विज्ञानातील कल्पवृक्ष

जग सध्या अत्यंत प्रतिकूल कालखंडातून मार्गक्रमणा करीत असताना विज्ञानभाष्यकार, विज्ञानकथाकार, अंधश्रद्धा निर्मूलनातील खंदे कार्यकर्ते आणि ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले असले तरी त्यांचे प्रगत, विज्ञानवादी, विवेकवादी, समन्वयवादी व मानवतावादी विचार व कार्य यापुढेही देशाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व कल्पवृक्षाप्रमाणे उपयोगी ठरेल.
विज्ञानातील कल्पवृक्ष
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

जग सध्या अत्यंत प्रतिकूल कालखंडातून मार्गक्रमणा करीत असताना विज्ञानभाष्यकार, विज्ञानकथाकार, अंधश्रद्धा निर्मूलनातील खंदे कार्यकर्ते आणि ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले असले तरी त्यांचे प्रगत, विज्ञानवादी, विवेकवादी, समन्वयवादी व मानवतावादी विचार व कार्य यापुढेही देशाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व कल्पवृक्षाप्रमाणे उपयोगी ठरेल.

मोबाइल युगाने अवघे जग हाताच्या पंजावर आले असताना जगातील प्रमुख महासत्तांच्या नाठाळ व अवगुणी नेत्यांच्या नवनव्या कारनाम्यांनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावण्याऐवजी त्या अधिक संकुचित होऊ लागल्या आहेत. जागतिक सलोखा, सहिष्णुता, सहकार्य, उदारमतवाद मागे पडत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी मागच्याच गुरुवारी नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधकांची फॅक्टरी असलेल्या जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठातील विदेशी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया तडकाफडकी रद्द केली. विदेशी विद्यार्थ्यांनी अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा किंवा अमेरिका सोडावी, असे फर्मान काढून विद्यादानाच्या पवित्र कार्यालाच हरताळ फासला. या फर्मानाला तेथील फेडरल कोर्टाने दुसऱ्याच दिवशी केराची टोपली दाखवली. याआधीही याच ट्रम्प महाशयांनी जगावर व्यापार कर लावला व हा प्रयोग अंगलट येण्याची शक्यता बळावताच तो माघारीही घेतला.

जगभरातील नेत्यांचा असा लहरी, मनमानी कारभार आपण पाहतोच आहोत. आपल्या देशातही काही वेगळी परिस्थिती नाही. आपल्याकडेही हुंडाबळी, बुवाबाजी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, विद्वेष व सुडाचे राजकारण जोशात सुरू आहे. अलीकडच्या काळात विशिष्ट धर्मीयांना शाळा, निवासी इमारतींमध्ये प्रवेश नाकारण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. त्यांच्या घरावर, दुकानांवर बुलडोझर फिरविले जात आहेत. या देशात कधी नव्हे इतका रंग, वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत, पेहराव, खाण्यापिण्यावरून भेदभाव केला जात आहे. म्हणूनच अशावेळी विचार-कार्याची बांधिलकी जपत, अंधश्रद्धेला नाकारत तर्कसंगत व विज्ञानवादी विचार रुजविणाऱ्यांची देशाला व जगाला नितांत गरज आहे.

ज्या महासत्तांनी जगाला मानवतेच्या कल्याणाचे, उदारमतवादाचे धडे द्यायचे त्यांनीच अशी धरसोडीची व संकुचित भूमिका घेतली, तर जगभरातील गोरगरीब देशांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? खरे तर आम्ही उच्चवर्णीय, आम्ही श्रेष्ठ हा बुरसटलेला तकलादू विचार केव्हाच इतिहासजमा झालेला आहे. तथापि, शिळ्या कढीला ऊत आणण्याची खुमखुमी अजूनही काही जणांमध्ये आहे व ती रोखण्याचे नैतिक अधिष्ठान विज्ञानवादी संकल्पनांमध्येच आहे.

विश्व प्रसरण पावत असल्याचे दावे प्रबळ होत असतानाच, विश्व कधीच प्रसरण पावत नसल्याचा सिद्धांत सर फ्रेड हॉयल व डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडून एक नवे संशोधन जगापुढे आणले. यानंतर जागतिक संशोधन क्षेत्रात नामी संधी खुणावत असतानाही ‘गड्या आपला गाव बरा’ या न्यायाने डॉ. नारळीकर यांनी आपली मायभूमी गाठली. प्रारंभी, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधनपर काम केले. पुढे त्यांनी पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिक शास्त्र केंद्राची (आयुका) मुहूर्तमेढ रोवली. देशाच्या दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थी, संशोधक, जिज्ञासू या संस्थेला भेट देऊन तिथे विज्ञान संशोधनाची धुळाक्षरे गिरवीत आहेत. उच्च दर्जाचे आधुनिक शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानकक्षा रुंदावत आहेत. त्याद्वारे वैज्ञानिकांना, संशोधकांना आपले मुक्त विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ खुले झाले आहे व ही समस्त देशवासीयांसाठी अभिमानाचीच बाब ठरली आहे.

डॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र, विश्वउत्पत्तीशास्त्राला आपल्या मूलभूत संशोधन कार्यातून नवा आयाम दिला. आपल्या विज्ञान साहित्याच्या माध्यमातून एक सर्जनशील विज्ञानकथाकार म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांनी विज्ञानाच्या प्रचार, प्रसार कार्याला वाहून घेतले. एक माणूस म्हणून, एक समाजप्रबोधक म्हणून दुसऱ्याच्या कामी येण्याची भूमिका सातत्याने घेऊन एक शिक्षक, मार्गदर्शकाच्या रूपाने ती अविरतपणे निभावली आहे. जिज्ञासा, प्रयोग, निरीक्षण, कारणमीमांसा, चिकित्सेला उत्तेजन देऊन विज्ञानरंजनातून त्यांनी विज्ञान अभिरुचीसंपन्न समाजनिर्मितीसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.

इंटरनेट विस्ताराचे मर्म ओळखून त्यांनी वेब पेज उलगडणारे तंत्रज्ञान आत्मसात करीत डाटा सायन्समध्ये प्रगती साधण्यासाठी विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहन दिलेले आहे. आपल्या संशोधन क्षेत्रातील नवनवे प्रयोग जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत व त्यातून देशाच्या प्रगतीला हातभार लाभावा यासाठी डॉ. नारळीकर हे सतत कार्यरत राहिले आहेत. म्हणूनच ते जनसामान्यांचे खगोलशास्त्रज्ञ ठरले आहेत. त्यांनी आपल्या विज्ञान कथा समस्त वाचकांपर्यंत पोहोचवून विज्ञान कथाक्षेत्रात अभिनव क्रांती घडवली आहे. सोप्या भाषेतून विज्ञानविश्वाचे गुंतागुंतीचे पदर अलगद उलगडून दाखवले आहेत. मुख्य म्हणजे साधी राहणी व उच्च विचारसरणीचा अंगिकार करीत एक व्यक्ती म्हणून, एक विज्ञान कथाकार म्हणून ते सर्वसामान्यांना सहजच भेटत बोलत राहिले. यातूनच त्यांची महानता दिसून आलेली आहे.

आपल्या अवतीभोवती अंधश्रद्धेचा बाजार फोफावत असून भोंदू बुवा, बाबा, महाराजांना बरकत आली आहे. फलज्योतिष व वास्तुदोषाच्या भ्रामक संकल्पनांचे थोतांड माजले आहे. ते लक्षात घेता, अनिष्ट रूढीपरंपरांमध्ये खितपत पडलेल्या आपल्या देशवासीयांना काळाच्या कसोट्यांवर उतरणारा विवेकवादी, मानवतावादी, विज्ञानवादी दृष्टिकोन देण्याचे काम डॉ. जयंत नारळीकर यांनी सातत्याने केले आहे. कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता आपले विज्ञानवादी विचारांचे अनमोल संशोधन विज्ञान कथांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे. आपले खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र, विश्वउत्पत्तीशास्त्रातील ज्ञान संशोधन प्रयोगशाळेतून, विद्यापीठातून थेट जिज्ञासूंच्या माजघरात, विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेत, शेतकऱ्यांच्या बांधावर नेले आहे. विज्ञान कथांना प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवून दिला आहे. समाजाला विज्ञानवादी विशाल दृष्टिकोन दिला आहे. उदारमतवादाची सांगड घालून लोकशाही मूल्यांना व विज्ञानवादी विचारांना सामाजिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे. तथापि, माणूस पूर्णत: विज्ञानिष्ठ झालेला नसल्याने विज्ञानाच्या प्रचार व प्रसारास अजूनही बराच वाव आहे.

अभिजात रसिकतेला चिंतनाचा स्पर्श लाभलेले भाषाप्रभू, विज्ञानाची लोकप्रियता वृद्धिंगत करण्याबरोबरच तिचे लोकशाहीकरण करणारा अवलिया, विज्ञानाच्या मुक्तचिंतनाचा उद्गाता, विज्ञान सामान्यांपर्यंत नेणारा असामान्य विज्ञानतपस्वी, जनसामान्यांचा विज्ञाननायक ठरलेले डॉ. जयंत नारळीकर हे आज आपल्यात हयात नसले तरी त्यांचे विचार व कार्य व्यक्ती, समाज, देशच नव्हे, तर जगासाठी यापुढेही प्रेरणा देत राहील.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in