण. हे सांगण्याचा उद्देश काय, तर साधारणपणे सारस्वत हा मत्स्यप्रेमी. अपवाद फार थोडे. आम्ही म्हणजे अस्मादिक, सारस्वत नावाला काळिमा. मी जरी सारस्वताच्या घरात जन्म घेतलेला असला तरी लहानपणापासून माझं गोत्र काही मासळीशी जुळलं नाही. म्हणजे कट्टर मत्स्यप्रेमींना कसं, दोन दिवस शाकाहारी जेवल्यानंतर मासळीची खूप आठवण येऊन उदास वाटू लागतं अशा जातकुळीतला तर मी अजिबातच नाही. असो.

तर आमच्या घरात, ही आणि माझी लेक दोघी मांजरी. मासळीवर मनापासून प्रेम करणाऱ्या. त्यांच्यासाठी मी मासळी बाजारात जातो खरा, पण मला चांगली, ताजी मासळी याबद्दल ओ की ठो काहीही कळत नाही. कोळंबी, बांगडे यांसारख्या उग्र वास घरात पसरवणाऱ्या मासळीचा तर मला अतिशय कंटाळा येतो. पण ही म्हणते, “तुला काय समजणार त्यातली गंमत?” अहो कोळंबी सोलल्यावर त्याच्या सालांचा जो दर्प सुटतो त्यात कसली आलीय गंमत? त्या वासाने मासळी न खाणाऱ्याला मळमळायलाच लागणार. म्हणून मग मी कोळंबी कोळीणबाईकडून सोलूनच घेऊन येतो. एकदा हिने मला मुडदुशा आणायला सांगितल्या होत्या. गुगलवर जाऊन मी त्याचं चित्र पाहून ठेवलं होतं. बाजारात गेल्यावर पाहिलेल्या चित्राशी साधर्म्य राखणारे मासे मला दिसले. पण नक्की कळत नव्हतं, त्यामुळे विचारायचं कसं. अखेर धीर करून विचारलंच, “काय आहे गं हे?”

असं मी विचारताच ती आणि आजुबाजूचे मासे घेणारे ग्राहक चमकून माझ्याकडे हा कोण वेडसर आलाय अशा नजरेने पाहायला लागले. ती कोळीणसुद्धा वैतागून म्हणाली, “मुडदुशा आहेत त्या दादा! आजच आलाय काय मच्छी घ्यायला बाजारात?”

ही अशी स्वतःची शोभा करून घेण्यापेक्षा त्यानंतर मी ठराविक दोन ओळखीच्या कोळीणींकडून मासळी घेणं सुरू केलं. आमच्या या मासळी बाजारात अगदी ताजी मासळी मिळते, असं आपलं जाणकार म्हणतात. मी एकदा ओळखीच्या मित्रांना ताजी मासळी कशी ओळखायची असं आपलं कुतूहलापोटी विचारलं. त्यांनी माशाच्या डोळ्याखाली असं दाबून पाहायचं वगैरे सांगितल्यावर तो विषय मी तत्काळ सोडून दिला. मासळीला जराही स्पर्श न करता मी तिची खरेदी करतो, तर या बाजारात सगळ्या मासळी विकणाऱ्या खालीच बसतात. त्यामुळे त्यांच्या टोपल्यांमधलं आणि त्यावर ठेवलेल्या लाकडी फळ्यांवर मासे ठेवलेलं बर्फाचं पाणी वाहत असतं आणि त्याचे ओघळ आपली पावलं बरबटून टाकत असतात. संपूर्ण बाजारात अशा पाण्याची लयलूट असते. आता त्या मासळी विकणाऱ्या एकमेकींना पाठ लावून ओळीत बसलेल्या असतात, तर काही राहिलेल्या जागेत सामावलेल्या असतात. त्यामुळे आत शिरण्यापूर्वी आपण आपलं डेस्टिनेशन नक्की करून कोणत्या मार्गाने तिथवर पोहोचायचं याचा मनात आडाखा बांधून त्या चक्रव्यूहात शिरायचं असतं.

ज्या व्यक्तीला इथल्या वासाची ॲलर्जी आहे किंवा तो वास सहन होत नाही अशांनी इथे येण्याचं धाडस करूच नये. मासे खरेदी केलेल्या लोकांच्या ओल्या पिशव्या आपल्या अंगाला कुठेही लागत असतात, एखाद्या कोळीणीची गच्च मासळी भरलेली मोठ्ठी टोपली डोक्यावर घेतलेला आणि त्या पाण्यात नखशिखान्त न्हाऊन निघालेला कामगार, “बाजू बाजू! मच्छी का पानी” असं ओरडत अंगावरून जातो. शक्य असेल तर व्हायचं बाजूला, अन्यथा त्या पाण्याने शुचिर्भूत व्हायचं, एवढंच आपल्या हातात असतं. त्यातच आपल्या पायांमधून, कोळीणींच्या टोपल्यांमधून मांजरी मुक्तपणे फिरत असतात. इथे त्यांना अजिबात मज्जाव नसतो. खाण्याची अगदी चंगळ असते आणि या सगळ्यामध्ये मला जिच्याकडून मासे घ्यायचे असतात तिच्यासमोर आधीच दोन- तीन ग्राहक उभे असतात आणि त्यांचा मासळीचा सौदा सुरू असतो. अर्थात त्यांचाही त्याला इलाज नसतो, कारण जागाच तेवढी असते. मग मासळीशी संबंधित गोष्टी, म्हणजे नारळ, मसाले याचीही दुकानं बाजाराला लागूनच असतात.

आता माझी (म्हणजे मी जिच्याकडून मासळी घेतो ती) एक कोळीणबाई आहे तिच्याकडे मोठी मासळीच मिळते. उदा. सुरमई, हलवा, पापलेट, रावस आणि लहान म्हणजे कोळंबी आणि दुसरी, जरा पुढे बसते. तिच्याकडे बांगडे, मुडदुशा, तारले, कोळंबी अशी लहान पण चविष्ट (जाणकारानुसार) मासळी मिळते. आता आमच्या हिने बांगडे, तारले किंवा कोळंबी असे लहान मासे आणायला सांगितले की, अर्थात मला त्या दुसऱ्या कोळीणबाईकडे जावं लागतं आणि तिच्याकडे पोहोचण्याचा मार्ग त्या मोठे मासे ठेवणाऱ्या कोळीणबाईच्या पुढ्यातून जातो. आता तिला चुकवून पुढे जाणं मला तरी अजिबातच जमत नाही आणि ती ते जमवू देत नाही. मी तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवत पुढे सरकू लागलो की ती ओरडते, “ए दादा! पुढे कुठे चालला? इकरे ये आधी..”

आणि हे अख्खा बाजार ऐकतोय असं मला आपलं उगाच वाटत असतं. अखेर तिच्याकडून मला काहीतरी खरेदी करावंच लागतं. घरी आल्यावर, “हे एवढं कशाला घेऊन आलास? तुला मी सांगितलं होतं ना? कोण खाणार हे सगळं आपल्याकडे?” असा ही शंख करते. हे आपलं उगाच असतं. खरं म्हणजे मासे पाहून ही मनातून खुश झालेलीच असते. हल्ली मी गनिमी काव्याने ही परिस्थिती हाताळतो. म्हणजे कशी? सांगतो, आता याच कोळीणबाईकडे जायचं असेल तर सरळ अगदी ताठ मानेने बाजारात शिरतो आणि लहान मासे घ्यायचे असले की मासळी बाजाराच्या मागच्या बाजूने एक वाट आहे, त्या वाटेने गेल्यावर आधी लहान मासे विकणारी मासेवाली भेटते (म्हणजे समोर येते) मग त्या कोळीणबाईकडे पाठ करून मी उभा राहतो. कारण ती तिकडूनही ओरडू शकते, “ए दादा इकरे ये.”

ते लफडच नको म्हणून मासे घेऊन आल्या वाटेने मागूनच बाहेर पडतो. या दोन्ही कोळीणबाईंनी आजपर्यंत मला शिळी किंवा खराब मासळी कधीच दिलेली नाही. याचा दुसरा अर्थ, त्यांच्याकडे चांगलेच मासे मिळतात, तर असा हा आमचा मासळी बाजार. त्याची सफर करणारा मी शाकाहारी सारस्वत आणि परमेश्वराच्या मत्स्य अवतारावर निरातिशय आणि रसभरीत प्रेम करणारे मत्स्यप्रेमी खवय्ये.

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in