खबरदार! राखणदार पाहतोय...

‘मी राखणदार’ ही चळवळ नाही-ही एक शपथ आहे. निसर्गाचं रक्षण करण्याची, संस्कृती जपण्याची आणि पुढच्या पिढ्यांना मातीशी जोडण्याची. निसर्ग आणि माणूस वेगळे नाहीत-आपणच निसर्ग आहोत. जर आपण निसर्ग वाचवला, तर आपण स्वतःला वाचवू. जर आपण निसर्ग नष्ट केला, तर कोणताही देव आपल्याला वाचवू शकणार नाही.
खबरदार! राखणदार पाहतोय...
Published on

विचारवाटा

रानमाणूस प्रसाद गावडे

‘मी राखणदार’ ही चळवळ नाही-ही एक शपथ आहे. निसर्गाचं रक्षण करण्याची, संस्कृती जपण्याची आणि पुढच्या पिढ्यांना मातीशी जोडण्याची. निसर्ग आणि माणूस वेगळे नाहीत-आपणच निसर्ग आहोत. जर आपण निसर्ग वाचवला, तर आपण स्वतःला वाचवू. जर आपण निसर्ग नष्ट केला, तर कोणताही देव आपल्याला वाचवू शकणार नाही.

निसर्ग हाच देव आहे.’ ही केवळ एखादी म्हण, सुविचार किंवा पोकळ श्रद्धा नाही, तर हा संपूर्ण भारतीय संस्कृतीचा प्राण आणि गाभा आहे. शतकानुशतके या भूमीने निसर्गाला केवळ उपभोग्य वस्तू मानले नाही, तर त्याला पूजनीय मानले. मंदिरं, मूर्ती आणि धर्मग्रंथ यांच्या आधी माणूस देवाला कुठे पाहायचा? तो पाहायचा डोंगरात, झाडात, पाण्यात, प्राण्यांत आणि मातीच्या प्रत्येक कणात. देव हा बाहेर कुठे नव्हता, तो निसर्गाच्या प्रत्येक श्वासात होता.

हिमालयातील केदारनाथाच्या उंच शिखरांपासून कोकणातील रवळनाथाच्या देवरायांपर्यंत देवाचं अस्तित्व निसर्गातच मानलं गेलं. जिथे पाण्याचा जन्म होतो, जिथे झाडं उभी राहतात, जिथे जंगल श्वास घेतं तिथेच देव आहे, ही आपल्या संस्कृतीची मूळ जाणीव होती.

पण आजच्या चकाकत्या आधुनिक युगात, जेव्हा आपण जागतिक वन दिन साजरा करण्यासाठी एकत्र येतो, तेव्हा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या निसर्गाला आपण ‘माता’ मानलं, त्या श्रद्धेचं आज नेमकं काय झालं आहे? मानवाच्या प्रगतीची चाके इतकी वेगाने फिरत आहेत की, त्याखाली निसर्गाची संवेदना चिरडली गेली आहे.

एकेकाळी सुपीक मातीला ‘सातेरी आई’ मानणारा माणूस आज त्याच मातीवर डंपर चालवतो आणि ती विकून टाकतो. ज्या डोंगरांना आपण महादेवाचं निवासस्थान मानून नतमस्तक व्हायचो, तेच डोंगर आज सपाट करून सिमेंटच्या जंगलात बदलले जात आहेत. नदीला तीर्थ मानणारा समाज आज तिच्याच प्रवाहात विष मिसळतो आहे. ही केवळ पर्यावरणाची हानी नाही, तर आपल्या आत्मिक संस्कृतीचा झालेला हा भयानक ऱ्हास आहे.

हे असं का घडतंय? कारण निसर्गाला देव मानणारी संस्कृती ही जागतिक भांडवलशाहीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होती. जो माणूस झाडाला देव मानतो, तो झाड कापणार नाही. जो पाण्याला तीर्थ मानतो, तो पाण्याचा बाजार मांडणार नाही. म्हणूनच धर्माचं बाजारीकरण झालं, लोकांना जाती-धर्माच्या वादात अडकवलं गेलं आणि माणूस आपल्या मूळ निसर्गदेवतेपासून दूर गेला.

आज धर्म हा ‘इव्हेंट’ झाला आहे, पूजा ‘स्पॉन्सरशिप’ झाली आहे आणि देव ही संकल्पना ‘ब्रँड’ बनली आहे. या सगळ्यात माणूस केवळ एक ‘ग्राहक’ बनून राहिला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती करत असलो, तरी आपली पर्यावरणीय जाणीव वेगाने कमी होत चालली आहे. आपण निसर्गदेवतेची हत्या करत आहोत आणि आपल्याला त्याचं दुःखही जाणवत नाहीये.

याच अस्वस्थतेतून जन्म झाला ‘मी राखणदार’. ही केवळ चळवळ नाही, तर एक जिवंत तत्त्वज्ञान आहे. निसर्गाला देव मानणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीच्या मुळाशी पोहोचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही गावोगावी फिरतो, देवरायांच्या सावलीत जातो आणि त्या पवित्र ऊर्जेचा अनुभव घेतो. जिथे निसर्गसंपत्ती मुबलक आहे, तिथेच विनाशकारी प्रकल्प का आणले जातात, हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारलाय का? खनिजांनी समृद्ध अशा अरावली पर्वतरांगांमध्ये खाणकामामुळे आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. उत्तर कोकणातील वाढवण येथे मच्छिमार आपल्या किनारपट्टीच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत आणि परदेशात बंद पडलेले रासायनिक उद्योग, लोटेसारख्या भागात पुन्हा उभे राहतात.

हा योगायोग नाही, हा एक पॅटर्न आहे. जिथे जंगल आहे, तिथे जमीन आहे. जिथे जमीन आहे, तिथे खनिज आहे आणि जिथे हे सगळे आहे, तिथे बाजाराची नजर असते. पण एक गोष्ट आपण विसरतो. जिथे निसर्ग आहे, तिथे राखणदार सुद्धा असतो. तो राखणदार कधी आदिवासी असतो, कधी मच्छिमार असतो, कधी शेतकरी असतो. पण तो नेहमी निसर्गाशी जोडलेला असतो. आज विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प राबवले जात आहेत, ते केवळ आर्थिक निर्णय नाहीत. ते सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम घडवणारे निर्णय आहेत. अरावलीतला आदिवासी जेव्हा रस्त्यावर उतरतो, तेव्हा तो फक्त जमीन वाचवत नाही. तो आपलं अस्तित्व वाचवत असतो.

कोकणातील मच्छिमार जेव्हा किनारपट्टीसाठी लढतो, तेव्हा तो केवळ व्यवसायासाठी नाही तो समुद्राशी असलेले नाते जपत असतो. हजारो वर्षांचा कृषी संस्कृतीचा वारसा आपण पालीच्या शेपटासारखा झटकन तोडू शकत नाही. शेवटी माणूस परत निसर्गाकडेच येणार. पण तेव्हा प्रश्न उरतो, गाव शिल्लक असेल का?

गाव म्हणजे केवळ घरांचा समूह नाही. ते एक जगण्याचं विद्यापीठ आहे. इथे मातीशी नातं शिकवलं जातं, पाण्याचं महत्त्व समजावलं जातं, निसर्गाशी सुसंवाद साधायला शिकवलं जातं. जर हे गावच नष्ट झालं, तर पुढच्या पिढीला शिकायला काय उरेल? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कोकणातील देवराया आजही उभ्या आहेत. या देवराया म्हणजे- जैवविविधतेचे खजिने, जलस्रोतांचं उगमस्थान आणि लोकसंस्कृतीचं केंद्र आहे.

गेल्या वर्षभरात, जुन्याजाणत्या लोकांसोबत या देवरायांमध्ये जाऊन निसर्गाचा अभ्यास, त्याचं दस्तावेजीकरण चित्रं आणि कथांच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे किंग कोब्रा, खवले मांजर, हॉर्नबील, कासव आणि त्यांच्या असंख्य प्रजाती यांचे अधिवास लोकसंस्कृतीने ‘राखणदार’ या संकल्पनेतून जपले आहेत. या सगळ्या अनुभवातून ‘मी राखणदार’ हा कार्यक्रम उभा राहिला. हा कार्यक्रम केवळ माहिती देत नाही. तो जाणीव जागवतो. तो लोकांना सांगतो- निसर्ग ही संपत्ती नाही, जबाबदारी आहे. जंगल म्हणजे संसाधन नाही, जीवन आहे आणि देव मंदिरात नाही- तो निसर्गात आहे.

रेडीच्या गंगाळदेवापासून पालघरच्या शंखोधरापर्यंत हा प्रवास अजूनही सुरू आहे. हा प्रवास केवळ भौगोलिक नाही. तो संस्कृती शोधण्याचा आणि निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा आहे. आज प्रश्न प्रकल्पांचा नाही. प्रश्न आहे दिशेचा. आपण विकासाच्या नावाखाली आपल्या पायाखालची जमीनच गमावत आहोत. जिथे निसर्ग आहे, तिथे राखणदार आहेच. पण तो अजून झोपेत आहे. आता त्याला जागं करण्याची वेळ आली आहे. कारण- जर राखणदार जागा झाला, तर निसर्ग वाचेल आणि जर निसर्ग वाचला, तरच आपण वाचू.

देवराई म्हणजे केवळ झाडांचा समूह नाही- ती एक जिवंत प्रयोगशाळा आहे. तिथे पाण्याचे झरे कधी आटत नाहीत, जैवविविधता टिकून राहते आणि निसर्गाचा समतोल अबाधित राहतो. गिरोबा, वेतोबा, वाघोबा, नागनाथ, डुंगोबा हे केवळ देव नाहीत, तर त्या परिसंस्थेचे राखणदार आहेत.

कोकणातील अनेक गावांमध्ये आजही ही संस्कृती जिवंत आहे. तेरेखोल नदीच्या काठावर गावकऱ्यांनी देवकोंड जपले आहेत. कर्ली नदीच्या खोऱ्यात अर्जुनाचे अजस्त्र वृक्ष ‘देवाचे आयन’ म्हणून जपले आहे. आचरा गावातील कांदळवन समुद्राच्या रौद्र रूपापासून गावाचं संरक्षण करतं. निवती-कोचरा परिसरातील डुंगोबा डोंगर किनाऱ्याचा नैसर्गिक रक्षक म्हणून उभा आहे. कान्हाळ्याची रायसारख्या देवरायांमध्ये लाखो वर्षांपासून टिकून असलेली जैवविविधता आजही जिवंत आहे.

या सगळ्या उदाहरणांतून एकच गोष्ट स्पष्ट होते- निसर्गाला देव मानणं म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणं. राखणदार म्हणजे कोण? राखणदार तो- जो झाडं लावत नाही, तर ती जगवतो. जो नदीची पूजा करत नाही, तर तिला वाहती ठेवतो. जो मातीला आई मानतो आणि तिचा सौदा करत नाही. जो जंगल जपतो आणि पुढच्या पिढ्यांसाठी निसर्ग टिकवतो. गावातले साधे लोक- जे अजूनही मातीच्या घरात राहतात, पारंपरिक शेती करतात, निसर्गाशी सुसंवाद साधून जगतात- तेच खरे राखणदार आहेत.

उद्योगपती देशभरातील जंगलं संपवून कार्बन क्रेडिटच्या नावावर ‘विकास’ उभा करतील, पण आपण मात्र कोकणाला कांतारासारखं ईश्वराचं मधुवन म्हणून जपायला हवं. कारण हेच आपलं देवाचं घर आहे. कांतारा पाहताना कोकण आठवतं, कारण ती कथा सुद्धा सह्याद्रीच्या कुशीतल्या एका राखणदाराची आहे. तिथले पंजुरली आणि गुलिगा, तसेच आपल्या कोकणातील वेतोबा आणि गिरोबा- हे सगळे गार्डियन स्पीरिट आहेत. ते भूमी, न्याय आणि परंपरेचे रक्षक आहेत. देवराया म्हणजे खरेच मधुवन. इथे पट्टेरी वाघाचा अधिवास आहे, तिलारी खोऱ्यात नागनाथाची देवराई आहे जिथे किंग कोब्राला राखणदार मानलं जातं. चित्रपटात दाखवलेला Slender loris हा जादूटोण्यासाठी नव्हे, तर आपल्या दोडामार्गच्या जंगलात राहणारा दुर्मीळ प्राणी आहे.

पण आज सह्याद्री आक्रोश करत आहे. जंगल कमी होत आहे, नद्या सुकत आहेत आणि प्राणी आपले अधिवास गमावत आहेत. एका देवकोंडीत सापडलेली मृत वाघीण हा केवळ प्रसंग नाही- तो निसर्गाचा इशारा आहे. जर जंगल नष्ट झालं, तर वाघ नाहीसे होतील आणि वाघ नाहीसे झाले, तर जंगलही वाचणार नाही.

आज ‘विकास’च्या नावाखाली जंगलं तोडली जात आहेत, नद्या वळवल्या जात आहेत आणि डोंगर सपाट केले जात आहेत. पण हा विकास नाही- हा विनाश आहे. खरा विकास म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुपीक माती आणि समृद्ध जैवविविधता. आपल्या लोकसंस्कृतीत दडलेलं विज्ञान आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे. विज्ञान आपल्याला ‘कसं वाचवायचं’ सांगतं, पण संस्कृती आपल्याला ‘का वाचवायचं’ हे शिकवते. या दोन्हींची सांगड घातली तरच आपण निसर्ग वाचवू शकतो.

‘मी राखणदार’ ही चळवळ नाही- ही एक शपथ आहे. निसर्गाचं रक्षण करण्याची, संस्कृती जपण्याची आणि पुढच्या पिढ्यांना मातीशी जोडण्याची. निसर्ग आणि माणूस वेगळे नाहीत-आपणच निसर्ग आहोत. जर आपण निसर्ग वाचवला, तर आपण स्वतःला वाचवू. जर आपण निसर्ग नष्ट केला, तर कोणताही देव आपल्याला वाचवू शकणार नाही.

लक्षात ठेवा- निसर्ग आपला देव आहे आणि आपण त्याचे राखणदार.

शाश्वत जीवनशैलीचे अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in