

शिक्षणगुज
युवराज माने
शाळा ही केवळ शिक्षण देणारी जागा नसून ती मूल्यांची जडणघडण करणारी जिवंत प्रयोगशाळा असते. इथेच मुलांच्या मनात संवेदनशीलतेची आणि निसर्गप्रेमाची बीजं अलगद रुजतात.
शाळा म्हणजे केवळ चार भिंतींमधला अभ्यास नव्हे; ती एक जिवंत प्रयोगशाळा असते. इथे पाठ्यपुस्तकातील शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरतात आणि मुलांच्या मनात नकळत मूल्यांची बीजं रुजतात. शिक्षक बोलतो तेवढंच शिक्षण नसतं; मुलं पाहतात, अनुभवतात, विचार करतात आणि त्यातून स्वतःचं जग घडवतात.
असाच एक साधा, पण मनाला स्पर्शून जाणारा प्रसंग आमच्या शाळेत घडल आणि त्या दिवशी आम्हाला निसर्गाशी नातं कसं जोडायचं, याचा सुंदर धडा मिळाला.
नेहमीप्रमाणेच शाळा भरली होती. परिपाठ सुरू झाला होता. सकाळचा प्रसन्न वारा, लेकरांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू आणि शब्दांमधला ताल सगळं काही सुरेख जुळून आलं होतं. इतक्यात शाळेच्या आवारात एक लोककलावंत आले- रसूल भाई. त्यांच्या येण्याने वातावरणात एक वेगळीच उत्सुकता दाटली. लेकरांच्या भुवया उंचावल्या; कुतूहलाचा तिसरा डोळाच उघडला जणू.
माने गुरुजींनी तत्परतेने जयश्री आणि रुपालीला बोलावून “लवकर दोन गुच्छ तयार करा.” असं सांगितलं. शीतलला शाल व इतर साहित्य गोळा करण्यास सांगितलं. इकडे परिपाठ ममता सांभाळत होती. सगळं सुरळीत सुरू होतं.
पण परसबागेत एक वेगळंच दृश्य दिसलं. रुपालीने जास्वंदीच्या झाडावरील सर्व फुलं आणि कळ्याही तोडल्या होत्या. शीतल तिला समजावत होती. तिच्या डोळ्यांत राग नव्हता, पण वेदना होती. “एक गुच्छासाठी एक-दोन फुलं पुरेशी असतात ना? मग सगळीच फुलं आणि कळ्या का तोडल्यास? किती वाईट वाटलं असेल त्या झाडाला!” ती म्हणाली.
हा प्रश्न ऐकून सगळेच थबकलो. झाडालाही वाईट वाटतं- ही जाणीव किती कोवळी, किती निर्मळ!
रुपाली चिडून म्हणाली, “तू तर रोज फुलं तोडून आणतेस आणि गुरुजींच्या खुर्चीवर ठेवतेस, तेव्हा नाही का होत त्याला त्रास?”
क्षणभर शांतता पसरली. तेव्हा शाळेची मुख्यमंत्री ईश्वरी शांतपणे म्हणाली, “तुम्हाला माहीत नाही; शीतल फुलं तोडण्यापूर्वी त्या झाडाला विनंती करते.”
काही मुलं हसू लागली. ममता म्हणाली, “झाडाला विनंती? वेडी आहे ती!” शीतल खाली मान घालून उभी राहिली. पण ईश्वरी पुढे म्हणाली, “ती म्हणते- ‘माझ्या प्रिय मित्रा, आमच्या शाळेत पाहुणे आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मला चार फुलं देशील का?’ मगच ती फुलं तोडते.”
वर्गात पुन्हा शांतता दाटली. काहींच्या डोळ्यांत पाणी तरळलं. स्वाती, प्रयास, प्रतीक भावूक झाले. गुरुजींनी शीतलला जवळ घेत विचारलं, “हे कसं सुचलं तुला?”
शीतल म्हणाली, “गुरुजी, वाचनाच्या आनंद सोहळ्यात आपण ‘श्यामची आई’ वाचलं. त्यात श्यामची आई म्हणते ना- कळ्या तोडू नयेत आणि प्रवीण दवणे सर सांगतात, की आपण स्वतः झाडं लावावीत. दुसऱ्यांच्या झाडांची फुलं तोडताना नेहमी परवानगी घ्यावी.”
त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं- पुस्तकातलं शब्दफूल आज प्रत्यक्ष कृतीत उमललं होतं. त्या दिवशी रसूल भाईंचा कार्यक्रम रंगला, गाणी दुमदुमली; पण खरा सूर लागला तो शीतलच्या संवेदनशील मनाचा. एका छोट्याशा विनंतीतून तिने आम्हाला निसर्गाशी नातं कसं जोडावं, हे शिकवलं.
शिक्षणगूज : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नव्हेत; तर त्या धड्यांमधून उमलणारी जाणीव आहे. फुलं तोडण्याआधी झाडाची परवानगी मागणं ही कदाचित बालिश गोष्ट वाटेल; पण त्यात निसर्गाशी मैत्रीचा, संवेदनशीलतेचा आणि कृतज्ञतेचा धडा दडलेला आहे. ‘श्यामची आई’तील शिकवण जर मुलांच्या कृतीत उतरली, तरच वाचनाचा खरा आनंद सोहळा साजरा होतो. फुलं तोडणं थांबवणं एवढंच नव्हे; तर मनात करुणेची कळी उमलणं- हेच शिक्षणाचं खरं यश. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट शिकली- विनंती करून घेतलेलं फूलच खऱ्या अर्थाने सुगंधी असतं.
लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात
yuvrajmane892@gmail.com