आम्ही जात त्यागली!

जातीय तेढ, धार्मिक विद्वेष, सामाजिक असहिष्णुता निर्माण करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याच्या आजकालच्या अत्यंत निंद्य व असंवेदनशील वातावरणात महाराष्ट्रातील अहिल्या नगरच्या नेवासा तालुक्यामधील सौंदाळा गावाने ‘जात’ त्यागून समाज परिवर्तनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राचे अनुकरणीय बलस्थान आहे.
आम्ही जात त्यागली!
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणून महाराष्ट्र धर्म जागवणारे छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या पसायदानातून विश्वबंधुत्वाचा व विश्वकल्याणाचा महामंत्र देणारे संत ज्ञानेश्वर, आपल्या अभंगवाणीतून ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’ असा मानवतेचा मूलमंत्र देणारे संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज, भूतदयेचा उपदेश करणारे संत नामदेव, ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली’ हा जीवनमंत्र देणारे महात्मा फुले दाम्पत्य, ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ अशी जगण्याची शिकवण देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘सत्य-अहिंसे’चा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, ‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’ असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे, ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका’ अशी शिकवण देऊन सार्वजनिक स्वच्छतेचा कानमंत्र देणारे संत गाडगे महाराज, समाजातील ढोंगावर आसूड ओढणारे प्रबोधनकार ठाकरे आणि ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असा माणुसकीचा धर्म सांगणारे साने गुरुजी या महानुभवांच्या विचारांचे कृतिशील अनुकरण करणारे गाव म्हणजे सौंदाळा.

सौंदाळा गावाने असे काही काम केले की त्याचा महाराष्ट्राला, देशालाच नव्हे, तर अवघ्या जगाला हेवा वाटावा. सध्याच्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात सौंदाळा गावाने वैचारिक प्रबोधनाचा आणि सामाजिक क्रांतीचा मार्ग अनुसरला आहे. ही वैचारिक, सामाजिक क्रांती घडवण्यासाठी मुळात माणसाला माणसाप्रमाणे वागणूक देण्याची इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती सौंदाळा गावाने दाखवली आहे. म्हणूनच या गावचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खरे तर, ‘शिवाजी आपल्याच घरी जन्माला यावेत’ हीच उर्मी मनात बाळगून त्यासाठी अहर्निश प्रयत्न करणारे सौंदाळा गाव विरळाच.

सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास जाणवला. सध्याच्या असहिष्णुतेच्या वातावरणाविषयी त्यांनी तीव्र चीड व संताप व्यक्त केला. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून महाराष्ट्र, भारताविषयीचा जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान आणि गोरगरीबांच्या कल्याणाचा ध्यास दिसून येत होता. मुख्य म्हणजे त्यांची नव्या पिढीला घडविण्याची प्रामाणिक तळमळ ऐकून मनस्वी आनंद झाला. त्यांच्यासोबतची ही संवादाची आनंदयात्रा थांबूच नये असेच काहीसे झाले.

सौंदाळा हे गाव काही अचानक प्रकाशझोतात आलेले नाही. त्यासाठी या गावातील पुढाऱ्यांनीच नव्हे, तर प्रत्येक गावकऱ्यांनी मनाची हिंमत दाखवून अपार कष्ट उपसले आहेत. त्यामागील त्यांची जिद्द आणि धाडस वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचा जो काही वैचारिक पाया रचला आहे, त्याला तोड नाही.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन सौंदाळा गावाने मागील ५ जानेवारी २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत ‘जातमुक्त ग्रामपंचायती’चा ठराव संमत करून सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय रचला आहे. या निर्णयाने सौंदाळा गावचे नाव सर्वतोमुखी झाले आहे. ‘आमचे सौंदाळा गाव आजपासून ‘जात त्याग’ करीत असल्याचा ठराव सरपंच शरद आरगडे यांनी मांडला. या ठरावाला बाबासाहेब मच्छिंद्र बोधक यांनी अनुमोदन दिले व हा क्रांतिकारी ठराव एकदिलाने संमत झाला. आपली जात, आपला धर्म केवळ घरात ठेवावा. त्याचा सार्वजनिक ठिकाणी वृथा अभिमान बाळगू नये. माणूस जन्माला येताना काही जात-धर्म कपाळावर गोंदवून येत नाही. त्यामुळे ज्याने त्याने आपला जात-धर्म केवळ कागदावरच ठेवावा. त्याचे सार्वजनिक व्यवहारात अवडंबर माजवू नये. माणुसकीचे नाते वृद्धिंगत करणारा हा ठराव आहे. आपल्या प्रत्येकाचे रक्त भगवे अथवा हिरवे कधीच नसते. ते असते फक्त लाल आणि सर्वांसारखेच. हाच भारतीय राज्यघटनेतील समतेचा, ममतेचा, सामाजिक बंधुभावाचा, धर्मनिरपेक्षतेचा, सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्याची किमया सौंदाळा गावाने करून दाखवली आहे. म्हणूनच या गावची थोरवी वर्णावी किती अशी.

आमच्या गावात जाती-धर्मावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. सर्वच गावकरी प्रत्येक सण-उत्सव एकदिलाने, सलोख्याने व सामाजिक बंधुभावाच्या दृष्टिकोनातून साजरे करतात. गावातील मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशी सर्वच प्रार्थनास्थळे सर्वांना सारख्याच प्रकारे खुली आहेत. एवढेच काय, गावातील पाणवठ्यावरही सर्वांचाच समान हक्क आहे. ही समतेची ज्योत माणसाला माणुसकी दाखवणारी आहे.

‘राम आमचा, रहीम तुमचा’, ‘गांधी तुमचे’ असा भेदाभेद करून महापुरुषांना जयंती आणि पुण्यतिथ्यांमध्ये वाटून घेण्याच्या सध्याच्या कलयुगात सर्वांना राज्यघटनेतील समतेच्या एकसूत्रात गुंफण्याची क्रांती सौंदाळा गावाने घडवून दाखवली आहे. जात-धर्मवादाचे संभाव्य टोळी युद्ध थांबवून जातिभेदाला मूठमाती दिली आहे.

सौंदाळा गाव अभिनव प्रयोगांनी चर्चेत आलेले आहे. शिवीगाळ करणाऱ्यावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करणारी सौंदाळा ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. जवळपास ७०० गोधन, उसाच्या शेतीवर पोसलेल्या आणि अडीचशे लोकसंख्या असलेल्या या गावाने रक्तदानाचे महत्त्व आपल्या गावकऱ्यांच्या मनावर बिंबविले आहे. त्यासाठी नियमित रक्तदान शिबिर भरविले जात आहेत. सौंदाळा ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात सीसीटीव्ही बसवले आहेत. ५ रुपयात उच्च दर्जाचे शुद्ध पाणी पुरविले जात आहे. प्रत्येक कुटुंबाचे शौचालय आहे. गावात वृक्षारोपण करून झाडे लावली व जगवली जात आहेत. विशेष म्हणजे, सरपंच आरगडे यांच्या आजोबांनी देहदान केले. आता वडील व त्यांनी स्वत: मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.

सौंदाळा ग्रामपंचायतीने ११ हजारांचे अनुदान देऊन विधवा पुनर्विवाहाचे पुरोगामी पाऊल उचलले आहे. गावातील ६२ मुलींच्या शिक्षणाचा भार ग्रामपंचायत उचलत आहे. गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात ६ हजार रुपये देऊन तिच्या कन्यादानाचा नवा पायंडा पाडला आहे. या कन्यादानाच्या प्रयोगाच्या आजवर २५ ते ३० मुली लाभार्थी ठरल्या आहेत. ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक दिवाळीला माणशी दीड किलो साखर मोफत वाटून जीवनातील गोडवा वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे.

मागील दीड महिन्यापासून सौंदाळा गावात सकाळी दहाच्या ठोक्याला राष्ट्रगीत वाजवण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. त्याला सर्वच कष्टकरी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठबळ दिले आहे. ही संकल्पना राष्ट्राभिमान जागृत करणारी व तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे हे अगदी खास.

सध्या मोबाईल संस्कृतीचा अतिरेकी वापर टाळण्याच्या उद्देशाने व विद्यार्थ्यांची अभ्यासाची गोडी वाढवण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत भोंगा वाजविला जात आहे. या दोन तासांच्या काळात प्रत्येकाने मोबाईल न वापरता केवळ अभ्यासावरच आपले लक्ष केंद्रित करावे, असा ठराव सौंदाळा गावाने केला आहे. विशेष म्हणजे या ठरावाचे आता राहुरी ग्रामपंचायतीनेही अनुकरण करायचे ठरविले आहे. सौंदाळे गावचे हे आदर्श सर्वच ग्रामपंचायतींनी अनुसरल्यास पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊन जातनिर्मूलनाच्या, जातीअंताच्या लढ्याला थोडाफार का होईना हातभार लाभेल, हे निश्चित.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in