बिबटे वाचले, तर जंगल वाचेल!

आधी धनदांडग्यांनी बिबट्यांच्या अधिवासावर म्हणजे जंगलांवर अतिक्रमण केले व आता विवट्यांनी खेड्यापाड्यातील गोरगरीबांच्या मानवी वस्त्यांवर हल्ले सुरू केले आहेत. उभयतांच्या जीविताला सारखाच धोका निर्माण झाला आहे. बिबट्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास निसर्गाची अन्नसाखळी तुटेल, पर्यावरणाचा समतोल ढासळेल व जंगलाचे अस्तित्वच धोक्यात येईल एवढा हा गंभीर विषय आहे.
बिबटे वाचले, तर जंगल वाचेल!
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

आधी धनदांडग्यांनी बिबट्यांच्या अधिवासावर म्हणजे जंगलांवर अतिक्रमण केले व आता बिबट्यांनी खेड्यापाड्यातील गोरगरीबांच्या मानवी वस्त्यांवर हल्ले सुरू केले आहेत. उभयतांच्या जीविताला सारखाच धोका निर्माण झाला आहे. बिबट्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास निसर्गाची अन्नसाखळी तुटेल, पर्यावरणाचा समतोल ढासळेल व जंगलाचे अस्तित्वच धोक्यात येईल एवढा हा गंभीर विषय आहे. एका बिबट्याला ठार केले, तर त्याची जागा दुसरा बिबट्या घेईल, त्यांचे प्रजननही तेवढ्याच वेगात वाढेल व त्यांचा उपद्रवसुद्धा कायम राहील. त्यामुळे विवट्यांना ठार करण्यापेक्षा त्यांची नसबंदी करण्याबरोबरच त्यांच्या सहअस्तित्वाची मानसिकता मनामनात रुजवून ती जपण्यात भूतदया आहे आणि पर्यावरणहितसुद्धा.

गेल्या काही वर्षात वन्य पशुपक्षी गावांकडे, शहरांकडे धाव घेऊ लागले आहेत. शहरांमधील रस्त्यावर अधूनमधून पहाडी पोपट, मोर, हरीण, भेकरे, सोनेरी कोल्हे, रानगवे, हत्ती, बिबटे, वाघ दिसायला लागले आहेत.

अचानक मानवी वस्तीत आलेल्या वन्य पशुपक्ष्यांना पाहून जनमानस कधी हरखून, तर कधी घाबरून जात आहे. तथापि, हे वन्य पशुपक्षी आपले मूळ जंगल सोडून गावांमध्ये, शहरांमध्ये का आले याचा कुणीच विचार करत नाही. त्यांची जंगलातील अधिकृत घरटी, त्यांचे अधिवास सारे निसर्ग नियम धाब्यावर बसवून उद्ध्वस्त केले, तर त्यांनी जायचे कुठे, हा प्रश्न कुणाला पडत नाही. त्यांचे सहअस्तित्व, सहजीवनच नव्हे, तर त्यांचे अस्तित्वच मिटविण्याचे कटकारस्थान रचले जात असेल, तर कुणाच्या अध्यातमध्यात नसलेल्या रानपाखरांनी, वन्यजीवांनी करावे तरी काय? हे प्रश्न कुणीच गांभीर्याने घेत नसल्याने वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षाने टोक गाठले आहे.

गेल्या काही वर्षांत पुण्यातला जुन्नर, शिरूरचा भाग, साताऱ्यातील पाटण आणि त्याच्या आसपासचा परिसर, नाशिक, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, चंद्रपूर परिसरात बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर भागात बिबट्यांच्या हल्ल्यात दोन मुले आणि एका वृद्ध नागरिकाचा बळी गेला. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. त्यांनी वनविभागाची तळछावणी पेटवून दिली. वाहनाला आग लावली. आसपासचे महामार्ग रोखून धरले. हा जनक्षोभ वाढल्यानंतर अखेर एका बिबट्याला थेट गोळ्या घालून ठार करण्यात आले. या ठिकाणी बिबट्याला ठार करून सूड-द्वेषभावनाच जागविण्यात आली. त्यात भूतदया, निसर्गप्रम आणि पर्यावरणहिताचा पालापाचोळा झाला. विचारांची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या मानवाचे वैचारिक सामर्थ्य वन्यजीवांना मारण्यात नाही, तर तारण्यात आहे याचाच सोयीस्कर विसर पडला आहे.

जंगलात स्वच्छंद जीवन जगणारे बिबटे एवढे हिंसक व्हायची कारणे काय आहेत, ती इथे सर्वप्रथम समजून घेण्याची गरज आहे. बिबट्यांनी आपले जंगल का सोडले? ते आपल्या गावाच्या सीमेवर का आले? याचे मूलभूत कारण म्हणजे झपाट्याने जंगलतोड होत आहे. शहरीकरण वाढत आहे. वाढत्या खाणी व विकास प्रकल्पांमुळे जंगलांचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यातच ऊसाची शेती आणि फळबागायतीचा विस्तार होत आहे. जंगलातील पाणवठे, अधिवास नष्ट होत आहेत. विविध विकास प्रकल्पांमुळे वनमार्ग खंडित होत आहेत. 'जंगल रिसॉर्ट' ची ठिकठिकाणी अतिक्रमणे सुरू आहेत. परिणामी, पाखरांची घरटी, प्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यांच्यावर आपल्या मूळ जंगलातून मानवी वस्त्यांकडे स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. हे स्थलांतर नव्या अधिवासाच्या आणि भूकेच्या शोधात आहे. नको असलेले स्थलांतर कळत-नकळत त्यांच्या माथी मारले जाऊ लागले आहे. मूळ जंगलच कमी होत चालल्याने पाखरांचे, वन्य प्राण्यांचे सुखीसंसारच उघड्यावर आले आहेत. वन्य प्राण्यांमधील असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. परिणामी, जंगलांची निरव शांतता हरपली आहे. पशुपक्ष्यांची झोप उडाली आहे. दुसरीकडे पशुपक्ष्यांबरोबरच जंगल जीवापाड जपणाऱ्या आदिवासींच्याही अस्तित्वाला सुरुंग लागला आहे. आदिवासींचे सहजीवन धोक्यात आले आहे. हा बदल ना निसर्गाला वाचविणारा आहे ना मानवाला तारणारा आहे. मानवाला दोन्ही करांनी भरभरून देणारा निसर्ग आता धनदांडग्यांच्या सावकारीने व शासन व्यवस्थेच्या अगतिकतेमुळे भूकेकंगाल, हतबल, निराश झाला आहे.

बिबटे आधी जंगलातील भेकर, हरीण, माकड रानडुक्कर, साळिंदर यांची शिकार करीत होते. प्रतिकूल परिस्थितीत ते बेडूक, उंदीर, घुशी, खेकड्यांवरही गुजराण करीत असले तरी आता जंगलातील भक्ष्य त्यांना पुरे पडत नाही. त्यामुळे ते मानवी वस्त्यांकडे आकर्षित होऊन कोंबड्या, शेळ्या, भटके कुत्रे व अन्य पाळीव प्राणी यांना लक्ष्य करीत आहेत. अशाप्रकारे त्यांच्या राहण्याच्याच नव्हे, तर खाण्याच्याही सवयी पार बदलल्या आहेत. तसे त्यांचे स्वभावही बदलत आहेत. ऊसाची घनदाट शेती हीच बिबट्यांचे सर्वात सोयीचे, सुरक्षित अधिवास ठरू लागली आहे. हे परिस्थितीजन्य, वातावरणीय, जनुकीय बदल बिबट्यांना आपले स्वत्वच विसरायला लावत आहेत.

बिबट्यांनी माणसांना मारले अथवा माणसांनी बिबट्यांना ठार केले, तरी उभयतांमधील संघर्ष काही मिटणार नाही. याशिवाय, निसर्ग अथवा बिबट्यांकडे आपले शत्रू म्हणून बघण्यात काहीच अर्थ नाही. तसेच, जुन्नरमध्ये पकडलेला बिबट्या कोल्हापूरमध्ये स्थलांतरित केला तरी तो पुन्हा जुन्नरमध्येच परत येतो हा अनुभव पाहता बिबट्यांना त्यांच्याच प्रदेशात पुन्हा सोडण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्याने बिबट्यांचा उपद्रव कमी होणार नाही. उलट हा धोका वाढण्याचाच संभव अधिक आहे.

माणसांप्रमाणे बिबट्यालाही जगण्याचा अधिकार आहे. ते लक्षात घेता, बिबट्यांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांची नसबंदी करावी लागेल. ज्या गावांमध्ये बिबट्यांचा संचार वाढला आहे, त्या गावांमध्ये मदत पथके निर्माण करावी लागतील. बिबट्या घराजवळ आल्यास त्याच्या हालचाली टिपून गावकऱ्यांना सावध करणारी सेन्सर आधारित सायरन व्यवस्था निर्माण करावी लागेल. जंगल व तेथील वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सीमेवर सौरऊर्जा कुंपण उभारण्याला प्राधान्य द्यावे लागेल. गावात दिवसा अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करावा लागेल. वृद्ध अथवा लहान मुले यांना रात्रीच्या वेळी एकटे न पाठवता समूहाने ये-जा करण्याची खबरदारी घ्यावी लागेल. गावाच्या आसपास उकिरडे नसतील तर तिकडे पाळीव भटकी जनावरेही फिरकणार नाहीत म्हणून गावे उकिरडेमुक्त राखण्याला प्राधान्य द्यावे लागेल. एखादा हल्ला झालाच तर त्या व्यक्तीच्या वारसांना तत्काळ नुकसानभरपाई कशी मिळेल हे पाहावे लागेल. शेती, फळबागायतींचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना वेळीच मदत करावी लागेल. तेव्हाच जनतेचा शासन यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत होईल आणि ते वन्यजीवांच्या रक्षणासाठी पुढाकार घेतील, त्यांची काळजी वाहतील. वन्य प्राण्यांची अवैध शिकार अथवा तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून योग्य तो संदेश द्यावा लागेल. वन्य प्राण्यांविषयीची भीती दूर करून त्यांच्या रक्षणासाठी गावकरी व वनविभाग यांच्यात सुसंवाद वाढीस लावावा लागेल. गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यातील काहींना प्रशिक्षित करावे लागेल. धनदांडग्यांपासून जंगलांचा अनमोल ठेवा जतन करावा लागेल. गावकऱ्यांना मध उत्पादन, आयुर्वेदिक वनस्पती गोळा करण्याबरोबरच पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना द्यावी लागेल. 'डब्ल्यूडब्ल्यूएफ, बिग कॅट रेस्क्यू, आययूसीएन' यासारख्या संस्थांनी 'लेपर्ड व्हिजन २०३०' आराखडा सुचवला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल. वनमार्ग पुन्हा जोडण्यासह जंगल आणि मानवी वस्त्यांमध्ये सुरक्षित अंतर राखावे लागेल. केवळ बिबट्यांची संख्या मोजत बसले तर ते कधी संपतील हे देखील कोणाला कळणार नाही.

मुळात बिबटे हेसुद्धा जंगलाच्या अस्तित्वाचा भाग आहेत. आपल्या मूळ स्वभावानुसार बिबटे तसे कोणत्याही बदलाशी समरूप होणारे आहेत. जसे बिबट्यांचे आहार, विहार बदलले तसे काही गावकऱ्यांनीही बिबट्यांना अनुरूप ठरतील असे बदल घडवायला प्रारंभ केला आहे, ही सुचिन्हेच म्हणावी लागतील. निशाचर बिबट्यांचा रात्रीचा संचार असतो. तो ध्यानी घेता काही शेतकऱ्यांनी आपल्या शेताला रात्रीचे पाणी देणे थांबविले आहे. काही शेतकरी आपली पाळीव जनावरेच काय, कोंबड्या, कुत्रेसुद्धा बंदिस्त जागेत ठेवत आहेत. बिबट्या आणि माणूस या दोघांनीही आपापले सहजीवन, सहअस्तित्वाच्या मर्यादा ओळखून परस्पर पूरक भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे. तसेच, बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे आणि आसपासच्या लोकवस्त्यांमधील ताणतणाव निवळला आहे. या जमेच्या बाजू आहेत. त्यादृष्टीने अन्यत्रही उपाययोजना करायला हव्यात.

मुख्य म्हणजे बिबटे हेसुद्धा निसर्गाच्या परिसंस्थेचा एक भाग आहेत. बिबट्यांचे प्रश्नसुद्धा कुणी तरी समजून घेण्याची आवश्यकता आहे. बिबटे हे मानवाचे शत्रू नाहीत. त्यामुळे बिबट्यांचे सहअस्तित्व मान्य करून त्यांचे जतन, संरक्षण करण्याची जबाबदारी कुणालाही टाळता येणार नाही. बिबटे वाचले तर जंगल वाचेल, पर्यावरणाचे रक्षण झाले, तर हवामानबदलाची तीव्रताही कमी होईल याविषयी जाणीवजागृती करण्यात आपण कमी पडत आहोत. म्हणूनच बिबटे हिंस्त्र झाले आहेत आणि माणूससुद्धा.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in