स्मृतिशिळा

आजही वेगवेगळ्या भागात सतीशिळा पाहायला मिळतात. सतीशि‌ळा म्हणजे स्त्रियांच्या आत्मत्यागाचे प्रतीक आहे. स्त्रियांनी भोगलेल्या वेदनांचा इतिहास त्यात नोंदवला गेला आहे.
स्मृतिशिळा
Published on

पाऊलखुणा

आजही वेगवेगळ्या भागात सतीशिळा पाहायला मिळतात. सतीशि‌ळा म्हणजे स्त्रियांच्या आत्मत्यागाचे प्रतीक आहे. स्त्रियांनी भोगलेल्या वेदनांचा इतिहास त्यात नोंदवला गेला आहे.

महाराष्ट्राच्या भूमीत फिरताना अनेक ठिकाणी दगडावर कोरलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा नजरेस पडतात. हे दगड म्हणजे केवळ शिल्प नाहीत, तर त्या स्त्रियांच्या त्यागाचे, वेदनेचे आणि समाजाच्या त्या काळातील परंपरांचे ते जिवंत साक्षीदार आहेत. या दगडांना ‘सतीशिळा’ किंवा ‘सतीचा दगड’ असे म्हटले जाते. पतीच्या निधनानंतर स्वतःचा जीव देणाऱ्या स्त्रिया- म्हणजेच ‘सती गेलेल्या’ महिलांच्या स्मरणार्थ या शिळा उभारल्या जात. अनेक ठिकाणी या शिळा देवळांच्या परिसरात उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे आजही काही ठिकाणी सतीशिळांवर शेंदूर लावून त्यांची पूजा केली जाते. या शिळांना धार्मिक भावनेने वंदन केले जाते, जणू त्या सती स्त्रीला देवीचा दर्जा देण्यात आला आहे.

सतीशिळा म्हणजे एक स्मृतिशिळा असून त्यातून त्या स्त्रीचे जीवन, तिची निष्ठा आणि तिच्या आत्मत्यागाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. या शिळांवर सर्वसाधारणपणे एक बांगड्या भरलेला हात दाखवला जातो. हा हात कोपरापासून वाकलेला असून, तो आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत असतो. हाताभोवती बांगड्या कोरलेल्या असतात, ज्यातून तिच्या सौभाग्यवती असण्याचे दर्शन घडते. हाताखाली दोन लहान प्रतिमा कोरलेल्या असतात; त्या तिच्या मुलांच्या असाव्यात, असा समज आहे. शिळेच्या वर सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात, जे अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. शिल्परचनांच्या दृष्टीने सतीशिळा अत्यंत विविधरंगी दिसतात. काही शिळांवर चितेवर बसलेली स्त्री, तिच्या मांडीवर पतीचे डोके ठेवलेले दाखवले जाते; तर काहींमध्ये ती वाघावर किंवा घोड्यावर स्वार असते. काही ठिकाणी नवरा-बायको हातात हात घालून उभे असतात आणि वरच्या चौकटीत दोघे शिवपिंडीची पूजा करताना दाखवलेले असतात. या दृश्यांमध्ये दांपत्यातील अध्यात्मिक एकता आणि निष्ठा प्रतीत होते. वीराच्या शौर्याच्या स्मरणार्थ उभारलेल्या शिळांना ‘वीरगळ’ म्हणतात; तर त्याच वीरासोबत सती गेलेल्या स्त्रीचे चित्रणही त्यावर दिसल्यास, अशा शिळेला ‘वीरसतीगळ’ म्हणतात. ही शिळा वीराच्या आणि त्याच्या पत्नीच्या एकत्र स्मृतीचे प्रतीक असते. काही शिळांवर दोन किंवा तीन बांगड्या भरलेले हात कोरलेले दिसतात; म्हणजे त्या वीराबरोबर दोन किंवा तीन स्त्रिया सती गेल्या, असे दाखवलेले असते.

सतीशिळा या शिळा मुख्यत्वे दोन प्रकारांमध्ये विभागल्या जातात; सहगमन आणि अनुगमन. जर स्त्रीने पतीच्या देहासोबत अग्निसमाधी घेतली असेल, तर ती सहगमन मानली जात असे आणि जर तिने पतीच्या देहाशिवाय आत्मदहन केले असेल, तर ते अनुगमन म्हणून ओळखले जात असे.

‘सती’ हा शब्द ‘सत्’ या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ ‘सत्य, पवित्र, निष्ठावंत’ असा आहे. ‘सती जाणे’ म्हणजे विवाहित स्त्रीने पतीनिधनानंतर त्याच्या चितेवर स्वतःला झोकून देऊन आत्मदहन करणे. सतीप्रथेचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेद या प्राचीन ग्रंथांमध्येही सापडतो. या वैदिक ग्रंथांतील संदर्भांवरून असे दिसते की, त्या काळात पतीच्या निधनानंतर पत्नीने आत्मविलय करणे ही एक सामाजिक आणि धार्मिक परंपरा म्हणून प्रचलित होती.

इतिहासातील सतीप्रथेचा सर्वात जुना पुरावा इ.स. ५१० मध्ये एरण (मध्य प्रदेश) येथे सापडतो. गुप्त सम्राट भानुगुप्ताच्या दरबारातील सरदार गोपराज युद्धात वीरगतीला प्राप्त झाला आणि त्याची पत्नी सती गेली, याची नोंद त्या ठिकाणच्या शिलालेखात आहे.

सतीचा उल्लेख हिंदू पुराणांमध्येही आढळतो. भगवान शिवाची पत्नी सती (दक्षायणी) हिने आपल्या पित्याने शिवाचा केलेला अपमान सहन न झाल्याने यज्ञाग्नीमध्ये आत्मार्पण केले. येथे विशेष म्हणजे शिव त्या वेळी जिवंत होते; म्हणजेच सती जाण्याचा हा प्रकार पतीनिधनाशी संबंधित नव्हता. पुराणांतील अनुसया, अहिल्या आणि सीता या तिन्ही सती पती जिवंत असताना सती झाल्या होत्या आणि त्यांच्या कृती स्वेच्छेने झाल्या होत्या. त्यामुळे ‘सती जाणे’ ही प्रथा धर्मसंमत होती, असा दावा त्या काळात करणे कठीण आहे.

द्वापारयुगात, महाभारतातील राजा पंडूच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी माद्री सती गेली. पंडूला एका ऋषींनी शाप दिला होता की, तो स्त्रीसंग करेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. नंतर एका प्रसंगात हा शाप खरा ठरला आणि पंडूचा मृत्यू झाला. माद्रीने या घटनेसाठी स्वतःला जबाबदार धरून आत्मदहन केले. ही घटना म्हणजे पतीनिधनानंतर सती जाण्याची पहिली ऐतिहासिक नोंद मानली जाते. पतीनिधनानंतर सती जाणारी माद्री बहुधा पहिलीच! पुढे भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर रुक्मिणी, सत्यभामा आणि इतर काही पत्नींनी सती जाण्याचा निर्णय घेतला. यावरून यादव समाजातही सतीप्रथा प्रचलित असल्याचे दिसते.

इ.स.च्या ११व्या शतकानंतर भारतावर इस्लामी आक्रमणे झाली. राजपूत राज्यकर्त्यांच्या पराभवानंतर राजघराण्यातील स्त्रिया अपमान आणि अत्याचार टाळण्यासाठी स्वतःला अग्नीसमाधी देत. सुरुवातीला त्या स्वतः खड्डा खोदून त्यात अग्नी प्रज्वलित करून उडी घेत असत. नंतर ही पद्धत चितेवर थेट उडी घेण्याच्या रूपात बदलली. या काळात सतीप्रथा उत्तर भारतातून पश्चिम भारतात पसरली आणि दृढ झाली.

तथापि, पुढे या प्रथेचा हेतू विकृत झाला. स्वाभिमान रक्षणासाठी नव्हे, तर समाजातील स्वार्थी प्रवृत्तीने तिला धार्मिक अधिष्ठान दिले. स्त्रियांना जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडले जाऊ लागले. कधी संपत्तीवरील हक्क नाकारण्यासाठी, तर कधी परंपरेच्या नावाखाली. शस्त्राच्या धाकाने, धमक्यांनी किंवा सामाजिक बहिष्काराच्या भीतीनेही विधवांना सती पाठवले जाई.

जिवंत व्यक्तीला जाळणे हे सर्व धर्मांमध्ये पाप मानले जाते, तरी सती जाणे हे ‘पवित्र कर्म’ मानले गेले. लोकांनी ते पतिनिष्ठेचे, पवित्रतेचे आणि धर्माचे प्रतीक मानून स्वीकारले. सतीला देवीचा दर्जा देऊन पूजा केली जाऊ लागली. परंतु त्या चितेच्या ज्वाळांत जळणारी स्त्री किती असह्य वेदना सहन करत असेल, याचा विचार क्वचितच कोणी केला.

काळ पुढे गेला, तसतसे सतीप्रथेच्या विरोधातील आवाज उमटू लागले. ब्रिटिश राजवटीत या प्रथेवर अखेर कायदेशीर बंदी आली. गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीप्रथाबंदीचा कायदा केला. या कार्यात राजा राममोहन रॉय यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी ‘संवाद कौमुदी’ या वृत्तपत्रातून सतीप्रथेविरोधात लेखन करून समाजजागृती केली. समाजातील कट्टरपंथीयांचा विरोध, धमक्या, बहिष्कार या पार्श्वभूमीवरही त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली. इंग्लंडच्या प्रिव्ही कौन्सिलमध्ये सतीबंदी कायद्याचे समर्थन करून हा कायदा अंमलात आणण्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. इ.स. १८२९ मध्ये बंगाल प्रांतात आणि १८३० मध्ये मुंबई व मद्रास प्रांतात सतीप्रथेबंदी कायदा लागू झाला. त्यामुळे या क्रूर प्रथेचा शेवट झाला.

आज सतीशिळा आपल्याला त्या काळाच्या मानसिकतेचा आणि स्त्रियांच्या वेदनांचा दस्तऐवज म्हणून दिसतात. या शिळा म्हणजे केवळ दगड नाहीत; त्या स्त्रीच्या आत्मत्यागाचे साक्षात प्रतीक आहेत. त्या सांगतात, कसा समाज एका स्त्रीकडून ‘पावित्र्याच्या नावाखाली’ तिचे जीवनच मागत होता. या शिळांकडे पाहताना त्या काळातील स्त्रियांनी भोगलेल्या वेदनांचा आणि अन्यायाचा विचार मनाला चटका लावतो. समाजातील स्त्री-पुरुष असमानतेच्या आणि विधवांवर होत असलेल्या अत्याचारांच्या छायेत त्या जगत होत्या. सुटकेचा कोणताही मार्ग नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या वेदनांचा अंत करण्यासाठी आत्मदहनाचा भयावह मार्ग स्वीकारला. त्यांच्या भोवती उठलेल्या ज्वाळांनी केवळ त्यांचे शरीरच नव्हे, तर त्या काळातील स्त्रीचे स्वातंत्र्यही भस्मसात केले. त्या असह्य वेदनांमध्येही त्यांनी समाजाच्या प्रथांना शरण जाण्यापेक्षा आत्मत्यागाचा मार्ग पत्करला. या शिळा पाहताना त्या स्त्रियांच्या मौन किंकाळ्यांचे, त्यागाचे, त्यांच्या स्वाभिमानरक्षणाचे स्मरण होते.

rakeshvijaymore@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in