

कथा
एकनाथ आव्हाड
सदानंद आणि राधिका यांची शाळा दुपारची असायची. दुपारी बारा ते संध्याकाळी सहा. शाळा त्यांना आवडायची. शाळेत मित्र भेटायचे. सप्टेंबर महिना संपत आला तरी आणखी एक मित्र त्यांच्या जोडीला अधेमधे असायचा. कधी अचानक यायचा. तो मित्र म्हणजे त्यांचा लाडका पाऊस.
एके दिवशी काय गंमत झाली. शाळा सुटायला अवघा अर्धा तास बाकी होता. शेवटची तासिका सुरू होती... सहस्त्रबुद्धे बाईंची. त्यांचं वाचन अफलातून. पूरक वाचनाचा तास त्या घ्यायच्या. अवांतर वाचनाचं महत्त्व त्या वर्गाला सांगतच होत्या. तेवढ्यात बाहेर ढगांचा मोठ्ठा गडगडाट झाला. मुलांनी खिडकीबाहेर पाहिलं तर बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं. जोराचा वारा सुसाट सुटला होता. खिडकीच्या तावदानाला गदागदा हलवून तो एकसारखा आवाज करत होता. आभाळ भरून आलं होतं. अचानक पावसाच्या सरी झरझर झरझर खाली आल्या...
'बाई पाऊस झाला सुरू..!' खिडकीकडे पाहत सदू पटकन म्हणाला.
मुलंही पाऊस पाहून आनंदली, हरखली. वर्गातल्या दशरथचा चेहरा मात्र जरा चिंतातूर झाला. सदूच्या मागच्याच बाकावर बसायचा दशरथ. थोडासा मितभाषी पण डोळे कमालीचे बोलके. भिडस्त स्वभावाचा. एकटा एकटाच असायचा. मैत्रीचा हात पुढे करून सदूने त्याला बोलकं केलं.
पाऊस पाहून सहस्त्रबुद्धे बाई लगेच म्हणाल्या, 'किती छान ना मुलांनो..! पाऊस हा हवाच. बरं मला सांगा, कुणाकुणाला पाऊस आवडतो ?'
सर्वांचे हात वर. एकट्या दशरथचाच हात खाली होता. बाईंनी विचारलं, 'दशरथ, का रे तुला पाऊस आवडत नाही ?' दशरथ काही बोललाच नाही. नुसता गप्प उभा राहिला. घुम्यासारखा. तो फारसा बोलतच नसे. बाहेर पावसाचा जोर आणखी वाढला. तसा वर्गात मुलांनी एकच कल्ला केला. बाई म्हणाल्या, 'दशरथ, बरं बस खाली. नंतर मात्र सांग हा मला, तुला पाऊस का आवडत नाही ते ? मला जाणून घ्यायचंय.'
तेवढ्यात बाळू म्हणाला, 'बाई, एखादं पाऊस गाणं म्हणू या का?' अरे व्वा छानच..! आता बाहेर पाऊस आहेच. होऊन जाऊ दे तुझं एखादं पाऊस गाणं.
मुलंही हसून म्हणाली, 'होऊन जाऊ दे... होऊन जाऊ दे.' दशरथ मात्र अजूनही शांतच होता. खिडकीबाहेरच्या पावसाकडे राहून राहून पाहत होता.
बाळू पटकन उभा राहिला... उत्साहाने ताल धरत तो म्हणाला...
'ढग फुटला वारा सुटला, पाऊस आला जोराचा चला मुलांनो भिजूया सारे, पाऊस आम्हा पोरांचा पाहतो वरून, आभाळ भरून, पाऊस फार खट्याळ खाली येऊन मस्ती करतो, जसा खोडकर बाळ पाऊस सरी, येतात दारी, झिम्माड पाऊस रानात टपटप टपटप वाजत बसतो, जणू बोलतो गाण्यात पाऊस तळ्यात, पाऊस मळ्यात, खुश्शाल डुंबू पाण्यात इंद्रधनूची कमान पाहून, मोर नाचतो मनात पाऊस पाणी, फुलती गाणी, पाऊस पाहतो हसून आनंदाच्या लाटेवरती, चला जाऊया बसून ऋतू हिरवा, ऋतू बरवा, धरती गेली नटून चैतन्याचे दान देऊन, पाऊस जाई भेटून'
... वर्गाने सदूच्या गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. शाळा सुटल्याची घंटा झाली.
वंदे मातरम म्हणून मुलं रांगेनं वर्गाबाहेर पडली. पावसाने येण्याची वर्दी न दिल्याने बऱ्याच मुलांनी छत्र्या, रेनकोट आणलाच नव्हता. त्यामुळे काही मुलं शाळेत अडकली. ज्यांच्याजवळ छत्र्या, रेनकोट होता ते मात्र फुशारकीने घरी निघाले. सदूला नवाकोरा रेनकोट बाबांनी घेतला होता. त्याची बहीण राधिकाकडे छत्री होती. सदूने विचार केला. वाऱ्याने छत्री उडाली तर. मग त्याने आपला रेनकोट राधिकाला घालायला दिला आणि तिची छत्री स्वतःला घेतली. सुदैवाने त्याच्या बॅगेत प्लास्टिकची एक मोठी पिशवी होती, चित्रकलेची मोठी वही ठेवण्यासाठी घेतलेली. त्याचं अख्खं दप्तर मावलं त्या प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीत. आता वह्या-पुस्तकं भिजण्याची चिंता नव्हती. तेवढ्यात दशरथ दिसला त्याला. पाऊस थांबण्याची वाट पाहत तो तिष्ठत उभा होता. सदू म्हणाला, 'दशरथ, अरे हा पाऊस लवकर आता काही थांबणार नाही. भिजतच जावं लागेल घरी. दशरथ म्हणाला, 'नको नको, आत्ताच आईने मालकीणीकडून आगाऊ पैसे घेऊन मला नव्या वह्या विकत घेऊन दिल्यात, त्या खराब झाल्या तर, मग माझं वर्ष कसं जाईल?'
सदूचं घर जवळच होतं. शेजारच्या रखमाकाकू त्यांच्या नातीला घ्यायला शाळेत आल्या होत्या. सदूने राधिकाला त्यांच्यासोबत घरी पाठवून दिलं. आपल्याला घरी यायला थोडा उशीर होईल, हा निरोप त्यांच्याजवळ दिला. मग तो दशरथकडे आला आणि त्याला म्हणाला, 'चल माझ्या छत्रीतून. मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो. आपण भिजलो तरी चालेल. पण आपली वह्या-पुस्तकं आपण भिजून द्यायची नाहीत.' दशरथला हायसं वाटलं. तो त्याच्या छत्रीत आला.
सदू आणि दशरथ आपापली दप्तरं पावसात भिजण्यापासून वाचवत एका छत्रीतून दोघे निघाले. दशरथ ज्या चाळीत राहतो ती चाळ एकदाची लागली. केवढा अरुंद बोळ. खाली गटार पाणी भरून वाहत होतं. दशरथ सांगेल तसा तसा सावधपणे पाय टाकत घरापर्यंत पोहचण्याचं दिव्य दोघांनी एकदाचं पार केलं. दशरथची आई दारात उभी राहून दशरथची वाटच पाहत होती. तिने दोघांना घरात घेतलं. अंग पुसायला टॉवेल दिला. करून ठेवलेला चहा पुन्हा स्टीव्हवर गरम करायला ठेवला. अल्युमिनियमच्या डब्यातून चहाबरोबर खाण्यासाठी तिने बटर काढले. सदूने दशरथच्या घराचं निरीक्षण केलं. घर खूप ठिकाणी गळत होतं. घरात जुजबी सामान होतं. त्याचे वडील चार वर्षांपूर्वीच देवाघरी गेले होते, घरात कोरडी जागा फारच कमी. सदूच्या मनात विचार आला, जर रात्रभर पाऊस पडतच राहिला तर हे झोपणार कुठे ? सदूकडे वाचं उत्तर नव्हतं. दशरथने सदूच्या डोळ्यातील भाव बरोबर ओळखले. तो पटकन म्हणाला, 'आता कळले ना तुला, मला पाऊस का आवडत नाही ते? खूप त्रास देतो रे हा पाऊस आम्हाला."
सद् माणाला, 'असे नसतं रे दशरथ. पावसाची अनेक रूपं आहेत, तुला त्याचं एकच ठाऊक आहे. सदू बोलता बोलता थांबला. मग कसलासा विचार करून तो म्हणाला, 'कसं सांगू तुला..? थांब एक प्रसंग सांगतो तुला. एक ना विचारवंत होता. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी तो एक मोठ्ठा पांढराशुभ्र पडदा लोकांच्या समोर टांगायचा. त्या पडद्यावर मधोमध एक काळा ठळक ठिपका आधीच काढलेला असायचा. मग तो विचारवंत लोकांना विचारायचा, काय दिसतं तुम्हाला? लोके बोलायचे, 'काळा डाग दिसतोय,' मग तो विचारवंत म्हणायचा, एवढा मोठा पांढराशुभ्र पडदा तुम्हाला दिसत नाही. छोट्टासा काळा डाग मात्र हटकून दिसती. हीच माणसाची दृष्टी आणि वृत्ती. 'दशरथला कळायचे ते कळले. सदू म्हणाला, 'दशरथ तुला तुझा त्रास दिसला. पण हा पाऊस केवढा उपकारक आहे, ते नाही दिसलं. अरे, हा पाऊसच जर पडला नाही तर किती जणांना त्याचा त्रास होईल. आपल्याला शेतीसाठी, पिण्यासाठी, कारखान्यासाठी, स्वच्छतेसाठी पाणी कुठून मिळेल ?'
दशरथ म्हणाला, 'अरे पण......
हा कोसळणारा पाऊस, गरीबांचे हाल करतो डोळ्यांत पाणी देऊन, घर पाण्यानेच भरतो'
सदू महणाला, 'हाच कोसळणारा पाऊस, सृष्टी हिरवीगार करतो पाखरांना देतो चारा आणि जगण्यात प्राण भरतो' दशरथची आईसुद्धा दशरथला म्हणाली, 'राजा, हाच पाऊस आपल्या जगण्यात चैतन्य भरतो. आपल्यासाठी जीवनदायी ठरतो.' सदूने आणि आईने दशरथचे मत परिवर्तन करण्याचा जणू चंगच बांधला होता. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं. शेवटी दशरथच स्वतःहून महणाला, 'खरंय सदू, मला माझ्याच दुःखाचा काळा ठिपका दिसत होता, त्यामुळे पावसाचे पांढरेशुभ्र महत्त्व लक्षातच घेतले नाही रे मी कधी. मी फक्त माझाच विचार करत राहिलो, जो चुकीचा होता, हे आज कळलं मला. हे बघ, आमचे हेही दिवस जातील, पण पाऊस हा हवाच, पाऊसच नसेल तर समाजाचं चित्र खूप भवाण दिसेल.' सदूला दशरथचं बोलणं ऐकून जसा आनंद झाला, तसाच दशरथच्या आईलाही झाला. तिने गरमागरम चहा आणि बटर दोघांना खायला दिले.
चहा-बटरचा आस्वाद घेता घेता सदू म्हणाला, 'आजपासून दशरथचाही पाऊस हा मित्र झालाय, याचा खूप आनंद झालाय मला.' बाहेरच्या बांबलेल्या पावसाने हे जणू ऐकलं असावं. कारण त्याने पुन्हा रिमझिम रिमझिम गाणं सुरू करून बरसायला सुरुवात केली. दशरथला पावसाच्या या गाण्याचा अर्थ आपसुक समाजला. तो मनातच म्हणाला, 'हे रिमझिम पाऊस गाणे आहे मैत्रीचे, सृजनाचे आणि आनंदाचे इंद्रधनू आयुष्यात फुलविणारे.'
बालसाहित्यिक व ललित लेखक