अस्वस्थतेचा सामाजिक दस्तावेज

‘सविनय अस्वस्थ’ वाचून झाल्यावर वाचक मनाने हादरतो, प्रश्नांनी भरून जातो आणि आपल्या समाजातील वास्तव विषमतेकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळवतो. त्यामुळे या कथासंग्रहाची खरी ताकद ही आहे की, तो वाचकाला अस्वस्थ करतो. अस्वस्थतेतूनच विचार, प्रश्न आणि बदलाची बीजं रोवतो. तो केवळ साहित्यिक आनंद देत नाही, तर समाजातील सत्तासंबंध, स्त्रीचे अस्तित्व, जात-धर्मीय विघटन आणि वर्गविभाजन यावर भाष्य करतो.
अस्वस्थतेचा सामाजिक दस्तावेज
Published on

रसास्वाद

प्रगती सुभाष

‘सविनय अस्वस्थ’ वाचून झाल्यावर वाचक मनाने हादरतो, प्रश्नांनी भरून जातो आणि आपल्या समाजातील वास्तव विषमतेकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळवतो. त्यामुळे या कथासंग्रहाची खरी ताकद ही आहे की, तो वाचकाला अस्वस्थ करतो. अस्वस्थतेतूनच विचार, प्रश्न आणि बदलाची बीजं रोवतो. तो केवळ साहित्यिक आनंद देत नाही, तर समाजातील सत्तासंबंध, स्त्रीचे अस्तित्व, जात-धर्मीय विघटन आणि वर्गविभाजन यावर भाष्य करतो.

सविनय अस्वस्थ’ हा कथासंग्रह हातात घेतला की सर्वप्रथम त्याचे मुखपृष्ठच विचार करायला भाग पाडते. काळा-पांढरा रंग, विस्कटलेली रेषा आणि निवांत झोपलेला माणूस यातून अस्वस्थतेचा विरोधाभास उलगडतो. हा विरोधाभास समाजातील अस्वस्थता आणि मानवी जगण्यातील दडपण यांचे रूपक ठरतो. तो काळ्याकडे पाठ करून पांढऱ्या धूसर भविष्याकडे पाहतो, जणू व्यवस्थेच्या बंधनातून सुटण्याचा तो प्रयत्न करत आहे.

पुस्तकाची अर्पणपत्रिका समाजक्रांतिकारक जोतिबा फुले यांच्या ऐतिहासिक पत्राला अर्पण केलेली आहे. लेखकाने जोतिबांना सलाम करताना ‘घालमोड्या दीदींचा’ उल्लेख करून पाय जमिनीवर असलेला, प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेला दृष्टिकोन दाखवला आहे.

संग्रहातील चौदा कथांमध्ये स्त्री-अस्तित्वाचे केंद्रस्थान स्पष्टपणे दिसून येते. जरी लेखकाचा दृष्टिकोन पुरुषी असला, तरी कथानकातील स्त्रिया क्रमशः नायकाच्या भूमिकेत येतात. या स्त्रिया परंपरेच्या जोखडात जगत असल्या, तरी त्यातून सुटण्याचा सतत प्रयत्न करतात. या संग्रहातील कथांमध्ये सामान्य माणसाचा संघर्ष केंद्रस्थानी आहे. सर्व कथांतून स्त्रीची वेदना, तिचे अस्तित्व, तिचे धाडस ठळकपणे पुढे येते. ‘अनसेड’, ‘नाळबंद’, ‘बरकत’, ‘ओली बाळंतीण’ यांसारख्या कथांमध्ये स्त्रीची परंपरेशी झुंज, मानसिक ताण तसेच व्यवस्थेने घालून दिलेल्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न दाखवला आहे.

‘अनसेड’ ही कथा विशेष लक्षवेधी आहे. मानसीच्या ‘चुकी’कडे समाज दोषारोपाने बघतो. मात्र मोहसीन तिच्याकडे माणूस म्हणून पाहतो. शेवटच्या एका वाक्याने ही कथा स्त्रीचे स्वातंत्र्य, लैंगिकता आणि पुरुषसत्ताक परंपरा यावर प्रश्न उभे करते. या कथेतून स्त्री-पुरुष संबंधातील ताण, लैंगिक स्वातंत्र्याचा प्रश्न आणि सामाजिक दडपशाही अधोरेखित होते. ही कथा स्त्रीला दोषारोपित करण्याच्या प्रवृत्तीवर थेट प्रहार करते. त्याचवेळी ती आजच्या समाजातल्या ‘मॉब लिंचिंग’सारख्या नव्या हिंसाचाराकडे मात्र डोळेझाक करते, हेही नमूद करता येईल.

‘ओली बाळंतीण’ ही कथा स्त्रीच्या सर्वात असुरक्षित क्षणातील दुर्दशा मांडते. स्त्रीच्या मातृत्वातील सर्वात नाजूक अवस्थेत समाज बघ्याच्या भूमिकेत उभा राहतो. इथे लेखकाने ‘या स्त्रिया आणि त्या स्त्रिया’ या विभागातून गरीब व श्रीमंत स्त्रियांच्या वास्तवातील तीव्र दरी दाखवली आहे. ही कथा वर्गसापेक्ष स्त्री-अनुभवांमधील भिन्नता दाखवते.

इथे नवश्रीमंती आणि सर्वहारा स्त्रियांच्या जीवनातील तीव्र दरी उघड होते. अशा दरीतून वर्गभेद, स्त्रीच्या शरीरावर नियंत्रण आणि सामाजिक सहानुभूतीचा अभाव प्रकर्षाने पुढे येतो. याच कथेत महिला महोत्सवाच्या शोसाठी निवेदक म्हणून आलेल्या नायकाच्या मनात महिलांकडे पाहून अनेक प्रश्न उभे राहतात. हे प्रश्न मांडताना त्याची अपेक्षा अशी आहे की, स्त्रियांनी बंडखोर जनी, हिरकणी, सावित्रीबाई तसेच चवदार तळ्याच्या लढ्यातील स्त्रियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी बंडखोरी करणाऱ्या स्त्रियांचा वारसा पुढे न्यावा.

कथेच्या सुरुवातीला “पाठ उघड्यांनी, नाभी दर्शनी पोटं, बोलणं मोठं” अशा शब्दांतून स्त्रीशरीरावर शेरे मारले गेले आहेत, असे भासते. मात्र कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा नवश्रीमंती मिरवणाऱ्या स्त्रिया आणि अब्रूला कवटाळून जगणाऱ्या गरीब स्त्रिया यांच्यातील खोल दरी स्पष्ट होते. म्हणजेच ‘या स्त्रिया आणि त्या स्त्रिया’ यातील असमानता ठळकपणे अधोरेखित होते. निवेदकाच्या स्वगतातून ‘आहे रे आणि नाही रे’ (सर्वहारा) या दोन गटांतील स्त्रियांच्या स्थितीतील विदारक वास्तव उलगडले जाते. तो स्पष्टपणे सांगतो की, श्रीमंतीकडे वाटचाल करणाऱ्या या नवश्रीमंत महिला कष्टकरी, सर्वहारा स्त्रियांच्या दुःखांविषयी बोलतच नाहीत. आर्थिक संकटात सापडलेल्या मुलीचे जगणे, परिस्थितीपोटी देहव्यवसाय करावा लागणाऱ्या मुलीचे वेदनादायी वास्तव या ओळी वाचकाला अस्वस्थ करतात. नायकाने दिलेल्या अनेक उदाहरणांतून ही ब्राम्होभांडवली व्यवस्था स्त्रियांचे कशाप्रकारे शोषण करते, हे कथेत तीव्रतेने उलगडले गेले आहे.

‘बरकत’ ही कथा सहजीवनाच्या परंपरेतील आनंद आणि माणुसकीची उब दाखवते. वरकरणी ही कथा एका विशिष्ट धर्मसमुदायाला गुन्हेगाराच्या चौकटीत उभे करून घडवलेल्या दंगलीची कहाणी सांगते. मात्र तिच्या आशयातून फक्त हिंसा किंवा तणाव जाणवत नसून त्यातून उमलणारे मानवी नात्यांचे भाव लक्ष वेधून घेतात. रियाज आणि फातिमाचा संसार, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेले त्यांचे दुकान धर्मांधतेच्या कुरघोडीवर आधारलेल्या राजकारणाने आगीच्या हवाली होते. पण या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवरही फातिमा नमाज अदा करताना आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी आणि कुटुंबाच्या रोजीरोटीत बरकत यावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करते.

आज या देशात विविधतेत एकता हे आदर्श रूप असूनही, धर्माधर्मात फूट पाडण्याचे गलिच्छ राजकारण सर्वत्र सुरू आहे. तरीही रियाजच्या नुकसानीने सर्वसामान्य लोकांच्या हृदयात हळहळ उमटते. त्यामुळे वाचकाच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो, मग हे सर्व कोण करते आहे? या प्रश्नाचे उत्तर वाचकाला ठाऊक असूनही त्याला नाकारता येत नाही. धार्मिक अतिरेकाने आज टोक गाठले असले, तरी सर्वसामान्य माणूस अजूनही दुसऱ्या माणसाकडे माणूस म्हणूनच पाहतो आणि जगण्याचा एक समान भाग मानतो, हा या कथेचा मूळ आशय आहे.

‘सविनय अस्वस्थ’ ही कथा एका संगीत कार्यक्रमाभोवती फिरते जिथे कलाकार, नेते आणि समाजातील लोक एकत्र येतात. निवेदक हा कार्यक्रम सांभाळतो. गाणी, वादक, मानधन आणि पैशांची व्यवस्था करतो. परंतु त्याच्या मनात कलात्मक आनंद आणि व्यावसायिक दबाव यात सतत संघर्ष सुरू असतो. कार्यक्रमात सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषमता दिसून येते आणि निवेदक आपल्या मुलीला डॉ. आंबेडकर यांचे मूल्य सांगून सामाजिक जाणीव निर्माण करतो. ‘सविनय अस्वस्थ’ या कथेच्या माध्यमातून समकालीन मनुवादी, सनातनी आणि व्यवस्थेच्या कट्टरवादी भूमिकांचा तिरकस शब्दांमध्ये समाचार घेतलेला आहे.

एकंदरीत या सर्व कथांमधून सामान्य माणसाच्या जगण्याचे विविध पैलू समोर येतात. हे तेच पैलू आहेत ज्यांना व्यवस्थेने प्रदूषित, कलुषित आणि द्वेषाने भारून टाकलेले आहे. दुर्दैवाने सर्वसामान्य माणसाला या प्रदूषणाची, या कलुषतेची जाणीवसुद्धा होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. उलटपक्षी नकळतपणे हाच सर्वसामान्य माणूस त्या व्यवस्थेचा वाहक बनतो.

एकूणच, ‘सविनय अस्वस्थ’ हा कथासंग्रह पारंपरिक चौकटी मोडणारा, अस्वस्थ वास्तव उजागर करणारा ठरतो. लेखकाने तिरकस पण संयत शैलीत व्यवस्थेचे विद्रूप रूप दाखवले आहे. प्रत्येक कथा वाचकाला मानवी भावनांच्या जवळ नेते आणि त्याला विचार करायला भाग पाडते. या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो सामान्य माणसाच्या आयुष्याला केंद्रस्थानी ठेवतो. पण त्या आयुष्याला आकार देणाऱ्या सत्ताकेंद्रांचा उलगडा करतो. ब्राम्होभांडवली व्यवस्थेचे परिणाम, जात-धर्मीय विभागणी, शिक्षणातील कंपूशाही आणि स्त्रीशोषण यांचे संदर्भ लेखकाने तिरकस पण संयत शैलीत मांडले आहेत.

थोडक्यात, ‘सविनय अस्वस्थ’ हा संग्रह साहित्यकृती म्हणून भावनिक परिणाम घडवतो आणि एकाच वेळी सामाजिक दस्तावेज म्हणूनही महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक कथा वाचकाला अस्वस्थ करून जात असली तरी ही अस्वस्थता केवळ भावनिक राहत नाही, तर ती विचारांना दिशा देणारी ठरते. हा कथासंग्रह समाजाच्या विद्रूप संरचनेचा आरसा आहे. संग्रहातील कथा वाचताना वाचक केवळ भावनांच्या पातळीवर भारावून जात नाही, तर तो विचारांच्या स्तरावरही हलतो. प्रत्येक कथेतून एकच धागा सतत पुढे येतो. सामान्य माणसाचे जगणे व्यवस्थेच्या पकडीत अडकले आहे. पण त्याचवेळी त्या जगण्यात माणुसकीची झलक अजूनही शिल्लक आहे.

स्त्रीच्या आयुष्याविषयी लेखकाची संवेदनशीलता लक्षणीय आहे. ‘अनसेड’मधील मानसी असो, ‘ओली बाळंतीण’मधील नवमाता असो किंवा ‘बरकत’मधील फातिमा असो, यातील प्रत्येक स्त्री परंपरेशी, समाजाशी, वर्गभेदाशी झुंजत आहे. त्या स्त्रियांची चूक, त्यांचा संघर्ष, त्यांचे मौन हे सर्व वाचकाला अस्वस्थ करते. स्त्रीच्या भावनिक, लैंगिक आणि सामाजिक गरजा अजूनही पुरुषसत्ताक व्यवस्थेत गौण मानल्या जातात. दुसरीकडे धार्मिक दंगली, जात-धर्मीय विभागणी, आर्थिक विषमता आणि नवश्रीमंतीचे दडपण या गोष्टी सामान्य माणसाच्या जीवनाला कलुषित करतात. ‘बरकत’सारख्या कथेतून धार्मिक राजकारणाच्या विळख्यात अडकलेला समाज दिसतो. पण त्याच वेळी सामान्य माणूस अजूनही माणुसकी जिवंत ठेवतो याची खात्रीही मिळते. हीच संपूर्ण संग्रहाची तत्त्वमीमांसा ठरते. हा संग्रह स्त्रीच्या अस्तित्वाला केंद्रस्थानी ठेवतो, सामान्य माणसाच्या संघर्षाला आवाज देतो आणि व्यवस्थेच्या अन्यायाला उघड करतो.

‘सविनय अस्वस्थ’ हा कथासंग्रह सामाजिक, आर्थिक, स्त्रीवादी आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर समृद्ध प्रकाश टाकतो. परंतु या विषयसंपन्नतेमुळे कथानक कधी कधी गोंधळलेले वाटते. स्त्रिया केंद्रस्थानी असल्या तरी काही ठिकाणी पुरुष नायकाचे निरीक्षण प्रबळ असल्याने स्त्रियांचे अनुभव पूर्णपणे उलगडत नाहीत. आर्थिक विषमता, धार्मिक कट्टरता, जातीभेद आणि स्त्रीशोषण यामुळे सततची अस्वस्थता निर्माण होते, जी काही वाचकांसाठी कथानक वाचणे अवघड करते. तसेच महाराष्ट्राभिमुख स्थानिक संदर्भ आणि प्रत्यक्षवादी, वैचारिक व कलात्मक शैलीतील मिश्रण कथानकाचा प्रवाह कधी कधी बाधित करते. या सर्व घटकांमुळे कथासंग्रह समृद्ध असला तरी सुसंगत अनुभव, पात्रांचा प्रभाव आणि वाचकाची सहज गुंतवणूक काहीशी मर्यादित राहते.

सांस्कृतिक राजकारणात व्यवस्थेत थेट हस्तक्षेप करणारे, काही वेगळे मांडणारे लेखन आणि साहित्य बेदखल होऊ नये, म्हणून या कथासंग्रहाची दखल घेणे आवश्यक आहे.

साहित्याच्या आस्वादक व सामाजिक चळवळींच्या अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in